एका साध्या नियमाचा फायदा करुन घेत बांग्लादेशसारखा देश रेमडिसीवीरचा निर्यातदार बनला.

देशातील कोरोनाच्या हाताबाहेर जाणाऱ्या परिस्थितीमुळे महाराष्ट्र, दिल्ली, उत्तरप्रदेश सारखी महत्वाची राज्य सध्या लॉकडाउनच्या सावलीत आहेत. आरोग्य व्यवस्थेवरचा ताण, ऑक्सिजनचा तुटवडा, रेमडीसीवीर औषधाची कमतरता अशा सगळ्या अडचणी या राज्यांसमोर आहेत. या अडचणी दूर करण्यासाठी अनेक उपाय केले जात आहेत.

यात बेडसाठी अनेक जम्बो कोविड सेंटर चालू केली जात आहेत. खाजगी हॉस्पिटल ताब्यात घेतली जात आहेत. तर ऑक्सिजन मिळवण्यासाठी ऑक्सिजन एक्सप्रेस, कंपन्यांकडून ऑक्सिजन घेणे यासारखे उपाय केले जात आहेत. राहिला प्रश्न रेमडीसीवीरचा.

तर रेमडीसीवीर औषधासाठी देशातील कंपन्यांचे उत्पादन वाढवले आहेच पण त्यासोबत सध्या बांग्लादेशकडे देखील मदत मागण्याचा विचार समोर येत आहे. होय बरोबर वाचलं. बांग्लादेशच.

ज्या औषधाचा तुटवडा अखंड भारतात आहे तेच औषध बांग्लादेशमध्ये मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे, आणि केवळ उपलब्धच नाही तर मागच्यावर्षी ज्यावेळी पर्यंत भारतात रेमडीसीवीरच उत्पादन होतं नव्हत त्यावेळीपासून बांग्लादेशच या औषधाचा निर्यातदार देश आहे. त्यामुळेच अलीकडे झारखंड सरकारने पुन्हा एकदा बांगलादेशमधून रेमडीसीवीर आयात करण्यासाठी केंद्र सरकारकडे परवानगी मागितली आहे.

पण भारतात सध्या तुटवडा असणाऱ्या या औषधाचा बांगलादेश निर्यातदार देश बनू शकला ते मात्र जागतिक व्यापार संघटनेच्या एका छोट्याश्या नियमामुळे.

कसं ते जरा विस्कटून सांगतो. रेमडीसीवरच पेटंट आहे अमेरिकेच्या जिलीड सायन्सेस या औषधनिर्मात्या कंपनीकडे. साधारण एप्रिलमध्ये या कंपनीने हे औषध कोरोना वापरता येत आल्याचं सांगण्यात आलं. त्यानंतर लगेचच म्हणजे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बातमी आली कि,

बांग्लादेश रेमडीसीवीरचे जेनरिक व्हर्जन तयार करणार.

बांग्लादेशला या औषधाच्या निर्मितीसाठी कोणतीही परवानगी नव्हती. पण तरी देखील त्यांनी या औषधाचं व्हर्जन तयार करायला घेतलं. त्यासाठी कारणीभूत होता जागतिक व्यापार संघटनेचा एक नियम.

नोव्हेंबर २००१ मध्ये दोहा विकासपत्रिका संमत झाली. त्यानुसार सर्व एलडीसी म्हणजे किमान विकसनशील देशांना विकासाच्या जास्तीत जास्त संधी मिळाव्या म्हणून एक निर्णय घेण्यात आला. तो म्हणजे या यादीतील देशांना २०३३ पर्यंत पेटंट कायद्यातुन सुट द्यायची.

आता बांग्लादेश या किमान विकसनशील देशांच्या यादीत होता. त्यामुळे तो कोणत्याही पेटंट असलेल्या वस्तूचे मुक्तपणे उत्पादन करु शकत होता, वापरु शकत होता आणि विकू शकतं होता. थोडक्यात लायन्सन मिळवण्याची सुट होती.

याच एका साध्या नियमाचा फायदा बांग्लादेशच्या बेक्सिमको फार्माने करुन घ्यायचं ठरवलं.

२१ मे रोजी बांग्लादेशच्या हि बेक्सिमको फार्मा रेमडिसीवीरचं जेनिरीक व्हर्जन तयार करणारी जगातील पहिली कंपनी बनली. नाव ठेवलं ‘बेमसिवीर’ आणि देशात विक्रीची किंमत ठेवली ६ हजार टाक. (भारतीय किंमतीमध्ये ५ हजार ३०० रुपये). पाठोपाठ इस्काएफ फार्मास्युटिकल्स या आणखी एका औषध निर्मात्या कंपनीने रेमडिसीवीर तयार केल्याची घोषणा केली.

३ जून रोजी बेक्सिमकोनं जाहिर केलं की ते जगभरातील ३० देशांना रेमडिसीवीर निर्यात करणार आहेत.

या सगळ्या दरम्यान भारत काय करत होता?

१५ मे रोजी सिप्लासह देशातील ७ कंपन्यांना जिलीडने रेमडिसीवीरसाठी परवानगी देवू केली. मात्र जुलै उजाडला तरी भारतात हे औषध विक्रीसाठी आले नव्हते.

या दरम्यान १० जूनच्या आसपास महाराष्ट्रात देखील हे औषध वापरण्याची चाचपणी सुरु झाली. आणि बांग्लादेशमधूनच आयात करण्याची प्रक्रिया सुरू झाली. इस्काएफ फार्मास्युटिकल्स आणि बेक्सिमको फार्मा या दोघांनी देखील १० हजार डोसेस राज्य सरकारला देण्याची ऑफर दिली होती.

मात्र त्यावेळी सेंट्रल ड्रग्स स्टॅन्डर्ड कंट्रोल ऑर्गेनायजेशनने या औषध आयातीला नकार देत सांगितलं की बांग्लादेशमधील उत्पादक कंपन्यांना रेमडिसीवीर उत्पादनाची कोणत्याही प्रकारची मंजूरी नाही. त्यामुळे त्याचं औषध आयात करता येणार नाही. सोबतच भारतात होतं असलेल्या अवैध आयातीला थांबवण्यावर लक्ष देण्यात येणार असल्याचं सांगितलं.

इथं महत्वाची गोष्ट म्हणजे बेक्सिमको फार्मा त्याआधी जगातील ५० देशांमध्ये आपली औषध निर्यात करत होती. तसचं अमेरिका, माल्टा, ऑस्ट्रेलिया या देशांमधील अन्न आणि औषध प्रशासनाची परवानगी प्राप्त देश होता. मात्र तरी देखील परवानगी नाकारली होती.  

अखेरीस जुलैमध्ये सेंट्रल ड्रग्स स्टॅन्डर्ड कंट्रोल ऑर्गेनायजेशनने महाराष्ट्राला १० हजार डोस आयात करण्याची परवानगी दिली. एव्हाना दोन महिन्यात बांग्लादेशने आपलं उत्पादन प्रचंड वाढवलं होतं. अमेरिकेकडे पेटंट असल्यामुळे अमेरिकेने सगळीकडचा स्टॉक आपल्याला आधी हा नियम करत उचलला. या तुटीचा फायदा बांग्लादेशला झाला आणि रेमडिसीवीर निर्यात करणारा देश बनला.

सप्टेंबर नंतरच्या काळात भारतात देखील रेमडिसीवीरच उत्पादन सुरु झालं. त्यामुळे बांग्लादेशमधील आयात थांबवण्यात आली पण आता दुसऱ्या लाटेत पुन्हा तुटवडा जाणवू लागल्याने पुन्हा एकदा बांग्लादेशकडे रेमडिसीवीर आयातीसाठी झारखंड सरकारने केंद्राकडे परवागनी मागितली आहे.

हे हि वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.