कोरोनाचा आणि घरातील गणपती मूर्तीच्या उंचीच्या नियमाला काय लॉजिक आहे?

राज्यात सध्या कोरोनाच्या संसर्गावर नियंत्रण आलं आहे, मात्र आगामी तिसरी लाट लक्षात घेऊन निर्बंध पुन्हा एकदा कडक करण्यात आले आहेत. याच सगळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं आगामी गणेशोत्सवासाठी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. यात प्रामुख्यानं येणारा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याची सूचना करण्यात आली आहे.

या सूचनांमध्ये प्रामुख्यानं घरातील आणि मंडळातील गणपती मूर्तींच्या उंचीबाबत, तिथल्या साधेपणाबाबत, तसेच आरती आणि विसर्जनापर्यंतचे एकूण १० नियम सांगण्यात आले आहेत.

मात्र यातीलचं काही नियमांना आता सामान्य नागरिक आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून आक्षेप घेण्यात आला आहे. सोबतच सोशल मीडियावर देखील विरोध नोंदवला जातं आहे. गतवर्षी देखील अशी नियमावली सरकारकडून जारी करण्यात आली होती. तेव्हा देखील त्याला नागरिकांकडून विरोध करण्यात आला होता.

यावर्षीचा विरोध नेमका का? नक्की नियम काय आहेत?

सरकारने सांगितलेले नियम काय आहेत?

  • सार्वजनिक गणेशोत्सवासाठी महापालिका, स्थानिक प्रशासन यांच्याकडून परवानगी घेणं बंधनकारक आहे.
  • कोरोनामुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता महापालिका तसेच संबंधित स्थानिक प्रशासनाचे मंडपांबाबतचे धोरण यांचेशी सुसंगत असे मर्यादित स्वरुपाचे मंडप उभारण्यात यावेत. या वर्षीचा गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करणे अपेक्षित असल्याने घरगुती तसेच सार्वजनिक गणपतींची सजावट करतांना त्यात भपकेबाजी नसावी.
  • सार्वजनिक मंडळाची गणेश मूर्ती ४ फूट तर घरगुती गणपती २ फुटांचा असावा.
  • शक्यतो शाडूच्या मातीची मूर्ती स्थापन करावी आणि या मूर्तीचं घरच्या घरी वा कृत्रिम तलावात विसर्जन करण्यात यावं. गणपती आणताना वा विसर्जनासाठी नेताना मिरवणूक काढता येणार नाही.
  • नागरिक स्वच्छेने देतील ती देणगी मंडळांनी स्वीकारावी. मंडप परिसरात गर्दी होऊ देऊ नये.
  • सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्यविषयक उपक्रम (जसे रक्तदान शिबीर) सार्वजनिक मंडळांनी राबवावेत. मलेरिया, डेंग्यू अशा आजारांचे प्रतिबंधात्मक उपाय, स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यात यावी.
  • आरती, भजन, किर्तन असे कार्यक्रम करताना गर्दी होणार नाही, याची काळजी घ्यावी.
  • नागरिकांची गर्दी होऊ नये यासाठी वेबसाईट, ऑनलाईन, केबल नेटवर्क, फेसबुकद्वारे दर्शनाची सोय करावी.
  • गणपती मंडपामध्ये निर्जंतुकीकरण आणि थर्मल स्क्रीनिंगची व्यवस्था असावी.
  • वेळोवेळी लागू करण्यात आलेले निर्बंध गणेशोत्सव काळात देखील कायम राहतील, त्यामध्ये कुठेही शिथिलता देण्यात येणार नाही.

119132105 whatsappimage2021 06 29at3.08.02pm

याच नियमावलीतील काही नियमांना सामान्य नागरिक आणि सार्वजनिक मंडळांकडून विरोध होतं असल्याचं दिसून येत आहे.

अमरावतीच्या परतवाडामध्ये राहणारे अभिजित जाधव ‘बोल भिडू’शी बोलताना या नियमांना लॉजिक नसल्याची टिका करतात. ते म्हणतात, 

माझा इतर कोणत्या नियमांना आक्षेप नाही, पण घरगुती गणपतीसाठी जे काही नियम दिले आहेत त्यावर माझा आक्षेप आहे. सरकारनं सांगितलं की घरगुती गणपतीची मूर्ती २ फुटांपेक्षा जास्त नको आणि सजावट जास्त नको.

माझ्या मते या दोन्ही नियमांना काहीही अर्थ नाही नाही. कारण गणपतीच्या मूर्तीच्या उंचीचा आणि कोरोनाचा काहीही संबंध नाही. हा नियम बनवताना नेमकं काय लॉजिक वापरलं आहे तेच कळलेलं नाही. दुसरं म्हणजे गणपती हा सण सगळे कुटुंब आनंदानं एकत्र येण्यासाठी साजरा केला जातो. सजावट नको म्हणजे काय एकदम निरुत्साही वातावरणात सण साजरा करायचा आहे का?

तर पुण्यातील कोथरूड भागात राहणारे योगेश सूर्यवंशी ‘बोल भिडू’शी बोलताना राज्य सरकारवर टीका करतात. ते म्हणतात,  

अजित पवारांनी मागच्या आठवड्यात पुण्यात राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यलयाचं उद्घाटन केलं. त्यावेळी त्यांनी किती गर्दी जमवली होती, हे सगळ्या महाराष्ट्राने बघितलं. आता सरकारने घरातील आणि सार्वजनिक मंडळातील गणपतीसाठी नियम आणले आहेत. म्हणजे आम्ही म्हणू ते धोरण आणि आम्ही बंधू ते धोरण असं काही हा प्रकार आहे का?

तर मूर्तिकार सुरेश कुंभार ‘बोल भिडू’शी बोलताना ४ फुटांच्या वरच्या उंचीच्या मूर्ती काय प्रतिष्ठपणा न करताच विसर्जन करायच्या आहेत का? असा सवाल विचारला आहे.

ते म्हणतात, आम्ही मागच्या जानेवारी, फेब्रुवारीमध्येच काम सुरु केलं आहे. यात मला आमच्या गावातील २ मंडळांच्या एक ६ फुटाची आणि एक ८ फुटाच्या मूर्तीची ऑर्डर मिळाली होती, आता या मूर्तीचं आम्ही काय करणार?

जर तशाच ठेवा म्हणतं असेल सरकार तर त्या मूर्तीना बनवण्यापासून ते कलर काम, सजावट सगळं करेपर्यंतचा आलेला खर्च द्यावा. आम्ही त्या तशाच ठेवतो.

रत्नागिरीच्या लांजामधील महेश देसाई ‘बोल भिडू’शी बोलताना ‘आम्ही आता मुंबईतून गावी जायचं कि नाही? असा सवाल विचारतात.

ते म्हणतात, कोकणातील सगळ्यात मोठा सण हा गणेशोत्सव आहे. याकाळात आमच्या सारखे मुंबईत राहणारे अनेक जण गावी जात असतात. त्यात काही पेंडिंग काम, नातेवाईकांच्या भेटीगाठी घेणं अशी काम देखील करून येत असतो.

पण सरकारनं सांगितलं आहे कि गणेशोत्सव काळात कसलीही सूट मिळणार नाही. मग आम्ही गावी जाऊन पण घरातचं बसायचं आहे का? मग त्यापेक्षा गावी जातचं नाही. मुंबईत असंही घरातचं बसून आहे.

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचं म्हणणं काय आहे?

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची भूमिका जाणून घेण्यासाठी ‘बोल भिडू’ने ऍड. प्रताप परदेशी यांच्याशी संपर्क साधला.

ते पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसह गुरुजी तालीम सारख्या अनेक गणपती मंडळांसाठी मार्गदर्शक तसेच कायदेशीर सल्लागार म्हणून काम करतात. ऍड. परदेशी म्हणाले,

सध्या तरी आमचा या नियमावलीला विरोध नाही, कारण पुढे येणार संकट कसं असेल हे सांगता येणार नाही. पण मागच्या वर्षीच्या आणि या वर्षीच्या परिस्थितीमध्ये फरक मात्र नक्कीच आहे. त्यामुळे आम्ही नियमांमध्ये सूट देण्यासाठी सरकारला विनंती मात्र नक्की करू.

कारण मागच्या दिड वर्षांपासून लोक घरात बसून कंटाळली आहेत, त्यांना थोडं तरी रिलॅक्सेशन हवं आहे. त्यामुळेचं लोकांना आता सण आणि उत्सव एकत्र येत आनंदानं साजरे करायचे आहेत.

तर मुंबईतील गणेशोत्सव मंडळांनी देखील उंचीच्या नियमाला विरोध दर्शवला आहे. 

महाराष्ट्र टाईम्सने दिलेल्या बातमीनुसार, मुंबईतील गणेशोत्सव मंडळांनी सरकारला २४ जून रोजी काही सूचना केल्या होत्या. यात त्यांनी प्रामुख्यानं सरकारला सांगितलं होतं कि,

गणेशमूर्तींच्या उंचीबाबत आम्ही कोणतीही तडजोड करणार नाही. आम्ही कोरोनाचे सर्व नियम पाळू, मात्र आम्हाला गणेशमूर्ती उंचच हवी. अशी भूमिका त्यांनी मांडली होती. तसेच विसर्जनासाठी चौपाट्या खुल्या करण्यात याव्यात अशी देखील मागणी मंडळांनी केली होती.

सोशल मीडियावर देखील लोकांनी या नियमावलीला विरोध केला आहे…

ganapati 1

ganapati 2

भाजपकडून देखील या नियमांवरुन सरकारवर टिका करण्यात आली आहे…

भाजपचे नेते आणि आमदार आशिष शेलार राज्य सरकारवर टीका करताना म्हणाले,

गणेशोत्सवाबाबत एक एक नियम असे घातले आहेत की आता घरातल्या धातूच्या मूर्तीचं पूजन करावं लागेल. राज्य सरकारला डिस्को-पब, बार चालतात आणि गणेशोत्सव चालत नाहीत. गणेश मूर्ती बनवायला तीन महिन्यांपासूनच सुरुवात केली आहे. आता राज्य सरकारच्या या नियमांमुळे मूर्तीकारांचं मोठं नुकसान होणार आहे. त्यांना एक रुपयाची देखील मदत दिली गेली नाही. ठाकरे सरकार बिनडोकपणे वागत आहे. त्याचा आपण निषेध करतो.

आता सर्व स्तरातून होतं असलेल्या या विरोधामुळे सरकार काय करणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. यात मग हि नियमावली अशीच ठेवणार कि त्यावर पुनर्विचार करणार हे देखील पहावं लागणार आहे.

हे हि वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.