“चंद्रकांता” आपल्या लहानपणीची गेम ऑफ थ्रोन्स होती !

भिडू सहज कट्ट्यावर गप्पा टाकायला आपण जातो तेव्हा एकतरी गडी असा भेटतो ज्याला इंग्लिश पिक्चरचा नाद असतो. उठता बसता नेटफ्लिक्सवरची नवी वेब सिरीज टेरेंटीनोचा नवीन पिक्चर, फुटबॉलची मॅच याच्या बद्दल त्याला उहापोह करायचा असतो. आपल्या पेठेतून कोथरुडात स्थलांतरीत झालेल्या क्रशला इम्प्रेस करायच्या प्रयत्नातून त्याचा हा सगळा अभ्यास झालेला असतो.

पण त्याला काय ठाऊक त्याला फ्रेंडझोन केलेली ताई त्याच्या बरोबर गेम ऑफ थ्रोंसच्या थियरी मांडते आणि घरी जाऊन माझ्या नवऱ्याची बायको बघत बसते.

आधीच सांगून ठेवतो. आमच गेम ऑफ थ्रोन्स आणि माझ्या नवऱ्याची बायको विषयी काहीही वाईट मत नाही. आम्हाला पण या सिरीयल खूप आवडतात. पण झालंय काय की गेम ऑफ थ्रोन्सच आणि त्या जॉर्ज आर आर आबा मार्टिनच एवढ दैवतीकरण झालंय की काय बोलायलाच नको.

आता आम्ही तुम्हाला म्हणालो की आर आर आबा मार्टिनच्या तोडीचा एक माणूस भारतात पण होऊन गेला तर तुम्हाला चेष्टा वाटेल. पण ही गोष्ट खरी आहे. त्याच नाव देवकीनंदन खत्री. आणि त्यांच्या गेम ऑफ थ्रोन्सच नाव होतं,

“चंद्रकांता”

होय तीच चंद्रकांता. नव्वदच्या दशकात रविवारी सकाळी ९ वाजता आपल्याला भेटायला येणारी. यक्कू पिताजी क्रूर सिंग, कुंवर वीरेंद्र, विषकन्या तारा,  आठवल ना सगळ? आपण सुद्धा या नौगड विजयगड जुनागड च्या लढाईत रममाण होऊन गेलो होतो. त्याकाळची ही बिग बजेट सिरीयल होती. शाहबाझ खान, मुकेश खन्ना , पंकज धीर पासून आपल्या वर्षा उसगावकर पर्यंत अनेक दिग्गज कलाकारांनी यात काम केलेलं.

   नौगड विजयगढ मे थी तकरार नौगढका था जो राजकुमार चंद्रकांता से करता था प्यार.

हे तर आपल लाडक गाण होतं. आणि तेव्हा कोणाला माहित नसणाऱ्या सोनू निगमने ते गायलं होतं. आता आपल्या अभिनयाने सगळ्या जगाला चकित करणारा इरफान खान सुद्धा यात होता पण आपल्या सगळ्यांच्या लक्षात राहिला अखीलेश मिश्रांचा यक्कू क्रूरसिंगच. या सिरीयलने त्याकाळचे सगळे रेकोर्ड मोडले. पण पुढे पुढे खूप बोअर केल. चंद्रकांताला स्क्रिप्टमधून गायब झाली आणि अखेर सिरीयल बंद झाली.

तर सांगायचा मुद्दा हा की ही सिरीयल बनली होती गेम ऑफ थ्रोन्स प्रमाणे एका कादंबरीतून. देवकीनंदन खत्रीनी १०० वर्षांपूर्वी ही कादंबरी लिहिली होती.

२९ जून १८६१ साली देवकीनंदन खात्री यांचा जन्म बिहारच्या मुजफ्फरपूरमध्ये झाला. त्यांचे पूर्वज मुळचे पंजाबचे. मुघलांच्या काळापासून ते दरबारी राजकारणात उच्चपदस्थ. पुढे शीख महाराज रणजीत सिंह यांच्या काळात खत्री परिवार काशीला आला.

देवकीनंदन खत्री याचं शिक्षण उर्दू, फारसी, हिंदी, इंग्रजी या सर्व भाषांमध्ये झाल. काशी नरेश ईश्वरीप्रसाद यांच्याशी त्यांचे घरगुती संबंध होते. त्यातूनच त्यांना उत्तरप्रदेशमध्ये चकीया आणि नौगढच्या जंगलातील ठेकेदारीची कामे मिळाली. याच जंगलात अनेक वर्षे काढल्यावर त्यांना अनेक ऐतिहासिक दंतकथा ऐकायला मिळाल्या. यातूनच त्यांना एक महाकादंबरी सुचत गेली.

तीच ही चन्द्र्कांता. साल होतं १८८८. 

बनारसच्या राजाच्या मदतीने सुरु झालेल्या लाहरी प्रिंटींग प्रेसमध्ये त्यांनी हे पुस्तक प्रकाशित केले. हिंदी देवनागरी भाषेत लिहिलेली ही पहिली कादंबरी असेल. या रहस्यमय कादंबरीने प्रचंड लोकप्रियता मिळवली. चार भागात ही कादंबरी प्रसिद्ध झाली. देशाच्या कानाकोपऱ्यात  ज्यांना हिंदी येत नाही ते लोक देखील देव नागरी भाषा शिकून वाचू लागले.

चन्द्र्कांताच्या यशामुळे देवकीनंदन खत्री १० वर्ष चन्द्र्कांता संतती लिहित गेले. त्याचे २४ भाग प्रकाशित झाले. सगळे तुफान गाजले.  चंद्रकांता संततीतील एका पात्राला नायक करून त्याची भूतनाथ ही कादंबरी लिहिली. पण दुर्दैवाने ही कादंबरी अपूर्ण असताना १९१३ साली त्यांचे निधन झाले. त्यांचे कार्य त्यांचे सुपुत्र दुर्गाप्रसाद खत्रीनी पूर्ण केले.

१०० च्या वर वर्षे झाली. चन्द्र्कांता ही आजही हिंदी मधील सर्वोत्तम साहित्यकृती मानली जाते. जॉर्ज आर आर मार्टिन यांच्या प्रमाणेच देवकीनंदन खत्री महान लेखक.

बाकी काही का असेना मुघल कालीन फारसीच्या जागी देवनागरी लिपीतल्या हिंदीचा प्रसार होण्यामागे देवकीनंदन खत्री यांचा सिंहाचा वाटा आहे.

अनेकांना चंद्रकांता ही मोठ्या पडद्यावर आणायची इच्छा होणे साहजिक होते. यामुळे १९९४ साली निरजा गुलेरी यांनी ही सिरीयल दूरदर्शनवर आणली. त्यानंतरही एकटा कपूरने वगैरे प्रयत्न केला. पण नव्वदच्या दशकात बनलेली चंद्रकांता भारतीय टीव्हीच्या जगातील मास्टरपिस समजली जाते.

हे ही वाच भिडू.