आंबेडकरांकडे मागणी करण्यात आली, दंडवतेंना नोकरीवरून काढून टाका

प्रो. मधु दंडवते. फक्त महाराष्ट्रच नाही तर देशाच्या राजकारणात जे मोजके आदर्श नेते होऊन गेले त्यात मधु दंडवते यांचा समावेश होतो. कोकण रेल्वेचं स्वप्न पूर्ण करणारे मधु दंडवते आपल्या शपथ विधी साठी स्कुटर वरून गेले होते, मंत्रिपद मिळाल्याची बातमी अली तेव्हा कपडे धूत होते, देशाचे अर्थमंत्री झाल्यावरही रिक्षाने फिरत होते. पंतप्रधानपदाची संधी फक्त तत्वांसाठी नाकारली. त्यांच्याबद्दलच्या कथा आजकालच्या पिढीला दंतकथा वाटाव्या इतक्या अविश्वसनीय अशा आहेत.

असाच त्यांचा एक किस्सा भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या सोबतचा.

मधु दंडवते यांचा जन्म अहमदनगरचा. त्यांचे वडील रामचंद्र दंडवते इंजिनियर होते. मधुकर दंडवते यांना क्रिकेटर व्हायचं होतं पण घरचं वातावरण अभ्यासू. ते शाळेत हुशार देखील होते. वडिलांच्या आग्रहास्तव महाविद्यालीयन शिक्षणासाठी मुंबईला आले. इथल्या रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मधून त्यांनी फिजिक्स विषयात डिग्री पूर्ण केली.

हा स्वातंत्र्यलढ्याच्या धामधुमीचा काळ होता. अनेक तरुण आपलं घरदार सोडून या महायज्ञात उडी घेत होते. महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल यांच्या विचारांनी भारावून गेलेला हा काळ. मधु दंडवते हे सुद्धा भारत मातेला स्वतंत्र करायच्या प्रेरणेने पेटून उठले त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतला.

याच काळात त्यांची नियुक्ती मुंबईच्या सिद्धार्थ कॉलेजच्या फिजिक्स डिपार्टमेंटमध्ये प्रोफेसर म्हणून झाली.

सिद्धार्थ कॉलेजची स्थापना डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी १९ जून १९४६ रोजी केली होती. त्यांच्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे हे पहिलेच कॉलेज. गोर गरीब विद्यार्थी दर्जेदार उच्च शिक्षणापासून वंचीत राहू नयेत म्हणून या कॉलेजची निर्मिती करण्यात आली होती.

डॉ. बाबासाहेबांसारख्या विद्वान कायदेपंडित व अर्थशास्त्रज्ञाने सुरु केलेलं महाविद्यालय म्हणून त्याची ख्याती पहिल्याच वर्षांपासून देशभरात पसरली होती. राजकारणात कितीही व्यस्त असले तरी बाबासाहेबांचं या आपल्या कॉलेजकडे बारीक लक्ष होतं. इथली शिस्त काहीही केलं तरी जपली जावी यासाठी त्यांचा आग्रह असायचा.

एकदा मधु दंडवतेंना बाबासाहेबांच्या शिस्तीचा अनुभव आला.

झालं असं होत कि स्वातंत्र्यलढ्याच्या चळवळीमुळे बऱ्याचदा मधु दंडवते महाविद्यालयात गैर हजर असायचे. ते का गैर हजर आहेत याची सगळ्यांनाच माहिती असायची. कित्येकदा त्यांना कारावास झालेला असायचा. त्यांच्या सारख्या गैर हजर असण्याला कंटाळलेल्या सिद्धार्थ कॉलेजच्या प्राचार्यानी दंडवतेंवर कारवाई करायचा ठरवलं.

प्राचार्यानी मधु दंडवतेंना नोकरीवरून निलंबित करत आहोत अशी शिस्तभंगाची नोटीस लिहिली आणि संस्थाप्रमुख म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची सही घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी गेले.

बाबासाहेबांनी ते पत्र पाहिलं. प्राचार्य अगदी खुशीत होते की कॉलेजची शिस्त पाळतोय म्हणून बाबासाहेब आंबेडकर आपल्याला शाबासकी देतील. पण तस घडलं नाही. बाबासाहेबानी ती नोटीस वाचली आणि चक्क तिथेच फाडून टाकली.

ते म्हणाले,

“प्रा.मधुकर दंडवते हा फार महत्वाचा माणूस आहे. तो देशाच्या स्वातंत्र्यलढ्याच्या चळवळीत भाग घेतोय. तो गैरहजर राहिला तरी चालेल पण इथून पुढे अशी नोटीस त्यांना पाठवू नका.”

महाविद्यालयाची शिस्त महत्वाची तर होतीच पण त्याहूनही देशाची स्वातंत्र्याची चळवळ महत्वाची होती हे बाबासाहेबांचं म्हणणं होतं. मधु दंडवते पुढे जाऊन देशाचा मोठा नेता होणार हे देखील त्यांनी ओळखलं होतं. बाबासाहेबांची दूरदृष्टी आणि न्याय वृत्ती होती म्हणून मधु दंडवते यांच्यासारखा नेता घडला.

हे ही वाचा भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.