पवारांविरोधात ट्रकभर पुरावे असल्याचा दावा करणाऱ्या खैरनार यांच पुढं काय झालं ?

एक काळ होता तेव्हा शरद पवारांच्या विरोधाच ट्रकभर पुरावे गोळा केल्याचा दावा एका अधिकाऱ्यांनी केला होता. प्रत्यक्षात तो ट्रक गॅरेजमधून कधी बाहेर आलाच नाही.

त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांच्या विरोधात बैलगाडी भरून पुरावे असल्याचा दावा केला. पुराव्यांची संख्या कमी झाली पण पुढे अजित पवारांना त्याच आरोपांमधून क्लिनचिट मिळाली, त्यानंतर आला तो आत्ताचा डिजीटल इंडिया…!!

डिजीटल इंडियात देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याकडे ६.३ जीबीचा डेटा भरून पुरावे असल्याचे सांगितले. या पुराव्यांच काय होईल ते पुढे कळेलच पण तुर्तास अशाच एका ट्रकभर पुराव्यांची गाथा आपल्यापुढे मांडत आहोत… 

कितीही मोठा सेलिब्रिटी असो किंवा बिल्डर माफिया खैरनार यांना जर अनधिकृत बांधकाम दिसले तर त्यांचा हमखास हातोडा पडणार याची गॅरंटी मुंबईकरांना होती.

गोविंद राघो खैरनार यांची दुसरी ओळख म्हणजे थेट मुख्यमंत्री शरद पवार यांच्याशी पंगा घेणारा अधिकारी.

नाशिकच्या कळवण तालुक्यातील पिंपळगाव येथे गरीब घरात त्यांचा जन्म झाला. अशिक्षित कुटुंब. पोराने शिकावं आणि मास्तर बनावं असं वडिलांचं स्वप्न. खैरनार लहानपणापासून हुशार होते. वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्याच्या मागं लागले.

खैरनार सांगतात,

‘‘अभ्यास करू लागल्यावर खरोखरच चांगले मार्क मिळाले आणि मास्तर व्हायचं स्वप्न आणखीन मोठं झालं. नंतर आपण ‘सर’ व्हावंसं वाटू लागलं. पुढे तर प्राध्यापक झालो तर किती चांगलं, असं वाटू लागलं आणि मी शिकतच राहिलो. शिक्षण पूर्ण झाल्यावर राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन शासकीय अधिकारी बनलो.”

दहा वर्षे त्यांनी राज्यशासनाच्या शासकीय सेवेत काढली. याच काळात त्यांचं लग्नही झालं होतं. परंतु मुंबईत स्वत:चं घर नसल्यानं व पालिकेच्या नोकरीत घर मिळतं असं समजल्यामुळे शासनाची नोकरी सोडून ते मुंबई महानगरपालिकेच्या नोकरीत दाखल झाले. पुढे विभाग अधिकारीपदाची परीक्षा दिली.

आणि त्यानंतर खैरनार नावाच्या वादळाची सुरवात झाली.

१९७६ बीएमसी वॉर्ड ऑफिसर बनल्यापासून त्यांनी अनधिकृत फेरीवाल्यांपासून ते अनेक अवैध धंद्यांवर कारवाई करायची असा रोजचा उपक्रम सुरू केला. पालिकेच्या इतर कर्मचाऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांची मोलाची साथ देखील घेतली होती.

त्याकाळी मुंबईच्या गुन्हेगारी वर्तुळामध्ये वरदराजन मुदलियार ऊर्फ ‘वरदाभाई’  याच मोठं वजन होतं. अगदी पोलिसांच्यापर्यँत त्याचे हात पोहचले होते. खैरनार यांनी त्याच्या अवैध धंद्यांवर कारवाई केली. तेव्हा वरदाभाई ने त्यांच्यावर जीवघेणे हल्ले केले. पण खैरनार मागे हटले नाहीत.

एके दिवशी हा वरदाभाई थेट खैरनार यांच्या बीएमसीमधल्या ऑफिसमध्ये आला आणि त्यांना लाच देण्याची आणि संरक्षणासाठी रिव्हॉल्व्हर देण्याची भाषा करू लागला. एकदा तर एका बडय़ा पोलीस अधिकाऱ्याच्या घरातच वरदाभाईच्या उपस्थितीत, ‘वरदाभाईशी जुळवून घ्या,’ असा सल्लाही खैरनार यांना देण्यात आला.

पण हट्टी स्वभावाचे खैरनार त्यांची ही भाषा समजतच नव्हते. हातोडा घेऊन कोणतंही अतिक्रमण ‘मोडून काढणे’ एवढंच त्यांना ठाऊक होते. अर्थात त्याची किंमतही त्यांना मोजावी लागली.

साधारण याच काळात मुंबईत अनधिकृत बांधकामांचा पेव फुटलं होतं. ठिकठिकाणी बिल्डर आपल्या टोलेजंग इमारती उभ्या करत होते. राजकारण्यांचा त्याला वरदहस्त होताच मात्र अंडरवर्ल्डमधील स्मगलरदेखील या व्यवसायात उतरत होते. बांधकाम व्यवसायाची काळी किनार गडद होत होती.

१९८५ साली दादरला अचानक खैरनार यांच्यावर गोळीबार झाला. पायात गोळी घुसली. या हल्ल्यामागे वरदाभाई आणि तत्कालीन काही राजकीय नेते होते, हे सर्वाना माहित होत मात्र कोणावरही तेव्हा ठोस कारवाई झाली नाही.

गो.रा.खैरनार मात्र हिंमत हरले नाहीत. त्यांनी आपला हातोडा सुरूच ठेवला. 

महापालिका आयुक्त म्हणून शरद काळे यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी संपूर्ण मुंबईतील अतिक्रमणविरोधी कारवाईची जबाबदारी खैरनार यांच्यावर सोपवली. इथून त्यांचा धडाका जोरात सुरु झाला.

डोक्यावर पांढरे हेल्मेट आणि हातात लाकडी दंडुका घेऊन खैरनार कार्यालयाबाहेर पडले की दूरवरच्या फूटपाथवर लगेचच खबर जाई आणि खैरनार तिथे पोहोचण्याआधीच फेरीवाले गायब झालेले असत. अगदी आपल्या मुलीच्या लग्नाच्या दिवशीही अक्षता टाकून ते दादर भागातील अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी निघून गेले होते.

खैरनार यांची प्रसिद्धी फक्त मुंबईतच नाही तर देशातल्या मीडियामध्ये गाजू लागली.

याकाळात त्यांनी  कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमची मेहजबीन मॅन्शन ही वादग्रस्त इमारत तर पाडलीच, शिवाय भेंडीबाजार, पाकमोडिया स्ट्रीट, महमद अली रोड या ठिकाणी अनधिकृत फेरीवाल्यांवरही कारवाई सुरू केली. आजवर ज्यांच्याकडे मान वर करून बघायची कुणाची हिंमत नव्हती, तेथे खैरनार  घुसत होते.

त्यांच्यामते त्याकाळच्या सत्ताधाऱ्यांना या कारवाया पसन्त पडत नव्हत्या. अनधिकृत बांधकाम पडताना पोलिसी संरक्षण देण्यास टाळाटाळ करणे अशा गोष्टी घडत होत्या. खैरनार यांची कोंडी होत होती, त्यातून ते अस्वस्थ होत गेले.

खैरनार सांगतात,

याच अस्वस्थतेतून मी तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलं. पवारांच्या विरोधात ट्रकभर पुरावे असल्याचं मी बोललो आणि मीडियात त्याची जोरदार चर्चा सुरू झाली.

शरद पवारांचे दाऊद इब्राहिम बरोबर संबंध असल्याचा त्यांनी उल्लेख केला आणि राजकारणाचा सारा नूरच बदलून गेला. विधानसभेत विरोधकांनीही घणाघाती हल्ले करण्यास सुरुवात केली. यातूनच सेना-भाजपला १९९५ मध्ये सत्ता मिळाली. पवारांची मुख्यमंत्रीपदाची जाण्यामागे एक अर्थे गो.रा.खैरनार कारणीभूत ठरले.

तेव्हाच्या मिडियासाठी खैरनार हे हिरो झाले होते. वन मॅन आर्मी म्हणून त्यांचा उल्लेख होत होता. 

मात्र या दरम्यानच्या काळात खैरनार यांच्यावर अधिकाराचा गैरवापर आणि बेछूट विधाने केल्याबद्दल कारवाई झाली. त्यांना निलंबित करण्याचा निर्णय शासनाने घेतला. कोर्टात याबद्दल केस चालली मात्र खैरनार यांच्याबाजूने निर्णय येऊनही त्यांना परत रुजू करून घेतले गेले नाही. ज्या खैरनार यांनी रान उठवल्याचा फायदा घेत युतीची सत्ता आली होती त्यांनीच खैरनार यांना साथ दिली नाही.

खैरनार हे अण्णा हजारेंच्या सोबत भ्रष्टाचार विरोधी आंदोलनात उतरले. दोघांनी राज्यभर चळवळी केल्या. मात्र थोड्याच दिवसात खैरनार यांचे अण्णा हजारेंच्या बद्दलच मत बदललं. त्यांनी या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाची साथ सोडली.

६ वर्षे अखंड लढा दिल्यावर निवृत्त होण्यापूर्वी सहा महिन्यांसाठी त्यांना परत कामावर रुजू करण्यात आले. या सहा महिन्यातदेखील त्यांनी आपला हातोडा जोरात चालवला. अनाधिकृत बांधकामे पाडण्यात कोणतीही कसूर केली नाही.

निवृत्तीनंतर त्यांच्यापुढे सर्वात मोठा प्रश्न होता तो म्हणजे घराचा. मुंबईत किंवा गावीही त्यांच्याकडे घर नव्हतं. यादरम्यान, एका अनिवासी भारतीय व्यक्तीचा अमेरिकेतून त्यांना फोन आला. भूकंपग्रस्त भूजमध्ये हि संस्था काम करत होती. जवळपास दीड वर्ष खैरनार यांनी तिथे काम केलं. पाकिस्तान सीमेजवळील कुरणगाव वसविण्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारली.

साबरकाठ जिल्ह्य़ातील बायडा तालुक्यात एका आश्रमात राहून त्यांनी भूकंपाचा धक्का सहन करेल अशी शेकडो घरे उभी केली. उध्वस्त गावे पुन्हा निर्माण केली.

पुढे मतभेद झाल्यामुळे ते त्या संस्थेतून बाहेर पडले. एका मुलाखती मध्ये ते सांगतात

मी दुसऱ्या एका संस्थेत काम सुरू केलं. रुग्णालयीन व्यवस्थापनाचं ते काम होतं. मात्र ही कामं करत असताना मुंबई महापालिका कितीतरी चांगली असल्याचं माझ्या लक्षात आलं.

याकाळात त्यांची आर्थिक परिस्थिती तितकीशी चांगली नव्हती. आजारी पडल्यावर उपचारासाठी मुंबई महापालिकेच्या केईएम आणि शीव रुग्णालयांत त्यांना उपचार घ्यावे लागले. पुढे अमेरिकेतील एक अनिवासी भारतीय प्रकाश यांच्या मदतीमुळे २००४ साली जुहू येथील आयडियल अपार्टमेंटमध्ये त्यांनी घर घेतलं.

ते म्हणतात आजारपणात माझी दोन वर्षे गेली हे लक्षात घेऊन यापुढे उपजीविकेचं साधन शोधण्याचं मी ठरवलं. जनआंदोलन किंवा राजकारण हे माझं काम नाही असं माझ्या लक्षात आलं. कारण त्यासाठी मोठय़ा प्रमाणात पैसा लागतो. भ्रष्टाचार किंवा गडबड-घोटाळे केल्याशिवाय हा पैसा उभा राहू शकत नाही. म्हणूनच घरी बेकार बसण्यापेक्षा सल्लागार म्हणून कुठंतरी काम करण्याचा निर्णय घेतला.

काही मंडळींनी त्यांना कार्यालयासाठी जागा दिली. अंधेरी, पवई आणि विलेपार्ले अशा तीन ठिकाणी असलेल्या कार्यालयांमधून ते प्रामुख्याने ‘एसआरए’शी संबंधित प्रकल्पांत झोपडपट्टीतील लोकांची फसवणूक होऊ नये, एसआरए योजना नेमकी कशी राबवायची, सोसायटीची स्थापना व कामकाज कशा प्रकारे करायचे, आर्किटेक्टची नेमणूक तसेच म्हाडामध्ये पाठपुरावा कसा करायचा, यासंदर्भात सल्ला देण्याचं काम करतात.

आता वयाच्या सत्तरीमध्ये त्यांनी समाजकारण आणि राजकारण बाजूला सारलं आहे.

अण्णा हजारेंच्या आंदोलनाची तर त्यांनी जाहीर टर उडवली. अण्णा उपोषण करताना हळूच काही तरी पदार्थ टाकून ज्यूस पितात, त्यांच्याकडे गाड्या कुठून आल्या असे प्रश्न खैरनार विचारताना दिसतात. आपल्या पत्नीला व मला समाधानानं जगता आलं पाहिजे एवढीच आता माझी अपेक्षा आहे. भोवतालच्या ढोंगी जगापासून लांब राहणंच चांगलं, असं ते ठणकावून सांगतात.

संदर्भ- एकाकी झुंज गो.रा.खैरनार यांचे आत्मचरित्र / लोकसत्ता दिवाळी अंक 

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.