बिहारच्या निवडणुकीची तयारी कुठपर्यंत आली?

राजकारण म्हंटलं की अनिश्चितता कन्फर्म. म्हणजे कोण कधी कोणासोबत युती करेल, कोण नवीन पक्ष काढले, आणि कोणता पक्ष निवडून येईल आणि कधी कोण मुख्यमंत्री होईल याची खात्री देवूच शकत नाही.

राबडी देवींच उदाहरण इतिहासात साक्षी आहे.

दुसरं उदाहरण द्यायचं तर अगदी अलिकडचं २०१४ ला नितीश कुमार नरेंद्र मोदींना पंतप्रधान पदाचे उमेदवार घोषित करण्याच्या मुद्द्याला विरोध करुन NDA मधून बाहेर पडले. आणि २०१५ च्या निवडणूकीत कट्टर विरोधक असलेल्या लालू प्रसाद यादवांशी युती केली न् सत्तेत देखील आले.

पुढे २ वर्षात लालुंचा धाकटा मुलगा आणि त्यांच्या कॅबिनेट मध्ये उपमुख्यमंत्री असलेल्या तेजस्वी यादव वर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. त्यामुळे उपमुख्यमंत्र्यालाच राजीनामा द्यायला लावला.

तेजस्वीने नकार दिल्यानंतर नितीशकुमारांनी स्वतःच राजीनामा दिला न् अवघ्या ११ तासांत विरोधी पक्षात असलेल्या भाजपशी युती करुन पुन्हा मुख्यमंत्रीपदी आले.

आता बिहारमध्ये पुन्हा निवडणूका होत आहेत.

सध्या कोरोनामुळे अजून तारखा जाहिर झालेल्या नसल्या तरी २९ नोव्हेंबर पुर्वी या निवडणूका संपतील असं आयोगानं सांगितलं आहे. पण विरोधी पक्षांनी कोरोना आणि बिहार मधील महापूराच्या पार्श्वभुमीवर या निवडणूका पुढे ढकलण्याची मागणी केली आहे.

तर सर्वोच्च न्यायालयात देखील यासंदर्भातील याचिका केली गेली होती. मात्र ती फेटाळून लावण्यात आली आहे. त्यामुळे ऑक्टोंबर-नोव्हेंबरमध्ये इथे निवडणूका होणार हे नक्की आहे.

सध्या काय चालू आहे ?

तर अशा या बिहारमध्ये निकालानंतर कोण किती पाण्यात हे कळेलच पण सध्या तिथल्या राजकारणात काय चाललयं? कोण काय करतयं ? कोणाची तयारी कुठे पर्यंत आलीय? याचा बोल भिडूने घेतलेला आढावा.

एनडीए विरुद्ध महागठबंधन अशीच होईल निवडणूक

 एनडीए अद्याप जागा वाटपात :

बिहारमधील सत्ताधारी दोन्ही पक्ष म्हणजे भाजप आणि जेडीयु अद्यापही जागा वाटपामध्येच व्यस्त आहे. २४३ सदस्य संख्या असलेल्या विधानसभेसाठी भाजपनं खूप आधीच मान्य केलं आहे की जेडीयुचं मोठा भाऊ असून नितीशकुमारांच्या नेतृत्वामध्येच आम्ही सरकार बनवणार आहे. त्यामुळे जेडीयु आमच्यापेक्षा एक तरी जागा जास्त लढवणार आहे. सध्या जेडीयुचे ७१ आणि भाजपचे ५३ सदस्य आहेत. बहूमतासाठी १२२ जागांची गरज आहे.

२०१० च्या निवडणूकांमध्ये जेव्हा जेडीयु – भाजप एकत्र होते तेव्हा जेडीयु १४१ आणि भापज १०२ जागांवर निवडणूका लढला होता. तर आता जेडीयुचं म्हणणं आहे ते स्वतः ११५ जागा लढवतील आणि भाजपनं १२८ जागांवर लढावं. आणि रामविलास पासवानांच्या एलजेपीला भाजपच्या कोट्यातुन जागा द्याव्यात.

देवेंद्र फडणवीस भाजपचे प्रभारी :

सध्या बिहारच्या निवडणूकांसाठी भाजपकडून प्रभारी म्हणून देवेंद्र फडणवीस आहेत. त्यांनी आधीच भाजपच्या डिजीटल प्रचाराला सुरुवात केली असून जागा वाटपासंदर्भातील स्थानिक पातळीवर अंतिम निर्णय आणि हायकमांडशी चर्चा तेच करणार आहेत.

भाजपने महाराष्ट्रातील निवडणुका देवेंद्र फडणवीस यांच्याच नेतृत्त्वाखाली लढल्या होत्या. महाराष्ट्रात भाजपनं सत्ता स्थापन केली नसली, तरी त्यांनाच सर्वाधिक जागा मिळाल्या. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्व कौशल्याबाबत केंद्रातील नेत्यांना विश्वास आहे.

महागठबंधनमध्ये ९ पक्ष एकत्र :

एनडीए सोबत बिहारमधील महागठबंधनचही जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. राष्ट्रीय जनता दल, कॉंग्रेस, राष्ट्रीय लोक समता पक्ष, हिंदुस्थानी आवाम मोर्चा, विकासशील इन्सांन पक्ष, झारखंड मुक्ती मोर्चा या पक्षांसह आता डावे पक्ष देखील या महागठबंधनमध्ये आले आहेत.

परंतु बॉस तर सर्वाधिक जागा असलेले लालु प्रसाद यादवच ठरणार आहेत.

ते सध्या निवडणूकीच्या रिंगणात नाहीत पण सगळे दोर त्यांच्याच हातात आहेत. कॉंग्रेसच्या सध्याच्या लढवत असलेल्या ४१ जागा आणि नवीन ५० अशा ९१ जागांवर निवडणूक लढवू इच्छित आहे. तर राजदनं २०१५ मध्ये १०१ जागा लढविल्या होत्या. त्यामुळं यावर्षी ते किती जागांवर लढवणार आणि कॉंग्रेससह इतर आठ पक्षांना किती देणार हे लवकरच कळेल.

तर समाजवादी पक्षानं आपण बिहारची निवडणूक लढवणार नसल्याचं मार्चमध्येच सांगितलं आहे. त्यांनी राजदला पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे.

एमआयएम लढविणार निवडणूका :

बिहारमधील विधानसभा निवडणूक अखिल भारतीय मजलिस-ए-इत्तेहदूल मुस्लिमीनने (एमआयएम) लढविणार असल्याचं पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी सांगितलं आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक लढविल्यानंतर ते आता बिहार विधानसभेसाठी तयारी करत आहेत.

बिहारच्या सीमांचल प्रदेशातील अरारिया, पूर्णिया, किशनगंज आणि कटिहार या जिल्ह्य़ांतील विधानसभा मतदारसंघांतून उमेदवार रिंगणात उतरविण्यात येणार आहेत, असं ओवेसी यांनी सांगितलं आहे.

शिवसेना पुन्हा बिहारच्या निवडणूका लढवणार :

२०१५ नंतर शिवसेना आता पुन्हा एकदा बिहारची निवडणूक लडवणार आहे. अशी घोषणा पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते संजय राऊत यांनी केली आहे.

आम्हाला उत्तर भारतामध्ये आमचा जनाधार वाढवायचा आहे असं त्यांनी सांगितलं आहे.

गुजरात, गोवा राज्यांच्या निवडणूकीनंतर बिहारची ही निवडणूकीत आम्ही पुर्ण उतरणार आहे. असं ही राऊत यांनी सांगितलं आहे. शिवसेना एकुण १४० जागांवर आपले उमेदवार उभे करणार आहे. २०१५ मध्येही शिवसेनेनं १४० जागा लढविल्या होत्या. मात्र एक ही जागा जिंकता आली नव्हती. त्यांना ०.६ टक्के मतं मिळाली होती.

 यंग ब्रिगेड मैदानात :

बिहारच्या राजकारणात सध्या मुख्य पक्षांसोबतच चार यंग ब्रिगेडची चर्चा जोरात चालू आहे. यापैकी तिघं जण हे राजकीय पार्श्वभुमी असेलेचं नेते आहेत. तर एक जण सुप्रसिद्ध राजकीय रणणितीकार आहेत.

तेजस्वी यादव :

लालु प्रसाद यादव यांचे धाकटे पुत्र आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव हे सध्या पक्षाचा प्रमुख चेहरा झाले आहेत. लालु प्रसाद यादव यांच्यावर निवडणूक लढविण्याची बंदी असल्यानं ते सध्या पडद्यामागुन सुत्र हालवत आहेत. तसेच महागठबंधनमध्ये नऊ पक्ष असल्यामुळे तेजस्वी यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

लालु यादव आता वृद्ध होत आहेत. त्यामुळे आगामी काळात वारसदार आणि २०१५ च्या निवडणूकीत आगामी मुख्यमंत्री म्हणून त्यांना प्रोजेक्ट करण्यात आलं. मागील निवडणुकीत मोठा विजय प्राप्त करून तेजस्वी यादव उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. मात्र, सत्ता टिकवता आली नाही. आता या निवडणूकीत ते कसं प्रदर्शन करतात ते पाहू.

प्रशांत किशोर :

सुप्रसिद्ध इलेक्शन मॅनेजर म्हणून प्रसिद्ध असलेले प्रशांत किशोर यांनी सध्या ‘बात बिहार की’ हे अभियान सुरु केलं आहे. या अभियानामधून ते म्हणतात बिहारचा पाहिजे तसा विकास झालेला नाही, आपण बिहार राज्याला देशातील पहिल्या १० राज्यांमध्ये स्थान मिळवून देऊ, असा दावा केला आहे. आपण कोणताही पक्ष स्थापन करणार नसून या अभियानातुन आपण बदल घडवून आणू असं त्यांनी म्हंटलं आहे.

प्रशांत किशोर यापुर्वी जेडीयुचे राष्ट्रीय उपाध्यक्ष होते. मात्र वैचारिक आणि विकासाच्या बाबतीत नितीश कुमारांशी मतभेद झाल्यानंतर त्यांना पक्षातुन काढून टाकण्यात आलं आहे. यानंतर त्यांनी नितीश कुमारांवर टिका करत त्यांचा उल्लेख ‘पिछलग्गू’, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टिका करत त्यांचा उल्लेख ‘गुजरातवाला’ असा केला. भाजप-जेडीयू आघाडीवर टीका करताना ते म्हणाले गांधी आणि गोडसे एकत्र कधीच वाटचाल करू शकत नाहीत.

प्रिया पुष्पम :

बिहारच्या राजकारणात एका नव्या नेत्याची राजकीय एन्ट्री झाली आहे. पुष्पम प्रिया चौधरी असं त्या मुलीचं नाव आहे. बिहारच्या दरभंगा या ठिकाणी आपल्या शैक्षणिक करियरला सुरवात करत प्रियानं सिंबायोसिस पुणे, जे. एन. यू. दिल्ली आणि नंतर जगविख्यात लंडन स्कूल ऑफ इकनॉमिक्स या विद्यापीठातून ‘ लोक प्रशासन ‘ या विषयांत पदवी घेतली आहे.

काही दिवसांपूर्वी प्रियानं ‘प्लुरल पार्टी’ नावाच्या पक्षाची घोषणा देखील केली आहे. आणि या पक्षाची मोठी कँपैन टीम सुद्धा उभारली आहे. ‘लव बिहार, हेट पॉलिटिक्स’ हे तिच्या पक्षाचे ब्रीद वाक्य आहे. प्रिया गेल्या अनेक दिवसांपासून बिहार मधल्या ग्रामीण इलाख्यात आपल्या पक्षाची ताकत वाढवणे कामी दौरे देखील करते आहे. तसेच तिनं बिहारच्या मुख्यमंत्रीपदावर दावा सांगत तिथल्या वर्तमानपत्रामध्ये मोठ्या जाहिराती देखील आहेत. विषेश म्हणजे प्रियाचे वडिल हे जेडीयुचे सिटींग आमदार आहेत. तर तिचे आजोबा ही नितीश कुमारांचे कट्टर समर्थक होते.

चिराग पासवान :

सत्तारूढ आघाडीत रामविलास पासवान यांचा लोकजनशक्ती पक्ष आहे. लोकसभेत एकही खासदार निवडून आलेला नसताना ते स्वतः केंद्रात मंत्री आहेत. मात्र, हा पक्ष सत्तारूढ आघाडीत राहील की नाही, याबद्दल शंका आहेच. याचं कारण म्हणजे या पक्षाचे आजचे नेते चिराग पासवान.

नव्या दमाच्या चिराग यांनी अलीकडेच पक्षाच्या १४८ जणांची यादी जाहीर केली, ज्यांना पक्षातर्फे उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. तसचं वेळ पडली आमची सर्वच्या सर्व २४३ जागा लढविण्याची ही तयारी आहे. असं ही सांगितलं आहे. दुसऱ्या बाजुला मात्र एनडीएच्या बैठकांमध्ये ही ते हजेरी लावत आहेत.

 या मुद्द्यांवर प्रचाराचं रण तापु शकत :

कोरोना :

कोरोना महामारीचा प्रश्न, लॉकडाऊन आणि अर्थव्यवस्था हा विरोधकांच्या अजेंड्यावरचा विषय असणार आहे. तर १० कोटी लोकसंख्या असलेल्या राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दोन लाखांच्या आतच म्हणजे १ लाख ६९ हजार इतकी आहे. तर बरे झालेल्या रुग्णांची संख्या १ लाख ५५ हजार आहे. तर मृत रुग्णांची संख्या ८६४ इतकी आहे.

त्यामुळे एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या राज्यात कोरोना उद्रेक झालेला नसल्याचे सांगत सत्ताधाऱ्यांसह गृहमंत्री अमित शहांपर्यंत बिहार सरकारचं सभांमधून कौतुक केलं आहे.

तसचं कोरोना नंतरची ही पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे कोरोना आणि लॉकडाऊनच यशापयशाच्या बाबतीत राष्ट्रीय मुड काय आहे आणि आगामी वर्षात उत्तर-प्रदेशची निवडणूक या दोन्हींची लिटमस टेस्ट म्हणजे बिहारची निवडणूक असणार आहे.

बेरोजगारी :

जेव्हा केंद्र सरकारनं एप्रिलमध्ये लॉकडाउन जाहिर केलं तेव्हा, बिहारमध्ये मोठ्या संख्येनं लोक इतर ठिकाणांहून त्यांच्या घरी आले. सरकारी आकडेवारीनुसार, १५ लाख लोक रेल्वेनं आले तर दोन लाख लोक बसमधून आले. तर मे मध्ये बिहार सरकारनं बेरोजगारांसाठी १ हजार रुपये मदतीची घोषणा केली होती. त्यासाठी २९ लाखांहून अधिक लोकांनी नोंदणी केली आहे.

तसेच यापुर्वीच्या निवडणूकांमध्ये बाहेरील शहरांमध्ये काम करणारे हे मतदार आता लॉकडाऊनमुळे घरी आहेत. त्यामुळे मतदानाच्या संख्येत पण वाढ होण्याची शक्यता आहे. या सर्व बाहेरुन आलेल्या आणि बेरोजगार असलेल्या मतदारांचे प्रश्न विरोधी पक्ष उचलुन धरणार हे नक्की!

महापूर :

बिहारमध्ये मागील पाच वर्षात तिसऱ्यांदा महापूराचा फटका बसला आहे. २०१९ साली राज्यातील ३८ पैकी १३ जिल्ह्यांमधील जवळपास ८३ लाख नागरिक या महापूरानं प्रभावित झाले होते. तर या वर्षी जुलै-ऑगस्ट मध्ये १६ जिल्ह्यांमधील ६३ लाख नागरिकांना या महापूराचा फटका बसला होता. त्यांच्या मदतीचा प्रश्न हा विरोधकांच्या प्रचाराचा स्थानिक मुद्दा होवू शकतो.

कृषी विधेयक :

कृषी विधेयकाचं मुख्यमंत्री नितीशकुमारांसह सगळ्या सत्ताधाऱ्यांनी स्वागत केलं आहे. मात्र लालु प्रसाद यादव यांच्यासह विरोधकांनी या कायद्याचा निषेध केला आहे. ते म्हणतात, बिहारमध्ये बाजार समिती कायदा २००६ मध्येच रद्द केला आहे. त्यामुळे तेव्हापासून राज्याच्या अन्नधान्य खरेदीच्या लक्ष्यापैकी एकुण १ टक्के सुद्धा खरेदी झालेली नाही. त्यामुळे या दोन्हीच्या विरोधात राजद येत्या २५ तारखेपासून जिल्हा मुख्यालयावर आंदोलन करणार आहे.

सुशांतसिंग राजपुत आत्महत्या प्रकरण :

मागील शनिवारी भाजपच्या कला व संस्कृती गटानं ‘जस्टिस फॉर सुशांत सिंह राजपूत’ या हॅशटॅगचा स्टिकर व सुशांतच्या चेहऱ्याचा मास्क प्रसिद्ध केला आहे. या स्टिकरवर सुशांतचा हसरा चेहरा असून त्यावर ‘न भूले है, न भूलने देंगे’, असा संदेश लिहिला आहे. भाजपने असे २५ हजार स्टिकर व ३० हजार मास्क तयार केले असून ते आता जनतेत वाटले जाणार आहेत.

तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कौकब कादरी म्हणतात, सुशांतच्या मृत्यूचे राजकारण भाजपनं सुरू केले असून ते अत्यंत घृणास्पद आहे. सुशांत बिहारची शान होता. त्याच्या कुटुंबाबद्दल आम्हाला सहानुभूती वाटते, अशा वेळी भाजपने या मुद्द्याला राजकीय केल्यामुळे सुशांतच्या कुटुंबाला न्याय मिळेल याची शक्यता कमी झाली आहे.

मात्र हे प्रचारासाठी नाही असं स्पष्ट करण्यात आलं आहे. सुशांत आमच्यासाठी प्रचाराचा मुद्दा नसून भावनिक विषय आहे. तो केवळ बिहारचा नाही तर देशाचा पुत्र होता असं ही प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे.

  • ऋषिकेश नळगुणे

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.