Google ने लोकांना कामावरून तर काढलंय पण वाऱ्यावर सोडलेलं नाहीये…कसं तर कसं

२०२२ मध्ये अनेक बड्या कंपन्यांनी कर्मचारी कपात करण्यासाठी लोकांना कामावरून काढून टाकलं. कंपन्यांची आर्थिक परिस्थिती ठीक नसल्याचं कारण देत कर्मचारी कपात करण्यात आली होती.

आता ही कर्मचारी कपातीचं संकट २०२३ मध्येही सुरूच आहे.

आधी मायक्रोसॉफ्ट सारख्या मोठ्या कंपनीने १०,००० कर्मचारी कमी करत असल्याची घोषणा केली. त्यानंतर आता गूगल या जगातल्या सगळ्यात भारी सर्च इंजिन असलेल्या कंपनीतून तब्बल १२,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

२०२२ साली अ‍ॅमेझॉन, ट्विटर मेटा म्हणजेच फेसबूक, व्हॉट्सअ‍ॅप आणि इंस्टाग्रामसारखी अ‍ॅप्स चालवणारी कंपनी अशा अनेक कंपन्यांनी कर्मचारी कपात केली होती.

या कर्णाचारी कपातीचा ट्रेंड हा जगावर आर्थिक मंदी आल्याची चर्चाही आंतरराष्ट्रीय पातळीवर झाली. त्यातच आता नवीन वर्षातही या दोन मोठ्या कंपन्यांनी कर्मचारी कपातीची घोषणा केल्यामुळे आता हे सावट अजूनही कायम असल्याचं दिसतंय.

गूगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी कर्मचाऱ्यांना एक मेल पाठवून यासंदर्भातली माहिती दिली आहे.  या ईमेलध्ये सुंदर पिचाई यांनी म्हटलंय,

“तुम्हाला सगळ्यांना सांगण्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे. आम्ही गूगलमधून १२,००० कर्मचारी कमी करायचे ठरवलंय. खरंतर, गेल्या दोन वर्षांत आपण सर्वांनी मोठी ग्रोथ बघितलीये. असं असलं तरी आजची परिस्थिती काही वेगळीच आहे. त्यामुळेच आम्ही हा निर्णय घेतलाय.”

या शिवाय त्यांनी याबद्दल दु:ख व्यक्त करत कर्मचाऱ्यांची माफीही मागितली आहे.

ज्या ज्या कंपन्यांनी २०२२ आणि आता २०२३ च्या सुरूवातीला कर्मचारी कपात केली त्या सर्व कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकतांना आर्थिक परिस्थितीचीचं कारण दिलं होतं. शिवाय, त्यांनी कर्मचाऱ्यांना ही बाब सांगण्यासाठी अशाच प्रकारे सीईओ किंवा मोठ्या अधिकाऱ्याकडून मेल्स पाठवले होते. असं असलं तरी, गूगलने या बाकी सगळ्या कंपन्यांपेक्षा काहीतरी वेगळं केलंय.

गूगलने आपल्या अमेरिकेतल्या कर्मचाऱ्यांना काढताना अनेक सुविधा द्यायचं ठरवलंय.

या सुविधा आर्थिक स्वरुपातल्या तर आहेतच याशिवाय आणखीही अनेक सुविधा या कर्मचाऱ्यांना देण्याचं गूगलने ठरवलंय.

या सुविधा नेमक्या कोणत्या स्वरुपातल्या असणार आहेत ते बघुया.

  • १६ आठवड्यांचा पगार दिला जाईल.
  • १६ आठवड्यांच्या पगाराशिवाय जितकी वर्ष गूगलसोबत काम केलं असेल त्या प्रत्येक वर्षासाठी प्रत्येकी २ आठवड्यांचा पगार दिला जाईल.
  • २०२२ सालचा बोनस दिला जाईल.
  • ६ महिन्यांसाठी आरोग्य विमा दिला जाईल.
  • नवी नोकरी शोधण्यासाठी मदत केली जाईल.
  • इतर देशांमधून आलेल्या कर्मचाऱ्यांना विशेष मदत केली जाईल.

या सुविधा गूगल कंपनीसाठी काम करत असलेल्या अमेरिकेतील कर्मचाऱ्यांना दिल्या जाणार आहेत. अमेरिकेशिवाय इतर ठिकाणी काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांना जिथल्या तिथल्या कॉन्ट्रॅक्ट्स आणि स्थानिक कायद्यांनुसार सुविधा दिल्या जातील.

सुंदर पिचाई यांनी सांगितल्याप्रमाणे अमेरिकेतल्या कर्मचाऱ्यांना आधीच याबाबत कल्पना दिली आहे. अमेरिके बाहेरच्या कर्मचाऱ्यांविषयी त्यांनी म्हटलंय, ‘प्रत्येक ठिकाणच्या स्थानिक कायद्यांनुसार त्या त्या त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढायला वेळ लागेल.’

शिवाय ही नोकर कपात कोणत्या एका डीपार्टमेंटमधून किंवा एका पातळीवरील कर्मचाऱ्यांची होत नसून यात, वेगवेगळ्या डीपार्टमेंटमध्ये काम करणारे वेगवेगळ्या स्तरावरचे कर्मचारी असल्याचंही वृत्त आहे.

आतापर्यंत नोकरकपात केलेल्या कंपन्यांमध्ये प्रगती झाल्याचं पाहायला मिळालंय.

अगदी उदाहरण देऊन सांगायचं झालं तर, मेटा कंपनीने ९ नोव्हेंबर २०२२ ला ११,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढल्यापासून कंपनीच्या शेअर्समध्ये ३५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. शिवाय, अ‍ॅमेझॉन कंपनीने १८,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढल्यापासून कंपनीच्या शेअर्समध्ये १३ टक्कयांनी वाढ झाली आहे.

तज्ज्ञांच्या मते या टेक कंपन्यांनी भविष्यात मार्केटमध्ये मंदी येणार आहे हे लक्षात न घेता आधी मोठ्या प्रमाणावर खर्च केला आणि त्यामुळेच आता या जगातल्या सगळ्यात मोठ्या समजल्या जाणाऱ्या टेक कंपन्यांमधून आता कर्मचारी कपात करण्याची गरज भासतेय.

त्यामुळेच गूगलनेही आता कर्मचारी कपात केली असल्याचं बोललं जातंय. तज्ज्ञांच्या मते हा निर्णय योग्य आहे. या निर्णयामुळे गूगल कंपनीचा फायदा शकतो असंही बोललं जातंय.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.