प्राचीन महाभारताची मूळ आवृत्ती शोधण्याचं श्रेय या मराठी माणसाला जाते.

महाभारत महाकाव्य. जगातील सर्वात प्राचीन साहित्य कलाकृतीपैकी एक. भारताच्या सांस्कृतिक, धार्मिक, तात्त्विक तसेच पौराणिक इतिहासाचा हा एक महत्वाचा दस्तावेज आहे. महाभारताचा भारतीय संस्कृतीवरचा ठसा अमीट असा आहे.

महर्षी वेदव्यास मुनींनी हा ग्रंथ गणपतीकडून लिहून घेतला अशी मान्यता आहे.

महाभारताची कथेत मुख्यत्वे कौरव आणि पांडव यांच्या साम्राज्यात असलेल्या भारतवर्षाचा उल्लेख आढळतो. कौरव आणि पांडवांमधील कौटुंबिक वैर आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये झालेले महायुद्ध हा महाभारतातील सर्वांत मोठा विषय आहे.

महाभारत हा मूळच्या जय नामक ग्रंथाचा विस्तार आहे. या ग्रंथातील घटनांचा काळ सुस्पष्ट नाही. काही इतिहासकारांनुसार ग्रंथातील घटना इ.पू. २५०० च्या सुमारास घडल्या. महाभारतात उल्लेख झालेल्या ग्रहणादी खगोलशास्त्रीय घटना विचारात घेतल्या,

तर महाभारताचा काळ सुमारे इ.पू. २००० इतका मागे जाऊ शकतो.

याचाच अर्थ कमीतकमी ४ हजार वर्षांपूर्वी हे महाकाव्य रचले गेले असावे.

महाभारतात अठरा पर्व अठरा पर्व लाखाहूनही अधिक श्लोक असून हा ग्रंथ ग्रीक महाकाव्ये इलियड व ओडिसी यांच्या एकत्रित आकाराच्याही सात पट मोठा आहे. भगवद्गीता सुद्धा यामध्येच अंतर्भूत आहे.

जेव्हा महाभारत लिहिलं गेलं तेव्हा आज आपण वापरतो तशा कागदाचा शोध लागला नव्हता.

त्यामुळे गेल्या चार पाच हजार वर्षात या महाकाव्यामध्ये कित्येक बदल झाले.

महाभारताच्या अनेक पाठावृत्त्या भारतातल्या निरनिराळ्या लिपींमध्ये भिन्नभिन्न प्रदेशांत मान्यता पावलेल्या आढळतात. त्यांच्यामध्ये मजकूर पुढचा मागे व मागचा पुढे झालेला दिसतो. अनेक अध्याय वा श्लोक कमीजास्त आहेत.

१२ हजार श्लोकसंख्यांचा फरक आढळतो. मजकुराची विसंगती अनेक ठिकाणी दिसते.

त्या सगळ्या पाठावृत्त्या तपासून कोणती पाठीवृत्ती सगळ्यांत प्राचीन असावी, हे निश्चित करून व चिकित्सक पाठावृत्ती संपादून प्रकाशित करावे लागणार होते.
हे अवघड शिवधनुष्य उचलले पुणे येथील भांडारकर प्राच्यविद्यामंदिराने.

सर्वात मुख्य जबाबदारी होती डॉ. विष्णु सिताराम सुखथनकर यांच्यावर.

वि.सि.सुकथनकर हे मूळचे मुंबईचे. त्यांचा जन्म १८८७ साली सिताराम व ढाकलीबाई या सुसंस्कृत व सुशिक्षित दांपत्यापोटी झाला. सितारामपंत हे अभियंता होते तर आजोबा शांताराम नारायण हे सरकारी वकील होते. सुखथनकरांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मुंबईतच झाले.

त्यांनी सेंट झेव्हिअर महाविद्यालयात ऍडमिशन घेतले होते.
पण ते पुढे इंग्लंडला उच्च शिक्षणासाठी गेले. तेथील केंब्रिज विद्यापीठा मधून त्यांनी चक्क गणित विषयात पदवी संपादन केली. त्यांनंतर ते जर्मनीला भारतीय भाषाशास्त्राभ्यासासाठी गेले.

जर्मनीमध्ये त्यांनी आपली पीएचडी पूर्ण केली. जर्मन व भारतीय तत्त्वज्ञानाचाही अभ्यास केला.

१९१४ साली ते भारतात परत आले. आल्यावर काही वर्षे पुरातत्व खात्यात नोकरी केली. या काळात त्यांना कोरीव लेखांच्या वाचनामध्ये अधिक रस निर्माण झाला. त्याला केंब्रिजमधील मॅथिमॅटिक्स ट्रायपॉस या पदवीमुळे शास्त्रशुद्घ मांडणीची साथ लाभली होती.

त्यांनी अनेक शोधनिबंध लिहिले. १९१७ मध्ये नुकत्याच स्थापन झालेल्या भांडारकर प्राच्यविद्या ओरिएंटल संशोधन मंदिराच्या ॲनल्स  या संशोधनपत्रिकेचे संपादन करण्याची संयुक्त जबाबदारी सोपविली होती.

अमेरिकेसह जगभर त्यांना व्याख्यानासाठी बोलावले जात होते.

भारतविद्यावंत प्रकांड पंडित म्हणून त्यांची कीर्ती दृग्गोचर झाली.

याच काळात त्यांचे लक्ष महाभारताकडे वेधले गेले. पुण्याच्या भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराने महाभारता च्या चिकित्सक पाठावृत्तीचा प्रकल्प १९१९ मध्येच हाती घेतला होता.

सुकथनकर यांची महाभारताच्या पाठयावृत्तीचे पहिले प्रमुख संपादक म्हणून नियुक्ती झाली.

त्यावेळी महाभारता च्या हस्तलिखितांचे ढोबळ वर्गीकरण दक्षिणेकडील मूळ प्रती व उत्तरेकडील मूळ प्रती असे करण्यात आले होते आणि अक्षरशः भिन्न लिप्यांत व भारतीय भाषांत अनुवादित केलेल्या शेकडो हस्तलिखित प्रती होत्या,

मात्र सुकथनकरांनी त्या हस्तलिखितांच्या मूळ उत्पत्तिस्थानापर्यंत शोध घेऊन त्यांचा काल, स्थळ, नकला यांविषयीची विश्वसनीय माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. यात अनेक तज्ज्ञांनी मोलाची साथ दिली.

या सर्वांच्याच अभ्यासपूर्ण प्रयत्नामुळे जागतिक साहित्य क्षेत्रात महाभारताला एक महाकाव्य म्हणून मान्यता मिळण्यास मदत झाली.

त्यांच्या संशोधनात गणितीय काटेकोरपणा, शास्त्रशुद्घ तंत्र आणि संस्कृत व्याकरणाच्या अभ्यासाने आलेली शिस्त होती. यामुळे त्यांनी शोधलेले महाभारत हे मूळ महाभारताच्या अगदी जवळ जाणारे आहे यावर पाश्चात्य अभ्यासकांनी देखील आक्षेप घेतला नाही.

भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराच्या रौप्यमहोत्सवानंतर (जानेवारी १९४३) दोन आठवड्यांनी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे पुणे येथे निधन झाले.

त्यांचे यापूर्ण राहिलेले काम भांडारकर प्राच्य विद्या संस्थेने पूर्ण केले.

डॉ. सुकथनकर यांच्या निधनानंतर डॉ. बेलवलकरांनी प्रमुख संपादकपदाची जबाबदारी स्वीकारली होती, तर एकेका पर्वाच्या संपादनास डॉ. एगर्टन, डॉ. सुशील कुमार दे. प्रा. वेलणकर, डॉ. दांडेकर इत्यादीनी साहाय्य केले.

महाभारताच्या अधिकृत पाठयावृत्तीचे प्रकाशन १९५६ साली तेव्हाचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते पुण्यात भांडारकर संस्थेमध्ये झालं. तेव्हा ते म्हणाले,

“महाभारत ने समय के साथ हिंदुस्तान में लाखों लोगों को प्रभावित किया है, वह उनके जीवन और संस्कृति का अनन्य हिस्सा बन चुका है. संस्थान की इस परियोजना के लिए और भंडारकर इंस्टीट्यूट के लिए कभी भी आर्थिक संसाधनों की कमी नहीं होने देंगे.”

डॉ. विष्णू सीताराम सुकथनकर यांचे कार्य फक्त महाभारतच नाही तर एकूण भारतीय सांस्कृतिक तत्त्वज्ञानाच्या बाबतीत महत्वाचं आहे.

FB IMG 1587821842939

म्हणूनच जेव्हा त्यांच्या मृत्यू नंतर ४० वर्षांनी टीव्हीवर महाभारत सिरीयलची निर्मिती झाली तेव्हा त्यांनी सुकथनकर यांच्याच संशोधनाचा सहारा घेतला. आजही सिरीयलच्या श्रेय नामावली मध्ये त्यांचे नाव प्रामुख्याने घेतलेले दिसून येते.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.