कोल्हापुरात कामगार म्हणून आलेल्या केरळी बंधूंनी जगात गाजलेला कारखाना उभारला, “मेनन पिस्टन.”

रांगड्या कोल्हापूरची ओळख कुस्ती, तांबडा पांढरा रस्सा, कोल्हापुरी चप्पल, अंबाबाईच मंदिर, रंकाळा तलाव, ऊस साखर गुळापर्यंत मर्यादित नाही. राजर्षी शाहू महाराजांचा सर्वोत्कृष्टतेचा ध्यास ठेवणाऱ्या या करवीर नगरीने प्रत्येक क्षेत्रात आपल नाव गाजवलं आहे.

असच कोल्हापूरचा दबदबा असलेलं आणखी एक क्षेत्र म्हणजे अभियांत्रिकी क्षेत्र.

छत्रपती शाहू महाराज, राजाराम महाराज यांच्या प्रेरणेने विसाव्या शतकाच्या सुरवातीला कोल्हापूरने इंजिनियरिंग क्षेत्रात पाऊल टाकलं. यंत्रमहर्षि वाय.पी.पवार, महादबा मिस्त्री, तात्या शिंदे, कै.रामभाई सामाणी इत्यादींच्या कष्टपूर्वक प्रयत्नामुळे कोल्हापूरचं नाही तर दक्षिण महाराष्ट्रात यांत्रिकिकरणाचे नवे युग सुरू झाले.उद्यम नगरीचा विशाल परिसर यंत्र सामुग्री व सुटे भाग यांच्या निर्मिती कार्यात मग्न राहिला.कोल्हापूर उद्योग वसाहतीतील उत्पादने अनेक आशियाई व आफ्रिकन देशात निर्यातही होऊ लागली.

अनेक लोक नोकरीधंद्याच्या शोधात रोजगाराच्या आशेने कोल्हापूरला येऊ लागली. अशातच दोन भाऊ पार केरळवरून कोल्हापूरला आले. कामगार म्हणून सुरवात केली. स्वतःचा कारखाना घातला, इतकंच नाही तर कोल्हापूरच्या इंजिनियरिंगचा ब्रँड सगळ्या जगात फेमस केला.

नाव चंद्रन मेनन आणि राम मेनन 

केरळमधील पण्णंगड या गावात २५ फेब्रुवारी १९३० मध्ये राम मेनन यांचा जन्म झाला. श्रीनारायणपूरम हे त्यांचे मूळ गाव. वाणिज्य शाखेतून पदवी शिक्षण घेतल्यानंतर मोठे बंधू चंद्रन मेनन यांच्यासोबत ते १९५१ मध्ये कोल्हापुरात आले. उद्यम नगरातील एका फाउंड्रीत कामगार म्हणून त्यांच्या करिअरची सुरुवात झाली. तत्कालीन उद्योजक बापूसाहेब जाधव, दादासाहेब चौगुले, हेमराज यांच्या संपर्कात ते आले.

नावीन्याचा ध्यास असल्याने त्यांनी फाउंड्रीत अवघड उत्पादने तयार करण्यास प्राधान्य दिले. तिथे हात बसल्यावर मोठे बंधू चंद्रन मेनन यांच्यासोबत त्यांनी १९५४ मध्ये मेनन अँड मेनन ग्रुपची सुरुवात केली.

चंद्रन मेनन यांनी त्या काळात एक शेतीसाठी म्हणून इंजिन बनवलं होतं. त्याकाळच्या मानाने ते एक अत्याधुनिक इंजिन होत आणि त्याला डिझेलची देखील कमी आवश्यकता लागायची. पण परप्रान्तीय असल्यामुळे त्यांच्या इंजिनवर शेतकरी विश्वास ठेवायला तयार नसायचे. त्यामुळे क्वालिटी असूनही खप नव्हता.

हि गोष्ट तत्कालीन आमदार उदयसिंह गायकवाड यांच्यापर्यंत पोहचली. एक बाहेरच्या राज्यातून आलेला कारखानदार या[ल्याकडच्या शेतीचा अभ्यास करतो, शेतकऱ्यांच्या गरज ओळखून त्यांच्यासाठी काही नवं तंत्रज्ञान शोधायची धडपड करतो हि घटना अभिमानास्पद आहे असं गायकवाड यांचं मत होतं. मेनन यांच्या मदतीसाठी शासनातर्फे  काही तरी करावं म्हणून त्यांनी प्रयत्न करायचं ठरवलं.

बाळासाहेब देसाई तेव्हा राज्याचे कृषिमंत्री होते. उदयसिंह गायकवाड यांचे त्यांच्याशी चांगले संबंध होते. बाळासाहेब रोज सकाळी लवकर आपल्या मुंबईच्या बंगल्यात शेजारच्या समुद्रकिनाऱ्यावर फिरायला जातात हे त्यांना माहित होत. तेव्हा त्यांचा मूड चांगला असतो म्हणून गायकवाड हे कोणतंही काम निघालं कि त्यांना तिथंच भेटायला जायचे.

त्यादिवशी देखील तसेच झालं. गायकवाड यांनी सकाळी समुद्रकिनाऱ्यावर बाळासाहेब देसाईंची भेट घेतली आणि मेनन यांच्या इंजिनबद्दल सांगितलं. 

या इंजिनाला डिझेल कमी लागत आणि कमी वेळात जास्त पाणी खेचलं जातं. त्यामुळे शेतकऱ्यांच्या वेळेच्या व खर्चाच्या बचतीसाठी म्हणून राज्यशासनाने तगाईवर इंजिन मंजूर करावे.

गायकवाडांनी चंद्रन मेनन यांची देखील कोल्हापुरात कृषिमंत्र्यांशी भेट घालून दिली. पण बाळासाहेब देसाई म्हणाले,

“तगाईवर आता नवी इंजिन मंजूर करायची नाहीत असा मंत्रिमंडळाने निर्णय घेतला असल्यानं आता ते शक्य होणार नाही.”

चंद्रन मेनन आणि उदयसिंहराव गायकवाड म्हणाले,

साहेब अजूनही वेळ गेलेली नाही. शेतकऱ्यांच्या हितासाठी आपण निर्णय बदलू शकता.

बैठक इथेच संपली. बाळासाहेबांना त्यांचं म्हणणं पटलं असावं. त्यांनी शेती विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावून घेऊन मेनन यांच्या इंजिनाचा अभ्यास करून आठ दिवसात अहवाल देण्यास सांगितले. शासकीय अधिकारी कोल्हापूरला आले. त्यांनी चंद्रन मेनन यांचं म्हणणं ऐकून घेतलं, त्यांच्या इंजिनाची पाहणी केली. मुंबईला परत जाऊन बाळासाहेबांना आपला अहवाल सादर केला. त्यांनी तो अहवाल मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर केला. आपलं म्हणणं ठामपणे मांडलं.

अखेर तत्कालीन मुख्यमंत्र्यानी शेतकऱ्यांना तगाईवर इंजिनं द्यायची नाहीत हा निर्णय बदलला. मेनन यांचं ते इंजिन तगाईवर मंजूर झालं.

इथून मेनन बंधूंचं नशीबच पालटलं. त्यांची इंजिने खेडोपाडी शेतकऱ्याच्या बांधावर पोहचली. यशाची उंची, अपयशाने केलेला पाठलाग आणि पुन्हा उसळी घेऊन घडवलेले नवनिर्माण असा प्रवास मेनन यांनाही करावा लागला. अभियांत्रिकी कामाची आवड आणि हुशारी, हे अंगभूत गुण मात्र सदैव त्यांच्यासह राहिले.

स्वयंरोजगार म्हणून सुरू केलेल्या फाउंड्री उद्योगाचा विस्तार प्रथम त्यांनी मोटारींना लागणारे पिस्टन बनवून केला. त्यातून ‘मेनन पिस्टन’ ही कंपनी उभी राहिली, वाढली.

ती इतकी की, ‘मारुती मोटर’ची जुळवाजुळव सुरू होण्याआधी संजय गांधींची भेट घेण्यासाठी इंदिरा गांधी यांनी मेनन यांना निमंत्रित केले होते, असे सांगतात. पुढे मारुती मोटारींत ‘मेनन पिस्टन’च वापरले गेल्यामुळे सिद्ध झाले!

आज टाटा, कमिन्स, किर्लोस्कर, सोनालीका ट्रॅक्टर, आयशर, एस्कॉर्ट, सुझुकी अशा नामांकित कंपन्या ‘मेनन’ उत्पादने खरेदी करतात.

१९५४ मध्ये सुरु झालेल्या मेनन अँड मेनन ग्रुपमध्ये पुढे सिलिंडर हेड व ब्लॉक्स, पिस्टन, रिंग, बेअरिंगचे उत्पादन सुरू केले. चंद्रन मेनन यांच्यानंतर त्यांचे धाकटे बंधू राम मेनन यांच्या नेतृत्वाखाली मेनन अँड मेनन ग्रुपचा विस्तार आणि निर्यात वाढली. या ग्रुपची वार्षिक उलाढाल सध्या ७०० कोटींवर आहे, तर अडीच हजारांहून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत.

मेनन ग्रुपच्या कोल्हापुरात तयार होणाऱ्या एकूण उत्पादनाच्या ३० टक्के निर्यात ही जगभरातील २४ देशांमध्ये होते.  

कोल्हापूरच्या उद्योगविश्वाला मोठी स्वप्ने दाखवून ती सत्यात उतरवण्याचा मार्ग दाखवणारे राम मेनन यांचे सामाजिक क्षेत्रातही मोठे योगदान होते.

कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स, स्मॅक, कोल्हापूर इंजिनीअरिंग असोसिएशन, राष्ट्रीय अंध कल्याण संघ यांसह केआयटी कॉलेज, दि प्रायव्हेट एज्युकेशन सोसायटी, जनता सहकारी बँकेच्या संचालक मंडळावरही त्यांनी काम केले. कोल्हापूर महापालिकेने त्यांना ‘करवीर भूषण’ पुरस्कार देऊन गौरविले. शिवाय ‘इंडियन इन्स्टिट्युट ऑफ फाउंड्रीमेन’, इचलकरंजी येथील ‘फाय फाउंडेशन पुरस्कार’ त्यांना प्रदान करण्यात आला होता.

सध्या मेनन ग्रुपमध्ये अडीच हजार कर्मचारी तर आहेतच पण शिवाय त्यांनी कोल्हापुरात लहानमोठे उद्योजकांना साहाय्य करून अनेक कारखाने उभारण्यास योगदान केले आहे. आज जवळपास पंचवीस हजार कष्टाळू हातांना मेनन मुळे रोजगार मिळाला आहे.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.