नगर मधल्या सर्वात हूशार माणसामुळं सांगली जिल्ह्यात कारखाना उभा राहू शकला

एखाद्या माणसाची ओळख सांगण्यासाठी विशेषण लावलं जातं. म्हणजे सहकारमहर्षी, कृषीमहर्षी, विचारक, सुधारक वगैरे वगैरे. पण एखाद्या माणसाची ओळख करुन द्यायची झाल्यास एखादं पान खर्च होणार असेल तर..?

आत्ता आपण त्यांची ओळख सांगण्याचा छोटासा प्रयत्न करु.. 

दुष्काळी महाराष्ट्राचे पाणी सल्लागार, प्रख्यात जलतज्ञ, कामगार शेतमजूर व शेतकऱ्यांचे नेते, शेतीक्षेत्राला दिशा देणारे बुद्धीजीवी शेतकरी, सामाजिक बांधिलकी जपणारे सिव्हिल इंजिनियर, कामगार संघटनांचे आधारस्तंभ, वीज बोर्डाच्या वर्केस फेडरेशनचे अध्यक्ष, गांधीवादी, डाव्या चळवळीचे नेते, कॉंग्रेस, शेकाप, कामगार किसान पक्ष आणि लाल निशाण पक्षाचे राजकारण केलेले एक आमदार म्हणजे,

कॉम्रेड दत्ता देशमुख 

वयाच्या २५-२५ व्या वर्षी ते आमदार म्हणून विधीमंडळात गेले. उत्तर नगर अशा तत्कालीन अकोले, संगमनेर, बेलापूर, नेवासा, शेवगाव, पाथर्डी, कोपरगाव, राहूरी अशा आठ तालुक्यांचा असणारा एक मतदारसंघ. या तालुक्यांचे नेतृत्व करण्याची संधी त्यांना कमी वयात मिळाली. आयुष्याची सुरवात त्यांनी कॉंग्रेसमधून केली.

आमदार म्हणून निवड झाल्यानंतर आपल्या पक्षनेतृत्वाच्या बाळासाहेब खेर आणि मोरारजी देसाईंचे वाभाडे काढण्यास सुरवात केली. कॉंग्रेसचा आमदार असूनही आमच्या विरोधात शेतकऱ्यांचे मोर्चे काढतो म्हणून मोरारजी देसाईं यांनी त्यांना अटक करवून आणली.

हळुहळु कॉंग्रेसच्या पुढारपणाचा फोलपणा लक्षात आला आणि हा माणूस डाव्या चळवळींकडे झुकू लागला. कृतीशील मार्क्सवाद अंमलात आणला गेला. लाल निशाणींच्या माध्यमातून महाराष्ट्राला एका हूशार व्यक्तिमत्वाची ओळख झाली.

यशवंतरावांनी हा विरोध वेळीच ओळखून मुख्यमंत्रीपदाची ऑफर देऊ केली. 

१९६२ साली यशवंतराव चव्हाण यांना भारताच्या संरक्षणमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली तेव्हा यशवंतराव चव्हाणांनी दोन डाव्या माणसांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती. त्यातील एक नाव भाई उद्धवराव पाटील यांच होतं तर दूसरं नाव कॉ. दत्ता देशमुख यांच होतं. अर्थात विचारांशी निष्ठा असणाऱ्या या दोन्ही नेत्यांनी यशवंतरांना नकार कळवला. त्यानंतर झालेल्या निवडणुकांमध्ये यशवंतरावांनी कॉ. दत्ता देशमुख यांचा पराभव घडवून आणला.

पुढे त्यांची भूमिका जलतज्ञ म्हणून राहिली. अवर्षण भागाला पाणी देण्यासाठी धरणांच नियोजन ठरवण्यापासून ते आणि पुर्नवसन मग धरण अशा भूमिकांमध्ये देखील त्यांच महत्वाचं काम राहिलं. त्यांचा उल्लेख करताना ग.प. प्रधान मास्तर म्हणतात,

कॉ. दत्ता देशमुख म्हणजे महाराष्ट्राच्या शेतीला मिळालेला इंजिनियर आहे.

कामगार मग तो साखर कारखान्यांचा असो, शेतीवरचा असो की गिरणी कामगार असो प्रत्येक क्षेत्र आणि प्रत्येक भाग त्यांच्यासाठीच होता.

अशा कॉम्रेड दत्ता देशमुखांमुळेच सांगली जिल्ह्यातला हुतात्मा किसन अहिर साखर कारखाना मंजूर होऊ शकला. 

वाळव्याचे क्रांन्तीसेनानी नागनाथ अण्णा नायकवडी आणि कॉम्रेड दत्ता देशमुख यांचा घनिष्ठ जिव्हाळा होता. नागनाथ अण्णा नायकवडींच्या हुतात्मा किसन अहिर साखर कारखान्यास अंतराच्या कारणावरून परवानगी मिळत नव्हती. तेव्हा क्रांन्तिसिंह नागनाथ अण्णा नायकवडी यांनी कारखाना मंजूर करून घेण्याची जबाबदारी पूर्णपणे कॉम्रेड दत्ता देशमुख यांच्यावर सोपवली.

त्यावेळी राव विरेंद्रसिंग हे केंद्रात शेतीमंत्री म्हणून कार्यरत होते. त्यांच्याकडेच कारखान्यांना परवानगी देण्याचे अंतीम अधिकार असत. त्यांच्यासोबत कारखान्यास आक्षेप घेणाऱ्या राजारामबापू कारखान्याचे एम.डी व वकिल यांच्यासह बैठक घेण्याचे नियोजित करण्यात आले. या बैठकीच्या सुरवातीलाच कॉम्रेड देशमुख कृष्णा, कोयना, वारणा, पंचगंगा नद्यांखोऱ्यांचा नकाशा घेवून आले.

चर्चा सुरू होताच केंद्रीय शेतीमंत्र्यांच्या समोर हा नकाशा मांडण्यात आला. या नकाशानुसार पाण्याची उपलब्धता, नद्यांचे खोरे, इतर कारखान्यांची स्थाननिश्चिती व हुतात्मा किसन अहिर यांच्या नावाने असणाऱ्या कारखान्यांची मंजूरी करण्याची निश्चित यांची अभ्यासपूर्वक मांडणी केली. ही मांडणी ऐकून राजारामबापू कारखान्याचे एम.डी व वकिल यांनी आपला आक्षेप मागे घेतला.

कृषी मंत्री देखील ही अभ्यासू मांडणी पाहून अचंबित झाले आणि त्यांनी तात्काळ कारखान्यास परवानगी देऊन टाकली. नगरच्या एका हूशार व्यक्तीमुळे सांगलीचा कारखाना उभा राहू शकला. सत्तेवर नसुन देखील आपल्या हूशारीने त्यांना सर्वत्र आदराचे स्थान मिळत असे ते यामुळेच. 

यशवंतराव चव्हाणांनीच त्यांना पहिल्या सिंचन आयोगात सहभागी होण्याची विनंती केली ती मान्य करत त्यांनी जलव्यवस्थापनाचा आदर्श वस्तुपाठ घालून ठेवला. दुष्काळ निवारण व निर्मूलन मंडळात भागिदारी केली. गावपातळ्यांवर जनजागृती करत असताना वर्तमानपत्रातून अभ्यासू मांडणी केली.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.