त्या सुपरओव्हरने सिद्ध केलं की धोनी जगज्जेता कप्तान होणार आहे.

२००७ हे वर्ष भारतीय क्रिकेट मध्ये मोठे वादळ घडवून आणणारे ठरले. ग्रेग चॅपेलने गांगुलीने उभा केलेल्या टीमची घडी विस्कटून टाकलेली. या दोघांच्या भांडणात बिच्चारा द्रविड मधल्या मध्ये पिसला जात होता.

सगळे मोठे खेळाडू चॅपेलच्या तंत्राला वैतागले होते.

त्यातच २००७ सालच्या वनडे वर्ल्ड कप मध्ये आपण पहिल्या फेरीत बाहेर फेकले गेलो. बांगलादेश कडून स्विकाराव्या लागलेल्या अपमानास्पद पराभवामुळे प्रेक्षक देखील टीमवर चिडली होती.

या पराभवानंतर अनेक बदल घडले. राहुल द्रविडने राजीनामा दिला. ग्रेग चॅपेलला काढून टाकण्यात आल. बीसीसीआयने मोठया बदलाची सुरवात केली.

अशातच पहिल्या ट्वेन्टी ट्वेन्टी वर्ल्डची घोषणा झाली.

भारतीय टीम मात्र टी20 साठी तयार नव्हती. या गेमची चड्डी क्रिकेट म्हणून निर्भत्सना केली गेली. बीसीसीआयने सुद्धा आम्ही टी20 खेळणार नाही असं घोषित केले.

जर भारतच खेळणार नसेल तर हा गेम कोण बघणार असा प्रश्न जाहिरातदारांनी विचारला. अखेर आयसीसीने हस्तक्षेप केला. धमक्या वगैरे दिल्या. त्यामुळे अनिच्छेने का असेना भारतीय टीम पहिल्या टी20 वर्ल्ड कप साठी आफ्रिकेला निघाली.

भारताने या वर्ल्डकपसाठी टीमची घोषणा केली. कप्तान होता महेंद्रसिंग धोनी.

नवख्या धोनीला कप्तानी दिली म्हणून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. पण गांगुली, द्रविड, सचिन हे दिग्गज या टीममध्ये नव्हते. टी20 हा तरुणांचा गेम आहे म्हणून त्यांनी त्या पासून दूर राहायचं ठरवलं होतं. पण तरीही सेहवाग, युवराज, हरभजन याना वगळून थेट धोनी कप्तान या मागे गौडबंगाल काय याचा उलगडा होत नव्हता.

धोनीने या पूर्वी कधी नेतृत्व केलेलं ऐकिवात नव्हतं. तो कशी कप्तानी करेल याची शंकाच होती.

त्या वर्ल्ड कपमधली आपली पहिलीच स्कॉटलंड विरुद्धची मॅच रद्द झाली. आता पुढचा सामना आपला परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध होणार होता.

धोनीची ही पहिली परीक्षा होती.

शोएब मलीकच्या नेतृत्वाखाली असलेली पाक टीम त्या वर्ल्डकपची फेव्हरिट टीम होती. मोहम्मद असिफ, उमर गुल वगैरे बॉलर फुल फॉर्ममध्ये होते आणि शिवाय जगातला सर्वात वेगवान शतक ठोकणारा बुमबुम आफ्रिदीसुद्धा टीम मध्ये होता.

धोनीने पहिलाच टॉस हरला. पाकिस्तानने पहिली फिल्डिंग स्वीकारली. भारताची सुरवात काही चांगली झाली नाही. ओपनर सेहवाग गंभीर शून्य आणि पाच धावा काढून आउट झाले. युवराज सुद्धा १ धाव काढून बाद झाला.

रॉबिन उथाप्पा आणि धोनी ने डाव सावरला. पण तरीही आपला स्कोर २० ओव्हर मध्ये १४१ इतकाच झाला.

पाकिस्तानसाठी हे टार्गेट अगदी सोपे होते. आगरकरने सुरवातीला सलमान बट्टची विकेट काढली तर हरभजनने नेहमी प्रमाणे आफ्रिदीला मामा बनवले. युनूस खान व मलिक च्या महत्वाच्या विकेट्स इरफानने काढल्या. दोघे रनआउट झाले.

इरफान पठाण आणि आरपी सिंग ने पाक फलंदाजाना बांधून घातले होते. श्रीशांत सोडला तर बाकीच्यांनी चांगली बॉलिंग केली होती. धोनीने केलेले फिल्डिंग मधील बदल चमत्कारिक होते. पण त्यांनी अपेक्षित परिणाम साधला होता.

याचाच परिणाम पाकिस्तानची गाडी सुद्धा १४१ धावांवर अडखळली. मॅच टाय झाली.

तेव्हाच्या नियमानुसार अंपायरनी सुपरओव्हरची घोषणा केली. पहिलाच सामना एवढ्या अटीतटीच्या स्थितीत पोहचला होता. सगळं जग टीव्हीपुढे आल होतं.

अख्खा भारत देश सुईच्या टोकावर बसला होता मात्र ज्याच्यावर प्रेशर हवं तो धोनी मंद स्माईल देत निवांत होता.

भारतातर्फे सुपर ओव्हरचा पहिला बॉल टाकण्यासाठी सेहवाग आला.

खर तर त्याने मॅचमध्ये बॉलिंग सुद्धा केलेली नव्हती. सेहवागने पहिलाच बॉलने स्टंप उडवली. पाकिस्तानच्या यासर आराफातने टाकलेला फुलटॉस मात्र वाया गेला.

दुसरा बॉल टाकणाऱ्या अनुभवी हरभजनने अगदी आरामात स्टंपचा वेध घेतला तर तिकडे पाक कडून उमर गुलने तर विकेट पासून हातभर लांब बॉल टाकला.

सगळ्यांना आश्चर्यचकित करत धोनीने तिसरा बॉल रॉबिन उथाप्पाला दिला.

त्याने देखील निराश न करता दांडी उडवली. पाकिस्तानच्या आफ्रिदीने ठरवून पण टाकता येणार नाही एवढा मोठा वाईड बॉल टाकला.

प्रचंड प्रेशरमध्ये असलेली ही मॅच आपण ३-० या सुपरओव्हरच्या निर्णयाने निवांत जिंकली.

या मॅचच आठवण सांगताना उथाप्पा सांगतो की

धोनी ने सुपरओव्हर साठी खास स्ट्रॅटेजी आखली होती.

भारत त्या सामन्यात ४ वेगवान गोलंदाजांसह खेळत होता मात्र त्यातल्या एकालाही धोनी ने सुपर ओव्हर साठी उतरवले नाही. अगदी फॉर्मात असलेल्या इरफानला देखील नाही.

शिवाय तो इतरवेळी प्रमाणे किपिंग साठी लांब उभा राहिला नव्हता तर अगदी विकेटच्या मागे दोन्ही गुडघे टेकून तो बसला होता.

पाकिस्तानच्या कामरान अखमलला यातली स्ट्रॅटेजी समजली नाही, तो नेहमी बॉलर बॉल टाकताना जिथे उभे राहायचे त्याच जागी किपिंग साठी उभारला.

भारताला याचा फायदा झाला. धोनीने सांगितल्याप्रमाणे भारतीय बॉलरनी स्टंप च्या ऐवजी त्याच्या दिशेने पाहून बॉल टाकला जो बरोबर निशाण्यावर लागला.

आउट ऑफ बॉक्स जाऊन पॉजिटीव्ह विचार करण्याची धोनीची कुल स्टाईल या सुपरओव्हर मध्ये दिसून आली.

आपल्या पहिल्याच मॅच मध्ये घेतलेल्या निर्णयामुळे त्याने भारत देखील जगज्जेता होऊ शकतो हे दाखवून दिलं. आणि तरुण टीमच्या जोरावर ते वर्ल्ड कप जिंकून ते खरं देखील केलं.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.