तेंव्हा जेआरडी टाटांनी भारतरत्न स्वीकारण्यास नकार दिला होता…

मागे काही दिवसांपूर्वी टाटा उद्योगसमूहाचे माजी चेअरमन रतन टाटा यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा यासाठी एक कँपेन सुरु होतं. रतन टाटांनी निष्काम भावनेतून गेली अनेक वर्षे आपल्या उद्योगसमूहातून केलेली देशाची सेवा, समाजासाठी केलेलं कार्य यामुळे ते हा पुरस्काराचे खरे हक्कदार आहेत असंच बहुसंख्य भारतीयांचं मत आहे.

पण अत्यंत नम्रपणे रतन टाटा यांनी सोशल मीडियावरून त्यांच्या भारतरत्नासाठी सुरु असलेलं कॅम्पेन थांबवण्याची विनंती केली. ते म्हणाले,

“सोशल मीडियामध्ये लोकांच्या एका गटाने पुरस्काराबाबत व्यक्त केलेल्या भावनांचा मी सन्मान ठेवतो. मात्र मी नम्रपणे सांगू इच्छितो की आपण चालवलेली मोहीम आता थांबवावी. पुरस्कारापेक्षा मी स्वतःला भाग्यवान समजतो की मी भारतीय आहे आणि भारताच्या प्रगती आणि समृद्धीसाठी प्रयत्न व योगदान देतोय”

इतका मनाचा सच्चेपणा आणि साधेपणा हा रतन टाटांनी कसा काय आत्मसात केलाय हा अनेकांना प्रश्न पडतो. मात्र टाटांच्या या साधेपणामागे सचोटीच्या आणि विश्वासाच्या भक्कम पायावर उभी असलेली सव्वाशे वर्षांची मूल्यांवर आधारित परंपरा असलेली पाच पिढयांनी परिश्रमपूर्वक जोपासलेली संस्कृती आहे.

रतन टाटा यांनी ज्यांचा वारसा पुढे चालवला त्या जे.आर.डी. टाटा यांच्या पण आयुष्यात भारतरत्न बद्दल असाच प्रसंग आला होता. विशेष म्हणजे आजच्याच दिवशी जे. आर. डी. टाटांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला होता. पण त्यांनी भारतरत्न स्वीकारण्यास नकार दिला होता.

जेआरडी टाटा यांना भारताच्या औद्योगिक क्रांतीचे आद्य पुरुष असं म्हटलं जातं. जवळपास साठ वर्षे त्यांनी टाटांचे हे विशाल साम्राज्य सांभाळले, इतकंच नाही तर त्याला यशाच्या शिखरावर नेऊन पोहचवलं. अगदी इंग्रज सरकारपासून ते पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू ते राजीव गांधी, नरसिंह राव अशा अनेक पंतप्रधानांच्या राजवटी त्यांनी अनुभवल्या. मात्र कुठल्या सरकार पुढे झुकले नाहीत.

पंडित जवाहरलाल नेहरू तर त्यांचे अगदी चांगले मित्र होते. दोघांनी मिळून देशात अनेक नव्या उद्योगसमूहांना सुरवात केली होती. नेहरूंच्या काळात जेआरडी यांना पद्मविभूषण पुरस्कार मिळाला होता.

मात्र एअर इंडियाच्या राष्ट्रीयीकरणावरून दोघांचे मतभेद झाले.

एअर इंडिया हे जेआरडी यांनी पाहिलेलं स्वप्न होतं.  त्यांनी स्वतः लावलेलं रोपटं त्या क्षेत्रातील कोणताही अनुभव नसलेल्या सरकारी अधिकाऱ्याकडे सोपवणे हे जे आरडी यांच्या मनाला पटत नव्हतं, तरी देशाच्या भल्यासाठी जर हा त्याग करावा लागत असेल तर तो करायचा म्हणत त्यांनी टाटांच्या या एअरलाईन्सचे राष्ट्रीयीकरण होऊ दिले.

नेहरूंनी एअर इंडियाचे चेअरमन पद त्यांच्याकडेच देऊ केले.

पुढे अनेक इंदिरा गांधी, मोरारजी देसाई, चरणसिंग, राजीव गांधी अशा अनेक राजवटी आल्या मात्र जे आर डी आणि त्यांचा टाटा ग्रुप या सर्वांच्या राजकारणापासून सुरक्षित अंतरावरच राहिला. वेळ प्रसंगी व्ही.पी.सिंग यांच्या सारख्या पंतप्रधानांना पत्र लिहून खडसावण्याचे काम देखील जेआरडी यांनी केले.

पुढे पी.व्ही.नरसिंह राव यांनी १९९१ साली देशाची आर्थिक धोरणे खुली करण्याचा निर्णय घेतला याचे त्यांना विशेष कौतुक वाटले. नरसिंह राव यांनी त्यांना टाटांची एयरलाईन्स पुन्हा सुरु करता येईल का याची विचारणा केली होती. वयाच्या नव्वदीत जे.आर.डी. टाटा उत्साहाने त्यात उतरले पण पुढे जेव्हा नरसिंह राव यांच्या मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांची १५ कोटी लाच मिळेल अशी अपेक्षा आहे हे कळल्यावर त्यांनी माघार घेतली.

इतर उद्योगपतींनी तेव्हा टाटांना वेड्यात काढलं. प्रसंगी तोटा सहन केला मात्र राजकारणातील घाणीचे शिंतोडे जेआरडीनी आपल्यावर कधीच उडू दिले नाही.

१९९२ साली त्यांनी टाटा उद्योगसमूहातून निवृत्ती घेतली आणि रतन टाटांच्या हाती कारभार दिला. आजच्या प्रमाणे तेव्हाही त्यांच्या भारतरत्न बद्दल चर्चा सुरु झाली. अनेक मान्यवरांनी जेआरडी यांना भारतरत्न दिला जावा अशी मागणी केली.

जेआरडी मात्र नेहमी प्रमाणे या सर्वापासून अलिप्त होते. कित्येकजण असे पुरस्कार मिळण्यासाठी शासन दरबारी वशिला लावण्याचे प्रयत्न करत असतात. पण जेआरडी लॉबीयिंग करायचं तर राहील लांब पण या मागणीचा सक्त विरोध करायचे.

राजीव गांधी, व्ही.पी.सिंग, चन्द्रशेखर या पंतप्रधानांच्या कार्यकाळात त्यांचे प्रिन्सिपल सेक्रेटरी म्हणून काम केलेलं जेष्ठ सनदी अधिकारी बी.जी.देशमुख हे निवृत्तीनंतर टाटा सन्सच्या सामाजिक कार्याच्या कामात सहभागी झाले होते. तेव्हाचे पंतप्रधान पी.व्ही.नरसिंह राव यांच्याशी देखील त्यांचे चांगले संबंध होते. एकदा पंतप्रधान कार्यालयातून त्यांना फोन आला की सरकार जे.आर.डी टाटा यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्याच्या विचारात आहे.

देशमुख हे हि बातमी देण्यासाठी टाटांच्या ऑफिसमध्ये गेले. तेव्हा राजकारणाचा वीट आलेल्या जे.आर.डी यांनी त्यांना स्पष्ट सांगितलं,

“कृपया पंतप्रधानांना कळवा कि अशा गोष्टींमध्ये मला रस नाही.”

नम्रता आणि साधेपणा त्यांच्यात इतका भरला होता की सरकारी मानसन्मान आणि पुरस्कार स्वीकारण्यासाठी ते नेहमी नाखूष असत. बी.जी.देशमुख यांना वाटलं भारतरत्न सारख्या सर्वोच्च सन्मानाला नकार देणारा हा पहिलाच कर्मयोगी असेल.

पण त्यांच्या बॉम्बे हाऊस ऑफिस मधील एक्झिक्युटिव्ह मंडळींनी देशमुख यांना प्रेमाने बजावलं कि जेआरडींच्या बोलण्याकडे बिलकुल लक्ष देऊ नका. हा देशाचा सन्मान स्वीकारण्यासाठी ते तयार आहेत असं कळवा.

अखेर पंतप्रधान कार्यालयाचे सेक्रेटरी अमरनाथ यांना तसे कळवण्यात आले आणि जेआरडी यांना भारतरत्न जाहीर झाला.

२५ जानेवारी १९९२ रोजी तत्कालीन राष्ट्रपती वेंकटरमण यांच्या हस्ते जेआरडी टाटा यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. आजवरच्या इतिहासात देशाचा हा सर्वोच्च सन्मान मिळवणारे ते एकमवे उद्योगपती आहेत.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.