दुबईकडे इतका पैसा असण्याचे कारण तेल नसून हा माणूस आहे.

फार फार वर्षांपुर्वीची गोष्ट. एका वाळवंटात एक राजा राहत होता. थांबा. अस काहीही नाही. म्हणजे राजा होता हे ठिकय पण फार फार वर्षांपुर्वीची गोष्ट नाही. वीस एक वर्षांपुर्वीच वाळवंट. वाळवंटात दुबई नावाचं एक मध्यम शहर. मध्यम म्हणजे तस फारच लहान.

आजचं दुबई काय आहे हे आम्ही सांगायची गरज नाही. जगातली सर्वात उंच इमारत या शहरात आहे. सर्वात मोठ्ठ सोन्याच मार्केट आहे. जगभरातल्या सेलिब्रिटींच हे दूसरं घर आहे. थोडक्यात काय तर दुबई शहर हे बाप आहे. आणि हे पाहिल्यावर आपल्या तोंडातून सहज शब्द येतो,

तेलाचा पैसा वो तेलाचा पैसा.

तर भावानों आणि बहिणींनो, तेलाचा पैसा आहे हे खरच पण त्यासाठी देखील डोकं लागतं. दुबईच्या या सगळ्या गरुडझेप घेण्यामागं तेलाचा पैसा आहेच पण त्याहून महत्वाचा आहे म्हणजे हा माणूस.

मोहम्मद बिन रशीद अल मक्तूम

संयुक्त अरब अमिराती देशाचे पंतप्रधान, उप-राष्ट्रपती व दुबई अमिरातीचे ते शासक आहेत. या माणसानेच दुबईचा  कायापालट केला आहे. २००६ पासून ते दुबई आणि संयुक्त अरब अमिराती देशाचे शासक आहेत. या माणसाची एक सवय आहे यांना कोणतीही गोष्ट १०० टक्केच लागते. त्यांना सुमार, मध्यम गोष्टी अजिबात आवडत नाहीत. त्यांना त्यांचा देश जी काही गोष्ट करतो ती एकतर एकमेव असली पाहिजे नाहीतर नंबर एक असली पाहिजे.

दुबईचा एकूण  जीडीपी पैकी फक्त एक टक्का महसूल तेला पासुन येतो. बाकी सर्व पर्यटन आणि व्यापारातून येतो. आपण एखाद्या महिन्याचे नियोजन करतो जास्ती जास्त एखाद्या वर्षाचे नियोजन करतो पण हा माणूस एका दशकाचे नियोजन करतो. या माणसाने नियोजन आणि अविरत कामातून दुबईला आज या उंचीला नेऊन ठेवले आहे.

या माणसाने वाळवंटात फुलांच ‘मिरॅकल’ नावाचं जगातील सर्वात मोठं गार्डन उभं केलं. जगातील सर्वात उंच पंच तारांकित हॉटेल ही त्यांनी दुबईत बनवून घेतले, एवढं करून ते थांबले नाहीत ते Disney land कडे गेले आणि म्हणाले

“आमच्याकडे पण एक disney land बनवा पण एकाच अट आहे माझी, ते जगातील सर्वात मोठे  Disney land असले पाहिजे. “

Disney ने नकार दिला मोहम्मद बिन रशीद यांचा इगो दुखावला त्यांनी त्याच दिवशी सांगितले मी दुबई land बनवणार आहे जे Disney land च्या अडीच पट मोठे असेल. मोहम्मद बिन रशीद अल मक्तूम यांचे प्रत्येक पाउल हे नवीन काहीतरी करण्यासाठीच असते. २०३० पर्यंत २५ टक्के इमारती थ्रीडी प्रिंटींगने बनवण्याचे त्यांनी योजले आहे. उडणारी ड्रोन टॅक्सीचे ही परीक्षण करून झाले आहे. दुबईचा कायदा आणि सुव्यवस्था अत्यंत नेटकी आहे. त्यामागे मक्तूम यांनी उभारलेली आधुनिक पोलीस यंत्रणा आहे इथल्या पोलिसांकडे बुगाटी, लॅम्बोर्गिनी सारख्या गाड्या आहेत.

दुबई सरकार दंडातुनच अमाप पैसा मिळवते. तिथे दंडाची रक्कम इतकी मोठी असते की लोक चूक करताना हजार वेळा विचार करतात. नागरिकांना शिस्त लावण्यासाठी अनेक गोष्टींवर दंड लावण्यात आला आहे. तुमची गाडी जरी घाण झाली असली तरी तुम्हाला दंड, चेक बाऊन्स झाला तरी दंड. या गोष्टीचा इतका फायदा झालाय की दुबई मध्ये क्राईम रेट खूपच कमी आहे.

भ्रष्टाचाराला इथे अजिबात थारा नाही तुम्ही नियम मोडला की तुमच्या खात्यातून दंड आपोआप वजा होतो. दुबई मध्ये संपूर्ण शरीया लागू नहिये त्यांनी तो मुद्दामून लागू केलेला नाही. सबंध मध्यपुर्व आशियामध्ये दुबई हे सर्वात लिबरल शहर आहे. बाहेरून विविध संकृतीतून येणाऱ्या लोकांना त्याचा जाच होऊ नये म्हणून ही व्यवस्था केली गेली आहे.

अबू धाबी सारख्या शहरांना प्रगती करणे सोपे होते कारण त्यांच्याकडे तेलाचे असंख्य साठे आहेत. त्या शहरांनी तेल विकले आणि स्वतःची प्रगती साधून घेतली. पण दुबई ची स्तिथी तशी नव्हती. दुबईच्या राजकर्त्यांनी नियोजन करून आजची दुबई बनवली आहे.

दुबईची लोकसंख्या फक्त ३१ लाख आहे, त्यातील एकूण लोकसंख्येच्या ६५ टक्के लोक भारत, पाकिस्तान, बांगलादेश, नेपाल , श्रीलंका अशा देशातील आहेत. हे लोक दुबईला लागणारं सर्व कामगारांची मागणी पूर्ण करतात. ५० डिग्री तापमानात हे लोक काम करू शकतात. दुबईसाठी तिचा कामगार वर्ग फार महत्वाचा आहे, त्यामुळे तिथले कामगार कायदे कमी पिळवणूक करणारे आहेत.

या ‘चीप लेबर फोर्सच्या’ जीवावर दुबईचा डोलारा उभा आहे असंच म्हणावे लागेल. शेख लोक स्वतः काही काम करत नाहीत ते म्हणतात आम्ही फक्त विचार करतो आणि जगातील सर्वात तज्ञ आणि कष्टाळू  लोकांना आणून ती गोष्ट पूर्ण करून घेतो. आलेल्या कामगारांना चांगली वागणूक देऊन त्यांना प्रोत्साहित करून बरोबर काम काढून घेतात हे शेख.

दुबई मध्ये कोणताच इन्कम टक्स लागत नाही, म्हणजे तुम्ही जे काही कामवाल ते सर्व तुमच. तिथे काळा पैसा वगेरे काही भानगड नाही. जमीन कमी पडू लागली तर या लोकांनी समुद्रात भर टाकून पाल्म बेट बनवलं व त्यावर बंगले बांधले. एक बंगला  ३५० कोटींचा आहे. दुबई या अश्या प्रोजेक्ट्स मधून अमाप पैसे मिळवते. दुबईला फक्त आणि फक्त व्यापार कळतो. जगातील सर्वोत्तम कंपन्या,व्यापारी इथे आले पाहिजेत या साठी व्यवस्थाच तशी सोयीस्कर बनवण्यात आली आहे.

टॅक्स फ्री अर्थव्यवस्था , स्पेशल इकॉनॉमिक झोन ,फ्री बिझनस झोन या सर्व गोष्टी व्यापाराच्या सुलभीकरणासाठी इथल्या राज्यकर्त्यांनी अमलात आणल्या आहेत.

तर भिडू दुबई ते करते जे इतर देशांना अशक्य वाटते. अनेक अशक्य वाटणाऱ्या गोष्टी मोहम्मद बिन रशीद अल मक्तूम यांच्या नेतृत्वात दुबईने अगदी सहज सध्या केल्या आहेत. भविष्यात वातानुकुलीत शहर, ड्रोन टॅक्सी, हायपर लूप,विना चालक बसेस अश्या अनेक गोष्टी करण्याचा त्यांचा निश्चय आहे. या सर्वात  तेलापासून दुबईला व्यापाराकडे घेऊन जाणाऱ्या मोहम्मद बिन रशीद अल मक्तूम या माणसाचा मोलाचा वाटा आहे.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.