लगान, गंगाजल, मुन्नाभाई MBBS नंतर केआरके चा देशद्रोही करुन ती कायमची बाद झाली

लगान, गंगाजल, मुन्नाभाई MBBS आणि त्यानंतर कमाल आर खानचा,

देशद्रोही….

काय चॉईस असावी एखाद्याची. म्हणजे या तीन सिनेमांसाठी स्पॉटबॉयचं काम केलेला माणूस देखील देशद्रोही सिनेमासाठी स्पॉटबॉयचं काम करणार नाही पण तिने ते केलं आणि गंडली. बॉलिवूडमध्ये सर्वांधिक गंडलेली हिरोईन कोण अस विचारलं तर क्रमांक एकवर नाव लागतं तीच ती,

ग्रेसी सिंग… 

कधीकाळी ग्रेसी सिंगचा सिनेमा ऑस्करसाठी नामांकित झाला होता. लगान या भारतीय फिल्म सृष्टीत मैलाचा दगड ठरलेल्या सिनेमातून ती समोर आलेली. त्यानंतर गंगाजल या अजय देवगणच्या सिनेमात ती झळकली होती. त्यानंतर संजय दत्तच्या मुन्नाभाई MBBS या सिनेमातून तीने बॉलिवूडचा एक चढता ग्राफ तयार केला….

आणि एकदमच… 

ग्रेसी सिंगच आयुष्य अस झालं. एकदमचं तिचा कार्यक्रम गंडला. तो का गंडला, कशासाठी गंडला आणि तिने आपल्या पायावर धोंडा कसा मारून घेतला हे सांगण्यासाठीच तिची ही स्टोरी…

ग्रेसी सिंग दिल्लीच्या पंजाबी कुटूंबातली.

त्यांचे वडील स्वर्ण सिंह दिल्लीच्या एका प्रायव्हेट कंपनीत चांगल्या पदावर काम करत होते. आई शाळेत शिक्षिका होती. लहानपणापासून भरतनाट्यम् शिकणारी ती मुलगी. पुढे ग्रेसीने दिल्लीच्या एका कॉलेजमध्ये आर्ट्स शाखेत प्रवेश घेतला. तिथे प्लॅनेट नावाच्या एका डान्स ग्रुपमध्ये ती जॉईन झाली.

कॉलेजमध्ये शिकता शिकता ती याच डान्स ग्रुममार्फत परफॉर्मन्स करायला वेगवेगळ्या ठिकाणी जायची. एका दौऱ्यावेळी तिची ओळख संजीव भट्टाचार्य यांच्यासोबत झाली. संजीव भट्टाचार्य यांनी तिला पहिला ब्रेक दिला.

त्या टिव्ही सिरियलचं नाव होतं अमानत. यामध्ये डिंकीची भूमिका ती करायची. त्याच बरोबर ती वेगवेगळ्या ऑडिशन द्यायला जायची. त्यामुळे हुतूतू आणि हम आपके दिल मैं रहते हैं या दोन्ही सिनेमात तिला छोटा रोल मिळाला.

एक दिवस आशुतोष गोवारीकर हे नवा सिनेमा करत आहेत व त्यासाठी ऑडिशन असल्याची माहिती तिला मिळाली.

बघुया म्हणून ती गेली आणि सिलेक्ट झाली. त्यानंतर तिला कळालं की आपणासमोर अमिर खान असणार आहे.

हा तिच्या आयुष्याचा टर्निंग पॉईन्ट ठरला.

लगान रिलीज झाला. प्रत्येकाला हा पिक्चर आवडला. पण नवीन हिरोईन म्हणून ग्रेसीची वेगळीच चर्चा झाली. त्यानंतर तिने अमिताभ बच्चन आणि अनिल कपूर असणारा अरमान नावाचा पिक्चर साईन केला. हा पिक्चर आपटला. त्यानंतर आला तो गंगाजल. हा पिक्चर मात्र अजय देवगणने गाजवला. पण ग्रेसीची या सिनेमात देखील चांगली चर्चा झाली.

लगान ऑस्करला गेलेला तर गंगाजलला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. दोन्ही सिनेमे बॉक्स ऑफिसवर पण हिट ठरले. या सिनेमांमुळे बॉलिवुडच्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये तिची गणना होवू लागली.

त्यानंतर आला तो मुन्नाभाई MBBS.

या पिक्चरने ग्रेसी वेगळ्याचं उंचीवर पोहचली. आत्ता तिच्या घरापुढे निर्मात्यांची लाईन लागू लागली. पण ज्या सिनेमात अंगप्रदर्शन करायला लागेल असे सिनेमेचं करणार अस ती सांगू लागली. त्यामुळे सिनेमे साईन करताना तिने हात आखडता घेतला.

त्याचा तोटा म्हणजे २००३ मध्ये तिच्या आजूबाजूला गर्दी करणारे निर्माते २००४ मध्ये मात्र थंड पडत गेले. आपला स्टारडम टिकवून ठेवण्यासाठी नवे सिनेमे करणं गरजेचं होतं. पण ते घडलं नाही.

आत्ता मिळेल ते सिनेमे साईन करणं हेच तिच्या हातात होतं. त्यासाठी भराभर सिनेमे साईन करण्यास सुरवात केली. यात बरेच B ग्रेड सिनेमे देखील होते. अशातच देशद्रोही नावाचा तद्दन फालतू सिनेमा तिने साईन केला.

२००४ ते २००८ पर्यन्त तिची कारकिर्द झाकोळत गेली. पण २००८ साली आलेल्या देशद्रोहीने तिच्या कारकिर्दीवर शेवटचा खिळा ठोकून सत्यानाश करुन टाकला.

देशद्रोहीमुळे एकदोन सिनेमाच्या ज्या ऑफर तिला यायच्या त्या देखील बंद झाल्या. सगळं काही थांबल्यानंतर ती लहानसहान पिक्चरमध्ये काम करू लागली. त्यातूनही बंद पडल्यानंतर पुढे टेलिव्हिजनचा रस्ता पकडला.

२०१२ मध्ये माहिती आली की तीने ब्रम्हकुमारी जॉईन केलय. त्या मार्फत ठिकठिकाणी ती सांस्कृतिक कार्यक्रम करते. सध्या ती एका ॲण्‍ड टिव्हीवर येणाऱ्या संतोषी मातेच्या सिरियलमध्ये संतोषी मातेचा रोल करतेय..

हे ही वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.