दक्षिणेतील अयोध्या म्हटल्या जाणाऱ्या दत्तात्रय पीठ-बाबाबुदानगिरीचा वाद नक्की आहे तरी काय

राजीव गांधींचा राममंदिर-बाबरी मस्जिदीचे दरवाजे उघडण्याचा निर्णय आणि अडवाणींनी काढलेली रथयात्रा या दोन घटनांमुळं भारतात मंदिर- मस्जिदीच्या राजकारणाला नवीन बळ मिळालं. अयोध्या विवाद मिटल्यांनंतर आता तरी या राजकारणाला खो लागेल असं वाटत असतानाच काशी, मथुरा येथील विवाद पुढे येऊ लागलेत. आता असे विवाद फक्त उत्तेरेतच चालत असतील असा जर तुम्ही विचार करत असाल तर थोडं थांबा.

 ‘श्री गुरु दत्तात्रेय स्वामी बाबा बुदान दर्ग्याचा’ विवाद तुम्हाला अजून माहित नाहीए.

कर्नाटकात चिकमंगलूर जिल्ह्यात असलेल्या बाबाबुदानगिरी किंवा दत्तात्रय पीठ म्हणू ओळखल्या जाणाऱ्या डोंगरावर हा दर्गा आहे. ‘श्री गुरु दत्तात्रेय स्वामी बाबाबुदान दर्गा’ नावावरूनच कळतंय कि इथं हिंदू मुस्लिम अशा दोन्ही धर्माच्या लोकांचं श्रद्धास्थान असणार. 

ब्रह्मा,विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींचा अवतार असलेले श्री दत्तगुरु आणि सुफी संत बाबा बुदान या दोन्ही श्रद्धास्थानांचं दर्शन घेण्यासाठी भाविक येथे गर्दी करतात.

शेकडो वर्षांपासून हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतीक म्हणून या दर्ग्याकडं पाहण्यात येतं.

या धार्मिक स्थळाच्या इतिहास सांगताना १९३० साली प्रसिद्ध झालेल्या म्हैसूर गॅझेटचा संदर्भ सारखा देण्यात येतो. यानुसार  शतकानुशतके एक मुस्लिम कुटुंब ‘दादा हयात खलेंद्र दत्तात्रेय स्वामी’ या दर्ग्याचे  प्रमुख आहेत. ते या परिसराची काळजी घेण्यासाठी एक मुजावर म्हणजेच पुजारी नेमतता. हे पुजारी हिंदू आणि मुस्लिम दोन्ही धर्माच्या भक्तांना पवित्र पाणी देतात. त्याचबरोबर हिंदू मठातील साधूंना  दिवा लावण्यासाठी गुहेच्या आत घेऊन जातात आणि  दत्तात्रयांच्या पादुकांची पूजा ही करतात. म्हैसूर धार्मिक आणि धर्मादाय संस्था कायदा १९२७ नुसार हे मंदिर ‘प्रमुख मुजराई मंदिर’ मानले गेले आहे. 

१९९० च्या दशकात जेव्हा राममंदिरसाठी आंदोलनं चालू झाली तेव्हा त्याचं लोण कर्नाटकातही पसरलं.

श्री गुरु दत्तात्रेय स्वामी बाबाबुदान दर्गा’ हे हिंदूंचं श्रद्धास्थान असून त्याची मालकी हिंदूंच्या ताब्यात देण्यात यावी अशी मागणी करायला हिंदू संघटनांनी सुरवात केली. मात्र या जागेच कायदेशीर वाद त्याहूनही जुना आहे. दर्ग्यावरील हक्कासाठी कायदेशीर लढाई १९७८ मध्ये सुरू झाली जेव्हा १९७३ मध्ये मुजराई विभागाकडून वक्फ बोर्डाने त्याचे प्रशासन ताब्यात घेतले. यावर  बरीच कायदेशीर काथ्याकूट झाली.  १९७५च्य आधी ज्या परंपरा चालू होत्याच त्याच चालू राहाव्यात असं न्यालयानं आपल्या आदेशात म्हटलं होतं.

या वर्षी सप्टेंबरमध्ये कर्नाटक हायकोर्टाने  म्हटलंय की, हिंदू रितीरिवाजांनुसार पूजा केल्या जाणाऱ्या धार्मिक स्थळी ‘फक्त एका मुस्लिम उपासकाला’ विधी करण्याची परवानगी देणे हे मुस्लिम आणि हिंदू दोघांच्याही धार्मिक अधिकारांचे उल्लंघन आहे. आणि  या ठिकाणी मुस्लिम मुजवरा बरोबर एक हिंदू पुजाऱ्याला नियुक्त करण्यास न्यायालयाने सरकारला सांगितले आहे. 

भाजपचे दिवंगत नेते अनंतकुमार यांनी या विवादाला दक्षिणेतील अयोध्या म्हटलं होतं  तेव्हपासून बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद जरवर्षी या जागेला ‘मुक्त ‘ करण्यासाठी दत्तजयंतीला शोभायात्रा काढतात.

 सध्या त्याचेच व्हिडिओ भाजपा नेते सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत. 

 

 चिकमंगलूरचे आमदार सी.टी. रवि आज भाजपचे आणि खासदार शोभा करंदलाजे या मुद्दयांवर आंदोलनं करून राष्ट्रीय पातळीवर पदं भूषवली आहेत. त्यामुळं  ‘श्री गुरु दत्तात्रेय स्वामी बाबाबुदान दर्ग्याचा’ वाद भाजपाला दक्षिणेत फायदा पोहचवणार का हे येणाऱ्या काळातच कळेल. 

Leave A Reply

Your email address will not be published.