अस्सल भारतीय मातीतलं कार्टुन यशस्वी होत नाही हा गैरसमज छोटा भीमने मोडला

सध्या लॉकडाऊन मध्ये लोक एवढे कंटाळले आहेत की अफवा पसरवण्यामध्येही क्रिएटिव्हीटी आली आहे. या पूर्वी थाळी वाजवल्यामुळे कोरोना जातो अशा अफवा पसरत होत्या,

आता छोटा भीमचं लगीन ठरलं ही अफवा पसरली आणि ते ही त्याची मैत्रीण चुटकीशी नाही तर राणी इंदुमती शी.

सगळा सोशल मीडिया भडकला. आता माझंही लग्न झालं पाहिजे म्हणून सर्व छोट्या मुलांनी मम्मीशी भांडण काढलंय. १०,जनपथवर सुद्धा वधुसंशोधन मोहीम सुरू झाली आहे ही नवी अफवा आहे.

असो, पण सोशल मीडियाने चिडायचं कारण वेगळं होत.

ज्याला गेली कित्येक वर्षे चुटकीने फुकटात लाडू चारले त्या छोटा भीमने ऐनवेळी दगाबाजी करून पैसे वाल्या राणी इंदूमती शी लग्न केलं याचा सगळ्यांना राग आला.

अखेर शोच्या निर्मात्यांना पब्लिकला ही फक्त एक अफवा आहे असं सांगायला लागलं. या सिरीयल मधील सर्व पात्र लहान मुले आहेत व त्यांचा लग्न करायचा कोणताही विचार नाही हे त्यांनी एका निवेदनात म्हटलंय.

छोटा भीमच्या वादावर अखेर पडदा पडला.

पण या घटनेने दाखवून दिलं की आजही छोटा भीम भारतात प्रचंड पॉप्युलर आहे. लोकांच्या भावभावना या ऍनिमेशन कॅरॅक्टरशी जोडलेल्या आहेत.

भारतात कार्टूनची संस्कृती आणली डिस्नेने. नव्वदच्या दशकात गुड मॉर्निंग डिस्ने म्हणत अनेक लहान मुलांची सकाळ उगवायची. मग अल्लादिन जीनी, डक टेल्सचा स्क्रुज मॅकडक, टेलस्पिनचा बलू, मिकी माउस, डोनाल्ड डक हे असंख्य डिस्ने कॅरेकटर्सनी भारतीय मुलांच्या विश्वात प्रवेश केला.

मग आलं कार्टून नेटवर्क. टॉम अँड जेरी, पॉपॉय वगैरेंनी आपल्याला वेड लावलं.

तसं भारतीय कार्टून कॅरेकटरची इंडियन मार्केट मध्ये गरज होती.

नाही म्हणायला जंगल बुकचा मोगली होता पण तो ही बनवला होता जपानवाल्यांनी. भारतातले हजारो कार्टुनिस्ट जगभरात काम करत होते पण आपला स्वतःचा असा कार्टून कॅरेक्टर नव्हता.

राजीव चिलाका नावाचा एक सॉफ्टवेअर इंजिनियर अमेरिकेतल्या एका मोठ्या कंपनीत काम करत होता. तो मूळचा हैद्राबादचा. एमएस साठी अमेरिकेत आला आणि तिथे त्याला ऍनिमेशन इंडस्ट्रीची ओळख झाली.

नोकरी करता करता ऍनिमेशनचा कोर्स केला.

तिथं त्याच सगळं चांगलं चाललं होतं. लग्न वगैरे करून व्यवस्थित सेटल झाला होता. पण आवडीच्या क्षेत्रात काही वेगळं करून दाखवण्याची उर्मी शांत बसू देत नव्हती.

आणि राजीव एक दिवस सगळं सोडून भारतात परत आला.

जानेवारी 2001 मध्ये त्याने ग्रीन गोल्ड ऍनिमेशन प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी स्थापन केली. प्रचंड स्ट्रगल केला. त्याला पहिला ब्रेक 2003 साली मिळाला. त्याच्या बॉंगो नावाच्या कार्टुनला कार्टुन नेटवर्क चॅनेलवर संधी मिळाली.

त्याच यश बघून विक्रम बेताल ही कार्टुन टेलिफिल्म बनवली.

भारतीय मायथॉलॉजी मध्ये असे अनेक कॅरेकटर आहेत ज्यांना कार्टुन मध्ये बनवून लहान मुलांपर्यंत पोहचवता येईल व त्याना ते आवडेल हे राजीव चिलकाला विक्रम बेताल मुळे लक्षात आले.

पुढे कृष्णावर त्याने चार टेलिफिल्म्स बनवल्या. पण त्याचा ड्रीम प्रोजेक्ट होता भीमावर आधारित असलेली एक कार्टुन सिरीज.

छोटा भीम

पण या छोटा भीमला कोणतेही चॅनेल हिरवा झेंडा दाखवत नव्हतं. भारतीय प्रेक्षक फक्त जगभरातील ऍनिमेशन बघतात, त्यांना भारतीय कार्टुन आवडत नाही हा मोठा गैरसमज कार्टुन चॅनेल वाल्याना होता.

अखेर खूप प्रयत्नातून एक चॅनेल छोटा भीम प्रसारित करायला तयार झाली. पोगो.

पोगोची भारतातली स्थिती काही चांगली नव्हती. त्यांचे कार्टुन इथल्या प्रेक्षकांना क्लिक होत नव्हते. भारतातून गाशा गुंडळायची त्यांची तयारी सुरू होती.

अशातच छोटा भीम आला.

लाडू आवडणारा, महाभारतातल्या भीमा प्रमाणे शक्तिमान असणारा हा मुलगा, त्याचे मित्र मैत्रिणी आणि ढोलपूर च्या राज्यावर येणारी संकटे ही या सिरीजची कथा होती.

छोटा भीम लहान मुलांच्यात प्रचंड फेमस झाला. त्याचे फोटो, स्टिकर्स प्रत्येक शाळकरी मुलाच्या बॅगेत दिसू लागले.

पोगो चॅनेलला देखील भीम मुळे नवीन ओळख मिळाली. फक्त भारतातच नाही तर भारताबाहेर देखील छोटा भीम फेमस आहे.

एवढंच काय पाकिस्तानातही छोटा भीमचे खूप फॅन्स आहेत.

छोटा भीममधला राजू, अर्जुन या कॅरेकटर्सची वेगळी कार्टुन सिरीयल बनली. तीही यशस्वी ठरली. छोटा भीमचे शेकडो एपिसोड रिलीज झाले आहेत.त्याच्यावर रोज हजारो जोक बनतात. एका राजकीय नेत्याला या कार्टूनशी जोडलं गेलंय.

काही का असेना राजीव चिलाका यांना या छोटा भीमने करोडपती बनवलंय.

अस्सल भारतीय मातीतला कार्टुन यशस्वी होत नाही हा गैरसमज छोटा भीमने मोडून काढला.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.