सौरव गांगुलीने भारतीय क्रिकेटला आजवर अनेक हिरे शोधून दिले, हा एकच दगड निघाला..

चुकीला माफी नाही

हा डायलॉग जर कोणाला एकदम परफेक्ट बसत असेल तर तो म्हणजे भारताचा माजी क्रिकेटर दिनेश मोंगियावर. दिनेश मोंगियाने केलेली एक चूक त्याच्या करियर समाप्तीला कारणीभूत ठरेल असं त्याला स्वप्नातही वाटलं नव्हतं. क्रिकेट कारकीर्द संपल्यानंतर तब्बल बारा वर्षांनी दिनेश मोंगियाने क्रिकेटमधून संन्यास घेतला. त्याने अशी काय चूक केली होती आणि त्याचा इतका मोठा फटका त्याला बसला याविषयीचा आजचा किस्सा.

इतक्या मोठ्या लोकसंख्येच्या देशात भारताच्या क्रिकेट संघात खेळायला मिळणं हे प्रत्येक क्रिकेट खेळणाऱ्या मुलाचं स्वप्न असतं. क्रिकेटबद्दलचं ठार वेड आपल्या लोकांमध्ये आहे. लहानपणापासूनच क्रिकेटकडे ओढा असलेले दिनेश मोंगिया अथक मेहनत करून क्रिकेटमध्ये आला.

प्रादेशिक संघांकडून खेळताना त्याने उत्तम प्रदर्शन करत भारतीय संघाच्या निवड समितीचे लक्ष वेधून घेतले आणि भारतीय संघाचं दार ठोठावलं. त्याने डोमेस्टिक क्रिकेट सामन्यांमधून तब्बल आठ हजार धावा झळकावून दमदार हजेरी लावली होती.

त्याच्या प्रदर्शनाच्या जोरावर त्याला संघात जागा मिळाली. हा तो काळ होता जेव्हा भारतीय संघ  फिक्सिंगच्या सावटातून हळूहळू बाहेर पडत होता. संघातल्या काही मोठ्या खेळाडूंना संघातून बाहेरचा रास्ता दाखवला गेला होता आणि संघाची धुरा युवा सौरव गांगुली सांभाळत होता.

दादा गांगुली मॅचफिक्सींगच्या गोष्टींना मागे टाकून भारतीय क्रिकेटला एका वेगळ्या उंचीवर नेण्याच्या प्रयत्नात होता आणि संघात जिंकण्याचा आत्मविश्वास भरत होता.

यामुळे संघात जवळपास बरेच नवीन युवा खेळाडू होते. दिनेश मोंगियाला पदार्पणाची संधी ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध मिळाली. पण या सामन्यात तो काही विशेष चमक दाखवू शकला नाही. पण पुढच्या बऱ्याच सामन्यात त्याने चांगले रन्स करून संघातलं स्थान टिकवून ठेवलं.

२००३ साली झालेल्या विश्वचषकामध्ये लक्ष्मणच्या जागी गांगुलीने दिनेश मोंगियाला निवडलं तेव्हा बरीच काँट्रॅव्हर्सी झाली होती. पण वनडे फॉरमॅटमध्ये दिनेश मोंगिया सारखा तडाखेबाज बॅटिंग करणारा, चांगली फिल्डिंग आणि वेळप्रसंगी बॉलिंग करणारा खेळाडू लक्ष्मणच्या शैलीदार दालनदाजीपेक्षा वरचढ आहे असं दादाने निवड समितीला सांगितलं.

मोंगिया भारतीय संघाचा महत्वपूर्ण भाग बनला. दादाच्या नेतृत्वाखाली भारतीय टीम वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीपर्यंत पोहचली. पण आपला अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला. या वर्ल्ड कपमध्ये दिनेश मोंगियाचे अपयश ठळकपणे जाणवून आले.

टीम गांगुली पैकी सर्वात गंडलेला प्लेयर म्हणून त्याला ओळखलं गेलं.

भारतीय संघाकडून टी-ट्वेन्टी खेळणारा दिनेश मोंगिया हा पहिला खेळाडू होता. बांगलादेश विरुद्धची भारताची पहिलीच टी-ट्वेन्टी मॅच हि दिनेश मोंगियाची करिअरची शेवटची मॅच ठरली.

त्यानंतर दिनेश मोंगियाचं प्रदर्शन तितकंसं खास राहील नाही. मग त्यावेळी भारतात टी-ट्वेन्टी या नवीन क्रिकेट प्रकाराचं आगमन झालं.

२००७ साली इंडियन क्रिकेट लीगची स्थापना झाली.

दिनेश मोंगिया हासुद्धा या लीगमध्ये सामील झाला होता आणि तो या लीगमधील चंदिगढ लायन्स या संघाकडून खेळत होता. शतकातला महान खेळाडू कपिल देव सारखे अनेक दिग्गज या लीगशी जोडले गेले होते. कित्येक नव्या खेळाडूंना या लीगमधून संधी मिळाली होती. अनेक खेळाडू असे होते ज्यांचं करियर संपुष्टात आलं होतं. पण अजूनही मुख्य टीम कडून खेळत असलेल्या पैकी दिनेश मोंगिया हा एकमेव खेळाडू होता.

परंतु या लीगला बीसीसीआयने परवानगी दिली नव्हती आणि हि लीग खेळणारे खेळाडू बीसीसीआयच्या नजरेत फितूर म्हणून ओळखले जाऊ लागले.

पुढे हि आयसीएल लीग बरखास्त करण्यात आली.

इंडियन क्रिकेट लीग खेळणाऱ्या खेळाडूंवर बीसीसीआयने बॅन लावला. यामुळे दिनेश मोंगिया, अंबाती रायुडू , हेमांगी बदानी या खेळाडूंचं करियर अधांतरी लटकलेलं होतं. दोन वर्षानंतर बीसीसीआयने खेळाडूंसाठी मवाळ भूमिका केली आणि खेळाडूंना पुनरागमनाची संधी दिली. पण दिनेश मोंगियाच नशीबचं दुर्दैवी होतं, त्याला भारतीय संघात परतताच आलं नाही.

त्याच्यावर मॅच फिक्सिंगचे गंभीर आरोप करण्यात आले. न्यूझीलँडचा माजी क्रिकेटर लू विन्सेंटने त्याच्यावर हे आरोप केले.

त्याने सांगितले कि इंडियन क्रिकेट लीगमध्ये होणाऱ्या मॅच फिक्सिंग करणाऱ्या टीमपैकी दिनेश मोंगिया हा एक प्लेअर होता. दिनेश मोंगियाने मात्र त्याचे सगळे आरोप फेटाळून लावले.आणि दिनेश मोंगियाविरुद्ध मॅच फिक्सिंग केल्याचा एकही पुरावा आढळून आला नाही. पण या आरोपाने दिनेश मोंगियाची पब्लिक इमेज डाऊन झाली.

पुढे मोहम्मद अझरुद्दीन यातून बाहेर पडल्यावर दिनेश मोंगियाने बीसीसीआयला माफीनामा पाठवून अपील केली कि,

जस अझरुद्दीनच्या फिक्सिंग केसमध्ये लक्ष घालून त्याला सोडवलं तसंच माझ्याबाबतीतही बीसीसीआयने लक्ष द्यावं.

पण तस काही घडलं नाही. इंडियन क्रिकेट लीग खेळणारे बरेच खेळाडू पुढे भारतीय क्रिकेट संघाचा भागही झाले मात्र दिनेश मोंगियाला पुन्हा कधीच संधी मिळाली नाही. इतर सगळ्या खेळाडूंना माफी मिळाली पण बीसीसीआयने दिनेश मोंगियाला माफी दिली नाही.

शेवटी कंटाळून सप्टेंबर २०१९ साली दिनेश मोंगियाने क्रिकेटला कायमचा रामराम ठोकला.

हे हि वाच भिडू :

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.