ऑस्ट्रेलियाने आजवर भारताविरुद्ध जिंकण्यासाठी केलेला रडीचा खेळ

आपल्याकडे क्रिकेटमध्ये भारत आणि पाकिस्तान हे कट्टर प्रतिस्पर्धी मानले जातात. प्रत्येक मॅचमध्ये वाद हे कम्पलसरी फिक्स. मग स्लेजिंग आणि खुन्नस काढणं हे प्रकार सर्रास बघायला मिळतात. एकदम हायव्होल्टेज ड्रामा. पण याच तोडीचा हायव्होल्टेज ड्रामा, स्लेजिंग, खुन्नस काढणं, वर्णद्वेषावरून चिडवणं असले प्रकार आपल्याला भारत – ऑस्ट्रेलियाच्या मॅचमध्ये देखील बघायला मिळतात.

यालाच आपल्याकडे ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंचा रडीचा डाव देखील म्हणतात. अगदी काल पण हेच बघायला मिळालं. मॅचमध्ये सिराज आणि बुमराह यांना वर्णद्वेषीचा सामना करावा लागला. फिल्डिंग करत असताना दर्शकांनी त्यांच्यासोबत असे प्रकार केले. यावर अनेक आजीमाजी खेळाडूंनी प्रतिक्रिया व्यक्त केली. 

सोबतच टीम पेनने अश्विनसोबत केलेलं स्लेजिंग देखील गाजलं. त्यावर परत पेनने माफी देखील मागितली. मॅच जिंकण्यासाठी अश्विनने दबावाय येऊन आपली विकेट टाकावी यासाठी

“आम्ही आता चौथ्या कसोटीसाठी खूपच आतूर आहोत. तुझा हा शेवटचा दौरा असेल नाा”,

असे चिडवायला चालू केले. त्यावर अश्विननं पण भारी उत्तर दिलं.

“तू भारतात ये… मी पण तुला भारतात खेळताना पाहण्यासाठी उत्सुक आहे. ती तुझी शेवटची मालिका असेल”, असं म्हणत त्याने पेनच तोंड बंद केलं.

पण हे असे प्रकार भूतकाळातील मॅचमध्ये देखील घडले आहेत. याच स्लेजिंगचा, वर्णद्वेषाचा अगदी द्रविड, हरभजन पासून कोहलीपर्यंत सगळ्यांना सामना करावा लागला आहे.

ऑस्ट्रेलियाच्या रद्दीच्या डावाचे असेच काही निवडक किस्से

२०००-०१ च्या सीरिजमधील पहिल्या टेस्ट मॅच मध्ये राहुल द्रविडने मायकल स्लेटरच्या दिशेने पुल शॉट खेळला. स्लेटरला वाटले की त्याने कॅच व्यवस्थित पकडला आहे. पण त्यानंतर देखील द्रविड आपल्या जागेवर उभा होता. कारण रिप्ले मध्ये स्पष्ट दिसत होतं की बॉल स्लेटरच्या हातात जाण्यापुर्वी जमिनीवर टप्पा पडला होता. त्यामुळे अंपायरनी देखील द्रविडला नॉटआऊट दिले.

पण यानंतर देखील स्लेटर तत्कालीन उपकर्णधार असेलल्या द्रविडला जाऊन भिडला होता.

अंपायरने दम दिल्यावर मागं हटला. पुढे स्लेटरलाच साक्षात्कार झाला कि द्रविडला स्लेज करणे हि त्याच्या आयुष्यातील सगळ्यात मोठी चूक होती. रागात मी जनावरासारखा वागत होतो आणि द्रविड मात्र शांत उभा होता. अशी उपरती देखील झाली होती.

वॉर्न-गांगुली वाद 

आजच्या काळात वॉर्न आणि गांगुली जरी एकत्र कॉमेंट्री बॉक्समध्ये दिसत असले तरी एकेकाळी ही मैदानातील सगळ्यात मोठी दुश्मन टाईप जोडी होती. याची सुरुवात झाली, २००३-०४च्या दौऱ्यात. गाबाच्या पिचवर खेळल्या जाणाऱ्या पहिल्या टेस्ट मॅचच्या आधी वॉर्नने गांगुलीची खोड काढली.

तो म्हणाला,

शॉर्टपीच बॉल हि गांगुलीची सगळ्यात मोठी कमजोरी आहे. त्यामुळे त्याला या दौऱ्यात खेळताना संघर्ष करताना बघून मला आश्चर्य नाही वाटणार. हा दौरा यशस्वी करायचा असले तर त्याला बरेच प्रयत्न करावे लागतील. गांगुलीला भारतीय बॅटिंगची सगळ्यात कमजोर कडी समजली जाते.

आता डायरेक्ट दादाला नडला म्हणजे आगीशी खेळल्या समानच. दादा त्या सिरीजमधील सगळ्यात यशस्वी बॅट्समन म्हणून समोर आला. त्याने ब्रिसबेन वर खेळलेली १४४ रन्सची खेळी आज देखील यादगार समजली जाते. या खेळीमुळेच भारत अत्यंत मजबूत स्थितीमध्ये आला. सोबतच सिरीज १-१ अशी ड्रॉ केली होती.

मंकी गेटचे प्रकरण 

२००८ साली सिडनी टेस्टच्या दरम्यान एंड्रयू साइमंडस आणि हरभजन दोघांच्यात मॅच दरम्यानच वादावादी चालू झाली. ऑस्ट्रेलियन खेळाडूंना वाटलं कि  हरभजन ‘एम’ शब्दचा सारखा वापर करत आहेत. साइमंडसने हरभजनला जाऊन विचारलं कि, तू मला परत माकड म्हणालास? तुला माहित नाही तू काय करत आहेस. स्टंप माइकमध्ये हे सगळं ऐकू आले होते. यानंतर मॅथ्यू हेडनने पण या वादात उडी घेतली.

हरभजनने या आरोपांचा विरोध करत साइमंडसनेच पहिल्यांदा हा वाद सुरु केलं असल्याचं सांगितलं. तेवढ्यात हेडन पुन्हा म्हणाला, यामुळे काही फरक पडत नाही, तुला माहित आहे कि तू जे म्हणाला आहेस ती जगातील सगळ्यात वाईट गोष्ट आहे आणि मोठी चूक आहे, वर्ण भेद!

पॉन्टिंगने याची तक्रार अंपायरला केली. मार्क बेनसन आणि स्टीव बकनरने मॅच रेफरी माइक प्रोक्टर यांना रिपोर्ट केला.

यानंतर भारतीय कॅप्टन अनिल कुंबळे याने पॉन्टिंगला आवाहन केलं की हरभजनवर वर्णभेदाचा आरोप लावला जायला नको. भारताकडून माफीचा प्रस्ताव देखील ठेवला गेला. पण ऐकले तो पॉन्टिंग कसा. यानंतर हरभजनवर तीन टेस्ट मॅचची बंदी घालण्यात आली.

भारताने या विरोधात अपील केलं आणि दौरा मधूनच सोडणार असल्याची धमकी दिली. आईसीसीने न्यूझीलँडचे न्यायाधीश जॉन हेनसन यांना या प्रकरणाच्या सुनावणीसाठी नियुक्त केलं. सचिन तेंडुलकर त्यावेळी हरभजन सोबत बॅटिंग करत होता. त्याने न्यायालयात साक्ष दिल्यानंतर हरभजनवरील बंदी हटवण्यात आली आणि मॅच फीच्या ५० टक्के दंड ठोठावला. 

सिडनी टेस्टमध्ये मंकी गेट सोबतच खराब अंपायरिंगची पण बरीच उदाहरण गाजली. भारत स्कोर चेस करत होता. तेव्हा द्रविडला माग कॅचआउट दिल. पण खरतर त्याची बॅट पॅडच्या पाठीमागे होती. यानंतर गांगुलीला देखील स्लिपवर कॅच आउट दिलं. पण बॉल फिल्डरच्या हातात जाण्याच्या आधी मैदानावर पडला होता. मात्र रिप्ले बघण्याच्या आधीच बकनर यांनी निर्णय देऊन टाकला.

यानंतर भारतीय पत्रकारांनी मॅच संपल्यानंतर पॉन्टिंगवर बंदी आणण्याची मागणी केली. भारताला क्रिकेट जगतातील दिग्गजांच समर्थन मिळालं. कुंबळे मॅचनंतर म्हणाला,

मैदानावर केवळ एकच टीम खेळभावनेनं खेळत होती.

यानंतर भारताने पर्थ टेस्टमध्ये चांगली कामगिरी करत मस्त कमबॅक केलं आणि मॅच देखील जिंकली. पण भारत १-२ ने सीरीज हरला होता.

गौतम गंभीरच जशास तसं उत्तर

गौतम गंभीर २००८ मध्ये बॉर्डर गावस्कर ट्रॉफी दरम्यान छान फॉर्ममध्ये होता. आपल्या घरच्या मैदानात म्हणजे कोटला स्टेडियमवर खेळताना त्याने तिसऱ्या टेस्टमध्ये डबल सेंच्युरी मारली. या मॅचमध्ये वीवीएस लक्ष्मणने स्ट्रेट ड्राइव खेळाला आणि बॉल कॅटीचच्या हाताला लागून सटकला.

रन काढताना गंभीर आणि कॅटिच दोघांच्या मध्ये आले, झालं गंभीरची सटकली. दोघांच्यात पुन्हा जुंपली. अखेरीस हि भांडण अंपायर बिली बॉडेन यांनी मध्यस्थी करत सोडवली.

याच मॅचच्या सुरुवातीला वॉटसनच्या स्लेजिंगला वैतागून गंभीरने त्याला कोपरा मारला. पण त्याच्या आधी वॉटसनने मूठ दाखवून गंभीरला उचकवलं होत.

मॅच रेफरी क्रिस ब्रॉड म्हणाले, गंभीर दुसऱ्या स्तरावरील गुन्हयासाठी दोषी आहे. त्यामुळे मॅच फी च्या १० टक्के दंड भरावा लागेल, आणि एक टेस्ट मॅचची बंदी देखील घालण्यात आली.

विराट म्हणजे दादा आणि गंभीरच्या चार पावलं पुढे

विराट कोहलीने तर गांगुली आणि गंभीरच्या पण चार पावलं पुढं जात उत्तर दिलं होत. २०११-१२ मध्ये आपल्या पहिल्या बॉर्डर गावसकर ट्रॉफीमध्ये काहोलीने ऑस्ट्रेलियन दर्शकांच्या स्लेजिंगला मधलं बोट दाखवून उत्तर दिल होत. आणि कॅमेरावर हा प्रकार सगळ्या जगाने बघितला.

त्यामुळे मॅच फीच्या ५० टक्के रक्कम त्याला दंड म्हणून देण्यात आली.

मॅच नंतर कोहलीने ट्विटरवर लिहिले कि, दर्शकांना अशा प्रकारचा प्रतिकार करायला नाही पाहिजे, पण ते जेव्हा आपल्या आई-बहिणींचा उल्लेख करतात आणि तो देखील तुम्ही कधी ऐकला नसेल अशा भाषेत. तेव्हा असंच उत्तर द्यावं लागत.

स्मिथचा ड्रेसिंग रूममधून मदत मागण्याचा उद्योग  

काही वर्षांपूर्वी बंगलोर टेस्ट मॅचच्या दरम्यान स्मिथने केलेला उद्योग सगळ्यांनी बघितला होता. ऑस्ट्रेलिया १८८ रन्सचा पाठलाग करत होती तेव्हा, स्मिथ उमेश यादवच्या बॉलवर एलबीडब्लू आउट झाला.

यानंतर स्मिथने डीआरएस घेण्यासाठी ड्रेसिंग रूममधून मदत मागितली.

यावर कोहली जाम भडकला होता. तो स्मिथ जवळ आला आणि त्याला तो असं करू शकत नसल्याचे सांगत त्याच्या कृतीवर आक्षेप घेतला. अंपायरने देखील त्याआधीच स्मिथला थांबवलं होत. कोहलीने मॅचनंतर स्मिथवर आरोप केला कि, स्मिथने याआधी देखील दोनवेळा ड्रेसिंग रूममधून मदत मागितली होती.

तर स्मिथच म्हणणं होत कि, ती अचानक आलेली प्रतिकिया होती. त्याच डोकं त्यावेळी काम करत नव्हतं. 

एकूणच काय तर भारत आणि ऑस्ट्रेलियाचा दौरा म्हणजे भारतीय खेळाडूंना स्लेजिंग, वर्णद्वेष हे प्रकार नवीन नाहीत. त्याची सवय झालीय. पण ऑस्ट्रेलियन खेळाडू परत माफी मागत विषय नेहमीप्रमाणं संपवतात. पण प्रत्येक वेळी नंतर माफी मागण्यापेक्षा आधीच असले प्रकार टाळले तर….

हे हि वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.