महिला म्हणून जन्म, पुरूष होता होता प्रेग्नेंट झाली. भारतातला पहिला प्रेग्नेंट ट्रांसमन….

जन्मत: आपलं लिंग कोणतं असावं हे आपण ठरवू शकत नाही. निसर्ग आपल्याला स्त्री, पुरूष किंवा तृतीयपंथी म्हणून जन्म देतो. पण वैद्यकीय प्रक्रियेतून आपण आपलं लिंग बदलून घेऊ शकतो. कायद्याने आपल्याला तसा अधिकारही दिलाय. भारतात लिंग बदलणाऱ्यांचं प्रमाण कमी असलं तरी ते प्रमाण आहे.

हे सगळं आता लिहायचं कारण हे की एखादा ट्रान्समन प्रेग्नंट असल्याची घटना भारतात पहिल्यांदाच घडलीये.

हे घडलंय केरळातल्या कोझिकोड या भागात. एका ट्रांंसकपलने या संदर्भातली माहिती सोशल मीडियावरून दिलीये. सोबतच आपले फोटोज सुद्धा शेअर केलेत. यानंतर सोशल मीडियावर लोकांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत प्रेम दाखवलंय.

बरं हे सगळं वाचताना थोडं कन्फ्युझिंग वाटत असेल.

अगदी सरळपणे सांगायचं झालं तर, या दोघांची नावं जिया आणि जहाद अशी आहेत. यांच्यातली जिया हा जन्माने पुरूष होता, पण स्वेच्छेने त्याने शस्त्रक्रिया करून घेत आपलं लिंग बदलून घेतलं आणि महिला झाली. जहाद ही जन्माने महिला होती मग स्वेच्छेने शस्त्रक्रिया करून घेत पुरूष झाली.

यात विषय असा येतो की महिला झालेली जिया नाही तर, पुरूष झालेला जहाद प्रेग्नेंट झालाय.

हे असं कसं होऊ शकतं? हा प्रश्न पडला असेल तर, जहाद याची महिलेपासून पुरूष होण्याची प्रक्रिया सुरू होती. अगदी शरीरातले स्तन काढण्यात आले होते, पण गर्भाशय आणि आणखी काही अवयव हे काढले नव्हते. त्यावेळी या जोडप्याला आपण ‘आई’ व्हायला पाहिजे अशी इच्छा झाली.

त्यामुळे मग जहादने त्याची ट्रांझिशन प्रक्रिया थांबवली आणि आई होण्याचा निर्णय घेतला.

आता, तुम्हाला प्रश्न पडला असेल, ‘बाळ जन्माला तर येईल पण मग बाळाचं स्तनपान कसं होणार?’

हा प्रश्न पडण सुद्धा अगदीच सहाजिक आहे कारण, जहादचे दोन्ही स्तन काढून टाकण्यात आलेत त्यामुळे त्याच्याकडून स्तनपान होणं शक्य नाही आणि जिया काही स्वत: आई होत नाहीये त्यामुळे तिच्याकडूनही स्तनपान शक्य नाही. पण कसंय, आजच्या जगात काहीच अशक्य नाहीये… अशा परिस्थितींसाठीच विज्ञानाने एक उपाय दिलाय. तो म्हणजे,

‘ब्रेस्ट मिल्क बँक’

मेडिकल कॉलेजमध्ये मिळणाऱ्या ब्रेस्ट मिल्क बँकेतून या बाळाला दूध देण्याचा या जोडप्याचा प्रयत्न असणार आहे.

आता आणखी एक प्रश्न येतो, हे बाळ आई कुणाला म्हणणार आणि बाबा कुणाला?

जिया ही एक महिला आहे आणि जहाद हा पुरूष पण, जहादच्याच गर्भातून हे बाळ जन्माला येणार आहे. त्यामुळे कोण आई कोण बाबा हा प्रश्न पडतो, पण या जोडप्यानं ते कन्फ्युजनसुद्धा दूर केलंय. जियानं एक इंस्टाग्राम पोस्ट लिहीलीये ज्यात तिने स्वत:चा उल्लेख आई आणि जहादचा उल्लेख वडील असा केलाय. तिने त्या पोस्टमध्ये लिहीलंय,

“माझं आई बनण्याचं व वडील बनण्याचं माझ्या पार्टनरचं स्वप्न आम्ही साकार करणार आहोत. ८ महिन्यांचा गर्भ आता जहादच्या पोटात आहे. मी जन्माने किंवा आपल्या शरीराने केव्हाच एक महिला नव्हते. पण आपल्याला कुणीतरी आई म्हणावं असं माझं स्वप्न होतं. आम्ही एकत्र येऊन ३ वर्षे झालेत. माझ्या आई बनण्यासह जहादचं वडील बनण्याचं स्वप्न आहे. आज ८ महिन्यांचा जीव त्याच्या मर्जीने त्याच्या पोटात वाढत आहे”

मग आता बाळाला जन्म दिल्यावर जहादचं काय होणार? म्हणजे तो असाच राहणार की, पुरूष होण्याची प्रक्रिया पूर्ण करणार?

माध्यमांमध्ये असलेल्या माहितीनुसार तरी बाळाला जन्म दिल्यानंतर जहाद पुरूष होण्याची त्याची उर्वरित प्रक्रिया पुन्हा सुरू करेल. त्यामुळे, जिया आणि जहाद या दोघांचंही आई-वडील होण्याचं स्वप्नही पूर्ण होईल आणि सोबतच आपलं लिंग बदलण्याची इच्छाही अपुरी राहणार नाही.

असं हे सगळं प्रकरण.

स्थानिक माध्यमांमध्ये असलेल्या वृत्तानुसार या जोडप्यानं आधी बाळाला दत्तक घ्यायचा निर्णय घेतला होता. त्यासाठी लागणाऱ्या कायदेशीर बाबीही तपासल्या होत्या आणि त्यानुसार त्यांनी प्लानिंगसुद्धा सुरू केलं होतं. पण एक ट्रान्सकपल असल्यामुळे त्यांना असं करण्यात अडचणी येत होत्या आणि म्हणून त्यांनी मुलाला जन्म देण्याचाच निर्णय घेतला.

सोशल मीडियावर या बाळाच्या जन्मापुर्वी लोक त्याला आशीर्वाद देतायत आणि या जोडप्याला शुभेच्छा देतायत. तसंच बाळ जन्मल्यावर प्रत्यक्षातही बाळाला आणि जोडप्याला प्रेम मिळावं अशीच जिया आणि जहाद पावल यांची मनोमन इच्छा असणार हे नक्की.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.