सी एन आर रावांचं योगदान हे सचिनच्या १०० शतकांच्या तोडीस तोड आहे…..

रोजच्या जीवनात विज्ञान आणि वैज्ञानिक हा मोठा फॅक्टर मानला जातो. वैज्ञानिक लोकांनी लावलेल्या शोधामुळे अनेक गोष्टींचा उलगडा होतो. आज आपण जाणून घेणार आहोत भारतरत्न सी. एन. आर. राव [ C.N.R.RAO ] यांच्याबद्दल. भारतातल्या सगळ्यात हुशार आणि महत्वाच्या लोकांमध्ये सी.एन.आर.राव यांचं नाव घेतलं जातं,.

२०१४ मध्ये ज्यावेळी भारतरत्न पुरस्काराचे मानकरी ठरवले गेले तेव्हा त्यात क्रीडा विभागातून सचिन तेंडुलकर आणि विज्ञान विभागातून सी.एन.आर. राव यांची निवड झाली होती. तर सी.एन.आर. राव फक्त भारतातच नाही तर जगातसुद्धा परिचित आहेत. 

सगळ्यात आधी सी.एन.आर.राव यांचं पूर्ण नाव काय आहे ते बघूया डॉ. चिंतामणी नागेशा रामचंद्र राव. ३० जून १९३४ मध्ये एका कन्नड परिवारात त्यांचा जन्म झाला. म्हैसूर विश्वविद्यालयात त्यांनी शिक्षण घेतलं आणि IISC मधून केमिकल इंजिनिअरिंग मध्ये पदवी पूर्ण करत पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. जगातल्या सगळ्या महत्वाच्या विद्यापीठांमधून त्यांनी पदव्या मिळवल्या आणि  विद्यापीठांमध्ये लेक्चरर म्हणून कामही केले.

जवळपास ६० हुन अधिक विद्यापीठांमधून त्यांनी पदव्या मिळवल्या हाही एक विक्रमच आहे. १६०० शोधनिबंध, सॉलिड स्टेट आणि मटेरियल केमिस्ट्री या विषयांवर राव यांनी जवळपास ४५ पुस्तकं लिहिली.

सी.एन.आर. राव यांनी नॅनो मटेरियल आणि हायब्रीड मटेरियल या क्षेत्रात केलेल्या क्रांतीमुळे त्यांना भारत सरकारने भारतरत्न देण्याचा निर्णय घेतला.

भारतामध्ये नॅनो सायन्स टेक्नॉलॉजीचे जनक म्हणून राव यांचं नाव घेतलं जातं. सॉलिड स्टेट आणि मटेरियल सायन्स केमिस्ट्रीमध्ये मध्ये त्यांनी मोलाचं योगदान दिलं होतं. कुठलाही पदार्थ हा जर त्याची संरचना बदलत असेल तर त्याच्या गुणधर्मांमध्ये बदल होतो आणि त्यामधील संबंध यावर त्यांनी सखोल संशोधन केलं.

त्यांच्या योगदानामुळे आणि त्यांना मिळालेल्या भारतरत्न पुरस्काराबद्दल वैज्ञानिक क्षेत्रातून आनंदाची लाटच पसरली होती आणि त्यावेळी वैज्ञानिक लोकांनी सांगितलं होतं कि

सी.एन.आर.राव यांचं योगदान हे सचिन तेंडुलकरच्या १०० शतकांच्या तोडीस तोड आहे.

वैज्ञानिक सी.एन.आर.राव यांनी केलेल्या विधानांपैकी एक म्हणजे विज्ञानाचा अभ्यास आणि परीक्षण यापेक्षाही गमतीदार हा त्याचा रिझल्ट असतो.

काम करण्याची त्यांची वृत्ती आणि एकनिष्ठता इतकी आहे कि त्यांच्या सोबत काम करणारे बरेच वैज्ञानिक हे निवृत्त झाले आहेत मात्र वयाच्या ८७ व्या वर्षीसुद्धा ते नेटाने आपलं काम करत आहेत. जगातल्या महत्वाच्या संस्थांमध्ये त्यांच्या मताचा आदर केला जातो. वैज्ञानिक संस्था या त्यांच्या सल्ल्यानुसार चालतात.

वैज्ञानिक क्षेत्रातून भारतरत्न पुरस्कार मिळालेल्या लोकांपैकी सी.एन.आर.राव हे फक्त चौथेच व्यक्ती आहे. या अगोदर विश्वेश्वरैय्या, ए.पी.जे.अब्दुल कलाम आणि सी.व्ही. रमण यांना भारतरत्न हा पुरस्कार मिळाला आहे. सी.एन.आर.राव यांनी शेवटी बंगलोरमधल्या जवाहरलाल नेहरू सेंटर फॉर ऍडव्हान्स सायंटिफिक रिसर्च मध्ये विशेष अधिकारी म्हणून काम केलं. 

वैज्ञानिक क्षेत्रात भारताचं प्रतिनिधित्व जागतिक पातळीवर करणाऱ्या सी.एन.आर.राव हे भारत सरकारच्या वैज्ञानिक धोरणांमध्ये कायम सहभागी असत. प्रधानमंत्री इंदिरा गांधींच्या वैज्ञानिक सल्लेगार समितीमध्ये सदस्य म्हणून सी.एन.आर. राव हे सहभागी होते.

सी.एन.आर.राव यांच्या नॅनो सायन्स टेक्नॉलॉजीच्या जोरावर भारत जगात ३ ऱ्या क्रमांकावर आहे. याचं कारण म्हणजे नॅनो मिशन हे त्याकाळी जोरात सुरु झालं होत आणि त्याची धुरा आणि सूत्र स्वतः सी.एन.आर.राव यांनी सांभाळली होती. केमिस्ट्री विषयातला सगळ्यात मोठा वैज्ञानिक म्हणून सी.एन.आर.राव यांचा गौरव केला जातो. 

इतके सारे अवॉर्ड,पुस्तक, नाव असूनही सी.एन.आर.राव हे सोशल मीडियापासून लांब आहेत. त्यांना अजूनही त्यांचा स्वतःचा ईमेल उघडता येत नाही. मोबाइलसुद्धा त्यांना चालवता येत नाही. याचकारण म्हणजे ते सगळ्या नोंदी या डोक्यात आणि कागदी ठेवतात. पण मोबाईलचा त्यांना विशेष तोटा होत नाही.

१९७४ मध्ये पदमश्री, १९८५ मध्ये पदमविभूषण अशा मानाच्या पुरस्काराने सी.एन.आर.राव यांना गौरविण्यात आले. २००० सालामध्ये कर्नाटक सरकारतर्फे कर्नाटक रत्न म्हणून त्यांचा सन्मान करण्यात आला.

२०१४ मध्ये भारताचा मानाचा आणि विशेष योगदानाबद्दल देण्यात येणारा भारतरत्न हा पुरस्कार देण्यात आला.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.