डिलिव्हरी बॉयचं काम करणाऱ्या पोरानं वर्ल्डकपमध्ये बांगलादेशला धूळ चारलीये

क्रिकेटर म्हटल्यावर याच्याकडं मोकार पैसा असेल, असं आपण सहज गृहीत धरतो. आता आपल्या भारतात क्रिकेटइतकं येड दुसऱ्या कशाचंच नाय (तसं राजकारणाचं आहे, पण तो नाद वेगळाय.) क्रिकेटर लोकांना चांगला पगार, जाहिराती, लिलाव, स्पॉन्सर असे पाच-सहा इन्कम सोर्स तर फिक्समध्ये असतात. आता हे का होतं, तर भारतात क्रिकेटचं मार्केट तेवढं वाढीव आहे. भारतासारखीच परिस्थिती इतर देशात मात्र नाही.

आता स्कॉटलंड हा देश आपल्याला माहिती तो, त्यांचे खुंखार पोलिस, इंग्लंडचे शेजारी आणि तिथं जगात भारी व्हिस्की मिळती या गोष्टींपायी. स्कॉटलंड आणि क्रिकेटचाही तसा जुनाच संबंध. लय रिक्षा फिरवली, आता तुम्हाला पॉईंटाचा मुद्दा सांगतो.

यावर्षीच्या टी२० वर्ल्डकपला रविवारी सुरुवात झाली. म्हणजे आता पहिला राऊंड सुरूये. त्यात स्कॉटलंड विरुद्ध बांगलादेश अशी मॅच झाली. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडला हरवल्यानं बांगलादेशचे पिवळे वाघ चांगलेच फॉर्मात होते. स्कॉटलंडनं या वाघांची शिकार केली आणि कडकमध्ये मॅच मारली.

या विजयाचा खरा शिल्पकार होता ख्रिस ग्रीव्ह्स. किस्सा काय झाला, स्कॉटलंडचे ६ कार्यकर्ते ५३ रन्स करून कल्टी झाले. आता बांगलादेशचा नागीण डान्स होणार असंच वाटत होतं, पण ग्रीव्ह्सभाऊंनीच त्यांची पुंगी वाजवली. त्यानं २८ बॉलात ४ फोर आणि २ सिक्स हाणत ४५ रन्स केले. स्कॉटलंडनं १४० रन्स बोर्डावर लावले.

आता बांगलादेश इंडियाकडून हरत असली, तरी खेळण्यात काय वंगाळ टीम नाये. शकीब उल हसन आणि मुश्तफिकूर रहीम सहज मॅच काढतील असं वाटत होतं. ग्रीव्ह्स बॉलिंगला आला आणि या दोघांना घरी पाठवलं. विषय खोल. पुढं स्कॉटलंडनं मॅच जिंकली, सगळा एकदम पिक्चरसारखा सिन.

आता पिक्चरमध्ये कसं शेवटी रडारडीचा सिन असला की, आई डोळ्याला पदर लावते, फादर भलतीकडं बघतात, गर्लफेंड बॉयफ्रेंड खांद्यावर डोकं ठेवतात. या मॅचमुळे सेम तसलाच सिन स्कॉटलंडमध्ये झाला असणार.

एवढा क्वालिटी खेळलाय म्हणल्यावर ग्रीव्ह्सला प्लेअर ऑफ द मॅचची ट्रॉफी दिली. त्यांचा कॅप्टन काईल कोयट्झरला यावेळी दोन शब्द बोलायला सांगितले. तेव्हा भावुक होऊन तो म्हटला, “इथपर्यंत यायला आम्ही लय मेहनत घेतलीये. काही महिन्यांपूर्वी ग्रीव्ह्स डिलिव्हरी बॉय म्हणून काम करायचा. जेव्हा आम्ही वर्ल्डकपची तयारी करायला घेतली तेव्हा हा अप्पा आमच्या पिक्चरमध्ये पण नव्हता. त्यानं मात्र लय कष्ट, मेहनत आणि त्याग करत टीममध्ये जागा मिळवलीये. याच महिन्यात टी२० डेब्यू करत त्यानं नेदरलँड्सच्या चार विकेट्सही खोलल्या होत्या. ग्रीव्ह्समध्ये क्षमता आहे ते त्यानं दाखवून दिलंय. तो लय भारी भिडू आहे.

आता सगळी टीम रडवेली झाली, ग्रीव्ह्सभाऊ पण. तो म्हटला, “मी टीमला सांभाळू शकलो याचाच मला आनंद आहे. मी या मॅचचा पार्ट आहे यावर माझा विश्वास बसंना झालाय.”

आपल्यात पण लय जण असतात ज्यांना क्रिकेटर बनायचं असतं. पण आपण स्पर्धा, पैसा आणि जबाबदारीच्या नादात आपली स्वप्न सोडून देतो. ग्रीव्ह्सनं तसं केलं नाय. त्यानं पार्सल वाटली आणि घर सांभाळलं, पण क्रिकेटर बनायचं स्वप्न पूर्ण केलंच.

कालच्या दुसऱ्या मॅचवेळी ओमानच्या कोचला रडू आलं. आता साधी गोष्ट आहे राव, ना सोयीसुविधा, ना जाहिराती, ना पैशे तरीही हे छोटे देश लढाया लढत राहतात आणि लय लोकांची स्वप्न पूर्ण करत राहतात. अशावेळी डोळ्यात पाणी येणारच.

ग्रीव्ह्स काय लगेच सुपरस्टार होणार नाही, ना त्याच्या घराबाहेर स्पॉंन्सर्सची रांग लागेल. पण कधी मोठं होण्यासाठी लय कष्ट करावे लागत असतील, तर भिडू लोक ग्रीव्ह्सची स्टोरी आठवायला विसरू नका!

हे ही वाच भिडू:

 

Leave A Reply

Your email address will not be published.