….म्हणूनच एकविरा आईचं मंदिर इतिहासकारांसाठी एक गूढच आहे

एकविरा आई तू डोंगरावरी, नजर हाय तुझी कोल्यांवरी…..

या भक्तिगीताच्या बोलाप्रमाणेच नवसाला पावणारी, कोळ्यांचे आराध्य दैवत असणारी देवी म्हणून एकविरा देवीला हिंदू समाजात महत्वाचं स्थान आहे. एकविरा देवीचं मंदिर लोणावळ्याच्या कार्ला लेण्यांच्या बाजूलाच स्थापन आहे. मंदिराचे वेगळेपण लेण्यांमध्ये असलेले तिचे स्थान, प्राचीनता आणि तिचं लोभसवाणं रूप यामुळे या देवीचे महत्त्व काही वेगळेच आहे. 

महाराष्ट्रात देवींची साडेतीन शक्तिपीठं मानली जातात. त्यापैकी पार्वती आणि रेणुका मातेचा अवतार असणारी एकविरा देवी. या देवीचं मंदिर महाराष्ट्रातील लोणावळ्याजवळील कार्ला गडावर आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारावर अखंड दगडात कोरलेले दोन भव्य हत्ती तुमचे स्वागत करतात. एकेकाळी बौद्ध धर्माचे केंद्र असलेल्या लेण्यांच्या शेजारी एकवीरा देवीची पूजा केली जाते.

एक जागृत देवस्थान म्हणून आई एकवीरेची ख्याती आहे. अश्विन नवरात्र किंवा शारदीय नवरात्र आणि चैत्र नवरात्रात अनेक भाविक या मंदिरात पूजा आणि उत्सव साजरा करण्यासाठी गर्दी करतात. चैत्र नवरात्रीत म्हणजेच एप्रिल महिन्यात देवीची भव्य जत्रा भरते. आता ७ एप्रिल ते १० एप्रिल अशी जत्रा असणार आहे.

या यात्रेचं औचित्य साधत देवीचे भक्तगण दर्शन घेण्यासाठी, नवस फेडण्यासाठी येथे येतात. हजारो पालख्या, दिंड्या परंपरेनुसार कोकणातून कार्ल्याला पायी आणल्या जातात. देवीच्या पालखी सोहळ्यास राज्यातूनच नव्हे तर देशभरातून लोकं येतात.  गेली २ वर्ष झालं कोरोना निर्बंधामुळे जत्रेत अडथळा होता पण यावेळेस मोठ्या संख्येने भाविक गर्दी करण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुणे प्रशासनाने गडावर १४४ कलम लागू केलं आहे. तरी भाविकांना दर्शनासाठी परवानगी आहे. 

एकवीरा देवी ही ठाकरे घराण्याची कुलदेवी आहे. ठाकरे कुटुंबातील सदस्य दरवर्षी येथे दर्शनासाठी येतात.

आता या देवीचं महत्व जितकं मुंबई, ठाणे, रायगड आणि कोकण भागातील कोळी, आगरी लोकांमध्ये आहे तितकंच महाराष्ट्रातील इतरही समाजात आहे. पण कोळी समाजाच्या लोकांबरोबरच एकवीरा देवीची उपासना बऱ्याच इतर समाजांतील लोकांकडून विशेषतः सीकेपी म्हणजेच चांद्रसेनीय कायस्थ प्रभू आणि दैवज्ञ ब्राह्मण यांच्याकडूनही केली जाते. तसेच काही कुणबी समाजाच्या काही लोकांचीही  कुलदेवता आहे. याशिवाय सोनार, पाठारे, चौकळशी, पाचकळशी अशा अनेक समाजांची कुलस्वामिनी देवी असल्याचं सांगितलं जातं.

आता पौराणिक कथेनुसार….

एकवीरा देवीचं मंदिर पांडवांनी बांधल्याचं मानलं जातं. असं म्हणतात की, पाण्डव जेंव्हा अज्ञातवासात होते तेंव्हा त्यांना एकवीरा देवीने दर्शन दिलं होतं. एकवीरा माता त्यांच्यासमोर प्रकट झाली आणि पांडवांना तिच्यासाठी मंदिर बांधण्याची सूचना केली. पांडवांच्या भक्तीची परीक्षा घ्यायची म्हणून देवीने एक अट घातली, ती अशी की या मंदिराचं बांधकाम एका रात्रीत बांधून पूर्ण झालं पाहिजे. पांडवांनी हे सुंदर मंदिर एका रात्रीत बांधून पूर्ण केलं. आणि एकवीरा गुहेत मंदिराची स्थापना केली. पांडवांच्या भक्तीने प्रसन्न होऊन, देवीने त्यांना वरदान दिले की त्यांच्या अज्ञातवासात ते कोणालाही सापडणार नाहीत. 

अतिशय प्राचीन असलेलं हे मंदिर पूर्वी हेमाडपंथी होते. या अतिप्राचीन मंदिराचा जीर्णोद्धार देवी अहिल्याबाई होळकर यांनी केल्याचे सांगितले जाते. तर काही संदर्भ सांगतात, १८६६ मध्ये या मंदिराचा जीर्णोद्वार करण्यात आलाय. 

आणि कार्बन डेटिंगनुसार असंही आढळून येतं की, या मंदिराची बांधणी दोन कालखंडांमध्ये झाली आहे. इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकाच्या दरम्यान देखील बांधकाम पार पडलं आणि इ.स. ५ व्या शतकापासून ते १०व्या शतकापर्यंत देखील या मंदिराचं बांधकाम चाललं. इसवी सनाच्या पहिल्या शतकातील शिल्पकला आणि लेणी कलेचा उत्तम नमुना आहे. असंही म्हणतात की हे मंदिर येथील लेण्यांपेक्षाही खूप जुने आहे. 

याच देवीच्या परिसरात एक प्राचीन शमीचे झाड आहे. या झाडाखाली भारतातील शमी देवाचे एकमेव मंदिर आहे. येथे महालक्ष्मी, विठ्ठल-रुक्मिणी, शीतला माता, हनुमान, काळभैरव यांच्यासह परशुरामाचेही मंदिर आहे. 

एकविरा देवी ही जलदेवता म्हणुन प्रसिध्द आहे. 

जलदेवता म्हणजे ज्या लोकांचा पाण्याशी जास्त संबध येतो. कोळी, आगरी या लोकांचा व्यावसाय हा पूर्णपणे पाण्याशी संबधीत आहे. त्यामूळेच या समाजाने आई एकविरेला कुलदैवत मानलं आहे. आई एकवीरा क्षत्रीय, वैश्य, शुद्र समाजाची कुलदैवता असल्या कारणाने ती अति प्राचीन देवता असावी असा इतिहास संशोधकांचे मत आहे.

आई एकविरा मातेची कहाणी स्कंद्पुराण, महाभारत, गणेश पुराण, काली पुराण यांमधुन सांगितली गेली आहे. प्रत्येक ठिकाणी आपल्याला वेगवेगळे संदर्भ मिळतात. आणि म्हणूनच इतिहासकारांसाठी हे मंदिर एक गुढ मानले जाते. पण देवीच्या भाविकांसाठी मात्र ती संकटात तारुन येणारी, नवसाला पावणारी एकविरा आई आहे.

हे हि वाच भिडू :

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.