काँग्रेसच्या उदारीकरणातही टिकून राहिलेल्या व्हिडीओकॉनचा आता मात्र बाजार उठला.

खरं तर ते व्यापारी मारवाडी कुटुंब पण मराठवाड्यात त्यांची भरपूर शेती होती. मात्र घरातील दोन्ही कर्ते पुरुष गांधीजींच्या स्वातंत्र्यलढ्यात उतरलेले. कधीही पोलीस यायचे आणि माधवलाल धूत यांना व त्यांच्या भावाला उचलून तुरुंगात टाकायचे. अशात शेतीकडे दुर्लक्ष होऊ लागलं म्हणून लहान वयातच नंदलाल धूत यांना शेती मध्ये उतरावं लागलं.

पुण्यात शिकून आलेल्या नंदलाल धूत यांनी आपल्या हातात नांगर धरला. अगदी थोड्याच दिवसात त्या भागातले सर्वात मोठे ऊस शेतकरी म्हणून त्यांनी नाव कमावलं. वेळ पडली म्हणून नांगर मारायचा शिकून घेतला असला तरी हातातली तागडी सुटली नव्हती.

काही तरी उद्योग करायचं डोक्यात चाललं होतं. अखेर वालचंद आणि फिरोदिया यांच्या मदतीने त्यांनी गंगापूर येथे साखर कारखाना सुरु करायचं ठरवलं. खरं तर त्याकाळी या गावात अजून वीजही आली नव्हती पण नंदलाल धूत हे जिद्दी होते. त्यांनी युरोपातून मशिनरी मागवली आणि गोदावरीच्या किनाऱ्यावर हा कारखाना उभारून दाखवला.

१९५५ सालचा काळ. इथून अगदी जवळच प्रवरानगर येथे विठ्ठलराव विखे पाटील यांनी सहकारी साखर कारखान्याची पायाभरणी केली होती. त्यांचा हा प्रयोग यशस्वी झाला. शेतकऱ्यांनी एकत्र येऊन उभारलेला हा कारखाना प्रचंड चालू लागला. हळूहळू संपूर्ण महाराष्ट्रभर सहकारी साखर कारखान्याची चळवळ पसरली. तत्कालीन राज्यकर्त्यांनीही सहकारी साखर कारखानदारीला मदत करण्याचं धोरण अवलंबलं होतं.   

याचा परिणाम धूत यांच्या कारखान्यावर देखील पडला. अखेर १९६७-६८ मध्ये नंदलाल धूत यांच्या ब्राँईडी अॅन्ड कंपनीकडून हा कारखाना सहकार क्षेत्रातील कै. बाळासाहेब पवार यांनी विकत घेतला.

धूत यांनी आपला मोर्चा वाहन उद्योगाकडे वळवला. त्यांनी बजाज कंपनीचे डिलरशिप घेतले. औरंगाबाद येथे बजाजच्या गाड्या धूत यांच्या शोरूम मधून विकल्या जाऊ लागल्या. काहीच दिवसात नंदलाल धूत हे बजाजचे सर्वात मोठे स्टार डीलर म्हणून ओळखले जाऊ लागले.

नंदलाल धूत यांच्यातील उद्योजक बनायची जिद्द अजून कमी झाली नव्हती. दुसऱ्यांचे प्रॉडक्ट विकून ते चांगले बिझनेसमन तर बनले होते पण त्यांची स्वप्ने मोठी होती.

अखेर सत्तरच्या दशकात औरंगाबादमध्येच त्यांनी लाइटिंग डिमर्स व इलेक्ट्रॉनिक गॅजेट बनवण्यास सुरवात केली. मेहनत आणि सचोटीने यात जम बसवला. संपूर्ण मराठवाड्यात त्यांना नवीन ओळख मिळाली. इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी धूत यांचं नाव मोठं झालं.

यातून आलेल्या आत्मविश्वासातून नंदलाल धूत यांनी मोठं पाऊल उचलायचं ठरवलं, कलर टीव्ही बनवणे.

भारतात वसन्तराव साठे या मराठी मंत्र्याच्या प्रयत्नातून १९८२ सालच्या एशियाड गेम्स वेळीच रंगीत टीव्ही आला होता. मात्र अजूनही भारतात कोणती स्वदेशी कंपनी हे टीव्हीसेट बनवत नव्हती. अनेक भारतीयांसाठी कलर टीव्ही हे एखाद महागडं स्वप्न वाटायचं.

हेच स्वप्न साकार करण्यासाठी नंदलाल धूत यांनी घरचे भांडवल साठ लाख रुपये आणि बँकेतून तीन कोटी रुपये कर्ज घेतलं आणि कंपनी स्थापन केली.

त्याला नाव दिलं व्हिडीओकॉन.

ते वर्ष होतं १९८३. जपानच्या तोशिबा कंपनीने त्यांच्याशी टेक्नॉलॉजी हस्तांतरणाचा करार केला. पुढच्या दोन वर्षात औरंगाबाद येथे व्हिडीओकॉनचा कलर टीव्ही तयार होऊ लागला. भारतातला हा पहिला कलर टीव्ही.

तिथून पुढे भारतीय इलेक्ट्रॉनिक्स मार्केटवर व्हिडीओकॉनच राज्य सुरु झालं. काश्मीर ते कन्याकुमारी प्रत्येक घरात रामायण महाभारत च्या बरोबरीने व्हिडीओकॉन टीव्हीसुद्धा भारतीयांच्या घरात घुसला. पुढचे दहा वर्षे त्यांना कोणतीहीही स्पर्धा नव्हती.

नंदलाल धूत यांची तिन्ही मुले या व्यवसायात आली होती. वेणुगोपाल धूत तर हे इलेक्ट्रिक इंजिनियर होते. त्यांना जपान मध्ये तोशिबा कंपनीत खास ट्रेनिंग घेण्यासाठी पाठवण्यात आलं होत. व्हिडीओकॉनचा कलर टीव्ही बनण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता.

त्यांचे धाकटे दोन्ही बंधू देखील याच व्यवसायात उतरले होते. बघता बघता व्हिडीओकॉनचे साम्राज्य हजारो कोटींचे बनले. दरवर्षी ९९३ कोटींची उलाढाल होऊ लागली. हजारो लोकांना त्यांनी काम मिळवून दिल होतं. फिरज, वॉशिंग मशीन, मायक्रोवेव्ह अशा सगळ्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये व्हिडीओकॉन हा सर्वोत्तम समजला जाणारा ब्रँड बनला होता.

सगळी घडी बसली होती आणि अचानक १९९३ साली नंदलाल धूत यांचा एका हवाई दुर्घटनेत मृत्यू झाला. गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर त्यांच्या अंत्ययात्रेला प्रचंड गर्दी झाली होती. वेणुगोपाल धूत यांनी वडिलांच्या स्मरणार्थ औरंगाबाद येथे चॅरिटेबल हॉस्पिटल सुरु केलं.

नव्वदच दशक उजाडलं तस धूत यांच्यावर अडचणीचे पहाड उभे राहायला सुरवात झाली होती. यातच एक होतं जागतिकीकरण.

नरसिंह राव यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात भारताने खुले आर्थिक धोरण स्वीकारले. डॉ.मनमोहन सिंग यांनी लायसन्सराज संपवण्याची घोषणा करत परदेशी कंपन्यांना भारतीय बाजारपेठ उघडी करून दिली. याचाच परिणाम देशी उद्योगांवर होणार हे स्पष्ट होतं. देशभरात यावरून टीका झाली.

परदेशी कंपन्या येणार हे कळल्यावर भारतातले मोठमोठे उद्योगपती घाबरले होते. फक्त एकच ब्रँड असा होता ज्याच्याशी टक्कर द्यायला सॅमसंग, सोनी वगैरे मोठ्या कंपन्या देखील घाबरल्या होत्या.

औरंगाबादचा व्हिडीओकॉन.

व्हिडीओकॉनने भारतीय मार्केट असं काबीज केलं होतं की परदेशी ब्रॅण्ड्सना आक्रमक जाहिराती, अत्यंत कमी किंमती, वेगवगेळ्या ऑर अशा आयडिया कराव्या लागल्या. नाही म्हणायला व्हिडीओकॉन वर देखील या संकटाचा परिणाम झाला मात्र याचा त्यांनी खंबीरपणे सामना केला. याचाच परिणाम त्यांचं देशभरातील ६ कारखान्यातील १५ हजार कर्मचाऱ्यांपैकी एकालाही काढून टाकावे लागले नाही.

बदलत्या काळाप्रमाणे बदलत व्हिडिओकॉन इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्रीमध्ये टिकून राहिली. मल्टी मिलिनियर परदेशी कंपन्यांना त्यांनी जबरदस्त फाईट दिली. एवढंच नाही तर त्यांनी जागतिकीकरणाचा फायदा उठवत परदेशातही आपला ब्रँड नेऊन पोहचवला.

मध्यपूर्वेतील ओमानपासून ते युरोपपर्यंत व्हिडीओकॉनचे इलेक्ट्रॉनिक वस्तू विकले जात होते.

नव्वदच्याच दशकातला एक किस्सा सांगितला जातो. भारताचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी इटली दौऱ्यावर गेले होते. तिथे स्वागताला काही स्थानिक उद्योगपती हजर होते. वाजपेयीजी पाहतात तर त्यात वेणुगोपाल धूत देखील दिसले. त्यांना खूप आश्चर्य वाटलं. आजी धूत यांना म्हणाले,

“आप यहां?”

वेणुगोपाल धूत यांनी विनम्रतापूर्वक सांगितलं की ते इटलीच्या निकी कॉम्प्रेसरचे मालक आहेत. वाजपेयींनी त्यांची पाठ थोपटली. असच देशाच नाव उज्वल करा अशा शुभेच्छा दिल्या.

दोन हजारच्या दशकात व्हिडीओकॉन नव्या आव्हानांना सामोरे गेले. त्यांनी मोबाईल पासून ते डिश टीव्ही या अनेक उद्योगांमध्ये आपले हात आजमावले. व्हिडीओकॉन हा ब्रँड अत्याधुनिक करण्याकडे धूत बंधूंचा प्रयत्न होता. मात्र टीव्ही उद्योगात एलईडी, एलसीडी प्रमाणे नव्या टेक्नॉलॉजी सॅमसंग सोनी व इतर कंपन्यांनी आणल्या. त्यांच्याशी स्पर्धा करणे व्हिडीओकॉनला जमले नाही.

हळूहळू कंपनी मागे पडत गेली. तरीही डिश टीव्हीच्या उद्योगात त्यांचे वर्चस्व मोठे होते. आजही आहे. पण गेल्या काही काळात वेगवेगळ्या कारणांनी धूत बंधूंचे नाव चुकीच्या गोष्टीत अडकताना दिसू लागले. मोठमोठी कर्जे फेडताना केलेली गडबड, धनादेश न वठल्याचा गुन्हा यांनी व्हिडीओकॉनला अडचणीत आणलं.

आयसीआयसीआयच्या चंदा कोचर यांनी केलेल्या घोटाळ्यात वेणुगोपाल धूत यांचे देखील नाव आले. सध्या त्यांच्यावर ईडीची चौकशी सुरु आहे. हजारो कोटींचे साम्राज्य असलेलं व्हिडीओकॉन दिवाळखोरीत निघणार असं बोललं जात आहे.

एकेकाळी भारतीयांना रंगीत स्वप्न दाखवणारे व्हिडीओकॉनचे टीव्ही सेट अडगळीत पडले आहेत त्याप्रमाणे ही कंपनी देखील अडगळीत जाणार अशीच चिन्हे दिसत आहेत.

हे ही वाच भिडू.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.