भारतीय जनता पक्षाच्या घटनेमध्ये ‘धर्मनिरपेक्षता’ आहे पण ‘हिंदुत्ववाद’ एकदाही नाही !!

इंदिरा गांधीनी आणिबाणीचा हुकुमशाही प्रयोग केल्यावर जनतेत त्यांच्याबद्दल राग होता. त्यांनी केलेल्या दडपशाहीच्या विरोधात अनेक पक्ष जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली एकत्र आले. जनता पक्षाची स्थापना करण्यात आली.

यात चौधरी चरणसिंग यांचा भारतीय लोक दल, राजाजी यांचा स्वतंत्रता पार्टी, प्रजासमाजवादी पार्टी, जॉर्ज फर्नांडीस यांची संयुक्त समाजवादी पार्टी, कॉंग्रेसचे काही गट आणि हिंदुत्ववादी जनसंघ असा अखंड विरोधी पक्ष इंदिराजींच्या विरोधात एकत्र आला होता.

तेव्हा झालेल्या निवडणुकीत खुद्द इंदिरा गांधींचा पराभव झाला होता. त्यांची लोकप्रियता रसातळाला पोहचली. कॉंग्रेसमध्येच अनेक फुट पडली. आता त्यांनी संन्यास घ्यावा अस अनेकांनी बोलून दाखवलं. 

इंदिरा गांधींच राजकारण संपल अशी चर्चा माध्यमात होती.

पण दुर्दैवाने हा जनता पक्षाचा प्रयोग जास्त काळ टिकला नाही. इंदिराजींच्या विरुद्ध रान उठवणारे गांधीवादी जयप्रकाश नारायण यांनी प्रधानमंत्री पद स्वीकारले नाही. मोरारजी देसाई यांचा पंतप्रधानपदाचा काळ त्यांच्या हेकेखोर स्वभावाने गाजला. त्यांच्यानंतर आलेले चौधरी चरणसिंग वेगवेगळ्या विचारसरणीच्या वेगवेगळ्या भागातल्या नेत्यांना एकत्र बांधून ठेवू शकले नाहीत.

ज्यांच्यामुळे हा प्रयोग सुरु झाला होता त्या जयप्रकाश नारायण यांचा मृत्यू झाल्यानंतर तर पक्षातली फुट मोठी झाली. आपापसातील अनागोंदीमुळे जनतापक्षाचा पराभव झाला. संपल्या संपल्या म्हणणाऱ्या इंदिरा गांधीच झोकात पुनरागमन झालं.

१४ जानेवारी १९८०, इंदिरा गांधीनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली. 

पराभवानंतर जनता पक्षातील भांडणे वाढीस लागली. जनसंघचे नेते कार्यकर्ते मनापासून जनता पक्षात आले नाहीत तर त्यांनी आपली राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरची निष्ठा कायम ठेवली आहे असे आरोप बाबू जगजीवनराम यांच्या सारख्या मोठ्या नेत्यांनी केले. जनसंघाच्या नेत्यांना हे आवडत नव्हते. अटलबिहारी वाजपेयी यांची घुसमट होत होती. अडवाणींनी तर एका कार्यकारणीमध्ये वक्तव्य केलं की,

“जनता पक्षात येताना इतर चार पक्ष ‘द्विज’ होऊन पावन झाले, आम्ही मात्र दलित आणि हरिजन राहिलो. आमचा पुनर्जन्म कुणी मान्यच केला नाही.”

राष्ट्रीय स्वयंसेवकसंघावर गांधीहत्येचे आरोप असल्यामुळे त्यांची विचारधारा असणाऱ्या जनसंघाला अस्पृश्यतेची वागणूक दिली जाते असा आरोप अडवाणी करत होते.त्यातच इंदिरा गांधीनी आल्या आल्या आपल्या विरोधी पक्षाची सत्ता असणाऱ्या ९ विधानसभा बरखास्त केल्या. तिथे देखील जनता पक्षाचा पराभव होणार हे स्पष्ट होते.

जनसंघाने जनता पक्षात घुसमटत राहायचे की स्वतंत्र व्हायचे याबद्दल पुनर्विचार करायचे ठरवले.

अटलबिहारी वाजपेयींनी अडवाणी आणि सुंदर सिंह भंडारी यांना देशभरातील कार्यकर्त्यांची काय भावना आहे हे जाणून घेण्यासाठी पाठवले. जनसंघ कार्यकर्ते प्रचंड प्रचंड नाराज होते. ही कोंडी फोडली पाहिजे नाहीतर उद्रेक होईल हा संदेश अडवाणी यांनी वाजपेयींना दिला.

तिकडे जनता पक्षाची कार्यकारणी मिटिंग झाली. बाबू जगजीवनराम यांनी जनसंघच्या नेत्यांनी संघाशी संबंध तोडावेत अथवा जनता पक्ष सोडावा असे आवाहन केले. यावर जोरात चर्चा झाली. १७ विरुद्ध १४ मतांनी निर्णय झाला की जनसंघाची जनता पक्षातून हकालपट्टी करायची.

गंमत अशी की हे करणारे बाबू जगजीवनराम दुसऱ्याच दिवशी जनता पक्ष सोडून कॉंग्रेसमध्ये परतले.

जनसंघाला ही हकालपट्टी अपेक्षितच होती. त्यांनी नव्या पक्षाच्या स्थापनेची तयारी सुरु केली होती. 

अटलबिहारी वाजपेयी यांच्याबद्दल अफवा उठू लागल्या की ते चंद्रशेखर यांच्या मैत्रीखातर जनता पक्षात राहतील. त्यांना सत्तेची उब हवीहवीशी वाटत आहे आणि जयप्रकाश नारायण यांच्या विचारानी त्यांना भारावून टाकलेले असल्यामुळे ते परत जनसंघात येतील का याबद्दल शंका होती. तसंही वाजपेयी हे नेहरूंचे फॅन होते आणि जनसंघात असूनही त्यांची इमेज सेक्युलर अशी होती.

पण अटलजींनी याचा इन्कार केला. त्यांनी आपली निष्ठा संघाबरोबर असेल याची खात्री दिली.

जुन्या भारतीय जनसंघाचे पुनरुज्जीवन करावे असा विचार पुढे आला पण यापूर्वीच बलराज मधोक यांनी या नावाच्या पक्षाची नोंद केली होती. त्यामुळे नवीन पक्षच स्थापन करावा ही मागणी पुढे आली. अटलजी मात्र जनता पक्षाचा वारसा सोडण्यास तयार नव्हते.

शामाप्रसाद मुखर्जी, दीनदयाळ उपाध्याय यांच्या बरोबर जयप्रकाश नारायण यांचा सुद्धा विचार आपण पुढे न्यावा. आपल्यावरचा जातीयवादाचा शिक्का पुसून सर्वसमावेशक प्रतिमा बनवावी हे त्यांचे म्हणणे होते.

गेल्या दशकभरात गाजवलेल्या आणीबाणीविरुद्धचे आंदोलनांने आपल्याला लोकांपर्यंत पोहचवले याची आठवण त्यांनी आपल्या सहकार्यांना करून दिली. जनतेत जायचे तर शेठजी आणि भटजींचा पक्ष ही इमेज बदलणे गरजेचे आहे हे इतर नेत्यानाही पटत होते. अखेर वाजपेयींचा विजय झाला. नव्या पक्षात जनता पक्ष राहिला. त्याचे नाव ठरले,

“भारतीय जनता पक्ष”

नव्या पक्षात जनसंघाच्या नेत्यांसोबत सिकंदर बख्त, राम जेठमलानी, सुषमा स्वराज, आरिफ बेग, शांतीभूषण, न्या.हेगडे असे आरएसएसशी संबंध नसलेले अनेक नेते नव्याने पक्षात आले. पक्ष केडरबेस्ड न राहता मास बेस्ड बनवण्याचे प्रयत्न चालू होते. संघाचा उजवा विचार मागे ठेवून काँग्रेसी विचारधारेचा मध्यमवर्ग स्वीकारण्यात आला.

सगळ्यात महत्वाच वाजपेयींनी आग्रहाने गांधीवादी समाजवाद ही आपल्या नव्या पक्षाची विचारधारा असेल हे जाहीर केले.

आता पर्यंत काँग्रेसी लोक राष्ट्रपिता गांधीजी ही आपल्या पक्षाची वैयक्तिक प्रोपर्टी असल्याप्रमाने हक्क सांगत होते. तर संघामुळे जनसंघाच्या नेत्यांनी ही गांधी आणि त्यांच्या विचारापासून एक अंतर राखलं होतं. गांधीहत्ये वेळी अनेक संघाच्या नेत्यांना अटक झालेली, अनेक कार्यकर्त्यांची घरे जाळलेली यामुळे गांधी या नावाचा देखील जनसंघ नेत्यांना राग होता.

पण भ्रष्टाचाराने बरबटलेल्या कॉंग्रेसमध्ये गांधीजींचा विचार हा फक्त प्रचारातल्या भाषणामध्ये सांगण्यापुरता उरला होता. गांधीजींना पाहिलेली पिढी तेव्हा अजूनही जिवंत होती. त्यावर कॉंग्रेस निवडणुका जिंकत होती. अख्ख्या भारताला गांधीवादी विचार भुरळ घालतो हे स्पष्ट होते.

मग गांधीवादापासून आपण दूर राहणे शहाणपणाचे नाही हे वाजपेयींना वाटत होते.

गांधीवादी समाजवाद म्हणजे भांडवलशाही आणि साम्यवाद यांच्या पासून सुरक्षित अंतर,स्वदेशीवर जोर, खेड्यांच्या आत्मनिर्भरतेवर भर आणि सर्व जातधर्माच्या सर्व लिंगाच्या व्यक्तींना समान संधी. जय प्रकाश नारायण यांच्या प्रभावातून वाजपेयींनी गांधीवादी समाजवाद स्वीकारला. पण संघाचे अनेक नेते याबद्दल खुश नव्हते.

ग्वाल्हेरच्या विजयाराजे शिंदे यांनी तर हा पक्ष म्हणजे कॉंग्रेसची ड्युपलीकेट कॉपी असणार आहे असे थेट वक्तव्य केले. नानाजी देशमुख यांचाही वाजपेयी यांच्या निर्णयाला छुपा विरोध होता. समाजवाद आणि गांधी या दोन्ही शब्दांशी संघाच वाकडं होतं. अनेक कार्यकर्ते गांधीवादी समाजवादामुळे हिरमुसले होते.

पण वाजपेयींचा दरारा एवढा होता की त्यांच्याविरुद्ध जाण्याची कोणाची टाप नव्हती. 

५ एप्रिल आणि ६ एप्रिल १९८० रोजी दिल्लीच्या फिरोजशहा कोटलावर भारतीय जनता पक्षाचे स्थापना अधिवेशन बोलवण्यात आल. भारतभरातून लाखो कार्यकर्ते आले. पक्षाध्यक्षपदी निवड झालेल्या अटलबिहारी वाजपेयींनी भाषणात आपली भूमिका स्पष्ट केली,

“भाजपचा संघाशी संबंध असला तरी संघही राजकीय संघटना नाही. ती सांस्कृतिक संघटना आहे. संघाच्या विरोधात केवळ राजकीय हेतून तोफा डागल्या जातात आणि त्याची झळ आम्हाला बसते. मात्र आम्ही त्याची फिकीर करत नाही आणि संघाशी आमचे नाते लपवतही नाही.”

याच अधिवेशनात त्यांनी भाजपची घटना मान्य करून घेतली ज्यात पहिल्याच pr समाजवाद, धर्मनिरपेक्षता, लोकशाही या तत्वावर ष्ट पणे भर देण्यात आला होता. जयप्रकाश नारायण यांचा, त्यांच्या गांधीवादाचा, त्यांच्या जनता पक्षाचा प्रभाव जाणवत होता.

भाजपचा झेंडा जनता पक्षाप्रमाणे एक तृतीयांश हिरवा आणि दोन तृतीयांश भगवा असा ठेवण्यात आला होता. जनता पक्षाचे नांगरधरी शेतकरी हे चिन्ह आपल्याला मिळावे यासाठी पक्षाध्यक्ष वाजपेयी आग्रही होते पण ते चिन्ह मिळणे शक्य नव्हते. विधानसभेच्या निवडणुका तोंडावर होत्या.

निवडणूक आयुक्तांनी स्पष्ट केले होते की एवढ्या गडबडीत नव्या पक्षाला चिन्ह देणे शक्य नाही.

वाजपेयी आणि त्यांचे इतर नेते तेव्हाचे आयुक्त शशधर यांना जाऊन भेटले. अखेर तोडगा निघाला की भाजपला अपक्षांच्या यादीतील एखादे चिन्ह द्यायचे आणि ते इतर अपक्षांना द्यायचे नाही. अडवाणी यांनी कमळावर बोट ठेवले. कोणतीही गडबड होऊ नये म्हणून कमळ आणि गुलाब हे चिन्ह अपक्षांच्या यादीतून काढले आणि कमळ भाजपचे अधिकृत चिन्ह घोषित झाले.

दिल्लीच्या कार्यक्रमापासून सगळीकडे भाजपचा हिरवा भगवा झेंडा आणि त्यावर कमळ लहरू लागला. 

त्यानंतरच्या निवडणुकामध्ये भाजपचा पराभव झाला. तरी वाजपेयी यांनी पक्षाच्या मुंबईमध्ये झालेल्या पहिल्या अधिवेशनात कार्यकर्त्यांना धीर दिला,

“अंधेरा छटेगा सुरज निकलेगा  कमल खिलेगा “

मुंबईच्या अधिवेशनापर्यंत  भाजपमध्ये जवळपास 25 लाख कार्यकर्त्यांची नोंद झाली होती.

कॉंग्रेसच्या भ्रष्टाचाराला वैतागलेल्या नवीन पर्याय शोधणाऱ्या लोकांना भाजपमध्ये आशेचा किरण दिसत होता. जनता पक्षाची जागा भाजपकडे आली होती. वाजपेयीमुळे सर्वसमावेशक चेहरा मिळाल्यामुळे सगळ्या धर्माची माणसे पक्षात आली होती. त्याच अधिवेशनातील वाजपेयीची लोकप्रियता बघून एक जेष्ठ पत्रकार म्हणाले,

“हा माणूस काही दिवसातच भारताचा पंतप्रधान होईल.”

पण दुर्दैवाने त्याला वेळ होता. इंदिरा गांधीच्या खुनामुळे देशभरात कॉंग्रेसला सहानुभूतीची लाट आली. राजीव गांधीनां न भूतो न भविष्यती असे पाशवी बहुमत मिळाले. भाजपचे फक्त दोन खासदार निवडून आले. वाजपेयींनी या पराभवाची जबाबदारी आपल्या अंगावर घेतली.

पक्षात अडवाणी यांचं राज्य सुरु झालं. कट्टर हिंदुत्व आणि राम मंदिर हे दोन मुद्दे पुढे रेटण्यात आले. गांधीवादी समाजवाद आणि सेक्युलॅरिझम हे भाजपच्या घटनेपुरते मर्यादित उरले.

नव्वदच्या दशकात पक्षाचा विजय झाला, पण सर्वसमावेशक इमेजमुळे वाजपेयींचीच वर्णी पंतप्रधानपदी झाली.

आजही निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर दिलेल्या भाजपच्या घटनेमध्ये समाजवाद सेक्युलॅरिझम आणि लोकशाही या तत्वांवर पक्ष उभा आहे असा स्पष्ट उल्लेख आढळतो. तर या ४४ पानाच्या घटनेमध्ये एकदाही हिंदूत्वाचा उल्लेख नाही.

आजही त्यांची विचारसरणी कोणती विचारली तर अधिकृत उत्तर एकात्म मानवतावाद हे आहे. त्यांच्या वेबसाईटवर पक्षाच्या पंचनिष्ठा दिल्या आहेत त्यातही कुठेही हिंदुत्व नाही पण त्यात गांधीवादी समाजवाद जरूर आहे.

https://www.bjp.org/en/constitution

त्यांचे कट्टर हिंदुत्वाचे प्रतिक असणारे नेतेही सार्वजनिक व्यासपीठावर गांधीजींना नमन करताना दिसतात. मात्र त्यांचे कार्यकर्ते खाजगीमध्ये गांधीजींना फाळणीचे कारणीभूत ठरवून शिव्याशाप देतात. कॉंग्रेसप्रमाणे भाजपही गांधीजींचा उपयोग फक्त नमस्कार करण्यापुरता ठेवला आहे का हा प्रश्न जनतेपुढे आहे.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.