या भारतीय माणसामुळे जगाला शाम्पू करायची टेक्नॉलॉजी कळाली

टीव्ही वर रोज शाम्पूच्या जाहिराती आपण बघत असतो, क्लिनिक प्लस, डव्ह, पॅन्टीन पासून ते गारनियर, न्यूट्रिजिना, लॉरियाल पॅरिस पर्यंत हायफाय इंग्लिश, फ्रेंच नाव असलेले शाम्पू आपण वापरतो. आज काल तर बियर शाम्पूसुद्धा आले आहेत.

या शाम्पूची जाहिरात पाहिली तरी आपल्याला जरा फॉरेनच्या महागड्या स्पा मध्ये जाऊन आल्या सारखं वाटतं. सारखं राहून राहून शाम्पू म्हणजे एखादी महागडी परदेशी वस्तू असल्या सारख वाटत राहतं.

इंग्लिश लोक नेहमी जगापुढं ओरडून सांगत असतात की भारतासारख्या रानटी देशाला आम्ही माणसात आणलं, सॉफीस्टीकेटेड बनवलं, कपडे घालायला, मॅनर्स पाळायला शिकवले.

सगळ्यात गंमतीशीर गोष्ट म्हणजे अतिशहानपणा करणाऱ्या ब्रिटिशांना आणि जगाला शाम्पू करायला भारताने शिकवलं.

हजारो वर्षांपूर्वी शाम्पूचा शोध भारतात लागला होता. अगदी रामायण-महाभारताच्या काळातही शिकेकाई सारखेसुगंधी द्रव्ये वापरून केसांची निगा राखत असल्याचे दाखले दिले जातात. शाम्पू हा शब्द देखील अस्सल भारतीय आहे.

मग तो फॉरेनला कसा पोहचला या मागे देखील एक गंमतीशीर कथा आहे.

इसवीसन १७५९ साली बिहारच्या पटनामध्ये बंगाली मुस्लिम कुटूंबात शेख दिन मोहम्मद नावाच्या व्यक्तीचा जन्म झाला. वडील ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीमध्ये नोकरीला होते.

वयाच्या १० व्या वर्षी वडलांचे छत्र हरपले. वडलांच्या निधनानंतर मोहम्मद स्वतः ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यात दाखल झाला. कॅप्टन गॉडफ्रे इवान बेकरच्या विंगमध्ये सामील करून घेतले गेले तेव्हा त्याचं वय अवघ ११ वर्षे असेल.

ईस्ट इंडिया कंपनीकडून त्याने अनेक लढायामध्ये भाग घेतला होता.

त्याचा वरिष्ठ कॅप्टन गॉडफ्रे इवान बेकर हा एक आयरिश प्रोटेस्टंट होता. मोहम्मद त्याचा बेस्ट फ्रेंड होता. या काळ्या गोऱ्या दोस्तांची जोडी ईस्ट इंडिया मध्ये फेमस होती

जेव्हा कॅप्टन गॉडफ्रे रिटायर झाला तेव्हा मोहम्मदने देखील कंपनी सरकारच्या नोकरीचा राजीनामा दिला.

१७८२ साली कॅप्टन आपल्यासोबत दिन मोहम्मद शेखला सातासमुद्रापार इंग्लंडला घेऊन आला. आयर्लंडच्या कोर्क या गावी बेकर कुटूंबासोबत मोहम्मद राहू लागला. इंग्लिश सुधारण्यासाठी त्याला तिथल्याच एका शाळेत घालण्यात आले.

या शाळेतच एका जेन डॅली नावाच्या सुंदर आयरिश मुलीच्या तो प्रेमात पडला.

पुढे या दोघांनी लग्न देखील केलं. यालग्नासाठी त्याने धर्मांतर देखील केले. हे दोघे नवराबायको लंडन शहरात एक घर भाड्याने घेऊन राहू लागले.

८ वर्ष लंडनमध्ये राहिल्यानंतर त्यांनी हिंदुस्तान कॉफी हाउस या नावाचे भारतीय रेस्टॉरंट उघडले. हे परदेशी भूमीवरील पहिले रेस्टॉरंट होते. युरोपला करी, रोटी या भारतीय पदार्थांची ओळख मोहम्मदच्या रेस्टॉरंटमुळेच झाली.

पण ते फार काही चालले नाही. दोन वर्षातच शेख दिन मोहम्मद याला रेस्टॉरंट बंद करावे लागले.

त्यांनी लंडन शहर देखील सोडलं. त्यानंतर ते ब्राइटन शहरात आले.

तिथे पोटापाण्यासाठी कोणता उद्योग करावा हा त्यांच्या पुढे मुख्य प्रश्न होता.

शेख दिन मोहम्मद हे नाभिक समाजातील होते. त्यांचे पूर्वज मुघलांच्या, नवाबांच्या दरबारात चंपी व हजामतीचे काम करायचे. मोहम्मदने हा आपला कौटुंबिक वारसा इंग्लंडमध्ये चालवायचं ठरवलं.

त्यांनी ब्राईटन शहरात स्वतःच्या नावाने मोहम्मद बाथ स्पा सुरू केला.

मोहम्मद ग्राहकांना हर्बल स्टीम बाथ द्यायचे. तसेच ग्राहकांची चंपी (डोक्याची मालिश) करायचे. मोहम्मद यांची सुगंधी तेल व द्रव्ये लावून केलेली चंपी फक्त गावातच नाही तर संपूर्ण ब्रिटन आणि युरोपमध्ये खूप प्रसिद्ध झाली.

त्यांच्या चंपीची भूरळ तिथल्या राजालाही पडली. मोहम्मद यांच्याकडून चंपी करून घेण्यासाठी १८२२ मध्ये चौथे किंग जॉर्ज यांनी त्यांना रॉयल शाम्पूइंग सर्जन म्हणून नियुक्त करून घेतले. त्यानंतर ते आणखी फेमस झाले.

images 3

मोहम्मद यांनी शाम्पू ही हजारो वर्षांपासून केस धुण्यासाठी असलेली भारतीय टेक्नॉलॉजी इंग्रजांना शिकवली.

फक्त इतकेच नाही करी, हुक्का या इंग्लंडमध्ये अतिशय लोकप्रिय गोष्टीची ओळख सुद्धा त्यांनीच करून दिली होती.

इंग्लंडमध्ये आणि तेही इंग्रजीत छापलेल पहिलं भारतीय पुस्तकसुद्धा त्यांनीच लिहिलंय.

आज जगभरात हजारो कोटींचा उलाढाल असलेल्या शाम्पू कंडिशनर च्या इंडस्ट्रीचे श्रेय शेख दिन मोहम्मदला जाते.

इंग्लंडच्या ब्राइटन संग्रहालायत शेख मोहम्मद यांचा मोठा फोटो आहे.

भारतीय संस्कृतीला पाश्चात्य देशांशी जोडण्यात त्यांचे सर्वात मोठे श्रेय होते असे मानले जाते. काही वर्षांपूर्वी अमेरिकेच्या गुगल या सर्वोत्तम कंपनीने त्यांच्या नावाचं डुडल प्रसिद्ध करून त्यांना श्रद्धांजली वाहिली होती.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.