मायलेकराच्या भांडणात झाला होता अटलजींचा पराभव !

१९८४ सालची लोकसभा निवडणूक अनेक अर्थाने महत्वाची होती. नुकतीच दहशतवाद्यांकडून इंदिरा गांधीची हत्या झाली होती. नव्या शतकाच्या तोंडावर  देशाचं राजकारण बदलण्याचं स्वप्न दाखवणाऱ्या राजीव गांधींच्या हातात काँग्रेसची सूत्र आली होती. इंदिराजींच्या मृत्यूमुळे शोकसागरात बुडालेल्या जनतेकडून मिळालेल्या सहानुभूतीच्या  लाटेवर स्वार होत राजीव गांधींनी आपला राजकीय प्रवास सुरु केला होता.

१९८० साली पूर्वाश्रमीच्या जनसंघी नेत्यांनी जनता पक्षापासून वेगळं होत “भारतीय जनता पार्टी” नावाने स्वतःचा वेगळा पक्ष स्थापन केला होता. अटलबिहारी वाजपेयी हे त्यांचे नेते होते. पक्षाध्यक्षपदाची धुरा तेच सांभाळत होते. वाजपेयींनी पक्ष उजव्या विचारसरणीचा पण  गांधीवादी समाजवादाच्या वाटेवरून चालणारा असेल असं ठरवलं होतं. त्या काळात त्यांचे १३ खासदार होते.

सुरक्षित मतदार संघ म्हणून ग्वाल्हेरची निवड

१९८४ सालची निवडणूक ही कमळ या  निशाणीखाली लढवण्यात येणारी भाजपची पहिलीच मोठी निवडणूक होती. ही निवडणूक पक्षाला जड जाणार याचा अंदाज वाजपेयींना आधीपासूनच होता. संपूर्ण देशभर पक्षाच्या प्रचारासाठी वेळ देता यावा यासाठी वाजपेयींना स्वतःसाठी एका सुरक्षित मतदारसंघाची आवश्यकता होती.

atal and vijayaraje
विजया राजे शिंदे यांच्या समवेत

अटलजी ज्या ‘नवी दिल्ली’ मतदारसंघाचे खासदार होते तेथील वातावरण भाजपसाठी अगदीच प्रतिकूल होतं. अशा वेळी अटलजींनी स्वतःसाठी सुरक्षित मतदारसंघ म्हणून ग्वाल्हेरची निवड केली.  ग्वाल्हेर हे अटलजींचं जन्मगाव होतं. तिथंच अटलजींचं शिक्षण झालं होतं शिवाय वडील ग्वाल्हेर संस्थानच्या शिक्षण विभागात नोकरी करत असल्यामुळे तिथल्या राजघराण्याशी वाजपेयींचे घरगुती संबंध होते.

आपल्या गावचा सुपुत्र म्हणून ग्वाल्हेरमधील लोकांमध्येही अटलजी लोकप्रिय होते. याच मतदारसंघातून १९७२ साली ते खासदार देखील राहिले होते. त्यामुळे पक्षाचा बालेकिल्ला असलेला ग्वाल्हेर हा  अटलजींसाठी सर्वात सुरक्षित मतदारसंघ मानला जात होता.

आई आणि मुलामधील वाद आणि राजीव गांधींची खेळी

ग्वाल्हेर हा भाजपचा बालेकिल्ला होता फक्त इथे एकच पेच होता तो म्हणजे आई आणि मुलामधील वैयक्तिक वाद. या पेचातील आई आणि मुलगा म्हणजे अनुक्रमे ग्वाल्हेरच्या राजमाता विजयाराजे शिंदे आणि संस्थानचे लाडके महाराज माधवराव शिंदे. ते दोघे राजकारणातील दोन वेगवेगळ्या ध्रुवांवर होते. विजयाराजे भाजपमध्ये होत्या तर माधवराव शिंदे काँग्रेसमध्ये. अटलजींचे मात्र दोघांशीही अगदी चांगले संबंध होते.

आपल्या आईच्याच विरोधात निवडणूक लढायला लागू नये म्हणून माधवराव शिंदे ग्वाल्हेरच्या शेजारच्या ‘गुना’ या मतदारसंघातून निवडणूक लढवायचे. ज्यावेळी विजयाराजेंनी वाजपेयींना ग्वाल्हेरमधून लोकसभा लढवायचे आमंत्रण दिले तेव्हा अटलजी माधवरावांना भेटायला गेले.

परस्परांत सौहार्दाचे संबंध असल्याने वाजपेयींनी माधवरावांना सरळच “तुम्ही ग्वाल्हेरमधून निवडणूक लढवताय का असा प्रश्न विचारला. माधवरावांनी नकार दिला आणि गुना हेच आपले कार्यक्षेत्र असल्याचे स्पष्ट केले.

माधवरावांच्या या उत्तराने निःशंक होऊन वाजपेयीनी ग्वाल्हेरमधून उमेदवारीचा अर्ज भरला आणि निर्धास्तपणे देशभर पक्षाच्या प्रचाराला लागले. प्रचारादरम्यान गुजरातमधील मेहसना येथे त्यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यात ते थोडक्यात बचावले. जखमी होऊन देखील त्यांनी आपल्या प्रचार सभा  थांबवल्या नाहीत.

madhavrav
माधवराव शिंदे

दरम्यान वाजपेयी आणि शिंदे घराण्याच्या तडजोडीची कुणकुण राजीव गांधींना लागली. त्यांनी माधवराव शिंदेंना ग्वाल्हेरमधून वाजपेयींच्या विरोधात निवडणूक लढवण्याचा आदेश दिला. आता खुद्द राजीव गांधी यांच्याकडूनच आदेश मिळाल्याने माधवरावांचा निरुपाय झाला. माधवराव शिंदे यांनी ग्वाल्हेरमधून अटलजींच्या विरोधात फॉर्म भरला.

शिंदे घराण्याविषयी ग्वाल्हेरवासीयांच्या मनात प्रेम आणि भक्तिभाव होता. माधवरावांनी फॉर्म भरताच वाजपेयींचा पराभव होणार हे निश्चित झालं होतं. झालंही तसंच. तब्बल दीड लाख मतांनी अटलजींचा पराभव झाला.
काँग्रेसने सहनभूतीच्या लाटेवर स्वार होत निवडणुका जिंकल्या. विरोधी पक्षातील अनेक  दिग्गजांचा पराभव झाला होता.

राजीव गांधींना विक्रमी बहुमत

लोकसभेच्या ५०३ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने ४०४ जागा जिंकल्या होत्या. एवढा मोठा विजय तर नेहरू आणि इंदिराजींना देखील मिळवता आला नव्हता. अडवणींनी या  लोकसभेचे वर्णन ‘शोकसभा’ असे केले होते.  भाजपची अवस्था तर अतिशय दयनीय झाली होती. भाजपचे फक्त दोनच खासदार निवडून येऊ शकले होते.

पराभवाचा उमदेपणाने स्वीकार  

ABV26

अटलजींना मात्र स्वतःच्या पराभवापेक्षा पक्षाची झालेली वाताहात अधिक जिव्हारी लागली. मात्र तरी  देखील २५ डिसेंबर १९८५  रोजी वाजपेयींचा साठावा वाढदिवस जोरात साजरा करायचा निर्णय पक्ष कार्यकर्त्यांनी घेतला. सभेचं आयोजन करण्यात आलं. सभेला प्रचंड गर्दी झाली. “अंधेरे मे एक चिंगारी, अटलबिहारी अटलबिहारी” या घोषणांनी सभामंडप दणाणून गेला.

त्यावेळी आपल्या मिश्कील शैलीत अटलजी म्हणाले,

“मुझे समझ नही आता  की एक तरफ  पराजय है और दुसरी तरफ सभाओं को इतनी बडी भीड ?? फिर समझ आया की लोग सोचते होंगे की चलो देखें हारा हुआ वाजपेयी कैसे दिखता है.”

पराभवातही त्यांची विनोदबुद्धी शाबूत होती. अटलजींचा हाच उमदेपणा जनमानसाचा ठाव घेणारा होता. अटलजी निवडणूक हरले होते, पण संघर्ष करणं थांबवणार नव्हते.

अटलजींनी संघर्ष केला आणि पुढे २ खासदार असणाऱ्या पक्षाला त्यांनी देशाचा सत्ताधारी पक्ष बनवलं. या संघर्षरथाचं सारथ्य करणारे अटलजी देशाच्या पंतप्रधानपदावर विराजमान झाले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.