ठाकरे असो की शिंदे दोन्ही गटांना माहीमवर वर्चस्व दाखवून द्यायचंय, ते या कारणांमुळे…

राज्यातला गणेशोत्सव वेगवेगळ्या कारणांनी गाजला. मुख्यमंत्र्यांचे दौरे, हटवलेले निर्बंध, लांबत गेलेल्या मिरवणूका आणि बरंच काही. या दहा दिवसांच्या उत्सवात राजकीय मोर्चेबांधणीही बरीच झाली, मात्र नेत्यांच्या गाठीभेटींपेक्षाही एक मुद्दा गाजला तो शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्याचा.

मुंबईच्या प्रभादेवीमध्ये विसर्जन मिरवणुकीदरम्यान दोन्ही गटांमधले कार्यकर्ते आमने सामने आले, त्यांच्यात बाचाबाचीही झाली. पोलिसांनी मध्यस्थी केली आणि प्रकरण थंडावलं. मात्र शनिवारी रात्री हा वाद विकोपाला गेला आणि पोलिस चौकीपर्यंत गेला. 

या सगळ्या राड्यात पोलिसांनी शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांना अटक केली, ज्या विरोधात खासदार अरविंद सावंत, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी परिवहन मंत्री अनिल परब या बड्या शिवसेना नेत्यांनी पोलिस स्टेशनमध्ये ठिय्या मांडला. अरविंद सावंत यांनी या घटनेमुळं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली.

 त्यानंतर शिंदे गटाचे प्रवक्ते किरण पावसकर यांनी उद्धव ठाकरे गटातल्या नेते आणि कार्यकर्त्यांवर टीका केली. थोडक्यात दोन्ही बाजूंचे नेते एकमेकांवर टीकास्त्र सोडत आहेत.

त्यातच या राड्यात सहभागी असलेल्या शिवसेना कार्यकर्त्यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंची भेट घेतली. यावेळी उद्धव ठाकरेंनी त्यांचं कौतुक केल्याच्या बातम्याही येत आहेत.

शिवसेनेत फूट पडल्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी दोन गटांमध्ये राडे झाले. पुण्यात आपल्या गाडीवर हल्ला झाल्याची तक्रार उदय सामंत यांनी केली होती, तेव्हाही वातावरण तापलं होतं. मात्र प्रभादेवी-दादरमध्ये झालेल्या राड्यामुळं संघर्षांची ठिणगी पडण्याची आणि दोन्हीबाजूचे बडे नेते यात सहभाग घेण्याची शक्यता नोंदवली जात आहे.

यामागचं कारण आहे, हा राडा जिथं झाला त्या माहीम मतदारसंघाचं राजकारण

दोन गटांमधल्या कार्यकर्त्यांच्या भांडणाला इतकं महत्त्व मिळालंय, कारण हा राडा झालाय दादरमध्ये, जो भाग येतो माहीम मतदारसंघात. हा माहीम मतदारसंघ शिंदे गट आणि ठाकरे गटासाठी का महत्त्वाचा आहे ? याचा इतिहास नेमकं काय सांगतो ?

या मतदारसंघाचा इतिहास

शिवसेनेच्या जडणघडणीत दादरचा महत्त्वाचा वाटा राहिला आहे. शिवसेनेचा जन्मच मुळात दादरच्या शिवाजी पार्कवर झाला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी शिवाजी पार्कवरुनच शिवसेनेच्या स्थापनेचा नारळ फोडला होता. त्यानंतर दादर हा शिवसेनेसाठी बालेकिल्ला बनत गेला. याच दादरमध्ये शिवाजी पार्क आहे, शिवसेना भवन आहे आणि बाळासाहेब ठाकरेंचं स्मृतिस्थळही.

१९९० च्या विधानसभा निवडणुकांनंतर शिवसेनेला मोठा बूस्टर मिळाला. याच निवडणुकीत शिवसेनेनं माहीम आणि तत्कालीन दादर हे दोन्ही मतदारसंघ जिंकले. तेव्हा दादरमधून मनोहर जोशी यांनी विजय मिळवला, तर माहीममधून सुरेश गंभीर यांनी विजय मिळवला होता. हे दोन्ही मतदारसंघ शिवसेनेचे बालेकिल्ले ठरले. यात शिवसेनेनं आमदार, नगरसेवक अशी सत्तेतली पदं तर मिळवलीच, पण ज्या कॅडर बेससाठी शिवसेना ओळखली जाते, त्या कार्यकर्त्यांच्या शाखाही याच परिसरात मोठ्या प्रमाणावर उभ्या राहिल्या.

मोठ्या प्रमाणावर गिरणी कामगार असणाऱ्या या भागात शिवसेनेनं कम्युनिस्ट पक्षांचं वर्चस्व भेदत आपली ताकद वाढवली.

२००८ मध्ये मतदारसंघांची पुनर्रचना झाली आणि दादर मतदारसंघाचा मोठा भाग माहीम मतदारसंघात विलीन झाला. त्यानंतर राजकीय समीकरणं बदलली, पण शिवसेनेसाठी माहीम मतदारसंघाचं महत्त्व कायम राहिलं. त्यामुळं ठाकरे गटाला शिवसेनेच्या जन्मभूमीत आपली ताकद राखायची आहे, तर शिंदे गटाला आपला शिवसेनेवरचा क्लेम माहीम जिंकत आणखी पक्का करायचा आहे.

मराठीबहुल भाग

माहीम मतदारसंघात येणारा दादर, प्रभादेवी हा भाग मराठीबहुल भाग म्हणून ओळखला जातो. अगदी गिरण्यांची चलती होती, त्या काळापासून आजपर्यंत इथं मोठ्या प्रमाणावर मराठी लोकं आहेत. मतांच्या टक्केवारीतून विचार करायचा झाला, तर मराठी मतदारांसोबत गुजराती, मुस्लिम आणि दाक्षिणात्य मतदारही इथं आहेत. पण मोठा टक्का आहे, तो मराठी मतदारांचाच.

याच मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचाही जन्म झाला, राज ठाकरे यांचं निवासस्थानही याच भागात आहे. त्यामुळं मनसेही इथं जोरदार ताकद आलंय. शिंदे गट, ठाकरे गट आणि मनसे या तिघांचाही मुख्य मतदार हा मराठी आहे.

साहजिकच मराठी माणूस कुठल्या पक्षाला मानतो हे ठरवणारी लिटमस टेस्ट माहीम मतदारसंघातूनच पाहायला मिळू शकते. 

यासाठीच शिवसेनेचे दोन्ही गट इथल्या राड्यामधून सहजासहजी माघार घेणार नाहीत, असं बोललं जातंय.

शिवसेना भवनाच्या दारातली लढाई

माहीम मतदार संघातच शिवसेना भवन येतं. याच भागात शिंदे गट प्रतिशिवसेना भवन उभारणार याची चर्चाही मध्यंतरी झाली होती. तेव्हाही सदा सरवणकर यांचंच नाव चर्चेत आलं होतं. याच मतदारसंघातल्या शिवाजी पार्कवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दसरा मेळावा घ्यावा, अशी मागणी त्यांच्या समर्थक आमदारांनी केली आहे. त्यामुळं शिंदे गट शिवसेनेच्या वर्चस्वाला हादरा देण्यासाठी माहीमलाच लक्ष्य करणार हे स्पष्ट आहे.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकांवेळी जेव्हा आदित्य ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरतील अशी चर्चा सुरु होती, तेव्हा माहीम मतदारसंघाचाच पर्याय पहिल्यांदा पुढे आला होता. कारण अर्थातच शिवसेना भवनाच्या दारात ‘ठाकरेंना’ पराभूत करणं विरोधकांना काहीसं कठीण गेलं असतं.

आता मात्र परिस्थिती काहीशी बदलली आहे. शिवसेना भवनातल्या दारातली लढाई जिंकणं उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोघांसाठीही प्रतिष्ठेचं आहे. दादरमधल्या काही विभागप्रमुख आणि शाखाप्रमुखांनी एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर आपल्या पदाचे राजीनामे दिले होते.

मात्र सदा सरवणकर हे उद्धव ठाकरेंसोबतच राहतील असं बोललं जात होतं. मात्र सरवणकरही गुवाहाटीला गेले आणि शिवसेनेला ही अंगणातली लढाई जिंकणं कठीण झाल्याचे संकेत मिळाले.

जेव्हा शिवसेनेनं माहीम गमावलं तेव्हा…

२००९ च्या निवडणुकीत शिवसेनेला माहीम गमवावं लागलं होतं. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या पहिल्याच निवडणुकीत जोरदार फॉर्मात होती. राज ठाकरेंचा करिष्मा चांगलाच दिसून येत होता. त्यांच्या रुपानं पुनर्रचना झालेल्या माहीममध्ये शिवसेनेला जोरदार आव्हान होतं. त्यात शिवसेनेनं आदेश बांदेकर यांना उमेदवारी दिली आणि सदा सरवणकर नाराज झाले. त्यांनी ही निवडणूक काँग्रेसकडून लढवली.

मराठी मतं आपल्याकडे वळवण्यात मनसेला यश आलं आणि नितीन सरदेसाई यांनी विजय मिळवला. सदा सरवणकर ८ हजार मतांच्या फरकानं दुसऱ्या क्रमांकावर राहिले, तर युती असूनही आदेश बांदेकरांना तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं.

१९९० नंतर पहिल्यांदाच शिवसेनेला माहीम-दादर या भागात विधानसभेला पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनीही माहीममध्ये झालेल्या पराभवाची खंत आपल्या जिव्हारी लागल्याचं बोलून दाखवलं होतं. 

त्यानंतर २०१४ मध्ये सरवणकर यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला आणि माहीममधून विजय मिळवला. पण यावेळी त्यांचं लीड होतं फक्त ६ हजार.

२०१९ मध्ये मनसेच्या संदीप देशपांडे यांचा पराभव करत सरवणकर पुन्हा एकदा आमदार झाले, मात्र त्यावेळी शिवसेना आणि भाजपनं एकत्र निवडणूक लढवल्या होत्या. सध्याची स्थिती पाहिली, तर भाजप आणि सेने सोबत नाहीत, मनसे आणि भाजपची युती होईल अशी चर्चाही सुरू आहेच, स्थानिक आमदार आणि मतदार संघावर वर्चस्व असणारे सदा सरवणकर शिंदे गटात आहेत, त्यामुळं या सगळ्यात उद्धव ठाकरेंना आपल्या बालेकिल्ल्यात अस्तित्व टिकवण्याचं आव्हान पेलायचं आहे.                  

त्यामुळं आता वर्चस्वाच्या लढाईत दोन्ही गट मागे सरकणार नाही, असेच संकेत या राड्यात उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या सक्रिय सहभागातून मिळतायत असं म्हणलं, तरी चुकीचं ठरणार नाही.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.