१०० वर्षांपूर्वी एक माणूस होऊन गेला त्याच्यामुळे आजही केरळमध्ये कट्टर जातीवाद जिंकत नाही…

सर्वांसाठी एकच जात, एकच धर्म व एकच परमेश्वर असं ब्रीदवाक्य त्याकाळी भयानक वाढलेल्या जातीयवादाविरुद्ध उभारलेल्या चळवळीतून पुढे आलं होतं. या ब्रिदवाक्याचे जनक होते नारायण गुरु.

२० सप्टेंबर १८५४ रोजी नारायण गुरूंचा त्रिवेंद्रम मध्ये इळव या अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या जातीत जन्म झाला. नारायणगुरूंचा लहानपणापासूनच वैराग्याकडे ओढा असल्याने पारंपरिक उच्च धार्मिक शिक्षण पूर्ण झाल्यावर सत्याच्या शोधासाठी विमुक्त जीवन जगण्याचे त्यांनी ठरविले. 

वेगवेगळ्या ठिकाणी फिरत असताना स्वजातीयांची विपन्नावस्था, हलाखी, त्यांच्यातील गाढ अज्ञान व त्यांच्यावर होणाऱ्या सामाजिक अन्यायाचे विदारक दर्शन त्यांना झाले आणि त्यामुळे त्यांच्या जीवनाला वेगळीच दिशा मिळाली. यापुढील उर्वरित संपूर्ण जीवन त्यांनी ईळव जातीच्या त्याचप्रमाणे केरळमधील इतर अस्पृश्य जातींच्या उद्धारासाठी वाहून घेतले. 

अस्पृश्यांतील पिढ्यान्पिढ्यांच्या धार्मिक संस्कारांचा अभाव त्यांच्यातील अनिष्ट प्रवृत्तींचे मूळ कारण आहे, असे नारायण गुरूंना वाटे. त्यामुळे अस्पृश्यांसाठी असे संस्कार करणाऱ्या मंदिराच्या स्थापनेचा अभिनव कार्यक्रम त्यांनी हाती घेतला. त्रिवेंद्रमजवळील अरुविप्पुरम, अंजेंगो, पेरिंगोत्तुकर, त्रिचूर, कननोर, तेल्लीचेरी, कालिलत, मंगलोर, वरकळ इ. महत्त्वाच्या ठिकाणी सु. १० वर्षांत त्यांनी शंभरांहून अधिक मंदिरे स्थापन केली. मंदिरातून देवतापूजेपेक्षाही नैतिक शिक्षण, सर्वधर्मसमभाव, बंधुता व स्वच्छता या गोष्टींना अधिक प्राधान्य देण्यात येई.

कट्टर जातीयवाद बाळगणाऱ्या लोकांना नारायण गुरूंमुळे तोंड वर काढता आलं नाही. त्यांनी केलेलं कार्य हे कट्टर जातीवाद्यांसाठी सणसणीत उत्तर असायचं.

माणसाचे ऐहिक जीवन अधिक सुखी, प्रेममय व सहिष्णुतेचे बनविणे हे श्रेष्ठ ध्येय असून त्या ध्येयाच्या प्राप्तीसाठी देवालयांची जागा विद्यालये घेतील, अशी नारायण गुरूंची श्रद्धा होती.

माणसांमधील परस्परबंधुभाव वाढीस लागण्याच्या दृष्टीने सर्व धर्मांचा तुलनात्मक अभ्यास व्हावा, अशी त्यांची इच्छा होती. त्या दृष्टीने त्यांनी श्रीलंकेचा दोनदा दौराही केला. त्यांच्या प्रेरणेनेच अलवाये येथे विश्वबंधुत्व परिषद (कॉन्फरन्स ऑफ ब्रदरहूड, १९२१) तसेच ‘सर्व धर्म परिषद’ (१९२४) अशा दोन परिषदा घेण्यात आल्या व अध्यात्मविद्येच्या अभ्यासासाठी  ब्रह्म विद्या मंदिरम्ही  संस्थाही स्थापन करण्यात आली.

नारायणगुरूंनी अस्पृश्यांच्या भल्यासाठी केलेलं महान कार्य म्हणजे १५ मे १९०३ रोजी ईळव जातीच्या उद्धारार्थ त्यांनी स्थापन केलेली  श्री नारायण धर्म परिपालन योगम् ही संस्था होय. अस्पृश्यांच्या सामाजिक, आर्थिक गरजांकडे लक्ष पुरविणे त्याचप्रमाणे त्यांच्यात शिक्षणाचा प्रसार करणे, हा संस्थेचा प्रमुख उद्देश होता. संस्थेतर्फे अनेक माध्यमिक व उच्च विद्यालये स्थापन करण्यात आली आणि गरजू व हुशार अस्पृश्य विद्यार्थांना शैक्षणिक संधी उपलब्ध करून देण्यात आली. 

केरळमध्ये, द. भारतात इतरत्र तसेच श्रीलंकेत नारायणगुरूंना लक्षावधी निष्ठावंत अनुयायी लाभले. सर्वांभूती समभाव, मानवता, प्रेम व बंधुता यांना त्यांनी आपल्या शिकवणुकीत सतत प्रधान्य दिले. त्रिवेंद्रमपासून सु. ३२ किमी. वरील शिवगिरी, वरकळ येथे १९०३ च्या सुमारास ते स्थायिक झाले होते व तेथेच त्यांचे निधन झाले. त्यांची समाधीही तेथेच बांधण्यात आली आहे. 

नारायण गुरूंच्या प्रभावामुळे आजही केरळमध्ये कट्टरतावाद दूर राहिलाय. अजूनही अनेक उजव्या विचारांच्या पक्षांना केरळमध्ये शिरकाव करता आलेला नाही. नारायण गुरूंनी १०० वर्षांपूर्वी रोवलेली मुहूर्तमेढ आजही अनेक लोकांना प्रेरणादायी आहे. त्यांचं कार्य केरळमध्ये नव्हे तर भारतभर चर्चिलं जावं इतकं महान आहे. 

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.