अपशकुनी समजला जाणारा रामटेक बंगला खडसेंच्या साठी पडता काळ घेऊन आला…

नेते मंडळी आणि सरकारी बंगल्याचं कॉम्पिटिशन काय नवी गोष्ट नाही. दिल्ली असो कि मुंबई. ब्रिटिश कालीन सरकारी बंगले म्हणजे प्रत्येक मंत्री खासदार आमदाराचं स्वप्न असतं. विशेषतः मुंबईत मलबार हिलच्या भागात असलेल्या काही बंगल्यावरून प्रचंड मारामारी होत असते.

यातलाच प्रमुख बंगला म्हणजे रामटेक

असं म्हणतात की रामटेक बंगला हा मुख्यमंत्री निवास असलेल्या वर्षा बंगल्यापेक्षा कितीतरी प्रशस्त आणि सुंदर आहे. समुद्रकिनारी असलेल्या रामटेक बंगल्याला अनधिकृतपणे उपमुख्यमंत्र्यांचा बंगला असं समजलं जायचं. मुख्यमंत्र्याच्या खालोखाल ताकदवान असलेला मंत्री या बंगल्यात राहतो हि अनेक वर्षांची चालत आलेली परंपरा होती.

इंग्रजी अमदानीत मलबार हिल परिसरात गेल्या शतकात अनेक देखण्या वास्तू उभारण्यात आल्या. प्रामुख्याने गव्हर्नर, वरिष्ठ इंग्रज अंमलदार, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, रिझर्व्ह बँक आणि स्टेट बँक यांचे प्रमुख; तसेच मध्य आणि पश्चिम अशा दोन्ही रेल्वे विभागांचे सरव्यवस्थापक यांच्या अधिकृत निवासांप्रमाणेच, अनेक धनवंतांनी हा हिरवागार परिसर राहण्यासाठी पसंत केला.

राज्यपालांचे राज भवन आणि मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान असलेला वर्षा बंगला देखील मलबार हिल वरच आहे. इथून अगदी जवळच रामटेक बंगला आहे.

रामटेक बंगला पहिल्यांदा चर्चेत आला तो शरद पवार यांच्यामुळे. खरं तर यशवंतराव चव्हाणांचे मानसपुत्र समजल्या जाणाऱ्या पवारांना अगदी तरुण वयात मंत्रिपद मिळालं होतं. मुख्यमंत्री वसंतराव नाईक आणि यशवंतराव चव्हाण यांच्यातील दुवा म्हणून ते ओळखले जायचे. पुढे शंकरराव चव्हाण, वसंतदादा पाटील यांच्या मंत्रिमंडळात देखील त्यांना अतिशय महत्वाचं स्थान प्राप्त झालं.

पक्षीय संघटन मजबूत करण्यापासून ते प्रशासन चालवण्यात वाकबगार असणारे शरद पवार तरुण उत्साही मंत्री म्हणून ते ओळखले जायचे.

याच काळात त्यांना रामटेक बंगला सोपवण्यात आला. कित्येक राजकीय घडामोडीमध्ये पवारांनी डावपेच याच रामटेक बंगल्यात बसून आखले.

पुढे वसंतदादा पाटलांच सरकार पाडून स्वतः मुख्यमंत्री बनायचे प्लॅन देखील इथेच बनला. वयाच्या ३८ वर्षी त्यांनी मुख्यमंत्री बनण्याचा विक्रम केला. पवारांच्या या प्रगतीमुळे अनेकांना रामटेक बंगला लाभदायक आहे असं वाटू लागलं. तेव्हापासून प्रत्येकाला रामटेक बंगलाच हवा हवासा वाटू लागला.

युतीच्या काळात उपमुख्यमंत्री गोपीनाथराव मुंडे यांना हा बंगला मिळाला. काँग्रेसच्या शासनाविरुद्ध आरोपांची राळ उडवून लोकप्रिय झालेले मुंडे यांनी उपमुख्यमंत्री गृहमंत्री म्हणून देखील चांगलीच छाप पाडली. पण पुढच्या काळात काँग्रेसने वेगवेगळ्या प्रकरणात त्यांना घेरण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या चारित्र्यावर देखील आरोप करण्यात आले. १९९९ साली युतीची सत्ता गेली. भविष्यात मुंडे यांना क्षमता असूनही मोठे पद पटकावता आले नाही.

त्यांच्यानंतर राष्ट्रवादीच्या छगन भुजबळ यांना रामटेक हा बंगला मिळाला. भुजबळांनी सुरवातीला कामांचा जोरदार धडाका लावला होता. पण लवकरच ते तेलगी प्रकरणात अडकले आणि त्यांच्यासाठी हा कायमचा सेटबॅक बसला. ते पुन्हा उपमुख्यमंत्री बनले पण आधीची प्रतिष्ठा आणि राजकारणातील दबदबा कायम राहिला नाही.

पण भुजबळांच उपमुख्यमंत्रीपद गेल्यावर हि त्यांनी रामटेक बंगला सोडला नाही. आर आर आबा यांनी मागणी केली होती पण त्यांनाही अखेर चित्रकूट बंगल्यावर समाधानी राहावं लागलं. तब्बल १५ वर्षे भुजबळ रामटेक येथे राहिले.

२०१४ साली सत्ता गेली आणि भुजबळ रामटेकमधून बाहेर पडले. त्यांना पुढे सत्तेत आलेल्या फडणवीस सरकारने जेल मध्ये पाठवलं. अनेक वर्षे भुजबळ जेलमध्ये राहिले.

देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात दोन नंबरची खुर्ची एकनाथराव खडसे यांच्याकडे होती. खरं तर त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा दावा होता पण केंद्रातून आलेल्या आदेशामुळे दुसऱ्या स्थानावर त्यांना समाधान मानून घ्यावं लागलं. पद मिळालं नाही पण उपमुख्यमंत्र्यांसाठीचा रामटेक बंगला त्यांना मिळाला.

एकादशीला पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील अग्रपूजेपासून अनेक प्रसंगी खडसेंना मानाचं स्थान देण्यात आलं होत.

पण एकनाथराव खडसे यांचं वाढत असलेलं महत्व पक्षांतर्गत विरोधकांना खुपू लागले होते. अशातच त्यांच्यातील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील सत्ता संघर्ष लपून राहिला नाही. रामटेक बंगला हा फडणवीस यांच्या विरोधातील विविध कारस्थानाचे केंद्रबिंदू आहे असं म्हटलं जाऊ लागलं. यातूनच मुख्यमंत्र्यानी खडसेंचे पंख कापण्यास सुरवात केली. 

भुजबळांच्या पाठोपाठ खडसेंना देखील अडचणींचा सामना करायला लागल्यामुळे रामटेक बंगला अपशकुनी असल्याची चर्चा सुरु झाली.

दरम्यान आपल्या कार्यकर्त्यांना विधानभवनावरून रामटेक बंगल्यावर भेटायला येण्यास अडचणी येत आहेत असं एकनाथराव खडसेंना जाणवलं. सामान्य कार्यकर्त्याला व व्यक्तीला २०० रुपये टॅक्सीभाडे देणे शक्य नाही व याच कार्यकर्त्यांची अडचण दूर करण्यासाठी मी विधानभवन जवळ मिळेल त्या छोट्या बंगल्यात राहायला जातो असं म्हणत त्यांनी रामटेक सोडले.

मधल्या काळात त्यांनी रामटेक बंगल्याची वास्तू शांती देखील करून घेतली असल्याचं बोललं गेलं. 

पण त्यांच्या मागचं शुक्लकाष्ठ कमी झालं नाही. अशातच भोसरी जमीन घोटाळा बाहेर आले. खडसेंवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. इतरांवर आरोप झाले कि त्यांना क्लीन चिट मिळत होती पण खडसेंचं मंत्रिपद गेलं. तरीही कधी ना कधी पुनरागमन करू असं म्हणत त्यांनी रामटेक बंगल्यावरील हक्क सोडला नव्हता. 

पण मीडियामध्ये यावरून बोभाटा झाला. माहितीच्या अधिकाराखाली प्रश्न विचारण्यात आले. प्रकरण वेगळा रंग घेऊ लागल्यावर खडसेंनी अधिकृतपणे रामटेक बंगला सोडला. 

एरव्ही रामटेक बंगल्यासाठी भांडणारे नेते खडसेंच्या राजीनाम्यानंतर रामटेक बंगला नको म्हणून भांडू लागले. अखेर भाजप मध्ये तुलनेने तरुण नेते असलेल्या जयकुमार रावल यांना हा बंगला मिळाला. २०१९ साली जेव्हा भाजपची सत्ता जाऊन महाविकास आघाडी सत्तेत आली तेव्हा पुन्हा छगन भुजबळ यांनी रामटेक बंगल्यात वास्तव्य थाटलं आहे.

पण इतक्या वर्षानंतर आजही महाराष्ट्राच्या राजकारण्यांमध्ये रामटेक बंगला अपशकुनी असल्याच्या चर्चा थांबत नाहीत.

हे ही वाच भिडू 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.