अस्सल राज्यपाल नियुक्त : ग. दि. माडगूळकर

कला, साहित्य, विज्ञान, क्रिडा, सहकार, समाजसेवा अशा क्षेत्रामधील लोकांना प्रतिनिधित्व मिळावं म्हणून विधानपरिषदेत राज्यपालांमार्फत १२ सदस्यांची नियुक्ती करण्यात येते. लहानपणापासून नागरिकशास्त्राच्या पुस्तकात आपण हेच वाचत आलेलो आहोत.

महाराष्ट्राची स्थापना १ मे १९६० साली झाली. महाराष्ट्रात द्विस्तरीय विधीमंडळ आहे. पैकी विधानपरिषदेत स्थानिक स्वराज्य संस्था, नागरी स्वराज्य संस्था, विधासभेतील आमदारांचे, पदवीधरांचे, शिक्षकांचे प्रतिनिधी निवडून जातात तर राज्यपालांकडून विविध क्षेत्रातील १२ सदस्यांची कलम १७१/ नुसार नियुक्ती होते.

हे सगळं झालं नागरिकशास्त्र, जे आपण विसरून टाकू आणि प्रॅक्टिकल मुद्यांवर येवू…

महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर दर सहा वर्षांनी जे १२ सदस्य निवडले जातात अशा व्यक्तींची आजतागायत एकूण संख्या होते १०६. आत्ता गंम्मत अशी की या १०६ पैकी १२-१३ व्यक्तीच वास्तविक त्या त्या क्षेत्राशी संबधित होत्या.

१०६ मधून निवडक १५-१६ वजा केले तर उर्वरीत ९० जण फक्त राजकीय पुनर्वसनासाठी आमदार झालेले.

असो तर अशाच १५-१६ जणांची माहिती घेण्यासाठी आपण ही सिरीज सुरू करतोय,

याच नाव आहे अस्सल राज्यपाल नियुक्त.

या सिरीजमधलं सातवे नाव आहे ते सुप्रसिद्ध कवी ग.दि. माडगूळकर यांच. 

गजानन दिगंबर माडगूळकर अर्थात गदिमा, अद्वितीय प्रतिभा व शब्द प्रभुत्वाच्या साहाय्याने ‘गीतरामायणा’सारखा दर्जेदार  काव्यसंग्रह महाराष्ट्राला पेश करणारे व आजही मराठी रसिकांच्या मनांत अढळ स्थान असलेले श्रेष्ठ कवी!

१ ऑक्टोबर १९१९ ला सांगली जिल्ह्यातील शेटफळ गावी गदिमांचा जन्म. पण जन्मताच मृत घोषित करण्यात आले होते. लहान मूल असल्यामुळे दफनासाठी खड्डाही खोदण्यात आला, तेवढ्यात शेवटचा प्रयत्न म्हणून शेगडीसाठी केलेला विस्तव तव्यावर घेतला आणि बाळाच्या बेंबीजवळ नेला न बाळाने टाहो फोडला. अगदी फिल्मी वाटावी असा जन्म.

माडगुळे या गावी बालपण अत्यंत गरीब व प्रतिकूल परिस्थितीमध्ये गेले. त्यांचे वडिल औंध संस्थानात कारकून होते. त्यामुळे चरितार्थ चालवण्यासाठी काही तरी करणे गरजेचे होते. त्यामुळे नापास झालेल्या गदिमांनी वयाच्या १६-१७ वर्षीं चित्रपटांच्या कथा – संवाद – गीतलेखनाचे काम केले.

सुरवातीला ‘ब्रम्हचारी’, ‘ब्रँडीची बाटली’ सारख्या काही चित्रपटात सहाय्यक नटाच्या भूमिका केल्या. १९४२ साली आलेल्या भक्त दामाजी, पहिला पाळणा या चित्रपटात त्यांना प्रथम गीतलेखनाची संधी मिळाली.

१९४७ साली आलेल्या लोकशाहीर रामजोशी चित्रपटापासून खर्‍या अर्थाने ‘कथा, पटकथा, संवाद, गीते यासाठी रसिक माडगूळकरांना ओळखू लागले. पुढे यामध्ये वंदे मातरम, पुढचे पाऊल, गुळाचा गणपती, लाखाची गोष्ट, पेडगावचे शहाणे, ऊनपाऊस, सुवासिनी, जगाच्या पाठीवर, प्रपंच, मुंबईचा जावई, देवबाप्पा सारख्या उत्तमोत्तम चित्रपटांचा समावेश होता. गदिमा-सुधीर फडके-राजा परांजपे या त्रयीने तर मराठी चित्रपटांचा सुवर्णकाळ निर्माण केला.

गोरी गोरी पान, एका तळ्यात होती बदके पिले सुरेख, मामाच्या गावाला जाऊया, नाच रे मोरा’ या सारख्या अनेक बालगीतांचा गदिमांच्या साहित्यात समावेश होतो. चित्रपट गीतांमध्ये एक धागा सुखाचा, जग हे बंदीशाळा, या चिमण्यांनो परत फिरा रे, बुगडी माझी सांडली ग, फड सांभाळ तुर्‍याला आला, इंद्रायणी काठी देवाची आळंदी, विठ्ठला तू वेडा कुंभार यासारखी हजारो गीते गदिमांनी लिहिली.

हिंदी चित्रपटसृष्टीतही २५ पटकथा लिहून तिथेही गदिमांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली. व्ही.शांताराम यांचा दो आंखे बारह हाथ, नवरंग, गूंज ऊठी शहनाई, तूफान और दिया हे चित्रपट गदिमांचेच होते.

गदिमांना महाकवी ही पदवी ज्याच्यामुळे प्राप्त झाली ते महाकाव्य म्हणजे गीतरामायण. ‘गीत रामायण’ हा एकाच कवीने  रचलेला, एकाच संगीतकाराने संगीतबद्ध केलेला, वर्षभर अखंडितपणे चाललेला आकाशवाणीच्या इतिहासातील एकमेव, अभूतपूर्व असा संगीत कार्यक्रम ठरला.  १ एप्रिल १९५५ ते १९ एप्रिल १९५६ पर्यंत तो पुणे आकाशवाणीने तो प्रसारित केला.

स्वातंत्र्य चळवळीतील गदिमा…

गदिमा यांचे नाव जेवढे साहित्यिक म्हणून अस्सल होते, तेवढेच स्वातंत्र्याच्या चळवळीत देखील अग्रभागी होते. याच काळात १९४२च्या आंदोलनकाळात भूमिगत असताना त्यांचा स्नेह यशवंतराव चव्हाणांनी जुळला.

कुंडल येथील आंदोलकांच्या गुप्त बैठकांमध्ये शाहीर शंकरराव निकम यांनी काही कविता आणि कवने सादर केली ज्यांची यशवंतरावांना भुरळ पडली. शाहिरांकडे विचारणा केली असता, गदिमांचे नाव पुढे आले. उभयतांची प्रत्यक्ष भेट मात्र १९५० साली मुंबईत एका मित्राच्या घरी झाली. “या भेटीत मला माझा एक जिवलग दोस्त मिळाला,” असे यशवंतराव सांगतात.

पुढे यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री असताना १९६२मध्ये राज्यपाल कोट्यातून विधानपरिषदेवर आमदार नियुक्त करण्यासाठी नावांचा विचार होऊ लागला. अशावेळी जी माणसे निवडणूक लढवू शकत नाहीत; पण समाजाला काही चांगले देणं देऊ शकतात, अशी माणसे विधान परिषदेत हवीत, असा यशवंतरावांचा आग्रह असायचा. त्यातूनच त्यांनी गदिमांची आमदार म्हणून नियुक्ती करण्याची शिफारस केली आणि ती मंजूर देखील झाली. 

सभागृहातील गदिमा….

गदिमांनी स्वातंत्र चळवळीत भाग घेतला होता. त्यामुळे त्यांची नाळ त्या वेळच्या कॉंग्रेस पक्षाशी जोडलेली होती. तरीपण त्यांच्या मित्र-परिवाराच्या गोतावळ्यात सर्व जणांचा समावेश होता. यात यशवंतराव चव्हाणांपासून ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा समावेश होता.

त्यामुळे गदिमा जेव्हा विधान परिषदेत भाषण करणार असायचे,  तेव्हा ते ऐकण्यासाठी विधान सभेतील अनेक सर्वपक्षीय आमदार खास त्यांचे भाषण ऐकण्यासाठी विधान परिषदेत येऊन बसत असत.

यशवंतराव चव्हाण यांना संरक्षणमंत्री म्हणून निरोप देताना महाराष्ट्र विधानसभेत आणि परिषदेत जी भाषणे झाली, त्यातली दोन भाषणे सोडली तर बाकी सगळय़ा राजकारण्यांची भाषणे उपचार म्हणून होती; पण, विधान परिषदेत ग. दि. माडगुळकरांचे भाषण सगळय़ांच्या डोळय़ात पाणी आणून गेले. माडगुळकर म्हणाले होते,

‘जा, यशवंता सुखे नैव जा..
उभा देश आहे तुझा पाठीराखा
तुझी कीर्ती वाढो, जशी चंद्रलेखा..’

भाऊ पाध्येंच्या कादंबरीचा किस्सा चांगलाच गाजला होता.

भाऊ पाध्ये यांची एक कादंबरी १९६५ ला प्रकाशित झाली होती. त्यावेळी मुख्यमंत्री होते वसंतराव नाईक. तर संयुक्त महाराष्ट्र चळवळीत आघाडीवर असलेले प्र.के अत्रे विरोधी बाकावर होते. भाऊंच्या लेखनावर नेहमीप्रमाणे अश्लीलतेचा आरोप करत आचार्य अत्रे यांनी कादंबरीचा संदर्भ देत सरकारला घेरण्याचे ठरवले. “सरकारचे कुठं लक्ष नाही” असा सूर आळवत आरोप केले गेले.

तर विजय तेंडुलकर, दुर्गा भागवत असे अनेक दिग्गज भाऊंच्या बाजूनेही उतरले. पण मागे सरतील तर अत्रे कसले!

त्यांनी आपल्या ‘नवा मराठा’ पेपरमधून २४ एप्रिल १९६६ रोजी अग्रलेख लिहिला. भाऊ पाध्येंच्या वादात नेमाडे, उद्धव शेळके यांनाही यात ओढत अत्रेंनी अग्रलेखातून जोरदार टीका केली.  तसेच असे पुस्तक मराठीत प्रकाशितच होऊ शकत नाही अशी भूमिका अत्रेंनी घेतली.

पुस्तकात भाऊ पाध्येंनी सामान्य पोराची भाषा वापरली असल्यामुळे त्यात शिव्या होत्या. आचार्य अत्रेंनी त्यातल्या शिव्यांची संख्या मोजून काढली.

“‘भ्यांचोद’ ही शिवी तर आम्ही ह्या पुस्तकात दीडशे वेळा मोजली. अन् ‘च्यायला’ सव्वाशे वेळा.” असं त्यांनी सरळसरळ अग्रलेखातच छापून टाकलं. पारितोषिक देणाऱ्या मुख्यमंत्र्यांना टार्गेट केलं.

विरोधी गट सरकारला निशाणा बनवू लागल्यावर त्यांनी याची जबादारी आमदार ग. दि. माडगूळकर यांच्याकडे सोपवली गेली. 

“पुस्तक वाचून काय ते कळवा म्हणजे पुढील कारवाई करता येईल” असं त्यांनी सांगितलं.

गदिमा स्वतः एक साहित्यिक होते, म्हणून फक्त शब्दांच्या पलीकडे कादंबरी आणि लेखन काय असतं हे त्यांना ठाऊक होतं. त्यामुळेच त्यांनी या पुस्तकात काहीही अश्लील नसल्याचा निर्वाळा दिला.

त्यानंतर विरोधकांच्या मताला न जुमानता वसंतरावांनी गदिमांचा शब्द अंतिम मानून या पुस्तकावर बंदी आणली नाही. म्हणूनच भाऊंची ही कादंबरी लोकांपर्यंत पोचू शकली.

पुरस्कारांनी सन्मान…

त्यांच्या या सर्व योगदानाचा सन्मान म्हणून भारत सरकारने १९६९ साली त्यांना ‘पद्मश्री’ हा किताब बहाल केला. ‘संगीत नाटक अकादमी’ व ‘विष्णुदास भावे सुवर्णपदक’ या पुरस्कारांनी देखील गदिमांना गौरवण्यात आले. १९६९ ला ग्वाल्हेरला झालेल्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे आणि १९७३ साली यवतमाळ येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

साहित्यिक, कवी, गीतकार, पटकथालेखक, कादंबरीकार, गीतरामायणकार, राजकारणी अशा विविध स्वरूपात ग. दि. माडगूळकर यांची ओळख महाराष्ट्राला आहे. मराठी चित्रपटासाठी त्यांनी १५७ पटकथा आणि २००० पेक्षा जास्त गाणी त्यांनी लिहिली. त्यातही त्यांची प्रतिभा, सहज सोपे शब्द, भावसंपन्न आणि मराठी मनाला सदैव मोहिनी घालणारी रचना यामुळे ते श्रेष्ठ ठरले. अशाच श्रेष्ठ साहित्यिक, समाजसेवक, पत्रकार या विभूतींची ओळख आपण या सिरीजमधून करून घेत आहोत. 

लवकरच भेटूया पुढच्या भागात….

हे ही वाच भिडू….

Leave A Reply

Your email address will not be published.