राष्ट्रीय खाद्यतेल मिशनमुळे खाद्यतेलाचे दर कमी होणार का?

पेट्रोलच्या किंमती दिवसेंदिवस गगनाला भिडतायत. इतक्या पटापट तेलाचे भाव वाढतायत की, लोकांना वाटायला लागलंय की आता गाड्या विकाव्यात. आता या तेलांच्या किंमतीवर पेपरात रकानेच्या रकाने भरून लिहिलं जातंय. पण गोडेतेलाचं, पामतेलाच म्हणजेच खाद्यतेलाच काय?

अहो त्याचे पण भाव गगनाला भिडले. मागच्या २ महिन्यांपासून खाद्यतेलांच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्या. त्यामुळे सर्वसामान्यांच महिन्याचं बजेट कोलमडलं. वाढत्या खाद्यतेलांच्या किंमतींवरून सरकारला टीकेचा सामना करावा लागला. त्यामुळे आता खाद्यतेलांच्या किंमती नियंत्रणात आणण्यासाठी आपल्या पंतप्रधानांनी मोठी घोषणा केलीय.

देशात राष्ट्रीय खाद्यतेल मिशनची घोषणा करण्यात आलीय. या मिशनमध्ये देशांतर्गत पाम तेलाचं उत्पादन वाढवण्यात येणार आहे. या मिशनसाठी पंतप्रधानांनी ११ हजार कोटी रुपयांच पॅकेज जाहीर केलंय.

या मिशन अंतर्गत काय काय होणार ?

या मिशनसंबंधी बोलताना मोदी म्हंटले,

आज, जेव्हा भारत एक प्रमुख कृषी निर्यात करणारा देश म्हणून ओळखला जात आहे, त्यावेळी आपल्या खाद्यतेलाच्या गरजांसाठी आपण आयातीवर अवलंबून राहणे योग्य नाही. आपल्याला ही परिस्थिती बदलावी लागेल. खाद्यतेल विकत घेण्यासाठी आपण जे हजारो कोटी परदेशात इतरांना देतो ते आपल्या देशातील शेतकऱ्यांना दिले पाहिजेत.

मग कसे देणार हे पैसे ?

भारतात तेलबियांचं उत्पादन कमी प्रमाणत घेण्यात येतं. शेतकऱ्यांनी अशा प्रकारची तेलबियांची पिके घ्यावी म्हणून, या प्रकारच्या पिकांना चालना देणं, उत्पादन वाढवणं आणि पर्यायाने शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न या मिशन अंतर्गत करण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या वतीने कृषी मंत्रालयाला या योजनेचा ड्राफ्ट बनविण्याचे निर्देश देण्यात आले होते. ज्यामुळे येत्या ५ वर्षात खाद्य तेलांच्या बाबतीत भारत स्वयंपूर्ण होऊ शकेल.

फेब्रुवारी २०२० मध्ये राज्यसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना वाणिज्य मंत्री पियुष गोयल म्हणाले होते की,

NMEO (National Mission on Edible Oil-Oil Palm) प्रस्तावाचे लक्ष्य २०२४-२५ पर्यंत आयात निर्भरता ६०% वरून ४५% पर्यंत कमी करणे आहे. देशांतर्गत खाद्यतेलाचे उत्पादन १०.५ दशलक्ष टनांवरून १८ दशलक्ष पर्यंत वाढवणे आहे. यात ७० % वाढीचे लक्ष्य आहे. तेलबियांच्या उत्पादनात५५% वाढ, ४७.८ दशलक्ष टनांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. मिशनच्या अंतिम आवृत्तीअंतर्गत हे लक्ष्य बदलले आहेत की नाही हे स्पष्ट नाही.

पण निश्चितच यामुळे खाद्यतेलांची आयात करण्याची गरज पडणार नाही. वरील आकड्यांना अनुसरूनच  राष्ट्रीय खाद्यतेल मिशनची आखणी करण्यात आली आहे.

या मिशन अंतर्गत,

देशात पामतेलाचं उत्पादन वाढवण्यासाठी शेतकऱ्यांना सर्व सुविधा पुरवल्या जातील. चांगल्या दर्जाची बियाणं, अद्ययावत तंत्रज्ञान शेतकऱ्यांना दिले जाईल. या मिशन अंतर्गत ईशान्येकडील राज्यांमध्ये पामतेलाची शेतीला सुरुवात करण्यात आली आहे.  याआधीही तृणधान्यांच्या उत्पादनात आत्मनिर्भर होण्यासाठी प्रयत्न करण्यात आलेत.

मोठ्या प्रमाणात आयात केलं जातं पाम तेल

भारतात पाम आणि सोयाबिन तेल सर्वात जास्त आयात केलं जातं. आयात केल्या जाणाऱ्या तेलामध्ये पाम तेलाचं प्रमाण ४० तर सोयाबिन तेलाचं प्रमाण ३३ टक्के आहे. कारण वापरच तितका आहे.

इंडियन एक्सप्रेसच्या अहवालानुसार १९९३-९४ मध्ये दरडोई तेलाचा सरासरी वापर ग्रामीण भागात ३७० ग्रॅम आणि शहरी भागात ४८० ग्रॅम होता. म्हणजे एक माणूस सरासरी इतके तेल खायचा. २०११-१२ मध्ये ही आकडेवारी ग्रामीण भागासाठी ६७० ग्रॅम व शहरी भागासाठी ८५० ग्रॅम पर्यंत वाढली आहे. म्हणजे जवळजवळ दुप्पट.

यानंतरचा दरडोई डेटा उपलब्ध नाही, परंतु एकूणच उपभोगाच्या आकडेवारीवरून असे दिसून येते की तेलाची मागणी वर्षावर्षाला हळूहळू वाढते. मागणीचा आलेख हळूहळू वर जात आहे. म्हणजे, यावर्षीच लोकांनी जास्त तेल खाण्यास सुरुवात केली आहे आणि यामुळे किंमती वाढत आहेत अशी गोष्ट नाही.

तर पुरवठाच्या बाजूने किंमती वाढत आहेत. देशात वापरल्या जाणाऱ्या तेलाचे आपल्याकडे उत्पादन होत नाही. बाहेरून आयात करावे लागतं. २०१९-२० मध्ये आपले एकूण तेल उत्पादन १  कोटी १० लाख टन होते. आणि मागणी २ कोटी ४० लाख टन होती.

म्हणजेच देशातल्या उत्पादनानंतर सुमारे १३ दशलक्ष टन तेल कमी पडत होते. आयातीमुळे ही कमतरता दूर होते. परदेशातून निम्म्याहून अधिक तेल आपल्याला मिळवावं लागतं. आणि आपण आयात केलेल्या तेलापैकी ८६ टक्के तेल सोयाबीन आणि पाम तेल आहे. पाम तेल इंडोनेशिया किंवा मलेशियामधून आयात करावं लागत.

पाम तेलाच्या उत्पादनात इंडोनेशिया जगात पहिल्या क्रमांकावर आहे तर त्याखालोखाल मलेशियाचा नंबर लागतो. काही आफ्रिकन देशांमध्येही पाम तेलाचं उत्पादन घेतलं जातं. भारत या देशांकडून पाम तेलाची आयात करतं.

ज्यांनी आजच पामतेलाचं नाव ऐकलं असेल त्यांनी समजून घ्या नक्की पाम तेल काय आहे ? 

पाम तेल एक प्रकारच्या वनस्पतीच तेल असत. ताडाच्या झाडाच्या बियांपासून पाम तेल काढलं जातं. या तेलाला कसल्याही प्रकारचा वास नसतो. गरिबांच्या घरचं तेल म्हणून पण पाम तेलाची ओळख आहे. जगभरात मोठ्या प्रमाणावर या तेलाचा वापर होतो.

भजीच्या टपरीपासून ते हॉटेल, रेस्टॉरंटपर्यंत सगळीकडेच पाम तेल मोठ्या प्रमणात वापरलं जातं. तुम्ही जो अंगाचा साबण वापरताना त्यासाठी या पाम तेलाचा वापर होतो. पाम तेलात सॅच्युरेटेड फॅट्सचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे चॉकलेट बनवण्यातही पामतेलाचा वापर केला जातो.

त्यामुळे आम्ही काय गरीब नाही, आम्ही पाम तेल खात नाही त्यांनी शांत बसावं. वर वाचलंय ना कशाकशासाठी हे तेल वापरतात ते. सगळ्यांच्या गरजेची गोष्ट आहे ते  पामतेल. त्यामुळे हे खाद्यतेल मिशन भारतासाठी खूप गरजेचं आहे.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.