आपण रोजच्याला वापरतोय खरं, पण शॅम्पूमुळं कॅन्सर होऊ शकतो काय…

आपल्यापैकी लय जणांना पडणारे दोन कॉमन प्रश्न आहेत, पहिलं म्हणजे केस का गळतात ? आणि दुसरं म्हणजे केस गळणं कसं थांबवायचं ? या दोन प्रश्नांचं उत्तर शोधायच्या नादात असतानाच एक बातमी आली की, कॅन्सरचा धोका असल्यानं युनिलिव्हरनं आपल्या वेगवेगळ्या ब्रँडचे तब्बल १९ शॅम्पू परत मागवलेत.

आता जिथं जिथं ही बातमी वाचली, तिथं तिथं धक्कादायक बातमी, शॅम्पू वापरत असाल तर आधी हे वाचा असले हेडिंग. अजून वय लग्नाचं असल्यानं उगाच रिस्क नको म्हणून सगळी माहिती घेतली. त्यामुळं आजचा विषय हाच की शॅम्पूमुळं खरंच कॅन्सर होऊ शकतोय का ?

या सगळ्या प्रकरणाची सुरुवात कुठून झाली ? 

तर युनिलिव्हरनं मार्केटमधून आपले १९ लोकप्रिय ड्राय शॅम्पू परत बोलावले आणि याचं कारण सांगण्यात आलं ते म्हणजे या शॅम्पूमुळं ल्युकेमिया आणि ब्लड कॅन्सरचा धोका निर्माण होऊ शकतो. 

या परत मागवलेल्या शॅम्पूमध्ये डव्ह आणि ट्रेस्मेसारख्या लोकप्रिय ब्रॅण्ड्सचाही समावेश होता. हे दोन ब्रँड आपल्या भारतातही चांगलेच लोकप्रिय आहेत, त्यामुळं जरासं टेन्शनचं वातावरण पसरलं. डव्ह आणि ट्रेस्मे सोबतच रिव्हाइव्ह, नेक्सस आणि टिगीचेही काही शॅम्पू युनिलिव्हरनं परत मागवले.

 अमेरिकेच्या फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशननं दिलेल्या धोक्याच्या इशाऱ्यानंतर युनिलिव्हरनं ऑक्टोबर २०२१ च्या आधी उत्पादन झालेले ड्राय शॅम्पू परत मागवण्याची ऍक्शन घेतली आहे.

थोडक्यात हा सगळा विषय ज्यामुळं फिरतोय तो ड्राय शॅम्पू हा काय प्रकार आहे ?

तर नॉर्मल शॅम्पू वापरताना आपण आधी केस ओले करतो, त्यानंतर शॅम्पू वापरतो आणि मग परत केस धुतो. नाय म्हणलं तरी लय कसरत करावी लागते. हेच ड्राय शॅम्पूमध्ये काय होतं, तर पाणी वापरावं लागत नाही. ड्राय शॅम्पू हे अल्कोहोल किंवा स्टार्च बेस्ड असतात. 

काही शॅम्पू स्प्रेसारखे असतात तर काही पावडरसारखे. यामुळं केसांमधला तेलकटपणा जातो आणि केसांना व्हॉल्युमही मिळतो. साहजिकच वापरायचा लई लोड नसल्यानं या ड्राय शॅम्पूला अनेकांकडून पसंती दिली जाते.

पण मग यातून धोका कसा निर्माण होऊ शकतो ? 

तर अमेरिकन एफडीए आणि इतर संस्थांनी याचं कारण सांगितलंय ते म्हणजे बेन्झीन नावाचं केमिकल.

जर रुम टेम्परेचरमध्ये पाहिलं तर बेन्झीन हे फिकट पिवळ्या रंगाचं दिसतं. हे केमिकल जर श्वासोश्वासातून, घशातून किंवा त्वचेतून शरीरात गेलं तर त्यामुळं ल्युकेमिया आणि बोन नॅरोच्या ब्लड कॅन्सरचा धोका वाढतो. 

याच बेन्झीनचं प्रमाण जास्त असल्यामुळं युनिलिव्हरनं हे शॅम्पू परत बोलावले आहेत, पण यात बेन्झीनचं प्रमाण नेमकं किती आहे याचा उल्लेख मात्र केलेला नाही.

बेन्झीन आणि आपला संबंध फक्त ड्राय शॅम्पूमुळंच येतो का ? 

तर नाही. बेन्झीन डियोड्रंट्स, सॅनिटायझर, सनस्क्रीन यांच्यातही वापरलं जातं. मात्र त्याचं प्रमाण किती आहे, यावर ते धोकादायक आहे की नाही हे ठरतं. इतकंच नाही तर मोठ्या प्रमाणावर कचरा साठलेला असेल, तर त्यामुळं हवेतही हे केमिकल तयार होऊ शकतं. साहजिकच रोजच्या आयुष्यातही वेगवेगळ्या माध्यमातून आपला बेन्झीनशी संबंध येऊ शकतो. 

याचवर्षी घाम येऊन नये म्हणून वापरल्या जाणाऱ्या अँटीपर्स्पिरंटमध्ये बेन्झीनचा वापर झाल्याचं आढळलं होतं. 

प्लॅस्टिक बनवताना, ल्युब्रिकंट्स, कलर डाय आणि डिटर्जंट बनवतानाही बेन्झीनचा वापर केला जातो. यातल्या अनेक गोष्टींचा आपल्या त्वचेशी थेट संबंध येतो. जर मोठ्या प्रमाणावर असलेल्या बेन्झीनचा शरीराशी संपर्क आला, तर त्यामुळं रेड ब्लड सेल्स झपाट्यानं कमी होतात आणि त्याचा परिणाम कॅन्सरसारखा गंभीर आजार होण्यात होऊ शकतो.

मग हा ड्राय शॅम्पू वापरावा की नाही ? 

शॅम्पूमधून कॅन्सरसारखा गंभीर धोका निर्माण होऊ शकतो का ? आणि नेमका शॅम्पू कुठला वापरावा ? याबद्दल जाणून घेण्यासाठी बोल भिडूनं काही हेअर ड्रेसर्स आणि ब्युटिशियन्सशी संपर्क साधला.

तेव्हा त्यांनी सांगितलं की,

‘कुठल्याही केमिकलचा अतिवापर करणं धोकादायकच असतं, एखादी गोष्ट दुसऱ्याच्या स्कीनला सूट होते म्हणजे ती आपल्याही स्कीनला होईलच असं नाही. केसांची रचना, आजूबाजूचं वातावरण आणि नेमकी गरज यावरुन कुठला शॅम्पू वापरायचा हे निश्चित करायला हवं. ड्राय शॅम्पू वापरायला सोपा जात असला तरी त्याचा अतिवापर करणं धोक्याचं आहे.

कारण ड्राय शॅम्पूचे पार्टिकल्स हे केसातल्या डँडरफ पेक्षाही छोटे असतात. जर ते वेळीच धुतले गेले नाहीत, तर स्काल्पला धोका निर्माण होतो. जर केस डॅमेज असतील, तर अशावेळी हे पार्टिकल्स स्किनमध्ये जाऊ शकतात.’

‘जर त्याच्यात धोकादायक केमिकल्स असतील तर निश्चितच आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. धोकादायक केमिकल नसलेले ड्राय शॅम्पू अगदीच गरज असली तर वापरायला हरकत नाही. पण त्यापेक्षा साधे शॅम्पू कधीही सेफ ऑप्शन ठरतात. आपल्या केसांची आणि त्वचेची पीएच लेव्हल ४.५ ते ५.५ असते, साध्या शॅम्पूमध्ये ही पीएच लेव्हल मेंटेन केलेली असते.

सोबतच पाण्यानं केस धूत असल्यानं कुठलेही पार्टिकल्स केसात राहत नाहीत.  साहजिकच हे शॅम्पू धोकादायक ठरत नाहीत.’

थोडक्यात काय तर अचानक एवढे शॅम्पू मार्केटमधून परत बोलावल्यानं भीतीची भावना निर्माण होणं साहजिकच आहे, पण शॅम्पू किंवा कुठलंही केमिकल आपल्या त्वचेला लावताना यातल्या तज्ज्ञांचा सल्ला तर घ्यायला हवाच, पण सोबतच त्या त्या प्रॉडक्टमध्ये कुठले धोकादायक घटक आहेत की नाही हे सुद्धा तपासायला हवं.

बाकी काळजी घेऊन, आपल्याला सूट करतील असे प्रॉडक्ट वापरले तर साहजिकच धोका कमी होतोय आणि नुसत्या शॅम्पूमुळं कॅन्सर होत नसला तरी त्यातले घटक आणि आपला वापर या गोष्टी मात्र मॅटर करतात.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.