दिनदलित वर्गाला शिक्षणापर्यंत पोहोचण्याचा मार्ग निर्माण केला तो दादासाहेबांनी !

दामोदर तात्याबा रूपवते…

रूपवते यांनी दलित वर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षणापर्यंत पोहोचण्याचा मार्ग निर्माण केला, त्यांना प्रेमाने लोकं दादा किंवा दादासाहेब म्हणायचे..

दादांचा जन्म २८ फेब्रुवारी १९२५ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील अकोले या प्रवरा नदीच्या काठी वसलेल्या एका लहानशा वस्तीत झाला, हि वस्ती गावात नव्हती तर गावाच्या बाहेर!  त्या काळात  जातीव्यवस्थेत मध्ये असणाऱ्या भेदभावात ते वाढले. दलित म्हणून समाजाने नाकारले तरी समाज  दादासाहेबांची जन्मजात बुद्धिमत्ता आणि दूरदृष्टी नाकारू शकत नव्हतं.

त्यांची बुद्धिमत्ता म्हणजे त्यांना मिळालेली निसर्गाची देणगीच होती.

त्यांचे प्राथमिक शिक्षण अकोले व नाशिक येथे झाले. याच काळात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक समानतेसाठी केलेल्या धडपडीमुळे मागासवर्गामध्ये आशावादाची लाट निर्माण झाली. या लाटेने दादासाहेब पूर्णपणे बुडले होते! त्याचाच एक भाग होण्यासाठी दादासाहेबांनी त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी मुंबईत प्रवेश केला.

दादांनी आपल्या ज्ञानाला बळकटी देऊन स्वतःचे गतिशील, पुरोगामी आणि सुसंस्कृत व्यक्तिमत्व विकसित केले. 

मुंबईतच त्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार त्यांचे कार्याचा बारकाईने अभ्यास केला, अभ्यास करता करता ते आंबेडकर यांच्या विचारांच्या प्रभावाखाली आले. आंबेडकरांचे विचार दादांना आयुष्यात कार्य करण्याची दिशा ठरविण्यात हे महत्त्वपूर्ण ठरले.

डॉ.आंबेडकरांशी हळू हळू दादासाहेबांचा संवाद वाढत गेला.

तरूण, तत्त्वनिष्ठ, प्रभावी आणि गतिशील दादासाहेबांची क्षमता पाहून बाबासाहेबांनी त्यांच्यावर विश्वास टाकून अनेक जबाबदाऱ्या दिल्या. दादांनी देखील आपल्यावर टाकलेल्या सर्व जबाबदाऱ्या मोठ्या निष्ठेने आणि दृढनिश्चयाने पार पाडल्या.

मुंबईतील सिद्धार्थ महाविद्यालयात वसतिगृहाचे पहिले रेक्टर म्हणून त्यांनी जबाबदारी पूर्ण केली. डॉ. आंबेडकर यांच्या निधनानंतर त्यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीमधील अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती विद्यार्थी शिष्यवृत्ती समितीचे सचिव आणि “प्रबुद्ध भारत” या साप्ताहिकाचे संपादक म्हणून  कार्य केले.

१९४८ मध्ये दादासाहेब रूपवते यांनी बहुजन शिक्षण संघ स्थापन केला आणि दलित वर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षणापर्यंत पोहोचण्याची संधी निर्माण केली.

आज बहुजन शिक्षण संघ अनेक वसतिगृहे, नर्सरी शाळा, प्राथमिक व माध्यमिक शाळा, महाविद्यालये आणि सांस्कृतिक केंद्रे यशस्वीपणे चालवित आहेत. सामाजिक समता परिषद आणि ‘उपेक्षित व्यासपीठ’ या संस्थांच्या पाठिंब्याने दादासाहेबांनीही दलित, कामगार आणि भूमिहीन मजुरांना न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलन सुरू केले.

स्थानिक लोककला जपण्यासाठी त्यांनी केलेला प्रयत्न तरुण कलाकारांसाठी प्रेरणास्थान होता. 

दादासाहेबांनी स्वतः कवी, स्थानिक नर्तक, कलाकार आणि मनोरंजनकर्ते यांच्या सन्मानासाठी   महत्त्वपूर्ण योगदान दिले होते. पाली आणि संस्कृत या पुरातन भाषांचा सार जपून ठेवत, समकालीन राजकीय आणि सामाजिक प्रश्नांचे समीक्षात्मक विश्लेषण करून दादांनी आपली बौद्धिक जबाबदारी पार पाडली होती.

आंतरराष्ट्रीय स्तरावर बौद्ध धर्माच्या प्रसारासाठीही त्यांनी आपले योगदान दिले.

दादासाहेबांनी आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारतातील दलित आणि अल्पसंख्यांकांचे प्रतिनिधित्व केले, चर्चा सुरू केली आणि काही वाजवी तोडगे काढण्याचे प्रयत्न केले.

अहमदनगर स्कूल बोर्डाचे नेतृत्व करण्यापासून ते समाज कल्याण, गृहनिर्माण व सांस्कृतिक मंत्री या नात्याने महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळातील विविध विभागांचे आयोजन करण्यापर्यंत… .. दादासाहेबांनी सर्व भूमिका नाविन्यपूर्ण आणि वचनबद्धतेने पार पाडल्या.

पुरोगामी परिवर्तन प्रक्रियेला चालना देण्यासाठी दादासाहेबांनी राजकीय, सामाजिक मुख्य प्रवाहात भाग घेतला आणि आयुष्याच्या शेवटपर्यंत ते मागासवर्गीयांचे प्रतिनिधित्व करत राहिले.

समाजातील विविध घटकांमधील मतभेद मिटवण्याच्या संघर्षाला त्यांनी कधी ना म्हणले नाही.

परंतु त्याच वेळी त्यांनी या संघर्षाचे विभाजन होऊ नये यासाठी ते पूर्णपणे जागरूक असायचे. सहिष्णुता आणि ऐक्यावरच समाजातली समानता शक्य आहे याची दादासाहेबांना खात्री होती.

ते जिथेही जायचे तिथे आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण व्हायचे. 

एक कट्टर आणि कामगार आणि मागासवर्गीयांच्या चळवळीला समर्पित असलेले नेते, एक उत्कृष्ट प्रशासक, एक सक्षम धोरण निर्माते, एक प्रेरणादायी आणि प्रभावी वक्ते, सामाजिक परिवर्तन आणि समानतेचे वाहक, फुले-आंबेडकरवादी विचारसरणीचा खरे अनुयायी म्हणून दादासाहेबांचे स्थान सर्वांच्याच मनात कायमचे कोरले गेले आहे.

हे हि वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.