दर्डा फॅमिली अडकली ; कोळसा घोटाळ्याचा धूर अजूनही संपेना…

बातमी आहे ती राज्यसभेचे माजी खासदार विजय दर्डा यांची.  त्यांना कोळसा घोटाळा प्रकरणी ४ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलीय. विजय दर्डा आणि त्यांचा मुलगा देवेंद्र दर्डा यांना दिल्ली विशेष न्यायालयाने चार वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. जेएलडी यवतमाळ एनर्जीला चुकीच्या पद्दतीनं खाणीचं कंत्राट मिळवल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. जेएलडी यवतमाळ या कंपनीला कंत्राट मिळालं होतं, जी कंपनी दर्डा यांच्या मालकीची होती.

युपीए सरकारच्या काळात गाजलेल्या घोटाळ्यांमध्ये कोळसा घोटाळ्याचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. या प्रकरणातील ही तेरावी शिक्षा आहे.

नेमका कथित कोळसा घोटाळा आहे तरी काय?

सीबीआयने न्यायालयाने सांगितलं होतं की, १९९९ ते २००५ या कालावधीमध्ये म्हणजेच UPA चं सरकार असतांना जेएलडी यवतमाळ एनर्जी लिमिटेडला छत्तीसगडमधील पूर्व फतेहपूर कोळसा खाणी मिळाल्या होत्या. हा एका षडयंत्राचा भाग होता. जेएलडी यवतमाळ यांना जे जुने ब्लॉक देण्यात आले होते त्याची माहिती लपवून पुन्हा युपीए सरकारच्या काळामध्ये गैरमार्गाने कंत्राट मिळवले गेले. यात पात्रतेच्या निकषांचा चुकीचा अर्थ काढण्यात आला होता. तसेच अर्जांमध्ये चुकीचे दावे करण्यात आले असे आरोप आहेत. त्यावेळी डॉ.मनमोहन सिंग यांच्याकडे कोळसा मंत्रालयाचा कारभार होता.

तसेच यावरून राजकारणही बरंच पेटलं होतं. कोळसा घोटाळा प्रकरणात गैरमार्गाने कंत्राट मिळावल्याचा आरोप विरोधकांकडून माजी खासदार विजय दर्डा यांच्यावर करण्यात आला होता. देशभरात गाजलेल्या कोळसा घोटाळा प्रकरणात देशातील अनेक बड्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते.

‘सुमारे अकरा वर्षांपूर्वी भाजपने कोळसा खाणवाटप घोटाळ्यावरून संसदेत आवाज उठवला होता. कोळसा घोटाळ्याची व्याप्ती ही दिसते त्यापेक्षाही प्रचंड मोठी आहे. आणखी किमान २०-२५ वर्षे या घोटाळ्याचा धूर येत राहील व कोणाकोणाचे हात कोळसा गैरव्यवहारात काळे झाले त्यांचेही चेहरे जगासमोर येतील’, असा हल्लाबोल ज्येष्ठ भाजप नेते हंसराज अहीर यांनी त्यावेळी लोकसभेतील चर्चेदरम्यान केला होता.

सीबीआयने या प्रकरणात २७ मार्च २०१३ रोजी आरोपपत्र दाखल केलं होतं. या आरोप पत्रात या सगळ्यांनी गैरमार्गाने कोळसा खाण आपल्या ताब्यात घेतल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणात सीबीआयने २० नोव्हेंबर २०१४ या दिवशी क्लोजर रिपोर्ट सादर केला. मात्र तो स्वीकारण्यास न्यायालयाने नकार दिला आणि प्रकरणाचा तपास सुरु ठेवण्याचे आदेश दिले होते.

या संदर्भात राज्यसभेचे माजी खासदार विजय दर्डा यांनी पंतप्रधान मनमोहन सिंह यांना लिहिलेल्या पत्रात माहिती लपवण्याचा आरोप करण्यात आला होता. याच आधारावर हा तपास सुरु झाला होता.

सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत आरोप सिद्ध झालेले हे १३ वे प्रकरण आहे.

गेल्या नऊ वर्षात आम्ही देखील अनेक वेदना भोगल्या आहेत, त्यामुळे आमची शिक्षा कमी करण्यात यावी असा युक्तिवाद दर्डाच्या वतीने करण्यात आला होता.  त्यानंतर आता कोर्टाने विजय दर्डा आणि देवेंद्र दर्डा यांना चार वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

दर्डा यांच्यासोबत कोळसा विभागाचे माजी सचिव एच. सी. गुप्ता, के. एस. क्रोफा आणि के. सी. सामरिया, जेएलडी यवतमाळ एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड आणि त्यांचे संचालक मनोज कुमार जयस्वाल इत्यादींचा समावेश आहे. या प्रकरणात एच. सी. गुप्ता आणि इतर दोन अधिकारी के. एस. क्रोफा आणि के. सी. सामरिया या तिघांना प्रत्येकी तीन वर्षे शिक्षा सुनावली आहे. छत्तीसगडमधील कोळसा खाणींच्या वितरणात अनियमितता आढळून आल्याचा ठपका कोर्टानं सर्वांवर ठेवला होता आणि IPC कलम १२०B, ४२० आणि भ्रष्टाचाराशी संबंधित कलमं या सर्वांवर लावली होती. जेएलडी यवतमाळला कोर्टाने ५० लाखांचा दंडही ठोठावला आहे.

महाराष्ट्रात दर्डा फॅमिलीला कोण नाही ओळखत…

जवाहरलाल दर्डा यांनी लोकमत वृत्तसमुहाची सुरवात केली. त्यानंतर लोकमतची धुरा आली त्यांची दोन मुलं विजय दर्डा आणि राजेंद्र दर्डा यांच्याकडे. विजय दर्डा हे काँग्रेसकडून तीन टाइम राज्यसभा खासदार राहिले आहेत तर राजेंद्र दर्डा राज्यातील काँग्रेस सरकारमध्ये मंत्री राहिले आहेत. लोकमत समूहाची १००% टक्के मालकी दर्डा फॅमिलीकडेच आहे. या समूहाची news 18 लोकमत या चॅनेलमध्ये देखील हिस्सेदारी आहे.

गेल्या पाच दशकांपासून दर्डा कुटुंब राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात सक्रिय आहे. त्यामुळे आजच्या निकालानं दर्डा कुटुंबियांसमोरची आव्हानं नक्कीच वाढली आहेत.

बरं यात फक्त दर्डाच नाही तर छत्तीसगडच्या कोळसा घोटाळ्यात अनेक मोठ्या नावांचा समावेश आहे.

या प्रकरणात अनेक बडे अधिकारी आणि राजकारण्याशी संबंध असलेले अनेक जण रायपूर तुरुंगात कैद आहेत. यात IAS अधिकारी समीर बिश्नोई, सौम्या चौरसिया, मुख्यमंत्र्यांचे उपसचिव, सूर्यकांत तिवारी, कोळसा घोटाळ्यात सिंडिकेट म्हणून काम करणारे सुनील अग्रवाल हि लोकं आहेत जी तुरुंगवास भोगतायेत.

हे ही वाच भिडू :

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.