चहावाल्याने केलेला अपमान जिव्हारी लागला आणि रमेश देवांची बॉलिवूडमध्ये एंट्री झाली….

मराठीमध्ये चार्मर हिरो नव्हता तेव्हाचा हा काळ होता. हिरोईक फेस आणि दणकेबाज गाणी, नात्यागोत्याच्या रडक्या गोष्टी आणि दोन चार फायटींग सीन असा सगळा सीन होता. एका बाजूला दादा कोंडके कोणालाही न जुमानता धडाधड सिनेमे आणत होते आणि दणक्यात बॉक्स ऑफिसवर पैसे कमवत होते.

थोडेफार अपवाद असू शकतात पण रोमँटिक वैगरे असा प्रकार मराठीत येत नव्हता. पण एक गाणं आलं आणि मराठीमध्ये रोमँटिक गाणी, सीन यांची लाटच आली. ते गाणं होतं…

सुर तेची छेडीता ,

गीत उमटले नवे….

पियानोवर एकदम थ्री पीस मध्ये बसलेले रमेश देव अभिनय करत होते. हे गाणं आजही मराठीमधलं एव्हरग्रीन गाणं मानलं जातं. आजही तरुण पिढीच्या सोशल मीडिया स्टोरीला हे गाणं बॅकग्राउंडला वाजताना दिसतं हेच या गाण्याचं यश.

पण या गाण्यातले रमेश देव प्रत्येकाच्या हृद्यात कोरले गेले ते कायमचेच.

एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे रमेश देव हे काय फक्त मराठी अभिनेते म्हणून प्रसिद्ध नव्हते, तर ते बॉलिवूडचेही चार्मर हिरो होते. एका बाजूला जितेंद्र, राजेश खन्ना ही मंडळी होती तर दुसऱ्या बाजूला रमेश देवांसारखा मराठमोळा नट बॉलिवूडमध्ये धमाल उडवून देत होता. पण रमेश देवांची बॉलिवूडमध्ये इनिंग कशी सुरु झाली याची एक भयानक मजेदार गोष्ट आहे.

साल होतं १९५९ आणि रमेश देव यांचा सिनेमात काम मिळवण्यासाठीचा स्ट्रगल सुरू होता. सिनेमात काम करून हिरो बनण्याचं त्यांचं स्वप्न होतं. साता जन्माचे सोबती हा रमेश देव यांचा पदार्पणातला सिनेमा पण तो त्यांना कसा मिळाला याचाही एक किस्सा आहे.

साता जन्माचे सोबती या सिनेमात आधी वेगळा हिरो होता पण त्या हिरोचं आणि प्रोड्युसरचं काहीतरी वाजलं आणि हिरोने हा सिनेमा सोडला. मग हिरोसाठी शोधाशोध सुरू झाली. रमेश देव यांना निर्माते म्हणाले तुम्हीच हिरो म्हणून हा सिनेमा करा पण ही विचित्र ऑफर ऐकून रमेश देवांनी कल्टी मारली. 

या सिनेमाच्या सिनेमॅटॉग्राफरने रमेश देवांना गाठलं. बराच वेळ ते रमेश देवांना समजावून सांगत होते की,

 हाच चान्स आहे हिरो बनायचा. इतके दिवस स्ट्रगल केला हाती काहीही लागलं नाही आता स्वतःहून संधी चालून आली आहे तर मागे हटू नको.

शेवटी रमेश देव तयार झाले आणि त्यांनी त्यांच्या करिअरचा पहिला सिनेमा केला तो म्हणजे साता जन्माचे सोबती.

एका बाजूला रमेश देव प्रसिद्ध होत होते, पण एक जबर धक्का त्यांना बसला. मराठीमध्ये सिनेमे करत असताना एका शूटसाठी रमेश देव चालले होते. अचानक चहाची तलफ लागल्याने एका टपरीवर त्यांनी गाडी थांबवली आणि चहाची ऑर्डर दिली. 

तेव्हा त्या टपरीवाल्याने उष्ट्या कपांमध्ये चहा दिला. ते बघून रमेश देव यांच्यासोबतचा एक सहकारी त्या चहावाल्याला ओरडू लागला आणि म्हणाला

 “ए हे काय करतोय, हे मोठे हिरो आहेत रमेश देव. तुला माहिती नाही का ?”

तेव्हा तो चहावाला शांतपणे म्हणाला,

“कारमधून उतरणारे सगळेच हिरो नसतात, हिरो असे नसतात हिरो तर असे असतात”

असं म्हणत त्याने त्याच्या दुकानातल्या पोस्टरकडे हात केला त्यावर दिलीप कुमार आणि राज कपूरचा फोटो होता.

हा अपमान रमेश देवांच्या जिव्हारी लागला आणि यातूनच त्यांनी ठरवलं की, फक्त मराठीमध्येच काम करत बसायचं नाही तर हिंदीमध्येसुद्धा आपण जायला हवं.आपल्याला आपल्याच इथले लोक ओळखत नाहीत. त्यामुळे आपण मोठं काम करायला हवं हा विचार मनात घर करुन गेला.

राजश्री प्रॉडक्शननं रमेश देवांना संधी दिली आरती या सिनेमात शशिकला यांच्या पतीचा रोल देऊन. इथून खऱ्या अर्थाने मोठी प्रसिध्दी रमेश देवांना मिळत गेली. लोकं भारतभर ओळखू लागले. 

आपल्या एकूण करियरमध्ये रमेश देवांनी 300 पेक्षा जास्त हिंदी सिनेमांमध्ये काम केलं तर 250 पेक्षा जास्त मराठी सिनेमात काम केलं. गुजराती आणि राजस्थानी सिनेमातसुद्धा रमेश देव झळकले. सिरीयल आणि रंगभूमीवरही त्यांचा दबदबा होता.

रमेश देव फक्त सुर तेची छेडीता पुरते मर्यादित कधीच नव्हते तर त्याहून बरचं काही ते होते. आजही बॉलिवूडमध्ये रमेश देव दिग्गज मानले जातात.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.