राहुल बजाज यांचं आयुष्यही ‘हमारा बजाज अलग अंदाज’ म्हणण्यासारखंच होतं

‘हमारा बजाज’ हे कायमच लक्षात राहण्याजोगं आहे….इतकंच नाही तर उदारीकरणापूर्वीच्या भारतात, ‘हमारा बजाज’ ही धून एकेकाळी मध्यमवर्गीय भारतीय कुटुंबांच्या महत्त्वाकांक्षेचे प्रतीक होती…आणि त्यामागे होते अत्यंत उच्च दर्जाचे निर्भीड उद्योगपती राहुल बजाज.

थोडक्यात सांगायचे तर राहुल बजाज यांनी परमिट राजच्या काळात दुचाकी आणि तीन चाकी वाहनांचा ब्रँड स्थापन करून आपले कसब दाखवले होते….

पण त्यांनी बजाज चा एवढा मोठा डोलारा कसा उभा केला ते बघूया….

१० जून १९३८ रोजी कोलकाता येथील मारवाडी कुटुंबात जन्मलेले राहुल बजाज यांचे वडील कमलनयन बजाज हे व्यापारी होते. बजाज यांनी दिल्लीतील स्टीफन कॉलेजमधून पदवी आणि हार्वर्ड बिझनेस स्कूल, यूएसएमधून एमबीए केले. बजाज ग्रुपमधील राहुल बजाज यांची कारकीर्द १९६५ मध्ये सुरू झाली.

राहुल बजाज यांनी वयाच्या अवघ्या २७व्या वर्षी बजाज उद्योगाची सूत्रे हाती घेतली होती.

त्यांच्या कार्यक्षम नेतृत्वामुळेच बजाज समूहाची ओळख देशातील आघाडीची स्कूटर विक्रेता म्हणून झाली. त्यांनी कंपनीची उलाढाल ७.२ कोटींवरून १२ हजार कोटींवर आणली. ७० च्या दशकात भारतात बजाजच्या व्हेस्पा ब्रँडच्या स्कूटरची मागणी इतकी वाढली होती की लोकांना त्यासाठी १५ ते २० वर्षे वाट पाहावी लागली. बजाजचे बुकिंग नंबर विकून अनेकांनी लाखोंची कमाई केली होती.

तुम्हाला हे वाचून नवल वाटेल कि, त्यांनी पहिली स्कूटर गॅरेजमध्ये बनवली होती.

स्वातंत्र्यानंतर पुढच्याच वर्षी, कंपनीने आयात केलेल्या भागांनी असेंबल्ड दुचाकी आणि तीनचाकी वाहने बाजारात आणली. पहिली बजाज स्कूटर गुडगावमधील गॅरेज शेडमध्ये बनवण्यात आली होती. यानंतर बच्छराज ट्रेडिंग कॉर्पोरेशनने कुर्ला येथे उत्पादन कारखाना उभारला, जो नंतर आकुर्डी येथे हलविण्यात आला. येथे बजाज कुटुंबाने फिरोदियाझसोबत भागीदारी करून दुचाकी आणि तीनचाकी वाहने तयार करण्यासाठी स्वतंत्र संयंत्रे उभारली. १९६० मध्ये कंपनीचे नाव बदलून बजाज ऑटो असे करण्यात आले.

एका टीव्ही चॅनलच्या मुलाखतीत राहुल बजाज यांनी सांगितले होते की, त्यांनी त्यांच्या आयुष्यात जे यश मिळवले त्याचे सर्व श्रेय त्यांची पत्नी रूपा बजाज यांना जाते. 

१९६१ मध्ये मराठी ब्राह्मण कुटुंबातील रुपा घोलप यांच्याशी त्यांचे लग्न झाले तेव्हा त्या काळातील सर्व राजस्थानी मारवाडी उद्योग घराण्यात झालेला हा पहिलं ‘लव्ह मॅरेज’ होतं. अशा परिस्थितीत दोन्ही कुटुंबांमध्ये ज्येष्ठांचे मत बनवणे थोडे कठीण होते.पण शेवटी सगळे मान्य झाले आणि राहुल बजाज यांचे लग्न देखील पार पडले.

२००५ मध्ये त्यांनी हळूहळू कंपनीची जबाबदारी त्यांचा मुलगा राजीव बजाज यांच्याकडे सोपवण्यास सुरुवात केली. राजीव बजाज ऑटोचे व्यवस्थापकीय संचालक बनले आणि कंपनीला जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनवले. तथापि, २००९ मध्ये राजीवने स्कूटरमधून मोटारसायकल निर्मितीकडे वळले आणि बजाज ऑटोमध्ये स्विच केल्यानंतर राहुल बजाज यांनी आपली निराशा जाहीरपणे व्यक्त केली होती.

इतकंच नाही तर बजाज घराण्याचे स्वातंत्र्यलढ्यात देखील योगदान आहे…

जमनालाल बजाज. राहुल बजाज यांचे आजोबा. बजाज समूहाचे संस्थापक. महात्मा गांधींनी त्यांना आपला पाचवा पुत्र म्हणत असत. स्वातंत्र्याआधीच्या या काळात त्यांचं संपूर्ण घराणं महात्मा गांधींच्या सहवासात वाढलेलं. जमनालाल यांचा जन्म एका गरीब मारवाडी घरात झाला. आजचे राजस्थान आणि नंतर जयपूर संस्थानातील सीकर.

चौथीपर्यंतच शिक्षण घेतले. इंग्रजी येत नव्हते. एका श्रीमंत कुटुंबाने त्यांना लहानपणीच दत्तक घेतले. नवीन कुटुंब पैशावर विश्वास ठेवणारे होते. जमनालाल या विचारांच्या पलीकडचे होते. एकदा भांडण झाले आणि ते घर सोडून निघून गेले. त्यानंतर घरच्यांनी मनधरणी करत त्यांना परत बोलावले. पण संपत्तीच्या मागे ते कधी धावले नाहीत.

१९१५ मध्ये गांधीजी भारतात परतले. जमनालाल यांच्यावर गांधीजींचा खूप प्रभाव होता. गांधीजींनी साबरमतीत आश्रम बांधला तेव्हा जमनालालही तिथे होते. गांधीजींचे कार्य जवळून पाहिले आणि मग काय त्यांनी देखील आपले आयुष्य स्वातंत्र्यासाठी समर्पित केले.

जमनालाल बजाज यांच्या मदतीनेच १९२१ मध्ये वर्धा आश्रमाची स्थापना झाली, यां आश्रमाने स्वातंत्र्यलढ्यात काँग्रेसला खूप काही दिले. 

तसेच बजाज यांनी स्वतः या लढ्यात भाग घेतला. त्यांनी अनेकवेळा तुरुंगवास देखील भोगला. पुढे, स्वातंत्र्यानंतर बजाज मंडळींनी व्यापार सोडून उद्योगात शिरकाव केला आणि आर्यन हिंदुस्तान शुगर, बजाज इलेक्ट्रॉनिक्स बजाज ऑटो कंपन्या काढल्या आणि यशस्वीपणे वाढवल्या.

राहुल बजाज यांच्या जीवनावर आजोबांचा प्रभाव होता. प्रसिद्ध मासिक फोर्ब्सला मुलाखत देताना ते म्हटले होते कि ,

 ‘मी संत नाही. पण मला या गोष्टीचा अभिमान आहे की मी पैसे कामावण्यासाठी कोणत्याही चुकीच्या मार्गाचा वापर केला नाही.

त्यामुळेचं बजाज घराणं जरी व्यापारात आणि उद्योगात होते, पैशावाले होते पण त्यांची राहणी साधी होती. म्हणजे पार भपकेबाज राहणं, कपड्यांचा आणि श्रीमंतीचा शौक करणं त्यांना कधीच पटलं नाही.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.