त्या काळात राजाराम कॉलेजमध्ये दोन हिरो होते. एक विश्वास नांगरे पाटील अन् दूसरा आर. माधवन.

राजाराम कॉलेज. राज्यातल्या वेगवेगळ्या भागातून कोल्हापूरच्या मातीत शिकायला येणारी मुलमुली याच कॉलेजमध्ये प्रवेश घेतात. गरिबापासून ते उच्चश्रीमंतापर्यंत सगळ्या पद्धतीचे मूल इथ असतात. कोण फक्त उनाडक्या करण्यासाठी येतो तर कोण आपली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी येतो. असाच विश्वास पण आला होता.

विश्वास नांगरेपाटील राहणार कोकरूड जिल्हा सांगली. छोट्याशा खेड्यातला बारावीत ग्रुपला चांगले ९१% मिळालेला एक मुलगा. बरोबरची सगळी मुलं इंजिनिअरिंगला प्रवेश घेत असताना तो अधिकारी बनायचं हे स्वप्न उराशी घेऊन राजाराममध्ये आला. होस्टेलला अॅडमिशन झालं.

तिथ गेल्यावर कळाल रूममेट एक तमिळ मुलगा आहे. नाव माधवन बालाजी रंगनाथन उर्फ आर.माधवन.

सुरवातीला दोघांच फार्स जमल नाही. नीटनेटका स्वभाव असणाऱ्या विश्वासला अस्ताव्यस्त कपडे टाकणारा, पसाऱ्याच्या ढिगाऱ्यात राहणारा माधवन फारसा आवडला नाही. माधवनच इंग्रजी सुद्धा फायफंडू होतं. त्याच्याशी बोलताना ग्रामीण भागातल्या मुलांना विनाकारण टेन्शन यायचं.

माधवनचे वडील टाटा स्टीलमध्ये नोकरीला होते म्हणून तो वाढला झारखंड बिहार मध्ये. इंजिनियरिंगला प्रवेश घ्यायचा होता पण एन्ट्रस पास झाला नाही म्हणून वडिलांनी त्याला बीएस्सी इलेक्ट्रोनिक्सला प्रवेश घेण्यासाठी पुण्याचा फेमस फर्ग्युसन कोलेजला आणलं. पण कॉलेजमध्ये घुसतानाच स्कर्टवाल्या पोरींकडे लक्ष गेलं. तिथून सरळ त्याला उचललं आणि कोल्हापुरला राजाराम कॉलेजला घातलं.

अखंड बडबड करणारा माधवन थोड्याच काळात विश्वासचा चांगला मित्र झाला. दोघेही सगळीकडे एकत्रच फिरायचे. मेसला जेवायला जाताना एका सायकलवर डबलसीट दोघांची स्वारी निघायची.

माधवन कॉलेजमध्ये असताना देखील बराच चळवळ्या होता. कायम उत्साहाने वाहात असायचा. त्याला मित्रदेखील खूप होते. त्यांच्यासोबत राहून राहून चांगल मराठी बोलायला शिकला होता. त्याचा फिमेल फॅन बेस मोठा होता. आत्मविश्वासपूर्ण व्यक्तिमत्व, फर्ड इंग्लिश यामुळे मुली त्याच्यावर जीव ओवाळून टाकायच्या. पण माधवन आपण भल आपल काम भल यात बिझी असायचा.

त्याचं वक्तृत्व आणि वादविवाद कौशल्य वादातीत होतं. विश्वाससारखे ग्रामीण भागातील मुलं यातच खूप मागे होते. माधवन होस्टेलच्या मुलाना एकत्र करून त्यांना इंग्रजीचे उच्चार शिकवायचा. थँक्यु म्हणताना क चा अतिसूक्ष्म उच्चार कसा आवश्यक आहे हे समजावून सांगायचा. कधी कधी कोणी त्याची गंमत करायच,

“अरे माध्या, तुझ्या घरावरून काय इंग्रजाच विमान गेलं होतं का रे?”

पण तो कधी कोणाला उलट उत्तर द्यायचा नाही. फक्त गोड हसायचा. पंजा लढवण्याच्या शर्यतीत कोणीही त्याच्यापुढे टिकायचं नाही. पण कधी कोणाशी भांडण करणे हा माधवनचा स्वभावच नव्हता म्हणूनच प्राध्यापकांच्या गळ्यातला तो ताईत बनला होता. माधवनने कॉलेजमध्ये जस्ट ए मिनिट नावाची स्पर्धा सुरु केली होती, प्रत्येकान अचानक दिलेल्या विषयावर न थांबता न अडखळता सलग एक मिनिट बोलायचं. पुढच्या आयुष्यात त्याला या स्पर्धेचा, कोल्हापुरातल्या अनुभवाचा खूप उपयोग होणार होता.

खेड्यातन आलेला विश्वासदेखील काही कमी नव्हता. या दोघा रूममेटमध्ये एक हेल्दी कॉम्पिटेशन असायची. विश्वासला मात्र स्पर्धापरीक्षेचा अभ्यास चालू ठेवून कॉलेजमधील एक्स्ट्रा करीक्युलर अॅक्टीव्हीटीमध्ये भाग घ्यायला बंधन यायची, माधवन एनसीसीच्या कँपच्या युथ एक्स्चेंजमधून जपानला जावून आला.   

पुढे कॉलेजच्या शेवटच्या वर्षात असताना कॉलेजचा आदर्श विद्यार्थी कोण यासाठी बेस्ट राजारामीयन अवॉर्ड दिला जातो. यासाठी माधवन आणि विश्वास या दोघांची नावे आघाडीवर होती. यावेळी मात्र विश्वासने बाजी मारली आणि ती मानाची ट्रॉफी जिंकली.

कोल्हापूरच्या मातीने या दोघाही मित्रांना घडवलं. पुढे आयुष्यात दोघांनीही आपापल क्षेत्र गाजवलं.

पुढे माधवन म्हणजे दाक्षिणात्य सिनेमाचा व हिंदी सिनेमाचा सुपरस्टार बनला. RHTDM आणि थ्री इडियटस सारखी कॉलेज विद्यार्थ्यांना जवळची असणारी भूमिका साकारली आणि विश्वास युपीएससी परीक्षा जिंकून पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील बनले. २६/११ पासून ते पुण्याचा रेव्ह पार्टीपर्यंत अनेक ठिकाणी ग्राउंडवर उतरून पराक्रम गाजवला.

आपल्या मन मै है विश्वास या आत्मचरित्रात नांगरे पाटील यांनी आपल्या आणि माधवनच्या मैत्रीचे बरेच किस्से सांगितले आहेत. ते म्हणतात,

“जर जपानच्या एनसीसी कँपमुळे माधवनचअभ्यासात दुर्लक्ष झालं नसत तर त्यावर्षीची बेस्ट राजारामीयनची ट्रॉफी माझी नाही तर त्याची असती.  “

हे ही वाच भिडू.

1 Comment
  1. Saurabh Himmatrao Patil says

    This knowledge is being The great Students so , I was Happy so , This Successfully Story , Biography ,????????????
    I also Being he…..

Leave A Reply

Your email address will not be published.