भाजप नेत्याला निवडणुकीत फक्त एकच मत मिळालं आणि नेटवर राडा सुरु झालाय…

आपल्या देशात कुठं ना कुठं इलेक्शनचा माहोल असतोच. बरं भारतातली इलेक्शन काय निवांत होत नाहीत. या उमेदवारानी त्याला पाडला, त्या उमेदवारानी असं इलेक्शन मारलं, मार्जिन इतकं, सीट थोडक्यात गेलं असे अनेक विषय असतात. दिल्लीपासून गल्लीपर्यंत प्रत्येक इलेक्शनमध्ये कायतरी वाढीव किस्सा होतोच. कोईम्बतूर जिल्ह्यातल्या कुरुडम्पालयम ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत असाच वाढीव किस्सा घडला. डी. कार्तिक या भाजपच्या उमेदवाराला फक्त एकच मत पडलं!

कोईम्बतूर जिल्ह्याच्या भाजप युथ विंगचा उपसचिव असणाऱ्या कार्तिकच्या घरात पाच माणसं आहेत. तरी याला एकच मत पडलं म्हणल्यावर ट्विटरवर कल्ला झाला. तमिळनाडूमध्ये सुरू झालेला #SingleVoteBJP हा हॅशटॅग थोड्याच वेळात देशभरात ट्रेंडिंगमध्ये दिसू लागला.

ही पोटनिवडणूक लढवताना उमेदवारांना पक्षाच्या चिन्हाऐवजी वेगळं चिन्ह मिळतं. कार्तिकला ‘कार’ हे चिन्ह मिळालं होतं. पण त्याच्या गाडीला पॅसेंजर सोडाच पण स्टार्टरही मिळाला नाही. भाजपनं पाठिंबा दिला असल्यानं कार्तिकच्या पोस्टरवर थेट मोदी, अमित शहांपासून तमिळनाडूमधल्या नेत्यांचेही फोटो होते. त्यात पक्षाचं पद म्हणल्यावर जनसंपर्क असणारच की, मतपेटीत मात्र कसलाच करिष्मा दिसला नाही.

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, की एकच मत पडलं आणि तेही स्वतःचं नाही, असं कसं? दोस्तांनी दोस्तीत कुस्ती केली असेल, घरात आणि भावकीत भांडणं असतील, पण स्वतःतरी मत देऊच शकला असता की! मग माशी शिंकली कुठे?

फक्त ट्विटरच नाही, तर पूर्ण मीडियात आपण चर्चेचा विषय झालोय म्हणल्यावर कार्तिकनं एक व्हिडीओ प्रसारित केला. त्यात तो सांगतो की,

‘मी आणि माझं कुटुंब वॉर्ड क्रमांक चारमध्ये राहतो. ही पोटनिवडणूक वॉर्ड क्रमांक नऊमध्ये झाली. मी सहजच उमेदवारी दाखल करण्याचा विचार केला. घरगुती अडचणींमुळे मला प्रचारही करता आला नाही, त्यामुळे एक मत मिळण्यालाही मी माझं यश समजतो.’

कार्तिकला आणि पर्यायानं भाजपला ट्विटरवर खतरनाक ट्रोल केलं गेलं. एक युझर म्हणाला, ‘पोस्टरवरच्या १० नेत्यांचा मान राखून किमान १० मतं तरी पडायला हवं होती.’ दुसऱ्या एका युझरचं म्हणणं होतं, ‘कार्तिकच्या कुटुंबानंही भाजपला नाकारलंय.’ काही युझर्स कार्तिकची बाजू मांडत ‘तो आणि त्याचं कुटुंब त्या वॉर्डात मतदान करू शकत नव्हते म्हणून एक मत पडलं’ असं सांगत आहेत.

आता त्या वॉर्डात कुणाला किती मतं पडली ते माहिती करून घ्या. एकूण मतदान झालं ९१०. विजयी उमेदवार असणाऱ्या डीएमकेच्या अरुल राजला ३८७ मतं पडली. तर दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या एआयएडीएमकेच्या वैथीलिंगमला १९६ मतं मिळाली. कार्तिक अण्णाची गाडी मात्र एका मताच्या पुढे जाऊ शकली नाही.

तसं म्हणलं तर, एका मताची किंमतही खूप असते. उदाहरण सांगायचं झालं तर १९९९ मध्ये पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी बहुमत सिद्ध करण्यासाठी लोकसभेत मांडलेला विश्वास ठराव एका मतानं हुकला आणि १३ महिन्यांचं वाजपेयी सरकार कोसळलं.

मुंबई महानगरपालिकेच्या २०१७ च्या इलेक्शनमध्येही एका मतानं किस्सा केला होता. वॉर्ड क्रमांक २२० चा निकाल लागला तेव्हा शिवसेनेचे सुरेंद्र बागलकर विजयी ठरले. भाजपचे पराभूत उमेदवार अतुल शहा यांनी फेरमोजणीची मागणी केली. या फेरमोजणीत दोन्ही उमेदवारांना ५९४६ इतकी मतं पडल्याचं निष्पन्न झालं. इलेक्शनचा निकाल लॉटरीवर लागला आणि शहा विजयी ठरले. बागलकरांना एक मत जास्त पडलं असतं, तर विषय लॉटरीपर्यंत आणि शहा महानगरपालिकेत गेलेच नसते.

एका मतानं हार-जीत असं कायपण ठरू शकतंय. त्यामुळे, भिडू लोक इलेक्शन खासदारकीचं असुद्या नायतर ग्रामपंचायतीचं मतदान करणं चुकवू नका.

हे हि वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.