माझ्या मुलीचा पराभव करणारा गद्दार म्हणत खडसेंनी इशारा गिरीश महाजनांकडे केलाय ?

भोसरी भूखंड प्रकरणात ईडीने बुधवारी दुपारी १२ च्या सुमारास एकनाथ खडसेंच्या  मुक्ताईनगरातील फार्म हाऊसच्या गेटवर समन्स अडकवल्याची चर्चा आहे. त्यावर खडसेंनी ईडीच्या कारवाईबाबत बाजू तर मांडलीच पण त्यावेळी, जिल्ह्यातील भाजपा नेत्यांवरही नाथाभाऊंनी तोंडसुख घेतलं. ते म्हणतात,

माझ्या मुलीचा पराभव करणारा गद्दार कोण हे मला राष्ट्रवादीत आल्यानंतर समजलं. मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी आपण कुणाच्या कृपेने आमदार झालो याची आठवण ठेवावी. उगाच जामनेरवाल्याच्या कानातील कुरघोड्या ऐकत बसू नये, जामनेरवाल्यानेच आपल्या मागं ईडी इन्कम टॅक्स, वेगवेगळ्या चौकशा लावल्या.

आपल्या मुलीचा पराभव करणारे जामनेरकर आहेत असा ओघ नाथाभाऊंचा होता. पण मग हे जामनेरकर नक्की आहेत तरी कोण ?

तर हे जामनेरकर आहेत, जामनेरचे आमदार आणि भाजप नेते गिरीश महाजन

सध्या राष्ट्रवादीत असलेले पूर्वाश्रमीचे नेते एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यातील वाद संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. संपूर्ण जळगावचं राजकारण या दोन नेत्यांभोवती फिरतं हे सुद्धा सर्वांना माहीत आहे. जेव्हा जेव्हा या दोघांचा वाद समोर येतो, तेव्हा नाथाभाऊ एक वाक्य नेहमी म्हणतात,

गिरीश, तुला राजकारणात मी जन्माला घातलंय.

खरं कस आणलं ते बघूया..

गिरीश महाजन विद्यार्थीदशेपासूनच भाजपच्या राजकारणाशी जोडले गेले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत ते सक्रिय होते. १९९२ मध्ये ते जामनेर ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणून निवडून आले. ते जामनेरचे सरपंचही होते. १९८८ ते १९९० मध्ये ते भारतीय जनता युवा मोर्चाचे जामनेर तालुका अध्यक्ष होते. नेमक्या याच काळात भाजपमध्ये नाथाभाऊंचा दबदबा सुरु झाला.

गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन यांच्या नेतृत्वाखाली नाथाभाऊ ग्रामीण भागातील बहुजन तरुणांना भाजपमध्ये संघटित करत होते. त्यातलेच एक प्रमुख कार्यकर्ते म्हणजे गिरीश महाजन.

१९९५ मध्ये महाजन पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेले. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. यात त्यांना मदत झाली होती एकनाथ खडसेंची. खडसेंची ताकद घेऊन महाजन जामनेरच्या राजकारणात मोठे झाले. यामुळे महाजन एकनाथ खडसे गटाचे होते.

त्यावेळी एकनाथ खडसेंच्या राजकारणात दबदबा होता. विरोधी पक्षनेतेपदी असतांना काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारवर त्यांनी जोरदार आसूड ओढले होते. अभ्यासू वृत्तीने काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस सरकारची विधिमंडळात दाणादाण उडवायचे.

२०१४ साली जेव्हा भाजप-शिवसेना युतीला विधानसभेत बहुमत मिळालं, त्यात भाजपला अधिक जागा मिळाल्यानं मुख्यमंत्रीपद आपल्याला मिळावं म्हणून खडसे आग्रही होते. त्यावेळी खडसेंनी मुख्यमंत्रीपदाची मनिषा लपवून ठेवली नव्हती. पण भाजपच्या अंतर्गत राजकीय कुरघोडीत देवेंद्र फडणवीस यांच्या मागे मोदी-शहा यांची ताकद लागल्याने खडसेंनी चार पावले मागे घेतली पण त्यावेळी मुख्यमंत्रीपदाच्या मोबदल्यात त्यांनी महत्त्वाची १२ खाती आपल्या पदरात पाडून घेतली. सोबतीला जळगावचे पालकमंत्रीपद देखील होते.

सत्ता स्थापन झाल्यानंतर काही दिवसातच देवेंद्र फडणवीस व खडसेंमधल्या वादाने वेगळीच उंची गाठली होती.  

अशातच एंट्री मारली महाजनांनी. फडणवीस यांनी गिरीश महाजन यांच्याकडची मंत्री मंडळातील महत्त्वाची खाती सोपवत खडसेंना शह दिला. खडसेंना खिंडीत गाठत जळगावमध्येच अडकवून ठेवायचे असा मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न होता.

खडसेंचे मंत्रीपद गेल्यानंतर त्यांचे समर्थक मानले जाणाऱ्यांनी महाजन यांच्याशी घरोबा केला. जळगाव विधान परिषद , जिल्हा परिषद निवडणुकीत खडसेंच्या समर्थकांना डावलण्यात आलं. एवढंच नाही तर लोकसभा निवडणुकीत त्यांच्या स्नुषा रक्षा खडसे यांना उमेदवारी नाकारली जाऊन गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन यांना मिळणार असल्याची जोरदार चर्चा होती. शेवटी मात्र रक्षा खडसे यांना उमेदवारी मिळाली.

खडसेंनी महाजनांना राजकारणात मोठी साथ दिली. परंतु फडणवीस मुख्यमंत्री होताच महाजन फडणवीसांच्या मर्जीतले झाले. त्यातच फडणवीस-खडसे वाद निर्माण झाल्याने त्याचा महाजन यांनी फायदा घेत महाजन यांच्याशी अधिकच जवळकी साधली.

पुढं महाजनांमुळेच २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत आपल्याला उमेदवारी नाकारण्यात आली. आपले राजकारण संपवण्याचा कट रचला गेला, असा आरोप खडसे यांनी केला होता.

तीस वर्षांपासून एकनाथ खडसे मुक्ताईनगर मतदारसंघातून निवडून येत होते. त्याच मतदारसंघातून २०१९ ची उमेदवारी नाकारून खडसेंच्या कन्या अ‍ॅड. रोहिणी खडसे-खेवलकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. मात्र, रोहिणी खडसे यांचा १९८७ मतांनी पराभव झाला आहे. अपक्ष उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी त्यांचा पराभव केला.

चंद्रकांत पाटील हे मुक्ताईनगर येथील शिवसेनेचे कार्यकर्ते होते.

विधानसभा निवडणुकीच बिगूल वाजल्यानंतर भाजप आणि शिवसेना यांच्या युतीबाबत साशंकता वर्तवली जात होती. मात्र, निवडणुकीच्या अवघ्या काही दिवसांअगोदर भाजप आणि सेनेने महायुतीची घोषणा केली.

युतीच्या झालेल्या वाटाघाटीत मुक्ताईनगर मतदारसंघ हा भाजपच्या वाट्याला आला. त्यामुळे मुक्ताईनगर येथील शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील नाराज झाले. त्यांनी बंडखोरी करुन अपक्ष उमेदवारीचा अर्ज दाखल केला. चंद्रकांत पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार देखील मुक्ताईनगरमध्ये दाखल झाले होते.

मुक्ताईनगर मतदारसंघात सर्व पक्ष खडसेंच्या विरोधात एकवटले होते. सोबतच जामनेरकरांनी म्हणजेच महाजनांनी भाजपची ताकद सुद्धा या चंद्रकांत पाटलांच्या मागं लावल्याची चर्चा त्यावेळेस होती.

मात्र, तरीही खडसेंनी एकेरी झुंज सुरु ठेवली. आपली मुलगी जिंकून यावी यासाठी त्यांनी भरपूर प्रचार केला. मात्र, तरीही इतर पक्षांच्या ताकदीपुढे रोहिणी खडसे यांचा १९८७ मतांनी पराभव झाला.

हे हि वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.