होम क्वारंटाईन असताना द्रौपदीने पाणीपुरीचा शोध लावला होता.

क्वारंटाइनचा मौसम सुरू आहे. घराचं खाऊन खाऊन कंटाळा आलाय. बाहेर पडलं तर पोलीस मोक्कार हणालेत. गप्प रामायण महाभारत बघत आईने केलेल्या डाळीची भाजी भाकरी खाऊन दिवस मोजणे सुरू आहे.

या कोरोनाच्या दिवसात अखंड भारतभरातल्या पोरी एक डिश मिस करत आहेत,

“पाणी पुरी”

तसं बघायला गेलं तर याचे हजारो प्रकार आहेत, बिहार मध्ये स्टाईल वेगळी, गुजरात मध्ये वेगळी, बंगाल मध्ये वेगळी, कुठे गोलगप्पा तर कुठे पुचका, अमेरिकेत पोटॅटो इन होल. पुण्यात तर याच्यात वरण घालतात

पण जगात कुठेही जा पाणीपुरीवाला कितीही कळकट मळकट असू दे त्याच्या समोर कटोरी घेऊन उभ्या असलेल्या भुकेलेल्या माता भगिनींची गर्दी कधी कमी होत नाही.

अशावेळी भिडूला प्रश्न पडतो सगळ्यांना प्रेमात पाडणारी ही पाणीपुरी आली कुठून असेल?

पाणीपुरीच्या इतिहासाबद्दल मतेमतांतरे आहेत. अभ्यासकांची यावरून भांडणे आहेत. पण सर्वात फेमस थेरी आहे की पहिली पाणीपुरी महाभारत काळात बनली होती आणि तिला बनवलेलं द्रौपदीने.

गोष्ट आहे पांडव पहिल्यांदा वनवासात गेले होते त्याची. हे म्हणजे त्याकाळचे क्वारंटाईन.

लाक्षगृह जाळून कौरवांनी पांडवांना मारण्याचा प्रयत्न केला होता, तिथून पाचही पांडव आणि कुंती माता यांनी कशिबशी सुटका करून घेतली.

याच वनवासातील काळात अर्जुनाने द्रुपदराजाची मुलगी द्रौपदीचा स्वयंवर जिंकला आणि तिला घेऊन घरी आला. स्वयंपाकात बिझी असलेल्या कुंतीमातेने त्याने काय आणलंय पाहिलंच नाही आणि जे आणलंय ते पाचही जण वाटून घ्या असा आदेश दिला.

बिचाऱ्या द्रौपदीची युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव अशी पाच भावात वाटणी झाली, ती पांचाली बनली.

हा काळ पांडवांवर आलेल्या संकटाचा होता. कुरु राज्याचे हे राजकुमार रानोमाळ भटकत होते. त्यांचेच चुलत भावंड असलेले 100 कौरव त्यांच्या जीवावर उठले होते.

अशा या कष्टमय परिस्थितीत जंगलातल्या झोपडीत ही लाडाकोडात वाढलेली राजकन्या कशी काय तग धरेल, आपल्या मुलांच्या पोटाला काय घालेल याची कुंतीमातेला चिंता लागली होती.

सासूबाई कुंतीने द्रौपदीची परीक्षा घ्यायचं ठरवलं.

तिला स्वयंपाकाच्या वेळी भाज्या भरपूर दिल्या पण पोळ्या बनवण्याचं पीठ अगदी कमी दिलं. भीमासारखे पट्टीचे खवय्ये जेवायला बसल्यावर त्यांना हे जेवण पुर्न अशक्य होतं.

पण पांचाली द्रौपदी राजकुमारी असली तरी संसारी होती. तिने एक आयडियाची शक्कल लढवली. एकदम छोट्या छोट्या पुऱ्या बनवल्या. त्या पुरीला एक छोटंसं भोक पाडून त्यात भाजी भरली.

पाचही पांडवांनी मिटक्या मारत हा नवा पदार्थ आवडीने पोट भरून खाल्ला.

भीमाने तृप्तीची ढेकर दिली. तेव्हा कुंतीची खात्री पटली की आपली सून ही अन्नपूर्णा आहे.

हाच द्रौपदीने बनवलेला पदार्थ आता पाणीपुरी म्हणून ओळखला जातो.

ही स्टोरी फेमस आहे पण काही जण यावर आक्षेप घेतात. त्यांचं म्हणणं पाणीपुरीची शोध मगध सत्तेच्या काळात लागला असावा.

तर काहीजण म्हणतात ही इंटरनेटवर कोणीतरी सोडलेली पुडी आहे.असो.

मधल्या काळात या पाणीपुरी मध्ये प्रचंड बदल झाले. आज आपण पाहतो ती पाणीपुरी मात्र खूप अलीकडची. ती बनवण्यासाठी लागणारा बटाटा, तिखटपणा येण्यासाठी लागणारं मिरची हे सगळं पोर्तुगीजांच्या नंतर भारतात आले.

शे दीडशे वर्षांपूर्वी बिहार आणि उत्तरप्रदेश च्या दरम्यानच्या भागात हा चटकमटक गोलगप्पा फेमस झाला आणि आज जगाच्या कानाकोपऱ्यात मिळतो.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.