एकदा तर राजर्षी शाहू महाराजांना अंबाबाईच्या मंदिर प्रवेशावेळी अडवलं होतं…

बरोबर एका वर्षांपूर्वीची घटना. खासदार संभाजीराजे छत्रपती यांना कुलस्वामिनी तुळजाभवानी मंदिराच्या गाभाऱ्यात जाण्यापासून रोखण्यात आलं होतं. मे २०२२ मध्ये संभाजीराजे छत्रपती उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर गेले असतांना ते श्री तुळजाभवानी मातेचं दर्शन घेण्यासाठी गेले होते. दर्शनासाठी आल्यावर थेट गाभाऱ्यात जाऊन विधिवत दर्शन घेतलं जातं. ही शेकडो वर्षांची परंपरा आहे. तरीदेखील संभाजीराजे छत्रपती यांना गाभाऱ्यात जाण्यापासून रोखण्यात आलं होतं. 

त्या नंतर काल रामनवमीला नाशिकच्या काळाराम मंदिरात एक घटना घडली जी आपल्याला आजही विचार करायला भाग पाडते.

माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या पत्नी संयोगीताराजे छत्रपती यांनी नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये रामनवमीला वेदोक्त मंत्र म्हणत होत्या पण मंदिरातील महंतांनी त्यांना वेदोक्त मंत्र म्हणण्यास विरोध केला. यामुळे चर्चेत आलं ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या आयुष्याला आणि संपूर्ण देशाला क्रांतीकारक वळण देणारं वेदोक्त प्रकरण. त्याच्या १०० वर्षांनीही पुन्हा त्याच प्रकरणाला छत्रपतींच्या वशंजाला तोंड द्यावं लागतंय हे दुर्दैव म्हणायला लागेल.

या दोन्ही घटनेमुळे राजर्षी शाहू महाराज यांच्याही आयुष्यात असाच काहीसा प्रसंग आलेला. त्यांना कोल्हापुरातल्या अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी जाण्यापासून रोखलं होतं.

ती घटना काय होती याची माहिती घेण्यासाठी बोल भिडूने इतिहास अभ्यासक आणि संशोधक इंद्रजित सावंत यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी सांगितल्यानुसार, 

या घटनेला वेदोक्त प्रकरणाची पार्श्वभूमी आहे. १९०० ते १९०५ या ५ वर्षांच्या काळात वेदोक्त प्रकरण घडलं होतं. याच दरम्यान १९०२ ला शाहू महाराज परदेश दौऱ्यावर गेले होते. ते परदेश दौऱ्यावर  जाण्याआधी कोल्हापूरमधील जे ब्रम्हवृंद होते त्यांनी शाहू महाराजांना सांगितलं की, 

“तुम्ही परदेशात जाण्याआधी ब्राम्हणांचा आशीर्वाद घेऊन जा, तर तुमची यात्रा सफल-संपूर्ण होईल”. 

मग यावर शाहू महाराज म्हणले कि माझे पूर्वज परदेशात जाताना ब्राम्हणांचे आशीर्वाद घेऊनच गेले होते पण ते तिथेच वारले. आता मी ब्राम्हणांचा आशीर्वाद न घेता जातो आणि बघतो कि माझा दौरा यशस्वी होतो कि नाही. 

पूर्वज म्हणजे शाहू महाराजांचे आजोबा छत्रपती राजाराम महाराज. परदेशात गेलेले ते पहिले छत्रपती आहे जे परदेशात गेले होते. याच परदेशी दौऱ्याच्या वेळेस इटलीच्या फ्लोरेन्स शहरात ते वारले. 

आणि म्हणून मग शाहू महाराज म्हणाले कि मी ब्राम्हणांचा आशीर्वाद न घेता जातो काय होते ते बघूया..शाहू महाराज दौऱ्यावर गेले आणि यशस्वीरीत्या परत आले. 

परत आल्यानंतर छत्रपतींच्या रिवाजानुसार, अंबाबाईच्या दर्शनाला मंदिरात जाण्याचं ठरलं. पण तेथील ब्राम्हणांनी आणि मंदिराच्या पुजाऱ्यांनी महाराजांना असं सांगितलं कि तुम्ही ब्राम्हणांचा आशीर्वाद घेतल्याशिवाय आणि प्रायश्चित्त केल्याशिवाय अंबाबाईचं दर्शन घेऊ शकत नाही कारण तुम्ही समुद्र उल्लंघन करून धर्मशास्त्राचं उल्लंघन केलं आहे. 

त्यावर शाहू महाराज म्हणाले कि, “मी प्रायश्चित्त वैगेरे काहीही घेणार नाही. मी अंबाबाईचं दर्शन घेणारच”. 

त्यासाठी ब्राम्हणांनी प्रचंड विरोध केला मात्र महाराजांनी तो विरोध झुगारून अंबाबाईचं दर्शन घेतलंच. या संपूर्ण घटनेचा उल्लेख शाहू महाराजांनी लिहिलेल्या पत्रात आहे. या घटनेला १०० वर्षे उलटून गेले तरी अजूनही अशा प्रसंगाला बहुजनांना तोंड द्यावं लागत आहे.  

हे हि वाच भिडू :

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.