तीस वर्षापूर्वी झालेला भीषण अपघात झेलून त्यांनी आकाशात उंच भरारी घेतली होती.

केरळ येथील कोझिकोड एअरपोर्टवर झालेल्या भीषण विमान दुर्घटनेत जवळपास २० माणसांना स्वतःचा जीव गमवावा लागला. महाराष्ट्राचे जिगरबाज वैमानिक दीपक साठे हे या विमानाचे पायलट होते. त्यांनी विमानात असलेल्या प्रवाशांचा जीव वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, परंतु काळाने त्यांच्यावर घाला घातला. कॅप्टन दीपक साठेंचा सुद्धा या दुर्घटनेत मृत्यु झाला.

दीपक साठे यांनी भारतीय हवाई दलात दैदिप्यमान कामगिरी केली आहे.

दीपक साठेंचं कुटूंब हे भारतातील प्रशासकीय सेवेत देशाची सेवा करण्यास तत्पर असलेलं कुटूंब. दीपक साठेंचे वडील वसंत साठे हे भारतीय सैन्यात ब्रिगेडीयर या मोठ्या पदावर होते. दिपक साठेंचा मोठा भाऊ सुद्धा सैन्यात होता. जम्मु काश्मिर मध्ये झालेल्या एका चकमकीत त्यांचा भाऊ शहीद झाला.

वडील आणि मोठ्या भावाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत ११ जुन १९८१ रोजी दीपक साठे भारतीय हवाई दलात भरती झाले. दीपक साठेंनी भारतीय हवाई दलात स्वतःच्या कर्तृत्वाने अनेक पदे भुषवली. हवाई दलात रुजु होण्याआधी त्यांनी पुण्याच्या NDA तुन प्रशिक्षण घेतले. तिथेही ते अव्वल आले होते. भारतीय हवाईदलात २००३ पर्यंत दीपक साठे यांनी वैमानिक म्हणुन सेवा केली.

दीपक साठे यांना अगदी भावासारखा मानणारा त्यांचा अत्यंत जवळचा मित्र निलेश साठे यांनी त्यांच्याविषयी एक आठवण सांगीतली आहे.

१९९० च्या दरम्यान भारतीय हवाई दलात असताना दीपक साठेंना अशाच एका विमान अपघाताला सामोरं जावं लागलं होतं. तेव्हा दीपक साठेंची जी शारीरीक अवस्था झाली होती, याचं सर्वांना फार वाईट होतं. दीपकजींना हाॅस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलं. त्यांच्या अनेक हाडांना आणि डोक्याला दुखापत झाली होती.

या अपघातामधुन दीपक साठे पुन्हा उठुन उभे राहु शकत नाहीत, अशी सर्वांची समजुत झालेली. दीपक साठेंनी सर्वांची हि समजुत खोटी ठरवली. सहा महिने उपचार घेऊन स्वतःच्या इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी सर्व दुखण्यावर मात केली. पुन्हा एकदा दीपक साठे कॅप्टनची जबाबदारी सांभाळुन विमानातुन आकाशात भरारी मारायला सज्ज झाले.

हवाई दलातील प्रशिक्षणादरम्यान दीपक साठे यांनी सर्वोत्कृष्ट कामगिरी केली.

यामुळे दीपक साठेंना ‘स्वाॅर्ड ऑफ ऑनर’ हा मानाचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते.

देशभरातुन अनेक विद्यार्थी प्रशिक्षण घेण्यासाठी आलेले असतात. त्यामुळे या विद्यार्थ्यांमधुन प्रशिक्षण घेताना इतरांपेक्षा भरीव कामगिरी असलेल्या व्यक्तीलाच हा पुरस्कार दिला जातो. दीपक साठेंना मिळालेला हा सन्मान म्हणुन महत्वाचा आहे.

२२ वर्षांच्या हवाईदलातील सेवेत त्यांनी हिंदुस्थान एअरनाॅटीक्स लिमीटेडमध्ये (HAL) टेस्ट पायलट म्हणुन सुद्धा जबाबदारी सांभाळली आहे. असं सांगण्यात येतं की, हि जबाबदारी सांभाळणं अत्यंत जिकीरीचं काम असतं. परंतु दीपक साठेंनी हुशारी आणि कुशलतेने हि जबाबदारी यशस्वीरित्या सांभाळली.

भारतीय हवाई दलातुन सेवानिवृत्त झाल्यावर दीपक साठे २००५ पासुन ‘एयर इंडिया’ मध्ये प्रवासी विमानं उडवणारे पायलट म्हणुन काम करत होते.

कोरोनाच्या काळात दुबईत अडकलेल्या भारतीयांना ते एयर इंडियाच्या विमानातुन मायदेशात आणण्याचं काम करत होते. दीपक साठेंनी जवळपास ३६ वर्षांच्या कारकीर्दीत भारतीय हवाई दलातील महत्वाची विमानं उडवली आहेत.

एयर इंडियात रुजू झाल्यावर सुरुवातीला अनेक वर्षे एयर इंडियाच्या ताफ्यातील जे सर्वात मोठं विमान म्हणुन ओळखलं जातं, अशा ‘एयरबस 310’ या विमानाचं त्यांनी उड्डाण केलं आहे.

काहीच तासांपुर्वी ७ ऑगस्ट रोजी हि भीषण दुर्घटना घडली. याच दिवशी दीपक साठेंच्या आईचा वाढदिवस असतो. त्यांचे आई-वडील नागपुरमध्ये राहतात. वाढदिवसाच्या दिवशीच दीपक साठेंच्या आईला मुलाच्या वीरमरणाची बातमी कळाली.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी स्वतःच्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्या म्हणाल्या,

“दीपकने स्वतःचा जीव गमावुन इतर प्रवाशांचे प्राण वाचविले. तो सर्वच गोष्टींमध्ये नेहमी अग्रेसर आणि कर्तृत्ववान होता.”

विमानाचा अपघात होत असताना जवळपास १५० माणसं विमानात होते. दीपक साठे आणि त्यांचे सहवैमानिक अखिलेश कुमार यांनी प्रसंगावधान दाखवल्यामुळे अनेक प्रवाशांचे प्राण वाचले. हा अपघात इतका भीषण होता की विमानाचे दोन तुकडे झाले.

शेवटच्या श्वासापर्यंत दीपक साठे प्रवाशांना सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करत होते. महाराष्ट्राचे जिगरबाज वैमानिक कॅप्टन दीपक साठेंच्या कर्तृत्वाला सलाम !

  • देवेंद्र जाधव

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.