डॉ.अमोल कोल्हे यांनी सुचवलेलं रेमडेसिव्हीरचे पर्यायी औषध खरचं किती प्रभावी ?
भारत सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतून जात आहे. रुग्णांचा वाढता आकडा हैराण करणारा आहे. मागील वर्षापेक्षा यंदाची परिस्थिती आणखी बिकट होऊ लागली आहे. त्यात रुग्णालयात खाटा अपुऱ्या पडत असून ऑक्सिजन, ICU , व्हेन्टिलेटर खाटा आणि रेमेडीसिवीर इंजेक्शनचा देखील तुटवडा जाणवत आहे.
कोविड – १९ युद्धा दरम्यान रेमेडीसिवीर हे एकमेव प्रभावी औषध असल्याच सामन्यांच्या मनात कोरल गेलंय . त्यामुळे रुग्णांवर उपचारासाठी वापरलं जाणार हे इंजेक्शन मिळविण्यासाठी नागरिकांची एकच धडपड सुरु आहे. अश्या परिस्थितीत रेमेडीसिवीरमुळे रुग्णांचा जीव वाचतो याबाबत कोणताच पुरावा नसल्याचे कोविड टास्क फोर्सने सांगितल आहे.
‘रेमेडीसिवीर काही जादूची कांडी नाही… ‘
रेमडेसिवीर जीव वाचवणारं औषध नसून व्हायरसला मारणारं, अॅन्टी व्हायरल औषध आहे. याचा वापर ‘इबोला’ व्हायरसविरोधात केला जात होता. जो आता आपण कोव्हिड विरोधात करतोय. या इंजेक्शनला आपात्कालीन परवानगी देण्यात आली असून प्रायोगिक तत्त्वावर याचा वापर करण्यात येतोय. यामुळे कोरोना बाधितांना लवकर रिकव्हर होण्यास मदत होतेय. दरम्यान, त्याचा तुटवडा पाहता कोविड टास्क फोर्सने त्याला पर्यायी औषध सुचवलं आहे,
रेमेडेसिविर प्रमाणेच फेव्हीपॅरावीर व फॅबी फ्लु कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी चांगला पर्याय
कोविड टास्क फोर्सने यापुर्वीच जाहीर केलंय कि, रेमेडेसिविर इंजेक्शन हे शंभर टक्के जीवनरक्षक नाही. शरीरातील विषाणूंचा भार कमी करण्यासाठी ते दिलं जातं. परंतु वाढत्या रुग्णसंख्येमुळे जर ते उपलब्ध नसेल तर कोविड टास्क फोर्सने पर्यायी औषध म्हणून फेव्हीपॅरावीर घेण्याबाबत सुचवलं आहे. रेमेडेसिविरचा पुरवठा सुरळीत होईपर्यंत सुचविलेली औषधे रुग्णांना देता येतील.
शिरूरचे खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी देखील पर्यायी औषध वापरण्याचा दिला सल्ला
खासदार अमोल कोल्हे यांनी ट्वीट करत रेमेडेसिविर उपलब्ध नसल्यास फेव्हीपॅरावीर हे पर्यायी औषध वापरण्याचा दिला सल्ला दिला. त्यांनी सांगितल कि,
‘ कोव्हिड टास्क फोर्सने वारंवार सांगितल कि, रेमडेसिव्हीर हे जीवनरक्षक औषध नाही. शरीरातील विषाणूंचा व्हायरल लोड कमी करण्यासाठी ते दिलं जातंय. त्यामुळे रुग्णांचा इव वाचतोच असं नाही. त्यामुळे केवळ रुग्णालयातील राहाण्याचे दिवस कमी होतात. मात्र, ते उपलब्ध नसल्यास कोव्हिड टास्क फोर्सने पर्यायी औषध फेव्हीपॅरावीर (Favipiravir) सुचवलं आहे.
त्याचा महाराष्ट्रात पुरेशा प्रमाणात साठा उपलब्ध आहे. त्यामुळे बाधितांचे नातेवाईक व रुग्णावर उपचार करणारे डॉक्टर या दोघांनीही घाबरून न जाता या दोन औषधांचा वापर जास्तीत जास्त करावा असे आवाहन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केले.
तसेच, रेमडेसिव्हीरचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी शासन आणि प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे यावर मर्यादा येत आहेत. तसंच रेमडेसिव्हीर रुग्णांना देताना डॉक्टरांनी पुरेशी काळजी घ्यावी. यासोबतच उपलब्ध साठा काळजीपूर्वक वापरुन गरज असणाऱ्या रुग्णांनाच हे इंजेक्शन दिले जावे. अवाजवी वापर टाळावा, अशी विनंती देखील कोल्हेंनी यावेळी केली.
कोविड – १९ च्या उपचारात अँटी-व्हायरल औषध फेव्हीपॅरावीर अनेक प्रकारे फायदेशीर
औषधनिर्माण कंपनी ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्सने केलेल्या दाव्यानुसार फेव्हीपॅरावीर औषध कोरोना संक्रमित रुग्णांसाठी उपयुक्त आहे. या औषधाचा डोस जलद उपचारासाठी देखील उपयुक्त आहे. या चाचणीचे निकाल आंतरराष्ट्रीय संसर्गजन्य रोग जर्नल (आयजेआयडी) मध्ये देखील प्रकाशित केले गेले असल्याची माहिती कंपनीने दिली. यामुळे ऑक्सिजन थेरपीची आवश्यकता देखील कमी होते. किरकोळ संसर्ग झाल्याची पुष्टी झालेल्या रूग्णांसाठी हा उत्तम पर्याय असल्याचे म्हंटले जाते.
फेव्हीपॅरावीर किंवा फॅबी फ्ल्यु हे रेमेडीसिवीर इतके प्रभावी नाही?
दरम्यान, इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्रचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवी यांच्या म्हणण्यानुसार फेव्हीपॅरावीर किंवा फॅबी फ्ल्यु हे रेमेडीसिवीरच्या पर्यायी औषध म्हणून म्हणता येणार नाही. ते म्हणाले कि,
एक तर यातील फॅबी फ्ल्यु हे तोंडी घ्यायचे औषध आहे. परंतु त्याचे डोस फार विचित्र असल्याने लोकं ते घेत नाही. या औषधाचे डोस घेताना संक्रमित रुग्णाला पहिल्या दिवशी सकाळी ९ आणि संध्याकाळी ९ गोळ्या , त्यानंतर सकाळ – संध्याकाळ ४-४ गोळ्या याप्रमाणे १४ दिवस हा डोस घ्यावा लागतो. त्यामुळे रुग्ण ते घेण्यास टाळाटाळ करतात. आणि या औषधाने रूग बरा होण्याची उदाहरणं देखील फार कमी आहेत.
या औषधांचे डोस मोठे असल्याने मुळात रुग्ण ते सलग १४ दिवस घेत नाहीत. फेव्हीपॅरावीर किंवा फॅबी फ्ल्यु हे औषध पर्यायी म्हणून वापरलं जात परंतु रेमेडीसिवीर इतका त्याचा प्रभाव नाही. रेमेडीसिवीर इंजेक्शन असल्यामुळे ते रुग्णांना देता येत आणि त्याचा कोणता साईड इफेक्ट नसतो. रेमेडीसिवीरचा कोर्स हा केवळ पाच दिवसांचा डोस असतो, जे पहिल्या दिवसी २ आणि इतर दिवशी रोज १ याप्रमाणे दिले जाते.
तसेच, डॉ. भोंडवी यांच्या म्हणण्यानुसार यासाठी एकच पर्याय आहे तो म्हणजे रेमेडीसिवीर उपलब्ध करायचं आणि गंभीर स्थिती नसलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाला तातडीने ऍडमिट करायचे नाही. त्या ऐवजी अशा रुग्णांसाठी रुग्णालयातचं २ -३ रूम तयार करावे आणि अशी सोय उपलब्ध करायची कि, ज्या रुग्णाला रेमेडीसिवीरची गरज आहे, जे सलाईन मार्फत दिले जाते.
ज्या रुग्णाचा सलाईन झाल्यावर त्या रुग्णाला घरी पाठवायचं आणि दुसऱ्या दिवशी परत बोलवून घ्यायचे. यामुळे त्याचे सर्व डोस पूर्ण होतील आणि याचा दुसरा फायदा असा होईल कि, रुग्णालयातील खाटा देखील वाचतील.
हे ही वाचा भिडू.
- इतर जिल्ह्यांना हजारो लसी आणि बीड जिल्ह्याच्या वाट्याला फक्त २० डोस, नेमका काय आहे मॅटर ?
- जगाला या माणसानं सांगितलं रेमडिसिव्हर इंजेक्शन कोरोनावर पण चालू शकतं.
- रेमडेसिवीर इंजेक्शन मिळवायचे असेल तर हे मार्ग आहेत..