ही एक स्कीम वापरली तर निर्यातीत दुसरा असणारा भारत, केसांच्या व्यवसायात टॉपला येऊ शकतो…

बालाजी मंदिरात दान केल्या जाणाऱ्या केसांचं पुढे काय होतं ते सगळ्यांना माहित आहे. ते केस दर महिन्याला लिलावामधून विकले जातात. मात्र भारतातील केसांच्या व्यवसायाची गोष्ट इथपर्यंतच नाही. ही एक मोठी इंडस्ट्री आहे जिला विकसित केलं तर भारताला यातून बक्कळ नफा आणि इथल्या लोकांना रोजगार मिळू शकतो.

ते कसं? तर त्याला आकडेवारी आणि जागतिक व्यवसायाच्या माहितीतून समजून घ्या…

वेगवेगळ्या मार्गातून मिळणारे केस निर्यात करणाऱ्या देशांमध्ये भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो. देशातून निर्यात केलेले हे केस कॅलिग्राफी ब्रश, सूट लाइनिंग्स, फर्निचर, ऑईल्स स्पिल्स, विक्स बनवण्यात तर वापरतातच, सोबतच डंकिंग डोनट बनवताना सुद्धा याचा वापर केला जातो.  

२०२१ च्या आकडेवारीनुसार या केसांचा जगातील संपूर्ण व्यापार ७ अब्ज डॉलरचा आहे. २०२२ मध्ये यात वाढ होऊन हा आकडा १० अब्ज डॉलरपर्यंत वाढलाय. तर भविष्यात २०२६ पर्यंत हाच व्यापार १३ अब्ज डॉलरवर पोहोचण्याचा अंदाज आहे.  

या व्यापारात भारताची सगळ्यात मोठी भूमिका आहे. २०१९ मध्ये भारतातून १९.४ मिलियन डॉलरच्या केसांची निर्यात करण्यात आली होती.

एका फॅशन वेबसाईटच्या रिपोर्टनुसार कोरोना काळात केसांची कमतरता निर्माण झाली होती. त्यामुळे केसांची किंमत सुद्धा वाढली होती. याचा प्रभाव देशातून होणाऱ्या केसांच्या निर्यातीवर सुद्धा झाला होता. २०२० मध्ये यात ४५ टक्के वाढ झाली, तसेच केसांच्या उत्पादनात सुद्धा ३९ टक्के वाढ झाली होती. 

यात भारतात निर्माण होणाऱ्या केसांमध्ये झालेली वाढ जबाबदार आहे. यातले सर्वाधिक केस तिरुपती बालाजी मंदिरातले असतात.

तिरुपतीच्या मंदिरात दरवर्षी लाखो श्रद्धाळू येतात आणि श्रद्धेतून हजारो किलो केसांचे दान करतात. यामध्ये महिलांच्या डोक्यावरून काढलेल्या या केसांचे शेंडे सरळ ठेवले जातात त्यामुळे यांना रेमी हेयर म्हणतात. याच्यामुळे केसांना नैसर्गिक स्वरूप मिळतं म्हणून यांना मोठी किंमत मिळते. त्यामुळेच  भारतातील केस सगळ्यात मोठ्या किमतीत एक्स्पोर्ट होतात, .

या केसांमधून मंदिराला वार्षिक उत्पन्नाचा १० टक्के भाग म्हणजेच २ हजार करोड रुपये मिळतात. इकॉनॉमिक्स टाइम्सच्या एका रिपोर्टनुसार मंदिरात दररोज तब्बल ३५ हजार लोकांचं मुंडन केलं जातं.  यासाठी ट्रस्टने एकूण १.५ हजार न्हाव्यांना यासाठी कामावर ठेवलंय. 

बिग लव इंडियन हेअरच्या चंदन सीताराम सांगतात की, कोरोना लॉकडाउनपूर्वी तिरुपती मंदिर समिती दर महिन्याला १७० क्विंटल केसांचा लिलाव करायची. या काळात १९-२६ इंच लांब केस १६ हजार ५०० रुपये प्रतिकिलो दराने विकले जायचे तर लॉकडाउननंतर याच्या भावात वाढ झाली आणि या केसांना प्रति किलो २५ हजार रुपये इतका दर मिळतो. 

भारतातील या केसांना ब्युटी उत्पादनं बनवणाऱ्या देशांकडून सर्वाधिक मागणी असते. 

म्यानमार, चीन, इटली, यूएस, हॉंगकॉंग या देशांमधून हे केस खरेदी केले जातात आणि त्यांच्यावर प्रक्रिया केली जाते. भारतासोबतच चीनमध्ये सुद्धा केसांचं उत्पादन होतं. पण भारतातील केस बारीक असतात त्यामुळे जगात याची मागणी जास्त आहे. चीन भारतीय केस घेतो आणि त्यांच्यामध्ये चायनीज केस मिसळून त्यांचे प्रोडक्ट बनवतो. 

जगातील एकूण केस निर्यातीपैकी भारतातून ३२ टक्के केस निर्यात केले जातात तर चीनमधून ५० टक्के केस निर्यात होतात. चीनमध्ये चांगलं तंत्रज्ञान, संघटित उद्योग आणि स्वस्त दरात मजूर उपलब्ध आहेत त्यामुळे चीनची निर्यात जास्त आहे. 

पण या केसांचा वापर मात्र अमेरिकन आणि युरोपियन देशांमध्ये केला जातो. 

अमेरिकेत केसं गळणारे लोक, कलाकार आणि सोशल मीडिया इन्फ्लूएंसर याचा वापर मोठ्या प्रमाणावर करतात. आफ्रिकी आणि कोकेशियन वंशाचे लोकं हे केस गळतीमुळे याचा वापर करतात तर ऑर्थोडॉक्स ज्यू हे आपल्या धार्मिक समारंभांसाठी केसांचा वापर करतात.

२०२० मध्ये जागतिक हेअर प्रोडक्ट खरेदीपैकी ४० टक्के प्रोडक्ट एकट्या उत्तर अमेरिकेत खरेदी करण्यात आले होते. अमेरिकेत २५ वर्षाखालील मुलं हेअर प्रोडक्टचा वापर पार्टी किंवा समारंभात करतात. ४५ ते ५४ वयोगटातील लोकं २२ टक्के प्रोडक्टचा वापर करतात, तर ५४ वयाच्या वरील लोकं याचा सर्वात जास्त वापर करतात. त्यामुळे प्रोडक्टसचे व्यावसायिक यांच्यासाठीच उत्पादन बनवतात. 

या सगळ्या प्रोडक्टमध्ये सर्वात जास्त महत्वाचे असतात ते भारतातील केस, पण भारताला याचा फायदा होत नाही. 

कारण भारतात यावर आधारलेली संघटित इंडस्ट्री नाही आणि आहे त्यांच्याकडे चांगली टेक्नॉलॉजी  नाही. देशातल्या हेअर इंडस्ट्रीत तब्बल ८ लाख लोकं काम करतात. मात्र कच्चा माल निर्यात केला जातो त्यामुळे समस्या निर्माण होतात. त्यामुळे या निर्यातीवर बंदी घालण्यात यावी यासाठी ह्यूमन हेअर अँड हेअर प्रोडक्टस मॅनफॅक्चरर्स एक्सपोर्टर्स असोसिएशन भारत सरकारसोबत चर्चा करत आहे.

मात्र त्यासोबतच आणखी एक समस्या आहे, ती म्हणजे स्मगलिंगची. टाइम्स ऑफ इंडियाच्या फेब्रुवारी २०२१ च्या रिपोर्टनुसार दरवर्षी केसांच्या स्मगलिंगमुळे भारताला १५० कोटी रुपयांचं नुकसान होतं आणि याचा इन्डायरेक्ट प्रभाव भारतातल्या हेअर इंडट्रीवर पडतो. यावर महसूल अधिकारी कारवाई करत आहेत.

एग्जॉनने मार्च २०२१ मध्ये प्रकाशित केलेल्या एका रिपोर्टमध्ये सांगितले की, ग्लोबल विग्स मार्केट २०२६ पर्यंत १३ बिलियन डॉलर पर्यंत वाढू शकतं. आणि यात ज्या केसांचा सगळ्यात जास्त वापर केला जातो ते भारतातीलच असतात. त्यामुळे सरकारने या मार्केटकडे लक्ष देऊन ‘मेक इन इंडिया’ इनिशिएटिव्हशी जोडायला हवा. असं केल्यास देशातील इंडस्ट्री वाढेल आणि इथल्या लोकांना रोजगार मिळेल. 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.