सगळं जग जिच्या नावाने नर्स डे साजरा करतं त्या फ्लोरेंसचे भारतावर देखील अनंत उपकार आहेत..

तुम्ही फ्लोरेंस नाईटिंगेल  ‘द लेडी विथ लॅम्प” ही स्टोरी माहितीये कां?

युद्धामध्ये जखमी झालेल्या सैनिकी रुग्णांसाठी ही फ्लोरेंस नावाची एक नर्सच नव्हे तर एक देवदूत होती!  आज आम्ही तुम्हाला या देवदूतासारख्या नर्सच्या माहिती नसलेल्या गोष्टी सांगत आहोत. 

फ्लॉरेन्समुळे ब्रिटनमधील इस्पितळांचा आणि नर्सिंग प्रोफेशनचे रंगरुपच बदलले होते.  फ्लॉरेन्सचा जन्म इटलीच्या फ्लोरेन्स शहरात झाला, त्यामुळे तिचे नावही फ्लोरेन्स ठेवण्यात आले होते. 

ती ब्रिटनमधील एका उच्चवर्गीय कुटुंबातील होती. फ्लोरेंस नाइटिंगेल हिचे बालपण ब्रिटनमधील पार्थेनोप भागात वडिलांच्या सामंतत्वाच्या जहागीरीत घालवले गेले.

शास्त्रीय शिक्षणाबरोबरच त्यांना तत्त्वज्ञान आणि आधुनिक भाषा शिकविल्या गेल्या. फ्लॉरेन्स नाइटिंगेल आणि तिच्या बहिणींना याचे घरीच प्रशिक्षण देण्यात यायचे. लहानपणापासूनच फ्लॉरेन्सला सर्वच क्षेत्रातील माहिती घेण्यासाठी  धडपडत असायची. अभ्यासातली किंवा इतरही अगदी लहान लहान गोष्टी लक्षात ठेवण्याची तिच्यात एक अनोखी प्रतिभा होती.  कसल्याही प्रकारच्या नोंदी, यादी लक्षात ठेवण्यात ती माहिर होती.

फ्लॉरेन्सची बहीण पार्थेनोपे सांगते की,

तिला गणितामध्ये खूपच रस आहे.  गणिताचे धडे आणि सूत्र लक्षात ठेवण्यासाठी ती रात्रंदिवस कष्ट करायची. एकोणिसाव्या शतकाच्या परंपरेनुसार, 1837 मध्ये नाईटिंगेल कुटुंबीयांनी आपल्या मुलींना युरोपच्या प्रवासाला नेले होते. 

त्या वेळी पाल्याच्या प्रशिक्षणासाठी हे फार महत्वाचे मानले जात असे.  फ्लॉरेन्सने या प्रवासाचा अनुभव तिच्या डायरीत खूप मनोरंजक पद्धतीने नोंदविला आहे.

शहरात किती रुग्णालये आहेत, धर्मादाय आणि कल्याणकारी संस्था किती आहेत इत्यादी आकडे प्रत्येक देश आणि तसेच शहरातील लोकसंख्येची आकडेवारी ती प्रवासादरम्यान आपल्या डायरीत नोंदवत असे.

फ्लॉरेन्सची आई तिच्या गणिती शिकवणीच्या विरोधात असली तरी तिला गणिताचा अभ्यास घेण्यासाठी शिकवणीदेखील लावण्यात आली होती. प्रवासाच्या शेवटी, फ्लॉरेन्सने आपल्या कुटुंबियांना सांगितले की, देवाने तिला मानवतेची सेवा करण्याचा आदेश दिला आहे, हे ऐकून तिचे आईवडील अस्वस्थ झाले.

फ्लॉरेन्स नाइटिंगेलने तिच्या पालकांना सांगितले, “देवाने मला एक आवाज दिला की तू माझी सेवा करावी. पण त्या दैवी आवाजाने हे नाही सांगितले कि,नेमकी सेवा काय करायची आहे.”

फ्लॉरेन्स नाईटिंगेल दिसायला खूप सुंदर होतीच परंतु सुशिक्षित, आणि हुशार होती. तिच्या आई-वडिलांकडे खूप संपत्ती होती.  अशा परिस्थितीत तिला चांगली-चांगली स्थळ यायला लागली. पण अशा कोणत्याही स्थळांमध्ये फ्लॉरेन्सला रस नव्हता. मुळात सेवाभावी असलेल्या फ्लॉरेन्सने 1844 मध्ये, नर्सिंगच्या व्यवसायात जाण्याचा निर्णय घेतला.  त्या पेशावर राहून लोकांची सेवा करावी अशी तिची इच्छा होती.

नर्सिंगचे ट्रेनिंग 

फ्लॉरेन्स ठरले होते कि, तिला सॅलिसबरी येथे जावून नर्सिंगचे प्रशिक्षण घ्यायचे आहे. पण  आईवडील परवानगी देत नव्हते.  पण ती सतत तिच्या पालकांना समजवण्याचा प्रयत्न करत राहिली. फ्लोरेंस चे एका तरुणाबरोबर प्रेम प्रकरण होते, परंतू तिने लग्न करण्यास नकार दिला आणि माझ्या नशिबात दुसरेच काही लिहिले गेले आहे म्हणून तिने 1849 मध्ये पालकांच्या इच्छेविरूद्ध लंडन, रोम आणि पॅरिसमधील रुग्णालयात दौरे करत होती.

शेवटी 1850 मध्ये, तिच्या आईवडिलांना उमजले कि, आपली मुलगी काय आता लग्न करणार नाही, म्हणून त्यांनी फ्लॉरेन्सला जर्मनीमध्ये नर्सिंगचे प्रशिक्षण घेण्यास परवानगी दिली.

फ्लॉरेन्स ट्रेनिंग ला गेली आणि त्याचा जबरदस्त धक्का तिच्या बहिणीला पार्थेनोपला बसला, आणि 1852 च्या दरम्यान बहिणीला नर्वस ब्रेकडाऊन झाल्यामुळे, नाईलाजाने फ्लोरेन्सला तिचे प्रशिक्षण सोडून आपल्या बहिणीची सेवा करण्यासाठी 1852 मध्ये इंग्लंडला परत जावे लागले.

1853 मध्ये फ्लॉरेन्सला लंडनमधील हार्ले स्ट्रीट हॉस्पिटलमध्ये नर्सिंगचे हेड बनण्याची संधी मिळाली.  अखेरीस, तिचे सेवेचे स्वप्न पूर्णत्वास येत होते. 1853 मध्ये क्रिमियाचे युद्ध सुरू झाले.  वर्तमानपत्रात येणाऱ्या बातम्या, ब्रिटीश सैन्यांच्या, रुग्णालयांच्या दुर्दशाच्या कहाण्या सांगण्यास सुरूवात झाली.

सैनिकांचा मृत्यूचा आकडा वाढतच होता – 

ब्रिटनचे युद्ध मंत्री सिडनी हर्बर्ट फ्लॉरेन्सला चांगले ओळखत होते.  हर्बर्टने फ्लॉरेन्सला 38 परिचारिकांसह तुर्कीच्या स्कुतरी येथील सैनिकी रुग्णालयात जाण्यास सांगितले. आणि अशाप्रकारे

ब्रिटनच्या इतिहासात प्रथमच महिलांना सैन्यात दाखल करण्यात आले.

जेंव्हा ती तुर्कीच्या बराक इस्पितळात आली तेव्हा फ्लोरेन्सच्या लक्षात आले की रुग्णालय अत्यंत वाईट अवस्थेत आहे.  सर्व मजल्यावरील विष्ठेचा जाड थर पसरला होता. हे दुर्दशा पाहून फ्लॉरेन्सने तत्काळ तिच्या सहकारी परिचारिका घेतल्या आणि कामाला लागली. प्रथम सर्वांना रुग्णालय स्वच्छ करण्यास सांगितले गेले. 

यानंतर, फ्लॉरेन्सने सर्व सैनिकांना योग्य आहार आणि स्वच्छ कपडे घालण्याची व्यवस्था केली.  पहिल्यांदाच सैनिकांना अशी सन्मानाची आणि खास वागणूक मिळत होती.

तथापि, फ्लोरेन्स आणि तिच्या टीमने सर्व प्रयत्न करूनही सैनिकांच्या मृत्यूची संख्या वाढतच होती. त्यादरम्यानच्या हिवाळ्यात चार हजार सैनिक मारले गेले. फ्लॉरेन्सने हॉस्पिटल खूप चांगले केले असले तरी.  तरी तेथील तो मृत्यू थांबेचनात!

1855 च्या वसंत ऋतुमध्ये, ब्रिटीशसरकारने स्कुतारीच्या रुग्णालयाच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी स्वच्छता विषयक कमिशन पाठविले. या आयोगाच्या निदर्शनास आले की, बराक रुग्णालय एका गटारांवर बांधले गेले आहे. 

याचा परिणाम असा झाला की रुग्ण, हॉस्पिटलमध्ये येणारे घाणेरडे पाणी पित आहेत. 

बराक हॉस्पिटल आणि ब्रिटनमधील इतर रुग्णालये पूर्णपणे स्वच्छ करण्यात आली आणि मोकळी, शुद्ध हवा कशी येईल याची व्यवस्था केली गेली. याचा परिणाम लागलीच दिसायला लागला आणि सर्वात मोठा फायदा म्हणजे सैनिकांच्या मृत्यूची संख्या बरीच कमी झाली.

याचवेळी, फ्लोरेंस नाईटिंगेलचा रात्रीच्या वेळी टॉर्चच्या सहाय्याने जखमी रूग्णांची सेवा करतानाचा एक फोटो वर्तमानपत्रात छापला गेला, आणि त्यानंतर तिचे एका रात्रीतून हजारो चाहते बनले. स्कुतारीच्या बराक हॉस्पिटलमध्ये फ्लॉरेन्स च्या कामामुळे रुग्णालयांमधील सैनिकांची परिस्थिती खूप सुधारली होती.

तिचे वर्तमानपत्रात आणि लोकांमध्ये खूप कौतुक होऊ लागले.  लोकं तिच्यावर कविता लिहून फ्लॉरेन्सच्या कुटुंबियांना पाठवत असत. अक्षरशः त्या पत्रांचा पूर तिच्याघरी यायचा.

‘द लेडी विथ लॅम्प’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या फ्लॉरेन्स नाईटिंगेलचे फोटो शाळेच्या बॅग, चटई आणि इतर वस्तूंवर छापले जात होते. 

 

होणाऱ्या प्रसिद्धीमुळे मात्र स्वत: फ्लॉरेन्स खूप चिंतेत होती, तिला सेलिब्रिटी बनण्याची मुळीच इच्छा नव्हती. क्रीमिया युद्धानंतर जेव्हा ती ब्रिटनला परतली तेव्हा ती मिस स्मिथच्या बनावट नावावर राहू लागली.

घरी परतल्यानंतर, ती ब्रिटनची राणी व्हिक्टोरिया यांना भेटण्यास गेली, राणी व्हिक्टोरिया देखील फ्लॉरेन्सची मोठी चाहती होती. फ्लोरन्सने राणीला सैनिकांच्या वाईट स्थिती व मृत्यू आणि कारणाविषयी माहिती दिली. सैन्याच्या आरोग्याच्या तपासणीसाठी चौकशी समिती तयार करण्याची विनंती त्यांनी महाराणी ला केली.

फ्लोरेंसच्या सांगण्यावरून राणीने विल्यम फार आणि जॉन सदरलँडला तिच्या मदतीसाठी पाठवले. या तिघांनी केलेल्या तपासणीत धक्कादायक माहिती समोर आली कि, युद्धात मारल्या गेलेल्या 18 हजार सैनिकांपैकी 16 हजार सैनिकांचा मृत्यू युद्धाच्या जखमांमुळे झाला नाही तर घाण व संसर्गजन्य आजारांमुळे झाला.

याचा अर्थ असा आहे की जर रुग्णालयात स्वच्छताविषयक चांगल्या सुविधा असतील तर या सर्व सैनिकांचे प्राण वाचू शकले असते. 1857 मध्ये रॉयल सॅनिटरी कमिशनचा अहवाल तयार झाला तेव्हा फ्लॉरेन्सला कल्पना होती की, फक्त आकडेवारी दाखवली तर लोकांना ह्या परिस्थितीचे गांभीर्य समजणार नाही.  म्हणून फ्लोरेन्सने ‘रोज डायग्राम’ च्या माध्यमातून लोकांना समजावून सांगितले की जेव्हा सेनेटरी कमिशन अर्थात स्वच्छता आयोगाने काम करण्यास सुरवात केली, तेव्हा सैनिकांच्या मृत्यूची संख्या वेगाने कशी कमी झाली.

हा प्रयोग इतका यशस्वी झाला की, लवकरच सर्वच वृत्तपत्रांनी ते प्रकाशित केला आणि फ्लोरेन्सचा संदेश दूर दूर पसरविला.

फ्लोरेन्सच्या प्रयत्नाने, ब्रिटिश सैन्यात वैद्यकीय, सेनेटरी सायन्स म्हणजेच किंवा स्वच्छता विज्ञान आणि सांख्यिकी विभाग तयार केले गेले. 1859 मध्ये फ्लॉरेन्स नाईटिंगेलने तिचे सर्वात प्रसिद्ध पुस्तक ‘नोट्स ऑन नर्सिंग अँड नोट्स ऑन हॉस्पिटल्स’ प्रकाशित केले.

पुढच्याच वर्षी ब्रिटनमध्ये फ्लॉरेन्स नावाने एक नर्सिंग स्कूल स्थापन झाले. पुढच्या काही दशकात फ्लॉरेन्सच्या कामामुळे नर्सिंग पेशाकडे बर्‍याच सन्मानाने पाहिले गेले.  रुग्णालयात स्वच्छतेवर जोर देण्यात येऊ लागला. रूग्णांना खुल्या व मोठ्या जागेवर ठेवण्यात येऊ लागले जेणेकरून त्यांचे आरोग्य लवकर सुधारेल.

परंतु अशातच फ्लॉरेन्स रूग्णांच्या देखरेखीसाठी झटत असताना, तिचीही तब्येत हळूहळू ढासळू लागली. असे म्हणले जाते की,  फ्लोरेन्सला ब्रुसेलोसिसच्या जंतूची लागण झालेली, क्रिमियातील तो एक गंभीर आजार होता. या जंतूमुळे जास्त ताप, औदासिन्य आणि तीव्र वेदना होत असायच्या.  फ्लॉरेन्स या आजारामुळे वरचेवर कमकुवत होऊ लागली. परंतु आजारपणातही तिच्या सहकाऱ्यांच्या मदतीने, ब्रिटनच्या आरोग्यसेवेच्या सुधारणांसाठी लढा सुरूच ठेवला.

1870 च्या दशकापर्यंत, फ्लॉरेन्सच्या मोहिमेने जोर धरला आणि त्यातच तिचं आजारही वाढत गेला. परंतु ती खूप श्रीमंत असल्यामुळे तिने, आपली वैयक्तिक काळजी घेता यावी, आजार कमी व्हावा म्हणून हवा तेवढा खर्च करत होती. परंतु ब्रिटनमधील बहुतेक सामान्य लोकांना हा खर्च करणे अशक्य आहे हे तीला माहित होते.  असे लोक अशावेळेस केवळ एकमेकांना मदत करू शकत होते.

अशा परिस्थितीत फ्लॉरेन्सच्या ‘नोट्स ऑन नर्सिंग’ या पुस्तकात लोकांना आजारपणात एकमेकांना कशी मदत करता येईल हे सांगितले होते. ते आजारी लोकांची काळजी कशी घेऊ शकतात?  आपण आपल्या कुटुंबातील सदस्यांना, नातेवाईकांना आणि मित्रांना या आजारापासून बरे होण्यास कसं मदत करू शकतात, फ्लॉरेन्स समाजाची सेवा करण्याच्या उद्देशानेच याचे लिखाण करत होती. जेणेकरुन ही माहिती वाचून एखादी व्यक्ती मग ती जनता श्रीमंत किंवा गरीब असो पण ती लवकरच या आजारापासून मुक्त होऊ शकेल आशा सूचना त्यात तिने लिहिल्या होत्या.

भारतासाठी स्वच्छ पाणीपुरवठा

फ्लोरन्सच्या मोहिमेचा परिणाम असा झाला की, ब्रिटनने ‘नेशनल हेल्थ सर्विस’ ची दिशा बदलली.  फ्लॉरेन्स नाइटिंगेल हे देखील ब्रिटिश सैनिकांचे आरोग्य सुधारण्याच्या उद्देशाशी संबंधित होते. यासाठी ती तिच्या तुर्की बराक हॉस्पिटलचा अनुभव अंमलात आणत होती.  सन 1880 च्या दशकापर्यंत विज्ञानाने आणखी प्रगती केली.

सर्व डॉक्टरांप्रमाणेच फ्लॉरेन्सने जंतूपासून रोगाचा प्रसार होण्यावर विश्वास ठेवण्यास सुरवात केली. यानंतर, फ्लॉरेन्सचे लक्ष हे भारतातील शुद्ध पाण्याचा पुरवठा वाढविण्यावर होते.  त्यावेळी ती डेटाही गोळा करत होती. आणि यावेळी फ्लॉरेन्सने दुष्काळग्रस्तांना मदत करण्यासाठी मोहीम सुरू केली.

जास्तीत जास्त लोकांना वाचविणे आणि त्यांना स्वच्छ वातावरण आणि पाणी पुरवणे हे फ्लॉरेन्सचे लक्ष्य होते. 

फ्लॉरेन्सला असे वाटले की, तुर्कीच्या स्कुतारीमध्ये तिने पाहिलेल्या दुष्काळ परिस्थितीसारखीच भारतात देखील तीच परिस्थिती होती. 1906 पर्यंत भारत देशाबद्दलचे अहवाल फ्लॉरेन्सला पाठविले जात होते.

अशातच सेवेच्या दीर्घ कारकिर्दीनंतर 1910 मध्ये फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांचे वयाच्या 90 व्या वर्षी निधन झाले.

यापूर्वी ब्रिटन सरकारणे फ्लॉरेन्सला ‘ऑर्डर ऑफ मेरिट’ दिले होते.  हा सन्मान मिळविणारी फ्लोरेंस नाईटिंगेल ही पहिली महिला होती.

फ्लॉरेन्स नाइटिंगेल एक ठाम धोरणं असणारी स्त्री होती.  तिच्या सेवाभाव गुणामुळे ती जगातील सर्व स्त्रियांसाठी एक आदर्श उदाहरण बनली. फ्लोरन्सचा लोकांशी संवाद साधण्याचा आणि त्यांची समजूत काढण्याचा मार्ग पूर्णपणे वेगळा होता.  फ्लोरेन्सचा ‘रोज डायग्राम’ हे त्याचे उत्तम उदाहरण आहे.

तिचे गणित आणि आकडेवारीचे तिचे अफाट ज्ञान सैनिकी रुग्णालये आणि सामान्य लोकांच्या आरोग्य सेवा प्रणाली सुधारण्यासाठी खूप प्रभावशाली सिद्ध झाले.

अतिशय हुशारीने तिने तिच्या लोकप्रियतेचा फायदा घेऊन सरकारला लोकांच्या हितासाठी पावले उचलण्यास भाग पाडले. आज आरोग्य सेवा प्रणालीत स्वच्छतेवर जो भर दिला गेला जातोय तो फक्त ‘द लेडी ऑफ लॅम्प’च्या प्रयत्नांमुळे शक्य झाला आहे.

भारत देश देखील फ्लोरेंसने भारताला दिलेल्या योगदानामुळे नेहमीच कर्जदार राहणार आहे !

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.