स्लॉट बुकींगचं सुद्धा टेन्शन घेऊ नका. पुण्यात तरुणाने मोफत लसीकरणासाठी मदतकेंद्र उभारलंय …

२३ मार्चला संपूर्ण देशात लॉकडाऊन लागले आणि संपुर्ण देश अचानक थांबला. अनपेक्षित अश्या कोरोना व्हायरसची महामारी आपल्या देशावर पसरली. कोरोनाच्या विळख्यात देश सापडला. कित्येक रुग्ण ह्या व्हायरसने आपले बळी बनवले. फक्त देशातच नाही तर संपुर्ण जगात लाखोंच्या संख्येत लोक मृत्युमुखी पडली. अजुनही ह्या कोरोनाचा विळखा आपल्या भोवती टांगत्या तलवारी सारखा आहेच.

आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची चर्चा सुरू आहे. पहिली लाट जेव्हा ओसरली तेव्हा कोरोना प्रतिबंधक लस ह्या आशेचे किरण ठरू लागल्या. संपुर्ण देशात लसीकरण मोहीम राबवण्यात आली. जेव्हा कोरोनाची दुसरी लाट आली तेव्हा पुणे शहरात रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत गेली. इतर शहरापेक्षा पुणे व मुंबई या शहरात रुग्णांची संख्या जास्त प्रमाणात दिसून येत होती.

रुग्णांना बेड मिळण्यापासून ते रेमेडीसीवर इंजेक्शन व व्हॅक्सिनेशन पर्यंत सगळाच घोळ होता. काय करावं?, कसं करावं? हे प्रश्न लोकांसमोर उपस्थितीत होत होते. कोविडसारख्या महामारीत लोकांमध्ये जनजागृती करणे खुप गरजेचे होते.

या जनजागृतीसाठी समाजातून प्रचंड हात पुढे आले. त्यामध्ये विविध संस्था,मंडळ,पक्ष मोठ्या प्रमाणात पुढे आली. युवक वर्गाचा तर यामध्ये मोलाचा वाटा होता. अश्याच एका कर्तव्यदक्ष युवकाने पुण्याच्या मध्यवर्ती  भागात आपल्या संस्थेमार्फत जनजागृतीचे काम हाती घेतले.

 या युवक मित्राचे नाव म्हणजे सौरभ बाळासाहेब आमराळे. 

सौरभची कर्तव्य सामजिक संघटना नावाची संस्था आहे. या संस्थेमार्फत नागरिकांना कोरोना आजाराबद्दल माहिती देण्यापासून, ते हॉस्पिटलला बेड उपलब्ध करून देण्यापासून ,प्लाज्मा,ऑक्सिजन/वेंटीलेटर,रेमेडीसिव्हर इंजेक्शन उपलब्ध करून देण्यापर्यंत काम केली गेली. तसेच विविध खेडेगावातून पुण्यात रोजगाराला आलेल्या लोकांना सर्व प्रकारची मदत व सहाय्य केले गेले. 

जेव्हा लसीकरणास सुरुवात झाली तेव्हा सुरुवातीला लसीकरण संदर्भात लोकांमध्ये अनेक शंका आणि लोकांचे विविध प्रश्न होते. कित्येक ठिकाणी लस उपलब्ध होत नव्हती. त्यावेळी वेळेचे आणि लसीकरणाचे महत्व ओळखून सौरभ याने पुण्यातल्या त्याच्या राहत्या मंडईच्या भागातल्या धनलक्ष्मी देवीच्या मंदिरातच मदतकेंद्र उभारले.

लसीकरणात स्लॉट बुकिंग हा एक पर्याय ठेवण्यात आला होता.पण अनेकांना बुकिंग कसे करायचे हेच समजत नव्हते. तसेच वेबसाईट वरून अनेकदा स्लॉट बुकिंग सुद्धा व्हायचे नाही.

अश्यावेळी उभारलेल्या मदतकेंद्रातुन सौरभ याने लोकांना स्लॉट बुकिंग करून देण्यापासून ते पुढे मोफत लसीकरणापर्यंत सुविधा राबविल्या.भागातली सुरु असलेल्या सर्व लसीकरण केंद्राची संपुर्ण महिती नागरिकांना देण्यापासून ते तेथील लसीकरणाचे स्लॉट बुकिंग करून देण्यापर्यंत सर्व वैयक्तिकरित्या सौरभने हाती घेऊन लोकांना मोफत लसीकरण करून दिले.

संपूर्ण पुणे शहरातून आणि राहत्या भागातून तब्बल १५००० पेक्षा जास्त लोकांचे मोफत लसीकरण हे सौरभ याच्या कर्तव्य सामजिक संघटने मार्फत करून देण्यात आले.

सोबतच नागरिकांना नोंदणी करून देणे, मोफत प्रिंट करून सर्टिफिकेट सुद्धा देण्यात आले. कित्येक गरीब नागरिकांकडे मोबाईल देखील नसायचे तेव्हा त्या नागरिकांना वेळप्रसंगी स्वतःच्या नंबर वरून बुकिंग करून देऊन, पुढे पुर्ण लसिकरणासाठी त्याचा पाठपुरावठा सौरभने केला. स्थानिक लोकांना लसीकरणाचे महत्व सांगून, घरोघरी जाऊन लोकांचे लसीकरण सौरभ याने केले.

आजही मंडईतील गाडीखाना येथे सौरभचे मदतकेंद्र दररोज सुरू आहे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ तसेच , माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सुद्धा सौरभच्या या कार्याची दखल घेत त्यांना शाबासकी दिली. तुम्ही सुद्धा पुण्यात असाल आणि तुमचे लसीकरण राहिले असेल तर तुम्ही सुद्धा सौरभच्या मदत केंद्रावर जाऊन लसीकरण करू शकता.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.