भाजप पासून ते काँग्रेसपर्यंत सर्वांचेच लाडके जीपी सिंग राष्ट्रद्रोही ठरवले गेलेत.

छत्तीसगडचे माजी अतिरिक्त पोलिस महासंचालक जी.पी. सिंग यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झालाय. प्रत्येक राज्य सरकारच्या मग ते भाजप सरकार असो वा काँग्रेस सरकार, सिंग नेहमीच सगळ्यांच्या गुड बुक्स मध्ये राहणारे अधिकारी आहेत.

सिंग हे १९९४ च्या बॅचचे संबलपूर ओडिशाचे आयएएस अधिकारी आहेत. सदैव सत्तेच्या वर्तुळात असणाऱ्या अधिकाऱ्यांपैकी एक असे जी.पी. सिंग हे टेक्नोक्रैट असून राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (पूर्वी आरईसी) राउरकेला चे पासआउट आहेत.

१९९० मध्ये आरईसी राउरकेला येथून मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतल्यानंतर सिंग यांनी टेल्कोमध्ये काही दिवस काम केलं. १९९४ मध्ये त्यांची भारतीय पोलिस सेवेत (आयपीएस) निवड झाली आणि त्यांना छत्तीसगड केडर मिळाले.

छत्तीसगडमध्ये १५ वर्षे सत्तेत असणारे भाजपाचे रमणसिंग सरकार असो वा २०१८ मध्ये सत्तेत आलेले कॉंग्रेसचे बघेल सरकार असो. जी.पी सिंग दोन्ही बाजूंचे लाडके अधिकारी होते.

सिंह यांना भाजप सरकारकडून रायपूर, बिलासपूर, दुर्ग, नक्षलवादी बस्तर अशा मोठ्या जिल्ह्यात एसपी, डीआयजी आणि आयजी यासारख्या महत्त्वाच्या पदांवर नियुक्त करण्यात आले होते.

तर विद्यमान भूपेश बघेल सरकारने फेब्रुवारी २०१९ मध्ये राज्याची सूत्रे हाती घेतली, तेव्हा सिंग यांची नियुक्ती महत्त्वपूर्ण अशा एन्टी करप्शन ब्यूरो (एसीबी) च्या प्रमुखपदी झाली.

राज्यांच्या प्रशासकीय विभागात असं मानलं जातं की मुख्यमंत्र्यांचा आवडता अधिकारी एसीबीचा प्रमुख बनतो.

जी.पी.सिंग एसीबीचे प्रमुख असताना बघेल सरकारने नान घोटाळ्यातील माजी डीजीपी मुकेश गुप्ता यांच्याविरूद्ध एफआयआर दाखल केली होती. जी.पी.सिंग यांच्या कार्यकाळातच माजी मुख्यमंत्री रमणसिंह यांचे प्रधान सचिव असलेले अमन सिंग आणि त्यांच्या पत्नीवर बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात एफआयआर दाखल करण्यात आली होता.

हे दोन्ही खटले अद्याप कोर्टात प्रलंबित आहेत. गुप्तांचा खटला सर्वोच्च न्यायालयात सुरु असून अमन सिंग यांना हायकोर्टाकडून दिलासा मिळाला आहे.

सिंग एसीबी प्रमुख असताना माजी मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिवाविरोधात एफआयआर तर झाली, पण सरकार त्यापलीकडे काहीही करू शकले नाही.

त्यानंतर आता याच राज्य सरकारने अतिरिक्त पोलिस महासंचालक (एसीबी) सिंग यांना काढून त्यांची राज्य पोलिस अकादमीचे संचालक म्हणून बदली केली.

असं म्हंटल जातं की मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी सिंग यांच्याविरोधात त्यांच्याच एका मंत्र्यांनी आणि काही अधिकाऱ्यांनी तक्रारी ऐकून सिंग यांना एसीबीमधून काढून टाकले.

सिंह यांच्या एसीबी प्रमुखपदाच्या १ महिन्याच्या कार्यकाळात त्यांच्यावर बेकायदेशीर वसुली आणि कोट्यावधी रुपयांची मालमत्ता गोळा केल्याच्या आरोपांवरुन एसीबीने जूनमध्ये गुप्त चौकशी सुरू केली होती. या तक्रारी खऱ्या असल्याचे तपासणीनंतर सिद्ध झाले.

एसीबी आणि राज्याच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेने रायपूर, राजनांदगाव, भिलाई येथील जीपी सिंग यांच्या अधिकृत निवासस्थानावर आणि ओडिशामध्ये सिंग यांच्याशी संबंधित असलेल्या जवळपास १५ ठिकाणी छापा टाकला.

सुमारे ६८ तासाच्या अविरत शोधानंतर एसीबीने सांगितले की, बेकायदेशीर बेनामी मालमत्ता, बेकायदेशीर व्यवहाराशी संबंधित कागदपत्रे, अनेक बँक खाती, अवैध दागिने, ओडिशा खाणींमध्ये गुंतवणूक आणि मनी लॉड्रिंगचे पुरावे सापडले आहेत.

एसीबीच्या म्हणण्यानुसार सुमारे दहा कोटींची अवैध मालमत्ता तसेच सरकारविरूद्ध कट रचल्याची कागदपत्रेही सिंग यांच्याकडे सापडली आहेत.

छाप्यात सापडलेल्या कागदपत्रांच्या आधारे रायपूर पोलिसांनी ३ जुलै रोजी एडीजीपी सिंगविरोधात एफआयआर दाखल केली. आणि सरकारने त्यांना ५ जुलै रोजी त्यांना निलंबित केले. निलंबनानंतर सरकारने ८ जुलैला सिंग यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हादेखील दाखल केला.

८ जुलै रोजी रायपूर पोलिसांनी सिंग यांच्या विरोधात कलम १२४ आणि कलम १५३ अंतर्गत रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे. कलम १२४ अन्वये लोकशाही सरकारविरुद्ध फौजदारी कट रचल्याची आणि १५३ अंतर्गत अशी कामे ज्यामुळे समाजात असंतोष पसरवला जाईल अशा आरोपांखाली सिंग यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

या आरोपांवर सिंग म्हणातात,

‘मला या प्रकरणांत मुद्दाम दोषी ठरविलं जात आहे’

यात विशेष म्हणजे सिंग यांनी आपल्यावर झालेल्या आरोपांविरोधात केलेल्या याचिकेत दाखल केलेले खटले मागे घेण्याची विनंती केलीच नाही. पण सीबीआय किंवा स्वतंत्र एजन्सीमार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे.

सिंग यांनी आपल्या याचिकेत म्हटले आहे की, ‘ज्या कागदपत्रांच्या आणि डायरीच्या आधारे त्याच्यावर गुन्हा नोंदविला गेला आहे, ते सर्व जुनी कचऱ्यात टाकलेली कागदपत्र आहेत.’

त्यामुळं अति लाडके ते आता देशद्रोही ठरवले गेलेल्या सिंग यांच्याविरोधात छत्तीसगड सरकार काय करणार याकडे सर्वांचचं लक्ष लागलंय.

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.