बाप भारताचा ॲपल बनवायच स्वप्न पहात होता तेवढ्यात पोरीने हजारो कोटींचा टीव्ही ब्रँड उभा केला.

झेनिथ कॉम्प्युटर नाव कधी ऐकलं आहे काय ? नव्वदच्या दशकात बऱ्याच घरात, ऑफिसमध्ये हे कॉम्प्युटर असायचे. भारताचा ॲपल अशी त्याची ख्याती होती. १९८० साली राजकुमार सराफ यांनी या कंपनीची स्थापना केली होती. भारतात जेव्हा लायसन्स राज होतं, बाहेरच्या देशातून कॉम्युटर आयात करण्यास देखील अनेक बंधने होती तेव्हा झेनिथने एंट्री केली.

राज सराफ यांनी शून्यापासून ही कंपनी सुरु केली. भारतीयांना पर्सनल कॉम्प्युटर वापरायची सवय त्यांनी लावली. गोव्यात त्यांची मोठी फॅक्ट्री होती. देशभर त्यांचे हजार डीलर होते, एवढंच नाही तर भारताबाहेर दक्षिण अमेरिका, युरोप, आखाती देश, अफिकन देश येथे देखील त्यांच्या कॉम्प्युटरची निर्यात व्हायची.

संरक्षण मंत्रालयापासून ते एअर इंडिया पर्यंत प्रत्येक मोठमोठ्या ऑफिसमध्ये झेनिथचे कॉम्प्युटर असायचे. आपल्या देशात नेट्वर्किंग, यूनिक्स सारख्या टेक्नॉलॉजी आणण्याचे श्रेय देखील राज कुमार सराफ यांना दिले जाते. एवढेच नाही तर १९९१ साली त्यांनी भारतातले पहिले लॅपटॉप देखील लॉन्च केले.

साधारण दोन हजार सालानंतर मात्र त्यांच्या या साम्राज्याला घर घर लागण्यास सुरवात झाली.

खरं तर भारतात आयटी बुमचा हा काळ. नवं क्षेत्र खुलं झालं  होतं. सुबत्ता आली होती, प्रत्येकाला आयटी मध्ये कोर्पोरेटमध्ये जॉब करायचा होता. परदेशी कंपन्या भारतात स्थिरावू लागल्या होत्या.

जग वेगाने बदलत चाललं होतं.

राजकुमार सराफ यांची पुढची पिढी त्यांच्या कंपनीत सक्रिय होऊ लागली. कर्मठ मारवाडी कुटुंबातील असूनही राजकुमार यांनी आपल्या १६ वर्षांची लेकीला देविता सराफ हिला आपल्या व्यवसायात येण्यास प्रोत्साहित केलं होतं. देविताच शिक्षण मुंबईतच झालं, आपल्या बीबीएच्या डिग्रीसाठी मात्र ती अमेरिकेच्या साऊथ कॅरोलिना विद्यापीठात गेली.

 अमेरिकेत शिकत असताना देवीताला या बदलणाऱ्या जगाची जाणीव झाली.

पूर्वीचे लोक काटकसरीने जगायचे, अंथरून पाहून पाय पसरणे हि जून्या पिढीची संस्कृती होती. पण नवी पिढी आपले पाय पसरून त्या मापाचं अंथरून विकत घेण्याच्या विचारांची होती. लक्झरी लाईफ स्टाईल हे प्रत्येकाचं स्वप्न होतं. आणि हे फक्त अमेरिकेत नाही तर याची सुरवात भारतात देखील झाली होती.

देविता भारतात आली तेव्हा तिच्या वडिलांनी तिला झेनिथ कॉम्प्युटरच्या मार्केटिंग टीममध्ये घेतलं. तेव्हा देविता फक्त २१ वर्षांची असेल. तिने वडिलांना समजावून सांगितलं की जगात काय चालू आहे, आणि भारतात देखील हाय एन्ड टेक्नॉलॉजीला कस भविष्य आहे. पण जुन्या पिढीच्या राजकुमार सराफ यांना हे खूप पटलं नाही. त्यांनी झेनिथचा स्वस्तात असेम्ब्ल केलेले कॉम्प्युटर बनवण्यावर भर दिला.

तीच म्हणणं होतं की,

खूपजणांना संपूर्ण टेक्नॉलॉजी समजत नाही पण त्यांना डिस्प्ले आवडतो. कित्येक जण फक्त शो-ऑफ साठी मोठ्या स्क्रीनचे मॉनिटर घेतात. त्याच वेळी माझ्या लक्षात आले कि भारतात स्टायलिश टीव्ही स्क्रीनचे मार्केट मोठे होणार आहे.

२००६ साली देविताने मुंबईत स्वतःची नवी कंपनी सुरु केली. त्याला नाव दिलं वू टेक्नॉलॉजी. नरिमन पॉईँट येथे हे टीव्ही विकण्यासाठी स्टोअर देखील सुरु केलं.

वू ही हाय एन्ड एलईडी टीव्ही बनवणारी कंपनी होती. भारतात तेव्हा जे टीव्ही बनत होते ते साधारण दहा वीस हजार रुपयांपासून ते पन्नास साठ हजार रुपयांचे होते. २ लाख रुपये वगैरे किंमतीचे टीव्ही आणि तेही मेड इन इंडिया, या नव्या ब्रँडवर कोणाचाही विश्वास नव्हता. देविताला तिचं शुभ चिंतकांनी आधीच सांगितलेलं की हि सुरवात थोड्या भांडवलावर कर पण ती मोठी जिद्दी होती.

“करने का है तो कुछ बडा करेंगे.”

तिचे स्पर्धक मार्केट मध्ये अफवा पसरवत होते की या मारवाडी पोरगीला सिरीयस घेण्याचं काही कारण नाही, तिच्या वडिलांनी मन रमावं  म्हणून सुरु करून दिलेली कंपनी फार काळ टिकणार नाही. लवकरच तीच लग्न होईल आणि ती वू टीव्ही बंद करून नवऱ्याच्या घरी निघून जाईल.

पण देविता खमकी होती. ती मार्केटमध्ये पाय रोवून उभी राहिली. मधल्या काळात झेनिथवर मोठं आभाळ कोसळलं. तिच्या वडिलांवर, भावावर आणि स्वतः देवितावर काही नियमांचे उल्लंघन केलं म्हणून सेबीने कारवाई केली.

पण देविता डगमगली नाही. तिने वू टीव्हीवर आपले लक्ष केंद्रित केले. तिने क्रोमा सारख्या स्टोअरसोबत करार केले होते व तिथे तिचे टीव्ही विकले जात होते. २०१४ सालापर्यंत तिचे ३० कोटी रुपयांचे टीव्ही दरवर्षी विकले जात होते. काळाची पावले ओळखणाऱ्या देविताने आपले टीव्ही विकण्यासाठी नव्या प्लॅटफॉर्म मध्ये प्रवेश केला. ते म्हणजे इ कॉमर्स.

भारतात अजून इ कॉमर्सने बाळसे धरले नव्हते तेव्हा वू टीव्हीने स्नॅपडील, फ्लिपकार्ट बरोबर तिने करार केले. या दूरदृष्टीचा तिला आणि कंपनीला फायदा झाला. पहिल्याच वर्षी नफा तिप्पट झाला. पुढच्याच वर्षी तिने फ्लिपकार्ट सोबत एक्स्क्लुजिव्ह करार केला. याचे परिणाम दिसले.

शिवाय २०१६ साली त्यांनी आपल्या टीव्हीमध्येच एन्टरटेन्मेंट फोकस्ड ऍप्लिकेशनला सुरवात केली. नेटफ्लिक्स सारखे ओटीटीवर कार्यक्रम घरच्या टीव्ही वरच्या मोठ्या स्क्रीनवर पाहणे शक्य होऊ लागले.

वू ने भारतात अनेक नव्या टेक्नॉलॉजीचा प्रारंभ केला. एक मेड इन इंडिया कंपनी फक्त लोकल कंपन्याच नाही तर सॅमसंग, सोनी सारख्या जागतिक ब्रँडला धडक देत होती. आज जवळपास ६० देशांमध्ये वू चे टीव्ही सेट्स विकले जातात. हे सगळे देविताने एकटीच्या जीवावर करून दाखवले.

ती या कंपनीची फक्त सीईओ नव्हती तर या वू टीव्हीची ब्रँड अँबॅसिडर देखील होती.

आज वू टीव्ही  टेलिव्हिजन ब्रँड मध्ये गणली जाते, तिचा पसारा  कोटींच्या घरात  पोहचलाय.जवळपास ५ हजार लोक तिच्या कंपनीत काम करतात. फोर्ब्ज मासिकाने तिच्या नावाचा समावेश जगातल्या ४० पेक्षा वयात स्वबळावर श्रीमंत बनलेल्या व्यक्तींच्या यादीत केलाय. अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यतानी आपली पोरगी इव्हानका हिच्या सोबत देविताची तुलना केलीय.

कोणाच्याही मदतीशिवाय आपला स्वतःचा ब्रँड बनवणारी देविता घर संसारात अडकलेल्या भारतीय नारीची प्रतिमा मोडून काढण्यास कारणीभूत ठरली आहे. तिने जे करून दाखवलं त्यामुळे तिला आज भारतातीलच नाही तर जगातील अनेक मुलींना महिलांना एक आदर्श रोल मॉडेल समजलं जात आहे. 

हे ही वाच भिडू.

 

1 Comment
  1. फार धडाडीचे काम केलेला आहे यामुळे माझा सलाम

Leave A Reply

Your email address will not be published.