फक्त थम्स अप पितो म्हणून दादाला चान्स दिला जात नव्हता
कोणाला कशाशी प्रॉब्लेम असेल सांगता येत नाही. सौरव गांगुली हे तर सुरवातीपासून controvercy चं दुसर नाव. सुरवातीच्या काळात अनेकांना त्याच्या प्रत्येक गोष्टीत प्रॉब्लेम असायचा. गांगुली जेव्हा पहिल्यांदा भारतीय टीममध्ये आला तेव्हा त्याने मैदानात ड्रिंक्स देण्यास नकार दिला अस म्हणून त्याला काढून टाकलं अशी अफवा होती.
तो कलकत्याच्या अतिश्रीमंत अशा महाराजा कुटुंबातील आहे. तो वशिला लावून टीममध्ये आला आहे, तो सिनियर खेळाडूंना मान देत नाही अशा तक्रारी सांगितल्या जायच्या.
खरं तर दादाची स्टाईलच अशी बिनधास्त होती की तो माज करतोय असच वाटायचं. विशेष म्हणजे प्रेक्षकांना ते आवडायचं. त्याला प्रेमाने बेंगोल टायगर म्हणायचे.
मैदानात विरोधी टीमच्या खेळाडूंना त्यांच्या भाषेत उत्तर देणारा दादा आपल्याच कोच, सिलेक्टर, बीसीसीआयचे पदाधिकारी यांच्या डोळ्यात खुपायचा.
जवळपास ५ वर्षे गांगुलीला राष्ट्रीय टीमपासून लांब ठेवलं पण १९९६ ला लॉर्ड्सवर धडाक्यात शतक ठोकून त्याने पुनरागमन केलं. तिथून कधी मागे वळून पाहिलं नाही. सचिन सोबत ओपनिंग ला जाऊ लागला, या दोघांनी जगभरातल्या सगळ्या दिग्गज बॉलर्सना फोडून काढलं. अनेक विक्रम प्रस्थापित केले.
हाच काळ भारतीय टीम मोठ्या स्थियंतरातून जात होती.
भारतीय टीमचा कप्तान मोहम्मद अझरुद्दीन याचे नाव मॅच फिक्सिंगमध्ये समोर आले. अनेक खेळाडूंच्या सहभागाची शक्यता बोलून दाखवली गेली. भारतीय पोलीस हे सगळं प्रकरण खणून काढण्यासाठी जीव तोडून प्रयत्न करत होते.
मनोज प्रभाकरच स्टिंग ऑपरेशन, हँसी क्रोनिएची फिक्सिंगची कबुली पण काही दिवसातच झालेला मृत्यू अस बरच काय काय घडत होतं. सगळ्या जगाचं लक्ष भारताकडे होतं.
अझरुद्दीनच्या गच्छंती नंतर सचिन तेंडुलकरकडे भारतीय टीमची कप्तानी देण्यात आली.
त्याने यापूर्वी कॅप्टनसी केली होती पण शांत सज्जन सचिनला हे प्रकरण झेपणारे नव्हते. करोडो प्रेक्षकांच्या अपेक्षा, मिडियाचा दबाव यात सचिनचा स्वतःचा खेळ बिघडत चालला होता. अशा आणीबाणीच्या प्रसंगी त्याच्या मदतीला उपकप्तान कोणाला करायचे हा प्रश्न पुढे आला.
तेव्हाचे निवड समितीचे सदस्य असलेले अशोक मल्होत्रा यांनी स्पोर्ट्सकिडा या वेबसाईटला दिलेल्या मुलाखती मध्ये गंमतीशीर किस्सा सांगितलं आहे.
कोलकात्यामध्ये बीसीसीआयची मिटिंग सुरू होती. तेव्हा चर्चेत भारतीय टीमचा भावी उपकप्तान म्हणून गांगुलीच नाव समोर आलं. पण तेव्हाचे भारतीय टीमचे कोच गांगुलीसाठी तयार नव्हते. कारण विचारल्यावर त्यांचं म्हणणं होतं की,
“तो कोल्ड्रिंक खूप पितो, त्याची रनिंग बिटविन द विकेट्स स्लो आहे. तो दोन च्या जागी एकच रन धावतो.”
कोचची ही हास्यास्पद कारणे ऐकून मल्होत्रा यांना धक्काच बसला. ते म्हणाले,
“गांगुली थम्स अप पितो म्हणून त्याला चान्स द्यायचा नाही हे योग्य नाही.”
यावरून मिटिंगमध्ये बराच वादविवाद झाला. तीन जणांनी गांगुलीच्या बाजूने मत दिले तर दोन जण त्याच्या विरोधात होते. पण दुर्दैवाने तेव्हाचे बीसीसीआयचे प्रेसिडेंट यांनी हस्तक्षेप केला. हे नियमाला धरून नव्हते.
पण बीसीसीआयच्या अध्यक्षाच्या प्रभावाखाली येऊन एका सिलेक्टरने आपलं मत बदललं आणि गांगुलीची उप कप्तानीची संधी हुकली.
पण मल्होत्रा सांगतात की त्यांनी व त्यांच्या सोबतच्या दुसऱ्या सिलेक्टरने गांगुली साठी लढा दिला. अखेर काही दिवसांनी बीसीसीआयने दादाच नाव उपकप्तान म्हणून जाहीर केलं.
नेमकं थोड्याच दिवसात सचिनने प्रकृतीच्या कारणाने भारतीय टीमच्या कप्तानीचा राजीनामा दिला. योगायोगाने कुंबळे वगैरे सिनियर खेळाडू टीममध्ये असतानाही उप कप्तान असल्यामुळे भारतीय टीमच नेतृत्व गांगुलीकडे सोपवण्यात आलं.
त्यादिवशी मल्होत्रा यांनी बीसीसीआयशी वाद घातला नसता तर हे काही घडलं नसत.
बाकी काही का असेना गांगुलीला प्रत्येक गोष्ट सहजासहजी मिळाली नाही. प्रत्येक गोष्टी साठी भांडावं लागल. याच लढाऊ वृत्ती मुळे दादाने आपल्या कर्णधारपदाच्या कारकिर्दीत इतिहास घडवला. भारताला ऑस्ट्रेलिया, इंग्लंड या मोठ्या टीमला हरवण्याचा आत्मविश्वास मिळवून दिला.
हे ही वाच भिडू.
- गांगुलीची जेव्हा पहिल्यांदा टीम मध्ये निवड झाली तेव्हा त्याच्या घरचे दुःखी होते .
- गांगुलीने रिकी पॉंटिंगचा छापा काट्यामध्ये पोपट केला होता.
- आणि त्या दिवशी गांगुली आणि सचिननं मॅच फिक्सिंगला हरवलं !!
- ड्रिंक्स देत नाही म्हणून गांगुलीला टीममधून बाहेर काढलं ते खोटं होतं, हे आहे खरं कारण !