पुण्याचा ‘आद्य अमृततुल्य’ चहा फेमस होण्यामागे ‘शम्मी आणि महम्मद रफी’ कनेक्शन आहे

पहिलं असतंय ते व्हरिजिनल असतंय, नी नंतर येणाऱ्या सगळ्या कॉप्या. मग तो लताचा आवाज असो स्मिताचा अभिनय असो, मारुतीची गदा असो, मधुबालाची अदा असो, माधुरीचं नृत्य असो किंवा पुण्याचा ‘आद्य अमृततुल्य’ चहा असो.

व्हरिजिनल ते व्हरिजिनलच असतंय. आणि नव्वदच्या दशकात हा व्हरिजिनल चहा प्यायला शम्मीपासून महम्मद रफीपर्यंत बॉलीवुडमधली बरीच व्हरिजिनल मंडळी यायची.

देशभरात चहाचे लय ब्रॅंडस आले आणि येत राहतील. एवढंच काय देशभरात चहाचे, ‘अमृततुल्य’ या नावाचेही लय ब्रॅंडस आले आणि येत राहतील पण पुण्याच्या ‘आद्य अमृततुल्य’ चहाला तोंड नाय, असं आम्ही नाय, बॉलीवुड आणि राजकारणातली कैक दिग्गज मंडळी म्हणून गेलीत.

पुण्याच्या लक्ष्मी रोडवर दिमाखात उभ्या असलेल्या आद्य अमृततुल्य चहाला मोठा इतिहास लाभलाय. सर्वसामान्यांपासून असामान्यांपर्यंत सगळेच जण ह्या चहाचे चाहते होते आणि आजही आहेत.

१९५७ साली एक किस्सा घडलेला. पुण्यात, तेव्हाच्या अल्पना टॉकीजमध्ये आपल्या लिजेंड शम्मी कपूरचा ‘तुमसा नही देखा’ नावाच्या सिनेमाचा प्रीमियर होता.

प्रीमियरच्या निमित्ताने शम्मी कपूर पुण्यात असताना असंच एकदा फेर फटका मारायला बाहेर पडले होते. तेव्हा त्यांना एका दुकानाबाहेर घोळका जमलेला दिसला. एरवी सेलिब्रिटी लाईफ जगणाऱ्या शम्मी कपूरना, तो घोळका एका साध्याशा ‘दुकानाबाहेर’ का जमला असावा असा प्रश्न पडला. त्यांनी जवळ जाऊन पाहिलं तर लोकं दुकानाबाहेर घोळका करून चहा पित होती.

इथल्या चहात काहीतरी खास असणार असं वाटून त्यांनीही चहा घेतला, प्यायला आणि अजून एक चहा मागवला. आता चहा दुसऱ्यांदा मागून घेतला म्हणल्यावर त्यांना तो आवडलाच असणार हे काय वेगळं सांगायला नको.

आणि फक्त शम्मी कपूरच नाही तर बॉलीवुड गाजवणारी अशी अनेक दिग्गज लोकं त्याकाळी हा चहा मागून मागून प्यायची.

लता मंगेशकर म्हणू नका, महंम्मद रफी म्हणू नका, आशा भोसले, जॉनी लिव्हर, दादा कोंडके, हे दिग्गज तर झालेच… शिवाय, पंडित जवाहरलाल नेहरू, शरद पवार, बाळासाहेब ठाकरे, अशी गाजलेली आणि नावाजलेली राजकीय नावं सुद्धा ह्या चहाचं नाव आवर्जून काढायची.

आता फिल्म इंडस्ट्रीतल्या कलाकारांचं इथं वरचेवर येणं होण्याला पण एक महत्वाचं कारण होतं.

हे चहाचं दुकान जिथे होतं तिथेच समोर एक रेकॉर्डिंग स्टुडिओ होता. ह्या स्टुडिओचं नाव होतं मेलेडी मेकर्स. ह्या स्टुडिओला सेलिब्रिटी लोकांच्या लई फेऱ्या असायच्या. आणि मग आपसूकच चहाच्या दुकानातही त्यांच्या फेऱ्या व्हायच्या.

शम्मी कपूर सारखे सेलिब्रिटी लोकं ह्या दुकानात जाऊन चवीचवीने चहा पितायत म्हणल्यावर सामान्यांची सुद्धा ह्या चहाविषयी क्रेझ अजूनच वाढत गेली. आणि पुण्याचा पहिला अमृततुल्य चहा फेमस आणि ऐतिहासिक ठरत गेला.

आता ‘आद्य अमृततुल्य’ हा चहा सुरु होण्यापूर्वीचा किस्सा लय भारी आहे बघा.

२७ जुलै १९२४ साली आशाडी एकादशीच्या मंगलमय सणाच्या दिवशी हा बिझनेस सुरू करण्यात आला. हा बिझनेस सुरू केला पन्नालाल नरतेकर यांनी. पण तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, ते म्हणजे पन्नालाल नरतेकरांचं कुटुंब मुळचं पुण्याचं नव्हतंच. आणि मुळात त्यांचा बिझनेस सुद्धा आधी चहाचा नव्हताच.

पन्नालाल नरतेकरांचं कुटुंब रहात होतं महाराष्ट्रापासून पार ९५० किलोमीटर दूर अंतरावर असणाऱ्या राजस्थानमधल्या, जालोर जिल्ह्यातल्या नारता ह्या गावी. पन्नालाल नरतेकर, चार मूलं आणि आपल्या बायको सोबत १८८० साली पुण्यात आले.

इथे आल्यावर त्यांनी पहिले थंडाईचा बिझनेस सुरू केला. त्यांनी रामेश्वर चौकात १८९६ साली त्यांचं पहिलं दुकान सुरू केलं. तिथं त्यांनी थंडाई सोबतच चहा सुद्धा विकायलाही सुरवात केली होती.

पण नंतर ब्रिटिश सरकारने १९२४ साली गांजावर बंदी आणली आणि म्हणूनच पन्नालाल यांनी थंडाई विकायचं बंद करून चहा विकण्यावर सगळा फोकस ठेवला. सोन्या मारुती चौकात, ३०० रुपयांत ३०० स्क्वेअर फुटची जागा घेतली आणि तिथे आपलं दुकान सुरू केलं.

आद्य म्हणजे पहिलं आणि अमृततुल्य म्हणजे अमृताच्या तोंडीचं असं म्हणत पन्नालाल यांनी पहिला अमृततुल्य चहा पुणेकरांना पाजला.

आताच्या घडीला पन्नालाल नरतेकर यांचे नातू चंद्रशेखर नरतेकर हा डोलारा सांभाळतायत. आद्य अमृततुल्यमध्ये आपल्याला ब्लॅक, साधा, फक्कड अशी चहाची व्हरायटी मिळते. शिवाय इथे कॉफी, स्पेशल कॉफी, ब्लॅक कॉफी आणि इतर नाश्ता आयटम्सही मिळतात.

अमृततुल्य हे नाव इतकं गाजलं की पुढे इतरांनी ‘अमृततुल्य’ या नावाचेच अनेक चहाचे ब्रॅंडस काढले. पण याविषयी चंद्रशेखर यांना विचारलं तर ते म्हणतात की, “आमची कोणाशीच स्पर्धा नाही. उलट चहा म्हणजे अमृततुल्य हा असा जर समानार्थी शब्द लोकांना आमच्यामुळे मिळाला असेल तर आम्हाला त्या गोष्टीचा आनंद आणि अभिमानच आहे.”

आद्य अमृततुल्य आता लवकरच शंभरी गाठणारे, आणि शंभर वर्षांमध्ये जगात अनेक उलाढाली झाल्या असल्या तरी त्यांच्या चहाची चव काय अजूनही बदललेली नाय आणि आम्हाला खात्री आहे की ती चव अजून पुढची शंभर वर्ष बदलणार पण नाय.

त्यामुळे शम्मी, रफी, आशा, लता सोबतच, पुणेकरांना आणि पुण्याबाहेरच्या अनेकांना वर्षानूवर्ष ‘अमृततुल्य’ चहा पाजून ह्या अमृततुल्यवाल्यांनी लय पुण्य कमावलं असणारे, फिक्स.

हे ही वाच भिडू: 

 

Leave A Reply

Your email address will not be published.